म्यानमारी वाळूचे कण रगडिता तेलही गळे

म्यानमार देशात फिरताना घाटरस्ता उतरताना एक लहानसं गाव नजरेच्या टप्प्यात आलं. पन्नास साठ झोपड्यांचं हे गाव काहीसं वेगळं दिसतंय. तेथे जे काही पाहिलं त्यानं विस्मयचकीत व्हायला झालं. पेट्रोलसम्राट आखाती देशांच्या पंक्तीत मानानं बसू शकेल, असं हे छोटंस गाव... तुमचा विश्वास बसणार नाही, पण या गावाचा मुख्य धंदा आहे, इंधन तेल उत्पादनाचा... !
oil well in Manmar
oil well in Manmar

म्यानमार देशात फिरताना घाटरस्ता उतरताना एक लहानसं गाव नजरेच्या टप्प्यात आलं. पन्नास साठ झोपड्यांचं हे गाव काहीसं वेगळं दिसतंय. तेथे जे काही पाहिलं त्यानं विस्मयचकीत व्हायला झालं. पेट्रोलसम्राट आखाती देशांच्या पंक्तीत मानानं बसू शकेल, असं हे छोटंस गाव... तुमचा विश्वास बसणार नाही, पण या गावाचा मुख्य धंदा आहे, इंधन तेल उत्पादनाचा... !

म्यानमारमध्ये फिरताना धूळभरल्या रस्त्यावर दुपारच्या जेवणासाठी थांबलो. ऊन बऱ्यापैकी होते. हॉटेलमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या तेथील मुलीने हसून म्यानमारी भाषेत काहीतरी पुटपुटत हातावर गुळाचा खडा आणि तिळाचे दाणे ठेवले, त्यासोबत थंडगार पाण्याचा ग्लास हातात दिला. कदाचित तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणाली असावी, असा समज करून घेत तिला गोडगोड धन्यवाद दिले. उन्हातून आल्यावर हातात गूळ देण्याची गोड भारतीय प्रथा इथपर्यंत पाझरलेली पाहून छान वाटलं. आत गेल्यावर एक बाई मोठ्या पातेल्यात गूळ बनवत असताना दिसली. म्हणजे मघाशी मी खाल्लेला गूळ घरी बनवलेला सेंद्रिय गूळ होता. नकळत एक छानशी गोड सेंद्रिय संवेदना पोटातून मेंदूकडे सरकत गेली.  ज्या हॉटेलमध्ये जेवलो, त्याच्याजवळच एक लाकडी घाणा होता. रिंगा रिंगा रोजेसच्या चालीवर बैल आणि मालक दोघही तिळाचे तेल काढण्यात गुंग झाले होते. मला पाहिल्यावर ते थांबले आणि ढेप चाखून बघायची आहे का? या अर्थाने इशारा केला. मी होकारार्थी मान डोकावल्यावर त्याने गरमागरम ढेपेचा तुकडा हातावर ठेवला. ढेप चाखून पहिली. छान चव होती. लहानपणी आम्हाला खाऊ म्हणून शाळेत ढेपच मिळायची. ही म्यानमारची ढेप मला पार भूतकाळात घेऊन गेली.

तीळ लागवडीला प्राधान्य    तेलबियांचे पीक येथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. म्यानमारच्या एकूण लागवड क्षेत्रापैकी १६ टक्के क्षेत्रात तेलबिया पिकांची लागवड आहे. तिळा तिळा दार उघड असं म्हणतं तेलपिकांच्या यादीत तीळ सर्वांत वरती जाऊन बसतो. त्यामुळे जगातील सर्वांत मोठ्या तीळ उत्पादक देशांच्या पंगतीत बसायचा मान म्यानमारला जातो.  त्यापाठोपाठ भुईमुगाचा नंबर लागतो.  म्यानमारचे तिळाचे सरासरी एकरी उत्पन्नही इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. एवढं तेलपिकांचे उत्पादन असूनसुद्धा तेल उत्पादनाच्या बाबतीत मात्र हा देश बराच मागे आहे. तेलाचे कारखाने येथे जास्त नाहीत. त्यामुळे तेलनिर्यातीच्या शर्यतीत ते कासवाच्या गतीने धावताहेत. पण पारंपरिक लाकडी घाणे मात्र इथं जागोजागी दिसतात. 

तेल विहिरींचे गाव  जेवण आटोपून निघालो. तीळ, भुईमुगाच्या शेतीला वेगळा जोडधंदा असेल याची आता सुतराम कल्पना असायचं काहीही कारण नव्हतं. या तेलकट विचारांना झटकत गाडी पुढे दामटली. म्यानमारच्या डोंगररांगातून बुलेट धडधडत निघाली. सुरुवातीला तुरळक असणारे डोंगर जरा जास्तच गर्दी करायला लागलेत. डोंगररांगा सुरू झाल्या आणि रस्ता अतिखराब प्रकाराकडे झुकला. घाटवाट अजून बिकट होत चालली होती. शेतीतील कामं आटोपून गोलगोल टोपीवाले थकले भागलेले शेतमजूर घराकडे निघाले होते. संध्याकाळचा सूर्य क्षितिजावर टेकण्याआधी जास्त उशीर न करता मला मुक्कामी पोहोचायचे होते.   घाटरस्ता उतरताना एक लहानसे गाव नजरेच्या टप्प्यात आलं. पन्नास, साठ झोपड्यांचे हे गाव काहीसं वेगळं दिसतंय. पाच, दहा मिनिटांत तिथं पोहोचलो. तेव्हा  जे काही पाहिलं त्यानं विस्मयचकीत व्हायला झालं. पेट्रोलसम्राट आखाती देशांच्या पंक्तीत मानानं बसू शकेल, असं हे छोटंस गाव आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण या गावाचा मुख्य धंदा आहे, इंधन तेल उत्पादनाचा... ! आश्चर्याचा धक्का बसला ना... होय ! या गावात चक्क तेलाच्या विहिरी आहेत. त्याही लोकांच्या मालकीच्या, शासनाच्या नव्हे.  हे लोक जमिनीत हजार-पंधराशे फूट खोल कूपनलिका खोदतात. त्यावर ४० ते ५० फूट उंच लोखंडाचे दोन खांब आणि बांबूचा आधार देवून तिपाई बनवतात. त्या तिपाईवर पुली लावून त्यावरून डबा जोडलेली तार सरळ कूपनलिकेमध्ये जाते. काही जण हाताने, तर काही जनरेटरच्या मदतीने ती तार खेचतात. मग त्या तारेला बांधलेला डबा खालून तेलाने भरून येतो. ते ओतून झाल्यावर डब्याला परत खाली सोडलं जातं. ज्याच्या कूपनलिकेला जास्त तेल असेल, तो सरळ पाइप आतमध्ये टाकून डिझेल पंपाने तेल बाहेर ओढतो. एका कूपनलिकेपासून दिवसभरात एक बॅरल तेल मिळतं. हे सर्व तेल एकत्र गोळा करून संध्याकाळी येणाऱ्या कंपनीच्या गाडीमध्ये भरले जाते. मग ही कंपनी पुढे त्यापासून पेट्रोल-डिझेल बनवते. एका कूपनलिकेमधून दररोज पाचशे रुपयांची कमाई होते. इथली लोक रस्त्यावर फक्त मौल्यवान रत्न विकत नाहीत, तर इंधन तेलही  विकतात. अजून पुढे रस्त्यावर काय काय विकायला ठेवलेलं दिसतंय हे ब्राह्मादेशी ब्रह्मदेवच जाणे. म्यानमारमध्ये तेलाचे साठे भरपूर आहेत. इंधनतेलाच्या निर्यातीला १८५३ मध्ये सुरुवात झाली होती. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, लष्करी राजवट आणि लोकशाहीचा अभाव याचबरोबरीने अमेरिका, युरोपसारख्या देशांनी लावलेले निर्बंध इत्यादी घटकांमुळे हा व्यवसाय वाढू शकला नाही.  तेल उत्पादनातही अडचणी   तेलाच्या विहिरीचा धंदा सुरू करायला फक्त तीन ते चार लाख रुपये खर्च आहे. जमीन विकत किंवा भाड्याने घ्यायची. कूपनलिका खोदणारी गाडी बोलावून जमिनीत कूपनलिका खोदायची. नशिबाने साथ दिली तर तेल लागेल. मग जनरेटर, पाइप, लोखंडी दोर आणि पुली आणून जुगाड टेक्नॉलॉजीने तेल काढायला सुरुवात करायची. जमिनीत तेल मिळालं नाही तर मात्र पैसे गेले तेल लावत. तेलासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या गरीब लोकांचे आयुष्य या भूमीला फुटलेल्या तेल पाझरावर अवलंबून आहे. काही गरीब शेतकरी तेलबिया पिकणारी शेती विकून या पेट्रोलच्या शेतीसाठी जमीन तुकडा विकत घेतात. पण तिलाही तेल लागलं नाही तर मात्र तेलही गेले तूपही गेले, अशी गत होते. पूर्वी जमिनीला चांगला फुटायचा पान्हा. जास्त तेल मिळायचे. पण आता जो तो उठसूट कूपनलिका खोदतो, त्यामुळे दिवसेंदिवस तेल कमी होत चाललंय, असा तक्रारीचा सूर येथील लोकांकडून ऐकायला मिळाला.  पूर्वीसारखा या भूमातेला पान्हा फुटत नसल्याने त्यांची आर्थिक उपासमार होतेय अशी खंत येथील लोकांनी व्यक्त केली. अशी तेलकट खेडी म्यानमारमध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत. क्रूड ऑइलवर आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या गावाला निरोप देत पुढे निघालो. आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तेल विहिरी पाहत होतो. अंगाला तेलाचा एकही डाग पडू न देता मजुरांना राबवून जगभर तेल साम्राज्य चालवणारे पांढरेशुभ्र अरब पाहून स्वतःच्या तेलविहिरींवर राबणाऱ्या या मळकटलेल्या मालकांचा अभिमान वाटला. म्यानमारी मातीचे कण रगडून तेल काढणाऱ्या या कष्टाळू लोकांना सलाम करत बुलेटला किक मारली. 

(लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस  प्रा. ली. कंपनीचे संचालक आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com