व्यवस्थापन हळद पिकाचे

सध्या हळद लागवड होऊन सात महिन्यांचा कालावधी (२१० दिवस) पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीक वाढीची हळकुंड भरणे ही अवस्था सुरु होते. या काळात योग्य पद्धतीने अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन करावे.
Turmeric cultivation
Turmeric cultivation

सध्या हळद लागवड होऊन सात महिन्यांचा कालावधी (२१० दिवस) पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीक वाढीची हळकुंड भरणे ही अवस्था सुरु होते. या काळात योग्य पद्धतीने अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन करावे.

 थंडीला सुरुवात झाल्यावर हळदीच्या पानावरील ठिपके (करपा रोग)  रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. हळद पिकांत अधिक उत्पादनासाठी सात महिन्यापर्यंत पाने हिरवीगार, तजेलदार आणि रोगमुक्त राहणे गरजेचे आहे.  सध्या हळद लागवड होऊन सात महिन्यांचा कालावधी (२१० दिवस) पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीक वाढीची हळकुंड भरणे ही अवस्था सुरु होते. २१० ते २७० दिवसांत जातीपरत्वे ही अवस्था पूर्ण होत असते. या अवस्थेमध्ये हळकुंडाची जाडी वाढून आणि वजन वाढत जाते. या वेळी वातावरणात १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान असते. खत व्यवस्थापन 

  •   शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर हळद पिकास कोणतेही नत्रयुक्त रासायनिक खत जसे युरिया इत्यादी देवू नये. जर युरियासारखी खते दिली तर त्यामुळे हळदीची अतिरिक्त शाकीय वाढ होते. परिणामी हळद पिकाची पुढील अवस्था जसे हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी, वजन वाढणे लांबणीवर पडते. 
  •    ज्या ठिकाणी पोटॅशयुक्त खतांची कमतरता असेल त्याठिकाणी हेक्‍टरी १२५ किलो पांढरा पोटॅश द्यावा. त्यामुळे हळकुंडांचे वजन वाढून चकाकी येते.
  •   ठिबकव्दारे खते देण्यासाठी विद्राव्य खते महाग असतात. त्यास पर्याय म्हणून युरिया, फॉस्फरीक ॲसिड आणि पांढरा पोटॅश शिफारशी प्रमाणे वापरावा. तसेच ०:०:५० ऐवजी पोटॅशिअम शोनाईट वापरले असता पालाश ऑक्‍साईड बरोबरच मॅग्नेशिअम आणि गंधक  हळद पिकास मिळण्यास मदत होते. 
  • पाणी व्यवस्थापन  

  • हलक्‍या प्रतीच्या जमिनीत १५ दिवस तर भारी जमिनीत २१ दिवसांच्या अंतराने पाटपाणी द्यावे. 
  • भारी प्रतीच्या जमिनीत पाण्याचे अंतर २१ दिवसांपेक्षा कमी ठेवले तर कंदकूज रोग मोठ्या प्रमाणात वाढतो. जमिनीत वाढणारे कंद कुजतात, पर्यायाने उत्पादनात मोठी घट येते. 
  • रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचन पध्दतीचा उपयोग करावा. ठिबकव्दारे पाण्याचे नियोजन असेल तर ड्रिपरची क्षमता किती लिटरची आहे हे तपासून ठिबक संच चालवावा. ४ लिटर क्षमतेच्या ड्रिपरव्दारे ४ तास प्रति दिन पाणी द्यावे. 
  • ठिबकचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी साठून राहिल्यामुळे मुळांना हवा (ऑक्‍सिजन) घेण्यास अडथळा उद्भवतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल झालेली दिसतात. सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजतात त्यामुळे कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. 
  • हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळी मधील अंतर जमिनीच्या मगदुरानुसार १२ ते १५ दिवस ठेवावे. आठ महिने होईपर्यंत जमिनीच्या मगदुराप्रमाणे हळद पिकास पाणी देत राहावे. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते. 
  • फुलांचे दांडे न काढणे

  • शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर हळदीला फुले येण्यास सुरवात होते. काही जातींना मोठ्या प्रमाणात तर काही जातींना कमी प्रमाणात  फुलांचे दांडे येतात. हळदीला फुले येणे म्हणजे हळदीच्या शाकीय वाढीचा कालावधी संपून हळदीस कंद सुटण्यास सुरवात झाल्याचे लक्षण आहे. 
  •   फुलांचे दांडे तसेच झाडावर ठेवल्यास हळद पिकाला त्याचा कोणताही तोटा होत नाही. फुलांचे दांडे काढणे ही प्रक्रिया खर्चिक आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही ही फुलांचे दांडे काढले जात नाहीत.
  • संशोधनामध्ये असे लक्षात आहे की, हळदीवर फुलांचे दांडे असल्यामुळे उत्पादनात कोणत्याही प्रकारे घट येत नाही. तसेच फुलांचे दांडे न संपणारी प्रक्रिया आहे. एकदा जरी दांडे काढले तरी ती नव्याने येतच राहतात. फुले काढताना जर हळद पिकाच्या खोडाला इजा झाली तर त्या भागातून दुय्यम बुरशींचा पिकात शिरकाव होऊन कंदकूज रोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हळदीला आलेली फुले तशीच राहू द्यावीत.  
  • - डॉ. मनोज माळी,  ९४०३७ ७३६१४  - प्रतापसिंह पाटील,   ७५८८५ ८७६६१  (हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज,जि.सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com