बागायती गहू लागवडीची सूत्रे

गव्हाची पेरणी जमिनीत पुरेशी ओल असताना दक्षिणोत्तर करावी. बागायतीमध्ये वेळेवर पेरणी दोन ओळींत २० सें.मी. आणि उशिरा पेरणी १८ सें.मी. अंतर ठेवून करावी.जमिनीचा उतार लक्षात घेऊन २.५ ते ४ मीटर रुंद आणि ७ ते २५ मीटर लांबीचे सारे पडावेत.
wheat crop
wheat crop

गव्हाची पेरणी जमिनीत पुरेशी ओल असताना दक्षिणोत्तर करावी. बागायतीमध्ये वेळेवर पेरणी दोन ओळींत २० सें.मी. आणि उशिरा पेरणी १८ सें.मी. अंतर ठेवून करावी.जमिनीचा उतार लक्षात घेऊन  २.५ ते ४ मीटर रुंद आणि ७ ते २५ मीटर लांबीचे सारे पडावेत. गहू पिकाला मध्यम ते भारी, चांगला  निचरा होणारी जमीन निवडावी.  हलक्या आणि मध्यम जमिनीत भरपूर भरखते व संतुलित रासायनिक खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन येते. खरीप पिकानंतर १५ ते २० सेंमी. खोलीवर जमीन नांगरट करावी. कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी.शेवटच्या कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. यामुळे मुळांची वाढ, विस्तार व कार्यक्षमता वाढून  अन्नद्रव्यांचे, पाण्याचे व्यवस्थित शोषण होते.  पेरणीची वेळ  बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान करता येते;मात्र, उशीर झालेल्या प्रत्येक पंधरवड्यानंतर उत्पादनात २.५ क्विंटल घट येते. उशिरा पेरणी केलेल्या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो. या घातक रोगास बळी पडून जास्त नुकसान होते. १५ डिसेंबरनंतर पेरलेल्या गव्हाचे उत्पादन फायदेशीर ठरत नाही.  बियाणे आणि बीजप्रक्रिया

  • प्रती हेक्टरी १०० किलो बियाणे वेळेवर पेरणीसाठी वापरावे. 
  • उशिरा पेरणीसाठी कमी तापमानामुळे गव्हाच्या पिकास कमी फुटवे येत असल्यामुळे बियाण्याचे प्रमाण १२५ ते १५० किलो प्रती हेक्टरी एवढे वापरावे.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणास प्रक्रिया करावी. तसेच २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर अधिक २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया गुळाच्या पाण्याबरोबर करावी. त्यानंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून पेरणी करावी. यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.
  • पेरणी तंत्र 

  • जमिनीत पुरेशी ओल असताना पेरणी शक्‍यतो दक्षिणोत्तर करावी. 
  • बागायतीमध्ये वेळेवर पेरणी दोन ओळींत २० सें.मी. आणि उशिरा पेरणी १८ सें.मी. अंतर ठेवून करावी. 
  • पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सें.मी. खोलीवर करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन  २.५ ते ४ मीटर रुंद आणि ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पडावेत.
  • लागवड सरी/वाफा/बीबीएफ पद्धतीने ही करता येते. शून्य मशागत तंत्राने पहिल्या पिकाच्या अवशेषात पेरणी करून उत्पादन खर्चात बचत करता येते.
  • खत व्यवस्थापन 

  • बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी हेक्‍टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.
  • पेरणीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. उरलेली नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यानंतर मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत द्यावी.
  • बागायती गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी हेक्‍टरी ९० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. पेरणीच्या वेळी १/३ नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. उरलेला नत्र दोन वेळेस पहिले पाणी आणि दुसरे पाणी देतेवेळी द्यावा.
  • एकात्मिक तण नियंत्रण 

  • पेन्डीमिथॅलीन (३० इसी) पेरणीनंतर त्वरीत २.५ लिटर प्रति हेक्टरी प्रति ६०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. जमिनीत ओलावा असावा.
  • पेरणीपासून ३० ते ४० दिवसांच्या आत तणांचे प्रमाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. जरुरी प्रमाणे १-२ कोळपणी करून जमीन मोकळी करावी त्यामुळे तणांचा नाश होतो.जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते, हवा खेळती राहून फुटव्याची  संख्या वाढते परिणामी उत्पादनात वाढ होते. 
  • योग्य जातींची निवड  आपल्याकडे बागायत वेळेवर व बागायत उशिरा अशा दोन टप्यामध्ये पेरणी केली जाते. बागायती वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत जाती या बागायती उशिरा पेरणीच्या जातीपेक्षा उशिरा परिपक्व होतात. बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारस केलेल्या जाती लवकर परिपक्व होतात. या जाती  वाढीच्या शेवटी येणाऱ्या उष्ण तापमानास सहनशील असतात म्हणून पेरणीसाठी शिफारस केलेल्या जाती निवडाव्यात. 

