शेळ्यांच्या सुलभ प्रजननासाठी अल्ट्रासोनोग्राफी

सुलभ प्रजनन व्यवस्थापन होण्यासाठी शेळीच्या प्रजनन संस्थेची सखोल आणि नियमित तपासणी करावी लागते. शेळ्यांची गर्भधारणा तपासणी ३० दिवसांत करावी. यासाठी अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो.
USG scanning procedure
USG scanning procedure

सुलभ प्रजनन व्यवस्थापन होण्यासाठी शेळीच्या प्रजनन संस्थेची सखोल आणि नियमित तपासणी करावी लागते. शेळ्यांची गर्भधारणा तपासणी ३० दिवसांत करावी. यासाठी अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो. 

बोकडाच्या मटणाला असलेली मागणी आणि शेळी दुधातील पौष्टिक औषधी गुणधर्मामुळे शेळीपालनाकडे बऱ्याच जणांचा कल वाढला आहे. आनुवंशिक गुणांच्या आधारे निवड केलेल्या शेळ्या किंवा त्यांची करडे शेळीपालन व्यवसायाचा पाया समजला जातो. त्यामुळे दोन किंवा तीन पिल्ले देणारी शेळी किंवा तिची पिल्ले पैदाशीकरिता निवडावीत. गोठा, आहार आणि व्यवस्थापनाबरोबरच शेळ्यांमधील प्रजनन व्यवस्थापन तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक शेळीने दोन वर्षात तीन वेळा पिल्ले दिली तर हा व्यवसाय फायदेशीर ठरतो.  तंत्रज्ञानाची उपलब्धता 

  • अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाची उपलब्धता शिरवळ, मुंबई, परभणी, उदगीर, नागपूर आणि अकोला येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पशू सर्वचिकित्सालयात आहे. त्याचा उपयोग पशपालकांनी करून घ्यावा. 
  • अल्ट्रासोनोग्राफी यंत्राच्या हालचालीवर नियंत्रण आहे. त्यामुळे पशुपालकास आपल्या शेळ्या ज्या ठिकाणी यंत्राची उपलब्धता आहे, त्या ठिकाणी घेऊन जाऊन तपासणी करावी लागते. 
  • अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर

    अल्ट्रासोनोग्राफी यंत्राच्या साहाय्याने शेळीच्या प्रजननसंस्थेची सखोल व अचूक तपासणी करून शेळी गाभण आहे किंवा नाही हे ३० दिवसात समजते. जर शेळी गाभण नसेल तर गर्भाशय आणि स्त्रीबीजांडांची अचूक तपासणी करून लगेच माजावर आणण्यासाठी योग्य औषधोपचार करावेत. 

  • सर्वसाधारणपणे पशुतज्ज्ञ शेळीची गर्भधारणा तपासणी करण्याकरिता पोटाला हात लावून पोट दाबून पडताळणी करतात. गर्भधारणा तपासणी साधारणपणे तीन महिन्यानंतर करता येते. सदर तपासणीची अचूकता कमी असल्याने वापर सुध्दा खूपच कमी प्रमाणात होतो. 
  • शेळीमध्ये अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपासणी करण्याकरिता अत्यल्प कालावधी लागतो. यासाठी शेळीला पाडायची किंवा भूल द्यायची आवश्‍यकता नसते. शेळीमध्ये अल्ट्रासोनोग्राफी तपासणीकरिता साधारणपणे २ ते ३ मिनिटांचा कालावधी पुरेसा असून या वेळात प्रजनन संस्थेची सखोल तपासणी करता येते. 
  • शेळी उभी असताना अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर सहज करता येतो. शेळीमध्ये अल्ट्रासोनोग्राफी यंत्राचा प्रोब कासेच्या समोरच्या भागात लावून तपासणी करता येते किंवा प्रजननसंस्थेच्या सखोल तपासणीसाठी शेळीच्या गुदद्वारामध्ये प्रोब टाकून करता येते. 
  • अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर शेळ्यांमधील वंध्यत्व तपासणी, गर्भाशयाच्या विविध विकारांची तपासणी तसेच गर्भधारणा तपासणीसाठी करता येतो. 
  • शेळ्यांमधील वंध्यत्वाची तपासणी करताना प्रामुख्याने गर्भाशय, स्त्री बीजांडे, स्त्री बीजकोष आणि पीतग्रंथीची पाहणी तसेच प्रत्येक अवयवाची लांबी व रूंदी मोजून अंतिम निष्कर्ष काढला जातो. त्यानुसार लगेच औषधोपचार करता येतो. अल्ट्रासोनोग्राफी यंत्राशिवाय सदर निष्कर्षास मर्यादा येतात. शेळ्या बरेच महिने वांझ राहतात, त्यामुळे पशुपालकांचे नुकसान होते. 
  • शेळ्यांमध्ये अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर गर्भतपासणी करण्यासाठी महत्त्वाचा आहे. २५ ते ३० दिवसांत गर्भधारणा तपासणी करणे शक्‍य आहे.  शेळी गाभण नसेल तर लगेच योग्य  उपचार करून ती माजावर आणता येते. गाभण शेळीच्या गर्भाशयात किती पिल्ले आहेत याची माहिती मिळते. त्याचा उपयोग पशुपालकांना गाभणकाळातील व्यवस्थापनासाठी होतो. 
  • बहुतांश पशुपालकांना शेळ्यांना बोकडाकडून कधी रेतन झाले याची तारीख माहिती नसते.  अल्ट्रासोनोग्राफी यंत्राच्या साहाय्याने सदर शेळीमधील गर्भाची लांबी तसेच डोक्‍याची रुंदी मोजून गाभण कालावधी किंवा शेळी किती महिन्याची गाभण आहे हे अचूकपणे समजते. 
  • अल्ट्रासोनोग्राफी यंत्राच्या साहाय्याने शेळीमध्ये कितीही वेळा गर्भधारणा तपासणी केली तरी त्याचा कोणताही धोका गर्भाला होत नाही, उलट गर्भाची वाढ व्यवस्थित होत आहे का ? तसेच गर्भाची हालचाल व गर्भाचे ह्यदयाचे ठोके मोजून योग्य सल्ला पशुपालकांना देता येतो. 
  • अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर हा प्रगत राष्ट्रामध्ये एक दैनंदिन व्यवस्थापनाचा भाग आहे. यामुळे तेथील शेळीपालन व्यवसाय हा एक फायदेशीर व्यवसाय समजला जातो. 
  • - डॉ. अजित माळी ९८५००७०४८१

    (सहाय्यक प्राध्यापक, पशुप्रजनन व प्रसूतिशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com