आरोग्यदायी अन् औषधी अळिंबीचे प्रकार

लायन्स मेन मशरूम अळिंबी कच्ची (सॅलड), शिजवून, वाळवून किंवा उकळून चहाच्या स्वरूपात वापरली जाते. कॉर्डिसेप्स, गॅनोडर्मा ही औषधी अळिंबी आहे. मैताके अळिंबीत विषाणूजन्य रोगप्रतिकारक गुणधर्म आहेत.
ganoderma mushroom
ganoderma mushroom

लायन्स मेन मशरूम अळिंबी कच्ची (सॅलड), शिजवून, वाळवून किंवा उकळून चहाच्या स्वरूपात वापरली जाते. कॉर्डिसेप्स, गॅनोडर्मा ही औषधी अळिंबी आहे. मैताके अळिंबीत विषाणूजन्य रोगप्रतिकारक गुणधर्म आहेत.

लायन्स मेन मशरूम (हेरीसियम एरिनासिअस) 

  • हेरीसियम अळिंबी सिंहाच्या मानेसारखी दिसत असल्यामुळे तिला लायन्स मेन मशरूम नावाने ओळखले जाते. 
  • ही खाद्य आणि औषधी अळिंबी आहे. अळिंबी लांबलचक (१ सेंमी लांबीपेक्षा जास्त) पांढऱ्या धाग्यांच्या घट्ट पुंजक्याच्या स्वरूपावरून ओळखता येते. 
  • अळिंबी अतिशय चविष्ट असून चीन, भारत, जपान, कोरियामध्ये लागवड होते.
  • अळिंबी कच्ची (सॅलड), शिजवून, वाळवून किंवा उकळून चहाच्या स्वरूपात वापरली जाते. 
  • याचा वास सी-फूड किंवा खेकड्यासारखा येतो. अर्क आरोग्य पूरक म्हणून वापरतात. 
  • कॉर्डिसेप्स अळिंबी (कॉर्डिसेप्स मिलीटॅरीस व इतर स्पेसीज.)        

  • किडीच्या मृत अळीवर वाढणारी  कॉर्डिसेप्स अळिंबीची फळे २ ते ५ सें.मी. लांब, क्लब-आकाराची (मध्यभाग फुगीर व दोन्ही टोके सधारणतः निमुळती होत गेलेली) आणि नारिंगी ते लालसर असतात.
  • कॉर्डिसेप्स ही कीटकांवर परजीवी आहे. फळे जमिनीतील मृत अळीवर वाढतात. भारतामध्ये ही अळिंबी अति थंड भागात (हिमालय) सापडते. परंतु अलीकडे ती प्रयोगशाळेतही कृत्रिमरीत्या रेशीम किडे, तांदूळ किंवा विशिष्ट द्रव माध्यमावर वाढविता येते. 
  • कॉर्डिसेप्स ही भाजीसारखी खाली जात नाही. मुख्यत्वे औषधी अळिंबी आहे. 
  • हर्बल औषधांमध्ये जैव-चया-पचय क्रियेचा एक संभाव्य स्रोत असून, याचा वापर केला जातो. ही अळिंबी प्राचीन काळापासून शरीराच्या विविध प्रणालींच्या पुनरुज्जीवनासाठी परिणामकारक असल्याचे विविध संशोधनामधून सिद्ध झाले आहे.
  • गॅनोडर्मा (रिशी) अळिंबी

  •  ही एक ब्रॅकेट बुरशी आहे. त्याची फलांगे (टोपी) लाल रंगाची, मूत्रपिंडाच्या आकाराची असून, खोड टोपीच्या परिघास एका बाजूला जोडलेले असते. त्यामुळे ती पंख्यासारखी दिसते. 
  • औषधी अळिंबी असून झाडाच्या खोडावर बुंध्यालगत वाढते. 
  • चव कडवट असून खाण्यासाठी वापरत नाहीत. अनेक आजारांवर उपयुक्त आहे. (हृदयरोग, कर्करोग, प्रतिकारशक्ती वाढविणे, इ.) 
  • गॅनोडर्मा अळिंबीपासून तयार केलेली औषधे उत्कृष्ट आहेत. 
  • अळिंबी  तृण धान्याचा कोंडा / काड, लाकडाच्या भुश्‍शावर वाढविली जाते. याच्या शाखीय तसेच पुनरुत्पादन वाढीसाठी २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आणि ८५ ते ९० टक्के आर्द्रता आवश्यक आहे.
  • टर्मिटोमायसेस अळिंबी (टर्मिटोमायसेस स्पे.)