    बागायती वेळेवर पेरणीसाठी जाती  (१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर)    

    जात ः एम.ए.सी.एस. ६४७८ हेक्टरी उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)ः ५० ते ५५     वैशिष्टे     ः  द्वीपकल्पीय विभागात बागायती वेळेवर शिफारशीत सरबत्ती जात, टपोरे दाणे, प्रथिने १४ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्कृष्ट, लोह ४२.८ पी.पी.एम., जस्त ४४.१ पी.पी.एम., पक्व होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस. जात ः  एम.ए.सी.एस. ६२२२ हेक्टरी उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)ः    ५० ते ५५ वैशिष्टे    ः    द्वीपकल्पीय विभागात बागायती वेळेवर शिफारशीत सरबत्ती जात, टपोरे दाणे, प्रथिने १२.५ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, १०६ ते ११० दिवसात कापणीस तयार.     जात ः एम.ए.सी.एस. ३९४९ उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)ः    ४५ ते ५० वैशिष्टे    ः    बागायती वेळेवर पेरणीसाठी योग्य बन्सी जात, टपोरा व चमकदार दाणा, पास्ता व रवा तयार करणेसाठी उत्कृष्ट, खोडावरील व पानावरील तांबेरा रोगास प्रतिकारक, जस्त ४०.६ पी.पी.एम, लोह ३८.६ पी.पी.एम. तसेच प्रथिनांचे प्रमाण १२.९ टक्के, पिकाचा कालावधी ११२ दिवस.

    जात ः एम.ए.सी.एस. ३१२५ उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)ः    ४५ ते ५० वैशिष्टे ः बागायती व वेळेवर पेरणीसाठी योग्य बन्सी जात, सरबती जातीपेक्षा अधिक उत्पादन , करपा व तांबेऱ्यास प्रतिकारक, रवा, शेवई व कुरडई तसेच पास्ता बनविण्यासाठी उत्कृष्ट, पिकाचा कालावधी ११२ दिवस.         जात ः त्र्यंबक (एन.आय.ए.डब्लू ३०१)       उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)ः४५ ते ५० वैशिष्टे ः    बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती जात, दाणे टपोरे आणि आकर्षक, प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११o-११५ दिवसात कापणीस तयार.

    जात ः तपोवन (एन.आय.ए.डब्लू - ९१७) उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी) ः    ४५ ते ५० वैशिष्टे ः बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती जात, दाणे मध्यम परंतु ओंब्याची संख्या जास्त, प्रथिनांचे प्रमाण १२.५ टक्के, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११५-१२० दिवसात कापणीस तयार.         जात ः गोदावरी (एन.आय.डी.डब्ल्यू- २९५) उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी) ः    ४५ ते ५० वैशिष्टे ः बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम बन्सी जात, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, रवा, शेवया, कुरडया यासाठी उत्तम, ११५-१२० दिवसात कापणीस तयार.         जात ः फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू- १९९४)      उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी) ः ४५ ते ५० वैशिष्टे ः बागायती वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणीसाठी योग्य, तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त, चपातीसाठी उत्तम

    बागायती उशिरा पेरणीसाठी जाती (१६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर) जात ः एन.आय.ए.डब्लू-३४ उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी) ः ३५ ते ४० वैशिष्टे ः बागायती उशिरा पेरणीसाठी उत्तम सरबत्ती जात. दाणे मध्यम आणि आकर्षक, प्रथिनांचे प्रमाण १३ टक्के, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम , १०० ते १०५ दिवसात कापणीस तयार    .

    जात ः  ए.के.ए.डब्ल्यू- ४६२७ उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)ः     ३५ ते ४० वैशिष्टे ः    द्विपकल्पीय विभागात बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती जात, तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त, चपातीसाठी उत्तम, पक्व होण्याचा कालावधी ९५ ते १oo दिवस.

    जात ः ए.के.ए.डब्ल्यू- ४२१o-६      उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)ः     ३५ ते ४० वैशिष्टे ः बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती जात, तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त, चपातीसाठी उत्तम, पक्व होण्याचा कालावधी ९५ ते १oo दिवस       

    जात ः एच.डी.३०९० उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)ः    ४० ते ४२ वैशिष्टे ः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आणि तामिळनाडू राज्यामध्ये बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती जात, तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त, चपातीसाठी उत्तम, पक्व होण्याचा कालावधी बागायती वेळेवर पेरणीसाठी १०१ दिवस.         जात ः एच.डी.२९३२ उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)ः    ४५ ते ५० वैशिष्टे ः मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आणि तामिळनाडू राज्यामध्ये बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती जात, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, पक्व होण्याचा कालावधी बागायती वेळेवर पेरणीसाठी ११० ते ११५ दिवस. गव्हाचे प्रकारानुसार उपयोग       सरबती  उपयोग ः चपाती, पाव, बिस्कीट व कुकीज साठी उत्तम जाती ः एम.ए.सी.एस.६४७८, एम.ए.सी.एस.६२२२, एम.ए.सी.एस.२४९६, एन.आय.ए.डब्लू. १४१५, एन.आय.ए.डब्लू. ९१७, एन.आय.ए.डब्लू. ३०१, एन.आय.ए.डब्लू. ३१७०        बन्सी/ बक्षी  उपयोग ः पास्ता, रवा, शेवया, कुरडयासाठी उत्कृष्ट. जाती ः एम.ए.सी.एस.३९४९, एम.ए.सी.एस.३१२५, एनआयडीडब्ल्यू. २९५, यु.ए.एस.४४६, एम.ए.सी.एस.४०२८ (बायोफोर्टीफाइड वाण), एम.ए.सी.एस.४०५८      खपली  उपयोग ः खीर, पुरणपोळी, लापशी, हुग्गी, दलिया साठी उत्कृष्ट जाती ः एम.ए.सी.एस.२९७१, डी.डी.के. १०२९,एच.  डब्लू १०९८  

    - डॉ. विजेंद्र बाविस्कर, ८३७४१७४७९७,

    (अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com