Agriculture Agricultural News Marathi management of Bamboo plantation | Agrowon

पारंपरिक बांबू लागवडीचे व्यवस्थापन

मिलिंद पाटील
रविवार, 12 जानेवारी 2020

सहाव्या वर्षानंतर दरवर्षी बांबू बेटातून सरासरी १० ते १५ तोडणीयोग्य काठ्या मिळतात. झाडांच्या आधाराने करण्यात आलेल्या बांबू लागवडीतून मिळणाऱ्या काठ्यांची संख्या कमी दिसत असली, तरी काठीची उंची आणि जाडी सरासरीपेक्षा नेहमी जास्तच मिळते. त्यामुळे दरदेखील चांगला मिळतो. 

सहाव्या वर्षानंतर दरवर्षी बांबू बेटातून सरासरी १० ते १५ तोडणीयोग्य काठ्या मिळतात. झाडांच्या आधाराने करण्यात आलेल्या बांबू लागवडीतून मिळणाऱ्या काठ्यांची संख्या कमी दिसत असली, तरी काठीची उंची आणि जाडी सरासरीपेक्षा नेहमी जास्तच मिळते. त्यामुळे दरदेखील चांगला मिळतो. 

कोकणातील एकंदर पाऊस आणि आर्द्रतेचा विचार 
 करता येथील शेतकरी झाडांच्यासोबत केलेल्या बांबू लागवडीस पाणी तसेच रासायनिक खतेदेखील देत नाहीत. जूनमध्ये लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी कंदास किमान एक ते दोन कोंब हमखास येतात. लागवडीनंतरची पहिली दोन वर्षे तण काढणी आवश्यक असते. बांबू लागवडीत सुरुवातीची तीन वर्षे आंतरपीक घेता येऊ शकते. बांबूमुळे बागेत निर्माण होणारी सावली तसेच खाली पडणाऱ्या सुकलेल्या पानांच्या दाट थरामुळे तीन-चार वर्षांनंतर कोणतेही तण बांबू जवळ वाढत नाही. बांबूची तंतुमय मुळे बेटापासून १० ते १५ फूट अंतरापर्यंत तसेच जमिनीत वरच्या ६ इंच भागात जाळी तयार करत असल्याने आपोआप तणांचा प्रतिबंध होतो. उन्हाळ्यात आजूबाजूला पडणारा झाडांचा व बांबूचा पालापाचोळा बांबूच्या मुळांवर ओढला जातो. मृग नक्षत्राअगोदर बांबू बेटांमध्ये शेण खत, लेंडी खत, भाताचे तूस वगैरे घालून त्यावर थोडी मातीची भर दिली जाते. 
उन्हाळ्याच्या दिवसांत कोकणात डोंगराच्या पट्ट्यात वणवा लागण्याचे प्रमाण जास्त असते. मध्यम स्वरूपाच्या आगींमुळे बांबू मरत नाही. काठ्या बाहेरून काळ्या दिसत असल्या तरी पावसाळ्यात त्यांना भरपूर पालवी येते आणि कोंबदेखील येतात. मात्र मोठ्या स्वरूपाच्या आगीपासून संरक्षण होण्यासाठी लागवडीभोवती जाळ रेषा काढणे आवश्यक असते. राष्ट्रीय बांबू अभियानाच्या अंतर्गत माणगा बांबूला भारतातील सर्वाधिक १८ औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण बांबू प्रजातींमध्ये स्थान देण्यात आले आहे. तसेच लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने शिफारस करण्यात आली आहे. 

बांबू पिकाचे व्यवस्थापन 

  •  वन्य प्राण्यांकडून विशेषतः वानर, रानडुक्कर, साळींदर, गवे, सांबर, हत्तींकडून मोठ्या प्रमाणावर बांबूच्या नवीन कोंबांचे नुकसान होते. त्यामुळे नवीन कोंब येणाच्या कालावधीत तीन महिने (जून ते ऑगस्ट) पीक संरक्षण करणे गरजेचे असते. शेतकरी या कालावधीत दिवसा पूर्ण वेळ लागवडीची राखण करतात. राखण करतेवेळी फटाके वाजवणे तसेच पीक संरक्षणासाठी कुत्र्यांचा वापर केल्यामुळे वानरांपासून होणारी नुकसानी ९० टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात. नॅफ्थेलीन गोळ्यांच्या पुरचुंड्या बांबू बेटाजवळ बांधून ठेवल्यास उग्र वासाने रानडुक्कर व साळींदर नवीन कोंब उकरत नाहीत, असे काही शेतकरी सांगतात.
  •  बेटात तोड झाल्यावर बांबूच्या फांद्या बेटातच मुळांवर ओढल्या जातात. त्यामुळे रानडुक्कर साळींदर थेट मुळांजवळ कोंब उकरू शकत नाहीत. वानरांकडून मोडलेल्या कोंबांचे नुकसान झाले तरी काही शेतकरी अशा काठ्या पुढच्या वर्षी कंद म्हणून लागवडीसाठी वापरतात.