  • अळिंबीच्या ३०-४० प्रजाती (स्पे.) आहेत. ही अळिंबी वाळवीच्या वारुळावर किंवा सान्निध्यात वाढते. अन्नासाठी पूर्णतः त्यांच्यावर सहजीवन पद्धतीने अवलंबून असते. 
  • बहुतेक अळिंबी खाण्यायोग्य असून अतिशय चाविष्ट आहेत. अळिंबीच्या टोपीचा व्यास हा काही सें.मी.पासून ते एक मीटरपर्यंत असतो. 
  • महाराष्ट्रामध्ये टर्मिटोमायसेस अळिंबी कोकणात सिंधुदुर्ग तसेच गोवा आणि विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत आढळते. विदर्भात ही अळिंबी डुंबरसात्या या नावाने लोकप्रिय आहे.
  • ब्लॅक ईयर अळिंबी  (अॅरीकुलारिया पोलिट्रिका)        

  • ब्लॅक इयर अळिंबी ही जास्त आर्द्रता असलेल्या वातावरणात वाढणारी औषधी अळिंबी आहे. 
  • अळिंबी लाकडाचा भुस्सा, गव्हाचे काड, भात पेंढ्यांवर वाढविली जाते. याच्या शाखीय तसेच पुनरुत्पादन अवस्थेसाठी २० ते ३० अंश सेल्सिअस  तापमान व ९० ते ९५ टक्के आर्द्रता लागते. 
  • ब्लॅक ईयर अळिंबी जेली बुराशीमध्ये मोडते. अळिंबी जिलॅटीनसारखी चिवट असते. 
  • अळिंबीची फळे कानाच्या आकाराची असून तपकिरी ते काळ्या रंगाची असतात.
  • थंड ते समशीतोष्ण भागात याची लागवड केली जाते.     
  • मैताके अळिंबी (ग्रीफोला फ्रोन्डोसा) 

  • मैताके अळिंबीची जपानमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.  यास डांसिंग मशरूम, हेन ऑफ द वुड्स, शीपशीड मशरूम, रॅम्स हेड, ई. नावाने ओळखली जाते.
  • ही अळिंबी कोबीच्या गड्ड्याप्रमाणे दिसते. यामधील विशेष घटकांमुळे मूत्राशय, अंडाशयाच्या आजारावर उपयुक्त आहे. 
  • अळिंबीत विषाणूजन्य रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामुळे रोगप्रतिकार शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचप्रमाणे रासायनिक औषधांचा शरीरावरील परिणाम कमी करण्यासाठी सुद्धा या अळिंबीचा फायदा होतो. 
  • अळिंबीच्या सेवनामुळे रक्त दाब तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.  
  • मोरेल अळिंबी 

  • अळिंबी उत्तर-पूर्व भारतामध्ये आढळून येते. यास ‘सुपर फूड’ म्हणून संबोधले जाते. इतर अळिंबीपेक्षा मोरेल ही वेगळी असून, तिचा आकार मधाच्या पोळ्यासारखा दिसतो.
  • अळिंबीची चव मटणासारखी असून स्वादही अतिशय चांगला असतो. 
  • अळिंबी अतिशय पौष्टिक असून त्याचे 
  • औषधी गुणधर्म उच्च दर्जाचे आहेत, म्हणून पारंपरिक औषध म्हणून अळिंबीचा वापर होतो.
  • अळिंबी जिवाणू प्रतिकारक्षम असून शरीराची प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. 
  • मोरेल अळिंबी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर अतिशय परिणामकारक आहे.        
  • पोर्सिनी अळिंबी (बोलेटस एडूलीस)

  • बोलेटस अळिंबीस पेन्नी बन, सेपेस, बोलेटीस, पोर्सिनो किंवा पोर्सिनी या नावाने ओळखले जाते. 
  • अळिंबी पानगळ होणाऱ्या झाडाखाली खोडाभोवती सहजीवी पद्धतीने वाढते.
  • याची टोपी फिकट तपकिरी रंगाची असून तिचा आकार मोठा (१ ते १४ इंच व्यास) असतो. 
  •  एका पोर्सिनी अळिंबीचे वजन काही ग्रॅम पासून ३ किलोपर्यंत असू शकते. 
  • अळिंबी मऊ असून चव मटणासारखी असते. वास नाकाला किंचित झोंबणारा आहे. चव उत्कृष्ट असल्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो. 
  • अळिंबी बारीक तुकडे करून वाळवून ठेवता येते, याचे लोणचे चांगले होते.
  •  - डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११

    (लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com