नियोजन कलिंगड लागवडीचे

watermelon cultivation
watermelon cultivation

कलिंगड लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, वालुकामय, मध्यम - काळ्या ते करड्या रंगाची पाण्याचा उत्तम निचरा असणारी, ६.५ ते ७.० सामूची जमीन लागवडीस योग्य आहे. थंडी कमी झाल्यावर १५ फेब्रुवारीपर्यंत लागवड पुर्ण करावी. उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात  फळे तयार होत असल्याने चांगली मागणी राहते.

कलिंगड पिकास उष्ण व कोरडे प्रामुख्याने उष्ण दिवस व थंड रात्र असे हवामान मानवते. वाढीच्या कालावधीमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होत नाही. तसेच रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. फळ लागल्यापासून ते फळ विक्रीसाठी तोडेपर्यंत किमान ४० ते ४५ दिवस तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे.

 लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, वालुकामय, मध्यम - काळ्या ते करड्या रंगाची पाण्याचा उत्तम निचरा असणारी, ६.५ ते ७.० सामूची जमीन लागवडीस योग्य आहे. सर्वसाधारणपणे हे पीक नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत उत्तम येते. मात्र, आठपेक्षा जास्त सामू, जास्त चुनखडीचे प्रमाण आणि चोपण जमिनी या पिकांच्या लागवडीसाठी निवडू नयेत. अशा जमिनीतील अधिक प्रमाणातील सोडिअम, कॅल्शिअम, मॅग्निशिअम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेट या सारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. अती भारी जमिनीत मुळांची वाढ कमी होते.  

जाती  अर्का ज्योती  ही मध्य कालावधीत येणारी संकरीत जात आहे. या जातीची फळे आकाराने मोठी ६-८ किलोची गोल असतात. फळाची साल फिक्कट हिरव्या रंगाची आणि त्यावर गर्द हिरव्या पट्याची मध्यम जाड सालीची असतात.  अर्कामाणिक   या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साल गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते. मधू   या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या जातीची मागणी बऱ्यापैकी असते.

 बाजारपेठेत विविध जाती उपलब्ध आहेत. 

लागवड तंत्र 

  • थंडी कमी झाल्यावर म्हणजे सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारी पर्यंत लागवड पुर्ण करावी. उन्हाळ्याच्या सुरवातीस फळे तयार होतात. साधारणत: प्रती एकरी एक किलो बी वापरतात. परंतू संकरित जातींचे एकरी ३०० ते ३५० ग्रॅम देखील बी पुरेसे होते. 
  • लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून प्रति एकरी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंम्पोस्ट खत जमिनीत मिसळून द्यावे. वखराच्या दोन पाळ्या द्याव्यात. लागवड साधारणतः सरी पद्धतीने किंवा आळे पद्धतीने आणि गादी वाफा पद्धतीने केली जाते. सरी पद्धतीने लागवड करताना दोन मीटर अंतरावर सऱ्या काढून सरीच्या दोन्ही बाजूस दोन फुटांवर लहान लहान आळी तयार करावी. एका आळ्यामध्ये एकच बी लावावे. 
  • गादीवाफ्यावर लागवड  

  • जमिनीची मशागतीनंतर दोन फूट रुंद व एक फूट उंचीचे गादीवाफे करावेत. दोन गादीवाफ्यांमध्ये सहा ते आठ फूट अंतर ठेवावे. गादीवाफा तयार करत असताना शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा द्यावी. मधोमध ठिबकची लॅटरल टाकून ठिबक संचातून पाणी सोडून तपासणी करून घ्यावी. 
  • मल्चिंग पेपरचा वापर या पिकात अधिक फायदेशीर आहे. गादीवाफ्यावर चार फूट रुंदीचा २५ ते ३० मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरावा. मल्चिंग पेपर लावताना तो गादीवाफ्याला समांतर राहील, तो ढिला पडणार नाही याची काळजी घ्यावी. मल्चिंग पेपरला रोपे लागवडीपूर्वी किमान एक दिवस आधी ४५ सेंमी. अंतरावर छिद्रे करून घ्यावीत. त्यामुळे आत तयार झालेली उष्ण हवा निघून जाईल.
  • रोपे तयार करून किंवा थेट गादीवाफ्यावर टोकण अशा दोन्ही पद्धतीने लागवड केली जाते. टोकण पद्धतीमध्ये उगवणक्षमता कमी राहते. न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा बी टोकावे लागते. पर्यायाने खर्चात वाढ होते. शक्यतो रोपे कोकोपीट ट्रेमध्ये तयार करून लागवड करावी. रोपे तयार होण्यासाठी १५ ते २१ दिवसांचा कालावधी लागतो. 
  • लागवडीपूर्वी बेड पूर्ण ओले करावेत. गादीवाफ्यात वाफसा स्थिती आल्यावर रोपांची लागवड सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. लागवडीपूर्वी रोपे १ टक्का कार्बेन्डॅझीमच्या द्रावणामध्ये बुडवून घ्यावीत. लागवड पूर्ण झाल्यावर अर्धा तास ठिबक सिंचन संच चालू ठेवावा. त्यानंतर पहिले सहा दिवस रोज १० मिनिटे किंवा आवश्यकतेनुसार पाणी देण्यास सुरुवात करावी. नंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचे नियोजन करावे. 
  •  - निवृत्ती पाटील, ९९२१००८५७५                (विषय विशेषज्ञ - उद्यानविद्या, सुविदे फाउंडेशन, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com