ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्ना

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कीर्ती आणि मिलिंद दातार यांनी बाजारपेठेचा अभ्यास आणि आरोग्यदायी उत्पादनातील संधी लक्षात घेऊन बाटली बंद ऊसरस, तसेच ऊसाच्या रसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्ना ही ‘रेडी टू ड्रिंक’ उत्पादने विकसित केली आहेत.
sugar cane juice processing.
sugar cane juice processing.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कीर्ती आणि मिलिंद दातार यांनी बाजारपेठेचा अभ्यास आणि आरोग्यदायी उत्पादनातील संधी लक्षात घेऊन बाटली बंद ऊसरस, तसेच ऊसाच्या रसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्ना ही ‘रेडी टू ड्रिंक’ उत्पादने विकसित केली आहेत.

खेडेगाव असो की शहर, आपल्याला ऊस रसवंती   दिसतेच. या ऊस रसाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे ध्येय निश्चित करून  कीर्ती आणि मिलिंद दातार यांनी ऊस रसाचा ‘केन बॉट’ हा ब्रॅण्ड तयार केला. बाजारपेठेचा अभ्यास आणि आधुनिक यंत्रणांचा वापर करत त्यांनी उत्पादन विकसित केले आहे. गेल्या दहा वर्षातील टप्याबाबत कीर्ती दातार म्हणाल्या, की आम्ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात असल्याने जगभर फिरलो. परदेशी बाजारपेठेत स्थानिक पदार्थ, पेय उत्पादनांचे विविध ब्रॅण्ड पाहिले. त्यांची गुणवत्ता, आरोग्यदायी गुणधर्मदेखील चांगल्या दर्जाचे होते. गेल्या दहा वर्षांपासून पुण्यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असताना एक दिवस रसवंतीवर ऊस रस पीत असताना समोरच ब्रॅंडेड कॉफी शॉप दिसले. तेथील ग्राहक विविध प्रकारच्या कॉफीचा आस्वाद घेत  फोटो काढत होते.तेव्हा सहज मनात विचार आला, की कॉफीला जशी शहरी ग्राहकांमध्ये क्रेझ आहे, तशी आरोग्यदायी ऊसरसाला मिळविता येईल का? त्यादृष्टीने आम्ही अभ्यास सुरू केला. स्वच्छता आणि प्रक्रिया उद्योगाचे नियम पाळत आरोग्यदायी पद्धतीने रसनिर्मिती करून ग्राहकांपर्यंत ऊसरस पोहोचविण्यासाठी प्रकल्प आराखडा आणि बाजारपेठेचा अभ्यास केला. यामध्ये असे लक्षात आले, की गुणवत्तापूर्ण ऊसरसाचा ब्रॅण्ड असेल, तर निश्चितपणे कृत्रिम शीतपेयाकडे वळलेला युवा वर्ग, ग्राहक ऊस रसाकडे जास्त प्रमाणात वळेल. दीड वर्ष आम्ही रसवंती आणि ऊसरस विक्रीचे आर्थिक गणित आणि ऊस उत्पादक ते ग्राहक या प्रवासाचा अभ्यास केला. रसाची गुणवत्ता चांगली असणारी ऊस जात, प्रक्रिया तंत्राची माहिती ऊस तज्ज्ञ, शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. कोइमतूर येथील ऊस संशोधन संस्थेला भेट देऊन तज्ज्ञांशी चर्चा केली. ऊस जाती, रसाची गुणवत्ता टिकविण्यासाठी संशोधनाचा अभ्यास झाला.  तयार केला ऊस उत्पादक गट  नोकरी सुरू असतानाच कीर्ती आणि मिलिंद दातार हे दर शनिवार-रविवारी पुण्याजवळील ऊस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांना भेट देऊन चर्चा केली. ऊसरसनिर्मिती उद्योग पूर्ण वर्षभर चालवायचा असल्याने त्यादृष्टीने एकाच परिसरातून एकाच जातीचा गुणवत्तापूर्ण स्वच्छ उसाची उपलब्धता होणे गरजेचे होते. शेतकऱ्यांच्या बरोबरीने झालेल्या चर्चेनुसार दौंड पट्ट्यात वर्षभर एकाच जातीचा, योग्य गुणवत्तेचा ऊस उपलब्ध होईल असे लक्षात आले. उद्योगाची मागणी लक्षात घेऊन दातार यांनी शेतकरी गटाबरोबरीने करार केला. वर्षभर को-८६०३२ उसाचा पुरवठा होण्यासाठी आराखडा तयार केला. शेतकरी गटाला प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने कोणत्या गुणवत्तेचा ऊस लागेल,त्याची तोडणी, साळवणी आणि प्रतवारीची तांत्रिक माहिती देण्यात आली. साधारणपणे २०१२ मध्ये दोघांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी सोडून खऱ्या अर्थाने ऊसरसनिर्मिती उद्योगाला सुरुवात केली. ऊसरस विक्रीमध्ये वेगळेपण जपण्यासाठी ‘केन बॉट’ हा ब्रॅण्ड आणि विक्री प्रमाणपत्र देखील मिळविले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये विक्री  विक्रीबाबत कीर्ती दातार म्हणाल्या,की दौंड पट्ट्यातील शेतकरी गटाकडून योग्य दर्जाचा साळलेला ऊस रिफर व्हॅनमधून पुण्यातील आमच्या प्रक्रिया केंद्रात आणण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी आम्ही एक क्विंटल ऊस आणून रसनिर्मिती सुरू केली. टप्प्याटप्प्याने दररोज एक टन ऊस पुरवठ्याचे नियोजन झाले. पूर्वी आम्ही शेतकऱ्यांकडून ऊस साळून आणायचो. परंतु आता शेतातून योग्य पद्धतीने प्रतवारी झालेला ऊस प्रक्रिया केंद्रात येतो. स्वयंचलित यंत्रांच्या माध्यमातून एका तासामध्ये एक टन ऊस साळून, तुकडे होऊन त्यापासून रसनिर्मिती होते. ऊसरसनिर्मितीसाठी क्रशिंग आणि ब्लेंडर यंत्रणेचा वापर केला जातो. रस विक्रीसाठी पहिल्या टप्प्यात आम्ही हिंजवडी, तळवडे येथील सहा माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या फूड कोर्टमध्ये आउटलेट  सुरू केले. वर्षभरात १२ कंपन्यांत आम्ही पोहोचलो. पहिल्यांदा कंपन्यांमधील रस विक्री केंद्रावर साळून तुकडे केलेला ऊस डीफ्रीजमध्ये ठेवला जायचा. मागणीनुसार यंत्राच्या माध्यमातून थंडगार ऊस रस काढून दिला जायचा. टप्प्याटप्प्याने ऊसरसाला विविध कंपन्यांमधून मागणी वाढली. दर दिवशी दीड टन उसापासून रसनिर्मिती सुरू झाली. या दरम्यान बंगळूरू येथील ‘आयआयएम’मध्ये नोव्हेंबर २०१९ मध्ये अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत आमच्या ऊसरसाच्या ‘केन बॉट’ ब्रॅंडची दखल घेण्यात आली. फेब्रुवारीमध्ये नवीन उद्योगांमध्ये स्पर्धा झाली होती. त्यामध्ये आमच्या ब्रॅंडला प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे हुरूप वाढला आहे. 

रेडी टू ड्रिंक’ उत्पादने  पुण्यातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये ऊस रसाला चांगली मागणी वाढत असताना दातार दांपत्याने बॉटल पॅक ऊसरस विक्रीचे नियोजन केले. पण मार्च २०२० मध्ये देशभरात लॉकडाउन सुरू झाले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील लोकांनी घरून कामकाज सुरू केल्याने कंपन्यांमधील फूड कोर्ट बंद झाले. त्यामुळे रस विक्रीची आउटलेट बंद पडली. तीन महिने ऊसरसनिर्मिती उद्योग ठप्प झाला. या अडचणीतूनही दातार दांपत्याने मार्ग काढला.  याबाबत कीर्ती दातार म्हणाल्या, की परिस्थितीचे अवलोकन करत व्यवसायाची नव्याने आखणी केली. मागील आठ वर्षांपासून उसाचा ताजा रस बॉटल पॅकिंगमध्ये कसा विक्रीस आणता येईल,याबाबत संशोधन आणि देश विदेशातील तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू होती. यामध्ये आम्हाला यश आले. उत्पादनाच्या सर्व चाचण्या आम्ही पूर्ण केल्या होत्या. लॉकडाउनमुळे कंपन्यांमधील रसविक्री बंद झाली. त्यामुळे थेट ग्राहकांपर्यंत बॉटल पॅकिंगमधील ऊसरस पुरविण्याचा विचार केला. नैसर्गिक गुणवत्ता असलेला रस एक वर्षापर्यंत शीतगृहात टिकतो. याचबरोबरीने इम्युनिटी शॉट, गन्ना पन्ना ही नवी उत्पादने विकसित केली. उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक शक्य नसल्याने सध्या ओळखीच्या प्रक्रिया उद्योगातील अत्याधुनिक यंत्रणा आम्ही भाडेतत्त्वावर वापरतो. आरोग्याच्या दृष्टीने सर्व नियम पाळून आम्ही ऊस रस, इतर उत्पादने तयार करतो.सध्याच्या काळात दरमहिना पाच हजार बॉटलची विक्री होते.      कोरोना प्रादुर्भावाच्या काळात लोकांमधील रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने काढा विकसित केला. दातार दांपत्यानेदेखील ऊसरसाचा वापर करत काढा तयार केला. याबाबत कीर्ती दातार म्हणाल्या, की आम्ही आयुष मंत्रालयातील तज्ज्ञांशी चर्चा केली. आम्ही ऊसरस, हळद, आले, लिंबूरस आदी आरोग्यदायी घटकांपासून `इम्युनिटी शॉट’ हा ‘रेडी टू ड्रिंक’ काढा तयार केला.याला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. उकडलेल्या कैरीच्या गरापासून पन्हे करणे हे नव्या पिढीमध्ये कमी होत आहे. कैरीचे पन्हे तयार करताना साखर वापरली जाते. त्यामुळे एवढी साखर शरीरात नको, म्हणून लोक अलीकडे पन्हे पिणे टाळतात. त्यामुळे पन्हेनिर्मितीसाठी साखरेऐवजी आम्ही उसाचा रस वापरला. या उत्पादनाला ‘गन्ना पन्ना’ नाव दिले. हे देखील रेडी टू ड्रिंक प्रकारातील आहे. कृत्रिम शीतपेयांना हा चांगला पर्याय आहे. वेबसाइटच्या माध्यमातून उत्पादनाचा प्रचार आणि विक्री होते. सध्या पुणे, मुंबईमधील ग्राहक, खेळाडूंना ही उत्पादने थेट घरपोहोच दिली जातात. येत्या काळात आखाती देशामध्ये ही उत्पादने निर्यात करण्याचे आम्ही नियोजन केले आहे.

- कीर्ती दातार,  ९८५०८३०७५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com