तोडणीचे नियोजन 

  •  किमान व्यवस्थापन केल्यास चौथ्या वर्षी बांबूची पहिली तोड करता येते. पहिल्या तोडणीस बेटांतील २ व ३ वर्षे वयाच्या किमान ५ काठ्या तोडणीयोग्य मिळतात. कोवळ्या काठ्यांपासून पुढील वर्षी नवीन कोंब मिळणार असल्याने बेटातील दीड वर्ष व त्यापेक्षा कमी वयाच्या काठ्यांची तोड केली जात नाही. 
  •  सहाव्या वर्षानंतर दरवर्षी सरासरी १० ते १५ तोडणीयोग्य काठ्या प्रती बेट प्रती वर्षी मिळतात. झाडांच्या आधाराने करण्यात आलेल्या या बांबू लागवडीतून मिळणाऱ्या काठ्यांची संख्या कमी दिसत असली तरी काठीची उंची आणि जाडी सरासरीपेक्षा नेहमी जास्तच मिळते. त्यामुळे अशा काठ्यांना चालू बाजारभावापेक्षा (सरासरी ५०/प्रती काठी) किमान २० ते ४० रुपये अधिक मिळतात. व्यापारी शेतकऱ्यांना तोडणी अगोदरच विशेषतः गणेश चतुर्थी किंवा दिवाळीसाठी निम्मे पैसे देऊन ठेवतात. नोव्हेंबर ते मे महिन्यादरम्यान सर्वाधिक व्यावसायिक तोड होते. पावसाळ्यात नवीन कोंब येण्याचा कालावधी असल्याने तोड केली जात नाही. काठीची तोड जमिनीबरोबर केली जाते. 
  •  पारंपरिक पद्धतीनुसार समुद्राची ओहोटी किंवा अमावास्ये दरम्यान तोड करावी असा प्रघात आहे.  तीन वर्ष वयाच्या काठ्या तोड झाल्यावर कित्येकदा वाहत्या पाण्यात महिनाभर ठेऊन नंतर वापरल्यास त्या १० ते १५ वर्षे टिकत असल्याचे शेतकरी सांगतात. 
  •  बांबूपासून विणून बनविलेली सुपे, टोपल्या, रोवळ्या, चटया वगैरे वस्तूंना दरवर्षी गाईचे शेण व गोमूत्र यांनी एकत्रित सारविले जाते. यामुळे वस्तू आणखीन टिकाऊ होत असल्याचे शेतकरी सांगतात. 

फुलोरा आणि बेटांचे पुनरुज्जीवन

  • बांबू ही गवतवर्गीय वनस्पती असल्याने तिला जीवनात एकदाच फुलोरा येतो. अनेक प्रजातींच्या बाबतीत फुलोरा येण्याचा कालावधी ४० ते ६० वर्षांदरम्यान असतो. फुलोरा आल्यानंतर भरपूर बीजनिर्मिती करून बेट मरून जाते. मात्र माणगा या प्रजातीस फुलोरा आला तरी बीजधारणा होत नाही. जसजसे बेटाचे वय वाढते तसा काठीतील पोकळपणा वाढू लागतो. दोन पेरांतील अंतर अधिक लांब होते, असे शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे. 
  • ऑगस्ट-सप्टेंबरपासून बांबू पेर व फांद्यांवर झेंडूंच्या फुलांप्रमाणे आकार असलेले लहान काटेरी गुच्छ येऊ लागतात. हाच बांबूचा फुलोरा होय. फुलोरा संपूर्ण बेटास येऊ शकतो किंवा काहीवेळा एकाच बेटातील काही ठरावीक काठ्यांनादेखील आलेला दिसतो. शेतकरी फुलोरा आलेल्या बेटांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करतात. 
  • फुलोरा असलेल्या बेटातील सर्व काठ्या फेब्रुवारीपूर्वी हिरव्या असतानाच तोडल्या जातात. त्यानंतर एप्रिल-मे दरम्यान या तोडलेल्या बेटाच्या ठिकाणी थोडा पालापाचोळा घालून हलक्या स्वरूपात आग लावली जाते. याला ‘धगवणी’ असे म्हणतात. धगवणीनंतर लगेचच कंदावर भरपूर पाणी घातले जाते. तसेच ताजे शेण व पालापाचोळ्याने संपूर्ण कंद झाकला जातो. आग, पाणी व ताजे शेण यांच्या माध्यमातून जमिनीतील कंदामधील फुलोऱ्यास कारणीभूत असलेले विविध रस (संप्रेरके) कमी होत असावीत. शेतकरी यास ‘पित्त कमी करणे’ असेही म्हणतात. ही पद्धत वापरून फुलोरा आलेली बेटे ८० टक्क्यांपर्यंत पुन्हा जिवंत होऊन पुढील ३० ते ४० वर्षे उत्पादन देत राहतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. 

- मिलिंद पाटील, ९१३०८३७६०२
(लेखक कोकणातील शेतीप्रश्‍नांचे 
अभ्यासक आहेत)

 


इतर वन शेती
जमिनीच्या प्रकारानुसार वनशेतीचे नियोजनवनशेतीच्या विविध पद्धती या जमिनीच्या प्रतीनुसार,...
वनक्षेत्रामध्ये करा बीज गोळ्यांचा वापरपडीक जमिनी किंवा जंगलामध्ये बिया   केवळ...
व्यवस्थापन साग लागवडीचेसामान्यपणे सागाची छाटणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या...
नावीन्यपूर्ण बांबू कलाकृतीतून ७५...लोहारा (जि.चंद्रपूर) येथील चंदन कस्तूरवार व विशाल...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा वनस्पतीचे...
पारंपरिक बांबू लागवडीचे व्यवस्थापनसहाव्या वर्षानंतर दरवर्षी बांबू बेटातून सरासरी १०...
वनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
बांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...
तंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
बांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण...भारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात...
बांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...
बांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधानबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती...
वाढवूया बांबूचे उत्पादनजगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी...
बांबू लागवडीचा ताळेबंदसर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...