नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
नगदी पिके
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन
खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच उत्पादन मिळू शकते. खोडवा उसामध्ये पाचट कुजविणे, आंतरमशागत, खुरपणी, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर, पाणी नियोजन योग्य पद्धतीने केल्यास चांगले उत्पादन मिळते.
खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच उत्पादन मिळू शकते. खोडवा उसामध्ये पाचट कुजविणे, आंतरमशागत, खुरपणी, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर, पाणी नियोजन योग्य पद्धतीने केल्यास चांगले उत्पादन मिळते.
लागण ऊस तुटून गेल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत पट्टा पद्धतीमध्ये संपूर्ण पट्ट्यामध्ये पाचट बसवावे. सलग सरी पद्धतीमध्ये पाचट कमी असल्यास एक आड एक सरीत बसवून घेऊन सरीचा बोध (वरंबा) रिकामा करावा. अलिकडे ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी करण्याचे यंत्र मिळते. यंत्राने सर्व पाला कुट्टी करून बारीक करावा. पालाकुट्टी किंवा अखंड पाचट प्रत्येक सरीत किंवा एक सरी आड दाबावे. त्यानंतर १ लिटर कंपोस्टिंग जिवाणू संवर्धक २०० लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारावे. या पाचटावर एकरी एक गोणी युरिया आणि एक गोणी सिंगल सुपर फॉस्फेट पसरावे. त्यामुळे पाचट कुजण्यास मदत होते. सूक्ष्म जिवाणूंना नत्र व सल्फर ही अन्नद्रव्ये मिळतात. सरीमध्ये जमेल तसे पाणी द्यावे. पाचटावर माती पडेल, अशा रितीने बगला फोडाव्यात. माती व पाण्याने आर्द्रता वाढते. पाचट कुजण्याची क्रिया जलद घडते. बोधावर आलेले उसाचे बुडखे धारदार कोयत्याने जमिनीलगत तासून घ्यावेत. म्हणजे उसाचा फुटवा जमिनीतून येईल. छाटलेल्या बुडक्यावर १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. चार ते पाच महिन्यांत प्रत्येक सरीतील पाचट कुजून कंपोस्ट खत तयार झालेले असते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाचट आच्छादन म्हणून उपयोगी पडते. त्यामुळे पाणी बचत व तण नियंत्रण होते.
खताचे नियोजन
- खोडवा उसाच्या समीमध्ये पाचट ठेवल्याने अर्धी रासायनिक खताची मात्रा सरीच्या एका बाजूस पाडेगाव पध्दतीच्या पहारीव्दारे छिद्रे घेऊन पीक १५ दिवसांचे असताना द्यावी.
- खोडव्यासाठीची उर्वरित अर्धी रासायनिक खताची मात्रा सरीच्या दुसऱ्या बाजूस पाडेगाव पध्दतीच्या पहारीने छिद्रे घेऊन पीक १३० ते १३५ दिवसांचे असताना द्यावी. खत मात्रा देण्यासाठी पहारीव्दारे छिद्रे बुडख्यापासून १० ते १५ सेंमी अंतरावर १० ते १५ सेंमी खोल घ्यावीत. खत मात्रा देते वेळी वाफसा नसल्यास पाणी देऊन वाफसा आल्यानंतर खत मात्रा द्यावी.
- खोडवा पिकास लावणीच्या उसापेक्षा कमी खत मात्रा लागते. युरियामधून दिलेला नत्र पाटपाण्यातून बराच अंशी वाहून जातो. काही प्रमाणात जमिनीत खोल झिरपतो. उरलेला काही भाग खोडव्याची मुळे जेथपर्यंत पोहोचतात तिथून शोषला जातो. फॉस्फरसची शिफारस केलेली मात्रा जमिनीतून दिली तरी त्याचे जमिनीत मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण होते. त्यातून फक्त २० टक्के उपलब्धता होते.
- सर्व अन्नद्रव्ये जमिनीतून दिली तरी जमिनीच्या सामूनुसार त्यांच्या परस्परात आंतरक्रिया घडतात. परिणामी, पिकालाही अन्नद्रव्ये मिळत नाहीत. त्यामुळे सर्व फुटव्यांचे पोषण होत नाही. वाढीच्या अवस्थेत मर होण्याची शक्यता असते. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.
- अशा परिस्थितीमध्ये मुख्य अन्नद्रव्ये म्हणजेच नत्र, स्फुरद, पालाश, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे पुरवठा करावा. त्याचा चांगला परिणाम दिसतो. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या फवारणीच्या द्रावणाची तीव्रता २ ते ३ टक्के असावी. एक लिटर पाण्यात २२ ग्रॅम युरिया विरघळवला तर १ टक्का नत्र द्रावण तयार होते. हे प्रमाण चार टक्के झाले तर पिकाला हानिकारक होते. फवारणी केल्यानंतर केवळ २४ तासांत ५० टक्के नत्र पानात शोषला जातो. पुढच्या ४८ तासांत ८० टक्के शोषण पूर्ण होते. यातील ३५ टक्के नत्र कोवळ्या पालवीत राहते. उरलेला नत्र गरजेप्रमाणे वाहून नेला जातो.
- डॉ. अशोक पिसाळ, ९९२१२२८००७
विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर