उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्र

गत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने बियाण्यांची उगवणशक्ती कमी राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी घरगुती पातळीवर बियाण्याच्या उपलब्धतेसाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन केल्यास उपयुक्त ठरेल.
soyabean seed production
soyabean seed production

गत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने बियाण्यांची उगवणशक्ती कमी राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी घरगुती पातळीवर बियाण्याच्या उपलब्धतेसाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन केल्यास उपयुक्त ठरेल.

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पीक बनले आहे. खरीप २०२० मधील खरीप हंगामात ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये सोयाबीन काढणी वेळी झालेल्या पावसाने शारीरिक पक्वतेच्या अवस्थेत बियाणे भिजले. परिणामी, त्यांची उगवणशक्ती कमी राहण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी लागवडीसाठी बियाणे कमी पडण्याची शक्यता आहे. अशा वेळी उन्हाळी सोयाबीनचे बीजोत्पादन घेतल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध उपलब्ध होऊ शकेल. बीजोत्पादनासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. जमीन : सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे. अत्यंत हलक्या जमिनीत सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन येत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त आणि रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. जमिनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे. हवामान : सोयाबीन हे पीक सूर्यप्रकाशास संवेदनशील आहे. सोयाबीन पिकासाठी समशीतोष्ण हवामान अनुकूल असते. उन्हाळी हंगामामध्ये पिकाची कायिक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते. सोयाबीन पीक २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते. मात्र कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फुले व शेंगा गळतात. शेंगांची योग्य वाढ होत नाही. दाण्याचा आकार कमी होतो. वाण : पेरणीसाठी किमान ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे आवश्यक आहे.    वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ः एमएयूएस ७१, एमएयूएस १५८ व एमएयूएस ६१२ किंवा    महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ः केडीएस ७२६, केडीएस ७५३ किंवा    जवाहरलाल नेहरू कृषी विश्‍वविद्यालय, जबलपूर ः जेएस ३३५, जेएस ९३-०५, जेएस २०-२९, जेएस २०-६९, जेएस २०-११६.  वरील जातींपैकी खरिपात लागवड असेल, तर त्या बियाण्याची उगवणशक्ती तपासून घ्यावी. उत्तम उगवणशक्ती असलेले घरचे बियाणे स्वच्छ करून व बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी वापरता येईल. जमिनीची पूर्वमशागत : खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर नांगरणी करून विरुद्ध दिशेने मोगडणी करावी. नंतर पाटा मारून जमीन समतोल करावी. बीजप्रक्रिया : सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या काळात येणाऱ्या विविध रोगांपासून बचावासाठी बीजप्रक्रिया उपयुक्त ठरते. सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झीन (३७.५%) अधिक थायरम (३७.५%) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे सोयाबीनचे कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील अन्य रोगांपासून संरक्षण होते. या शिवाय बीजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी ८ ते १० ग्रॅम  प्रति किलो बियाणे या प्रमाणे वापर करता येतो. या बुरशीनाशकाच्या प्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत (ब्रेडी रायझोबियम) अधिक स्फुरद विरघळवणारे जिवाणू खत (पीएसबी) प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो किंवा द्रवरूप असल्यास १०० मि.लि. प्रति १० किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पेरणीची वेळ : उन्हाळी हंगामी सोयाबीनच्या बीजोत्पादनाकरिता डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पिकाची पेरणी करावी. जर पेरणीस उशीर झाल्यास पीक फुलोऱ्यात असताना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना म्हणजेच मार्च व एप्रिल महिन्यांत जास्त तापमानामुळे फुले व शेंगा गळ होते. दाण्याचा आकार लहान राहतो. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. पेरणीवेळी किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले असल्यास पेरणी थोडी लांबवून तापमान साधारणत: १५ अंश झाल्यानंतर पेरणी करावी. कमी तापमानात पेरणी केल्यास उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागतात.  लागवडीचे अंतर  : सोयाबीनची पेरणी ४५ × ५ सें.मी. अंतरावर व २.५ ते ३.० सें.मी.  खोलीवर करावी. पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही.  बियाण्याचे प्रमाण : सोयाबीन लागवडीसाठी हेक्टरी ६५ किलो बियाणे वापरावे. (एकरी २६ किलो).

अन्नद्रव्य व्यवस्थापन  

सेंद्रिय खते   सोयाबीनसाठी हेक्टरी २० गाड्या (५ टन) शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे.  रासायनिक खते 

  •   सोयाबीनला हेक्टरी ३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ३० किलो पालाश आणि २० किलो गंधक पेरणी वेळी द्यावे. पेरणी करतेवेळी खते ही बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. 
  •   गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच हेक्टरी २५ किलो झिंक सल्फेट आणि १० किलो बोरॅक्स द्यावे. या पिकास नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, गंधक, कॅल्शिअम, मॉलिब्डेनम, बोरॉन, लोह, जस्त व मँगनीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी, फुलधारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात. 
  •   उन्हाळी हंगामात पाणी देण्यामध्ये खंड पडल्यास पोटॅशिअम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे ३५ व्या व ५५ व्या दिवशी १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे कराव्यात. 
  •   पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी. 
  •   पीक २० ते २५ दिवसाचे असताना सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास, मायक्रोन्यूट्रियन्ट (ग्रेड-२) या सूक्ष्मअन्नद्रव्यांची ५० ते ७५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  •   पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना १९:१९:१९ या द्रवरूप रासायनिक खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ०:५२:३४ या द्रवरूप रासायनिक खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  • - डॉ. एस. पी. म्हेत्रे,   ७५८८१५६२१० - व्ही. आर. घुगे,   ७५८८१५६२१३ (सोयाबीन संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com