जनावरांच्या आहारात काटे विरहीत निवडुंगाचा वापर

काटे विरहीत निवडुंगांमध्ये शुष्कपदार्थ, प्रथिने, तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थांचे चांगले प्रमाण आहे.याचबरोबरीने निवडुंगामध्ये कॅल्शिअम, स्फुरद, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि सोडीयम हे चांगल्या प्रमाणात उपलब्ध होते. शेळ्यांसाठी हा चांगला आहार आहे.
goat feeding
goat feeding

काटे विरहीत निवडुंगांमध्ये शुष्कपदार्थ, प्रथिने, तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थांचे चांगले प्रमाण आहे.याचबरोबरीने निवडुंगामध्ये  कॅल्शिअम, स्फुरद, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि सोडीयम हे चांगल्या प्रमाणात उपलब्ध होते. शेळ्यांसाठी हा चांगला आहार आहे.  

जनावरांच्या आहारामध्ये विविध पौष्टीकतत्वे जसे की प्रथिने, स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ, ऊर्जा, खनिजे व जीवनसत्वे, पाणी गरजेचे आहे. अशी पौष्टिक तत्त्वे आहाराच्या विविध माध्यमातून जनावरांना मिळत असतात. सर्वसाधारणपणे १० लिटर दूध देणाऱ्या संकरित गाईंसाठी २५ ते ३० किलो हिरवा चारा (२१ किलो एकदलीय आणि ९ किलो द्विदलीय चारा ), ३ ते ४ किलो वाळलेला चारा, ४ ते ५ किलो पशुखाद्य, ५०-६० ग्रॅम खनिज मिश्रण आहार म्हणून द्यावे. उन्हाळा आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे चाऱ्याचे योग्य नियोजन व आहाराचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाईमुळे चारा पिकांची लागवड शक्य नसते. अशा परिस्थितीमध्ये कमी पाण्यावर येणारी चारापिके महत्त्वाची ठरतात. यालाच एक पर्याय म्हणून काटे विरहीत निवडुंगाचा वापर चारा म्हणून करू शकतो.  एक उत्तम पर्याय

  • उच्च क्षमता तसेच विविध पौष्टीकतत्वांनी युक्त हिरवा चारा.
  • उच्च तापमानामध्ये तग धरते, कमी पाण्यामध्ये किंवा पावसाच्या पाण्यावरती वाढते.
  • बाएफ संस्थेमध्ये पशू खाद्याच्यादृष्टीने काटेविरहीत निवडुंगांच्या वेगवेगळ्या जाती जसे की १२७०, १२७१, १२८०, १३०८ आणि १२८७ वाढवून त्याचा वापर जनावरांच्या आहारामध्ये करण्यात आला. त्यामध्ये अशा प्रकारच्या निवडुंगाच्या जाती तयार करण्यासाठी नर्सरी तंत्रज्ञान तसेच शास्त्रीयदृष्ट्या जनावरांमध्ये आहार परिक्षण इ. चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. या विविध जातींपैकी १२८० व १३०८  या क्रमांकाच्या जातीमध्ये पौष्टीकतत्वे जास्त आहेत. 
  • निवडुंगाचे रासायनिक पृथक्करणामध्ये विविध पौष्टिक तत्त्वे जसे की, शुष्कपदार्थ ७.५ ते ११.५ टक्के, प्रथिने ५.५ ते ८ टक्के, तंतुमय पदार्थ ११.५ ते २०.५ टक्के, स्निग्ध पदार्थ १.५ ते २.५ टक्के, राख १२ ते १८ टक्के आढळून आले. 
  • निवडुंगामध्ये विविध खनिजे जसे की, कॅल्शिअम, स्फुरद, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि सोडीयम चांगल्या प्रमाणात उपलब्ध. 
  • नर्सरी तंत्रज्ञान वापरून काटेविरहीत निवडूंग बांधावर तसेच कमी पाण्याच्या जमिनीमध्ये लागवड करू शकतो. 
  • प्रयोगाचे निष्कर्ष 

  • शास्त्रीयदृष्ट्या शेळी आणि करडांमध्ये अशा प्रकारच्या काटेविरहीत निवडुंगाचा वापर करून चारा पिकाला एक पर्याय व पौष्टीकदृष्या उच्चप्रतीचा आहार म्हणून वापर करण्यात आला.
  • शिफारशीत जातीचे निवडूंग खाऊ घातल्यामुळे शेळ्यांमध्ये दैनंदिन वजन वाढ तसेच शरीरपोषणामध्ये वृद्धी झाली.
  • उन्हाळी हंगामामध्ये जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी पाण्याची गरज कमी झाली. कारण यामध्ये ९०-९५ टक्के पाण्याचे प्रमाण आहे. 
  • शेळ्या प्रति दिन ३.७५ किलो निवडूंग सहजरित्या खाऊ शकतात. 
  • २५ टक्के शुष्क पदार्थाला पर्याय. 
  • शेळ्यांना कुठल्याही प्रकारची हानी नाही. 
  • तीव्र उन्हाळ्यामध्ये योग्य शरीर व्यवस्थापन व पोषण. 
  • शेळयांप्रमाणेच दुभत्या गाईंमध्ये व इतर जनावरांच्या आहारामध्ये सुध्दा काटे विरहीत निवडूंग योग्यरीत्या वापरू शकतो. सर्वसाधारणपणे दुभत्या गाईंमध्ये कमीत कमी ७ ते ८ किलो काटेविरहीत निवडूंग इतर चाऱ्यासोबत पर्याय म्हणून दैनंदिन वापरू शकतो. 
  • शेळ्यांना काटे विरहीत निवडूंग खाऊ घालण्याची पध्दत

  • निवडुंगाची पाने कापून त्याचे कोयत्याने छोटे तुकडे करून खाऊ घालावेत.
  • सुरुवातीला ८ ते १० दिवस ५०० ग्रॅम काटे विरहीत निवडुंगाचे तुकडे द्यावेत. 
  • त्यानंतर शरीराला सवय लागल्यानंतर ३ ते ४ किलो काटेविरहीत निवडूंग खाऊ घालावे. 
  • - डॉ.मनोजकुमार आवारे, ९४२१००७७८५ (विभाग प्रमुख,पशुआहार व पशुशास्त्र विभाग, बाएफ, उरुळीकांचन,जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com