ग्रामविकास आराखड्यातील जबाबदाऱ्यांचे वाटप

प्रत्यक्ष गाव पातळीवर ग्रामपंचायतींना लोकसहभागातून ग्रामविकास आराखडे तयार करावे लागतात. ग्रामपातळीवरील विकास आराखड्यातील जबाबदाऱ्यांच्या काही प्रश्‍नांचा या लेखात विचार करत आहोत.
women participation in village meeting
women participation in village meeting

प्रत्यक्ष गाव पातळीवर ग्रामपंचायतींना लोकसहभागातून ग्रामविकास आराखडे तयार करावे लागतात.  ग्रामपातळीवरील विकास आराखड्यातील जबाबदाऱ्यांच्या काही प्रश्‍नांचा या लेखात विचार करत आहोत. 

ग्रामविकास आराखडे योग्य व वास्तववादी व्हावेत यासाठी राज्य पातळीपासून ग्रामपातळीपर्यंत विविध घटकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. म्हणूनच लोकसहभागी नियोजन प्रक्रियेसाठी तिन्ही स्तरावर उपक्रमाचे नियोजन होते. राज्य ग्रामीण विकास संस्थेकडे (यशदा) प्रशिक्षण साहित्य निर्माण करून सर्वच स्तरावरील प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागीय स्तरावर कार्यक्रमाचा आढावा व माहिती संकलन व अहवाल सादरीकरण हे उपायुक्त (विकास) यांनी करावयाचे असते. जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे या उपक्रमाची अंमलबजावणी यशस्वीपणे व सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचे बरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे नोडल ऑफिसर म्हणून काम पहात असतात. ग्रामविकास आराखड्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवून संनियंत्रण करण्याची जबाबदारी त्यांची आहे.  जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागांचे खाते प्रमुख आपापल्या विभागाशी संबंधित ग्रामविकास आराखड्यातील प्रकल्प/उपक्रम/काम याबाबत ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करणे तसेच तांत्रिक मार्गदर्शन करणे ही भूमिका पार पाडणे अपेक्षित आहे. गटविकास अधिकारी व प्रभारी अधिकारी हे पंचायत समिती स्तरावर या उपक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, मार्गदर्शन, नियंत्रण याबाबत जबाबदार आहेत.  ग्रामविकास आराखडा तयार करण्यात गाव पातळीवर सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची आहे?  - लोकसहभागी नियोजन प्रक्रियेमध्ये व आराखडा तयार करण्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये ग्रामपंचायतीची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.  विकास आराखडा तयार करण्यात ग्रामसेवकाची जबाबदारी काय आहे?  - ग्रामविकास हा ग्रामपातळीवरील शासनाचा प्रतिनिधी म्हणून ग्रामविकास अधिकारी या नात्याने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ग्रामस्तरावर साहाय्यक प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज पाहणे ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत बैठकीचे आयोजन, विकास आराखड्याबद्दल जागृती, ग्रामसभेत संसाधन गटाची स्थापना करणे, गावातील स्वयंसहाय्यता गट, इतर घटक, ग्रामपंचायत उपसमित्या यांचे समवेत समन्वय व नियोजन प्रक्रिया करणे. गावपातळीवरील प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमाचे नियोजन करणे. लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने विविध माहिती, शिक्षण संवाद उपक्रम हाती घेणे, प्रदर्शन, भित्तिपत्रके, स्पर्धा इत्यादी ग्रामपंचायत स्तरावर विविध माहितीचे संकलन, ग्रामस्तरावरील तीन दिवसाच्या सहभागी नियोजन प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर सक्रियतेने सहभागी होणे. पंचवार्षिक व वार्षिक विकास आराखडा, आराखड्यातील कामांचे प्रकल्प अहवाल तयार करणे अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या ग्रामसेवकांकडे आहेत.  गावपातळीवरील विविध विभागांचे प्रमुख/कर्मचारी यांची या विकास आराखड्याबाबत काय जबाबदारी आहे?  - गावातील मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलिस पाटील, तलाठी, कृषी साहाय्यक हे विविध विभागांचे प्रमुख या विकास आराखडा तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. म्हणून यांच्यावरही जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणूनच ग्रामस्तरावरील तीन दिवसीय सहभागीय नियोजन प्रक्रियेत सक्रिय सहभाग देणे, ग्रामस्तरावर आवश्‍यक ती आपल्या विभागाची   माहिती विहित नमुन्यात साहाय्यक प्रभारी अधिकारी यांना मुदतीत उपलब्ध करून देणे, विविध प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहणे या  जबाबदाऱ्या आहेत.  ग्रामपंचायत मधील विविध समित्यांनी याबाबत काय काम करायचे आहे?  - गावातील विकासाचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून ग्रामपंचायतीमध्ये विविध समित्यांची स्थापना केलेली असते. त्यामध्ये ग्राम पाणीपुरवठा, स्वच्छता समिती, पाणलोट विकास समिती, तसेच ग्रामविकास समिती, शिक्षण आरोग्य समिती अशा समित्या असतात. या समित्यांनी प्रामुख्याने परिस्थिती विश्‍लेषण,बेसलाईन सर्वेक्षण, उणिवांचा शोध घेणे. गरजांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करणे. वार्षिक व पंचवार्षिक विकास आराखडा पारदर्शी पद्धतीने तयार करणे या भूमिका पार पाडायच्या आहेत.  महिला ग्रामसभा कशासाठी?  काय जबाबदारी आहे?  - गावातील महिलांच्या गरजा व त्यांच्या विकास कामाबाबत विकास आराखड्यात दखल घेतली आहे का? हे गावातील महिलांना समजावे व त्यांनी आपल्या भूमिका मांडाव्यात यासाठी ग्रामपंचायत विकास आराखडा मान्यतेसाठी ग्रामसभेत मांडण्यापूर्वी त्यावर महिला ग्रामसभेवर चर्चा व्हावी म्हणून तो महिला ग्रामसभेत चर्चेसाठी ठेवण्यात येतो. महिलांच्या शिफारशीसह तो ग्रामसभेत ठेवण्यात येतो.  ग्रामसभेची जबाबदारी काय आहे?  - ग्रामसभा ही गावाची संसद असल्याने ग्रामसभेची मंजुरी ही अंतिम मंजुरी असते. तीन दिवसांच्या सहभागी नियोजन प्रक्रिया पूर्ण केल्यावर सर्वसमावेशक व लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या ग्रामविकास आराखड्यास अंतिम मंजुरी देण्यासाठी तो ग्रामसभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात येतो. या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य, समित्यांचे प्रमुख, संसाधन गट, ग्रामस्थ यांचबरोबर प्रभारी अधिकारी व प्रवीण प्रशिक्षक आणि ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी यांनी उपस्थित राहणे ही त्यांचे कर्तव्य व जबाबदारीही आहे. अशा ग्रामसभेत चर्चेअंती ग्रामविकास आराखड्यास चर्चेअंती मंजुरी देणे ही ग्रामसभेची महत्त्वाची जबाबदारी आहे.  ग्रामस्तरावरील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास खऱ्या अर्थाने विकेंद्रित लोकशाहीचा वापर होऊन, लोकसहभागातून पारदर्शक ग्रामविकास आराखडे तयार होतील. 

- डॉ. कैलास बवले, ८८८८८९२७५७ (समन्वयक, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्‍वत ग्रामविकास केंद्र, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com