निसर्ग अन् लोकसंस्कृतीतून ग्रामविकासाला दिशा

plantation of verious pnat species in fish pond
plantation of verious pnat species in fish pond

भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या माध्यमातून भंडारा व गोंदिया जिल्ह्यामध्ये लोकसहभाग आणि मासेमारी संस्थांच्या माध्यमातून मत्स्य तलावांचे संवर्धन करण्यात येत आहे. तलाव परिसरातील जैवविविधताही जपली जात आहे. संस्था शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण, महिला विकास आणि वनसंवर्धनामध्येही कार्यरत आहे.

पर्यावरण आणि विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी १९९३ मध्ये भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाची सुरुवात झाली. यामध्ये प्रामुख्याने पक्षिनिरीक्षण, आकाश निरीक्षण, तसेच छोट्या प्रयोगांमधून विज्ञानाबद्दल रुची निर्माण होईल असे उपक्रम शहर तसेच ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालयांमध्ये राबवले जात होते. यासाठी भंडारा शहरातील काही समविचारी मित्रांनी पुढाकार घेऊन काम सुरू केले होते.  तलावांचा अभ्यास  दरवर्षी स्थलांतरित हिवाळी पाणपक्ष्यांच्या गणनेमध्ये संस्थेचे सदस्य आणि अभ्यासक सहभागी होत असत. भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात तलाव इतक्या मोठ्या संख्येत असण्याची कारणे शोधायला सुरुवात केल्यावर पूर्व विदर्भात अस्तित्वात असलेली पाणी व्यवस्थापनाची परंपरागत पद्धत समोर आली. या पद्धतीच्या अभ्यासाचे काम १९९६ मध्ये सुरू झाले. या भागातील कोहळी, पोवार, गोंड आणि शेती करणाऱ्या जवळपास सर्वच समाजांतील लोकांनी गोंड राजांच्या काळात हे तलाव बांधले. पिढ्यान पिढ्या गावातील लोकांनी याच्या आधारे शेती केली. गावातील तलाव सिंचनाच्या व्यतिरिक्त मासेमारी, जनावरांना पाणी आणि चराई, तलावातील भाज्या आणि कंद वापरात असायचे. याचबरोबरीने गवताचे विविध प्रकार हे घरगुती उपयोगाचे झाडू आणि घरांच्या छपरासाठी वापरले जातात. या तलावांना माजी मालगुजारी तलाव म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यानंतर मालगुजारी आणि जमीनदारी संपुष्टात येऊन तलाव सरकारच्या ताब्यात आले. हे परंपरागत तलाव असल्यामुळे यावर लोकांचे हक्क आहेत आणि त्याची महसूल संहितेच्या तरतुदीप्रमाणे निस्तार हक्क म्हणून नोंद आहे. हे हक्क फक्त सिंचनापुरते नोंदवले गेले. यामुळे सिंचनाकरिता पाणी मोफत वापरले जाते. या स्थितीत शासनाला देखभाल- दुरुस्तीचा खर्च करायचा होता; पण पाणीपट्टी घेता येणार नव्हती. हळूहळू त्यांचे दुर्लक्ष झाले. दुसरीकडे, सिंचनाचे हक्क सुरक्षित झाल्यामुळे आणि कामांची जबाबदारी शासनाने घेतल्यामुळे शेतकरी आणि तलाव हा संबंध फक्त पाण्यावर हक्क सांगण्यापुरता राहिला. पूर्वी जे शेतकरी पाटांची सफाई, तलावातील सुपीक गाळ शेतात टाकणे, पाणलोटातून येणाऱ्या पाण्याच्या मार्गांची स्वच्छता करणे ही कामे गावोगावी करत होते, ते आता फक्त मोजक्या ठिकाणी होताना दिसत आहे.  दुसरीकडे शासन पाण्याचे व्यवस्थापन करताना पिण्यासाठी पाणी, सिंचनासाठी पाणी आणि उद्योगांसाठी पाणी एवढाच उपयोग डोळ्यांसमोर ठेवून पाण्याचे नियोजन करते. गावाच्या पातळीवर लोक जे जगण्यासाठी पाणी वापरतात, तो दृष्टिकोन व्यवस्थापनामध्ये नसल्यामुळे सिंचनाव्यतिरिक्त इतर उपयोगांच्या आधारे उपजीविका करणाऱ्या लोकांच्या समस्या वाढत गेल्या. हे इतर उपयोग करणारे जे लोक आहेत, ते एकतर अल्प, अत्यल्प भूधारक आहेत किंवा भूमिहीन आहेत. जे तलावाचा जगण्यासाठी उपयोग करतात. त्यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाणी खर्च होत नाही. तलावात पाणी असताना त्याआधारे असणाऱ्या वनस्पती, मासे यांच्या उपयोगातून उपजीविकेच्या गरजा भागवतात; पण हळूहळू तलावांची दुरवस्था व्हायला लागली, त्यामुळे त्या तलावांच्या आधारे जगणाऱ्या लोकांचे उपजीविकेचे प्रश्न निर्माण झाले. अनेक शतकांपासून अस्तित्वात असलेल्या तलावांच्या आधारे जैवविविधता निर्माण झाली होती, त्यामध्ये वनस्पती, मासे, पाणपक्षी यांच्यावरही विपरीत परिणाम होऊन तलावांच्या दुरवस्थेत भरच पडली.

जैवविविधतेचे संवर्धन   परंपरेने मासेमारी करणाऱ्या धीवर समाजावर तलावाकडे झालेल्या दुर्लक्षाचे परिणाम जास्त प्रमाणात झाले. पण त्याचवेळी त्यांचा तलावाशी असणारा संबंध मासेमारीच्या माध्यमातून कायम राहिल्यामुळे, त्यांचे अनुभवजन्य ज्ञान टिकून आहे. बदलत्या परिस्थितीचे अनुभव व त्यांचे परिणाम याबाबतही त्यांचे ज्ञान अद्ययावत आहे. त्यामुळे या समाजातील माहीतगार लोकांच्या मदतीने तलाव संवर्धन, जैवविविधता संवर्धन आणि पर्यायाने लोकांची उपजीविका सुरक्षित करणे, याबाबतच्या कामाची संस्थेने २००६ मध्ये सुरुवात केली. यामध्ये लोकांचा चांगला सहभाग मिळू लागला आहे.

तलावात पाणवनस्पती आणि माशांची वाढ   लोकांच्या दृष्टीने तलावांची कमी झालेली उत्पादकता वाढवणे आवश्यक होते, त्याकरिता तलावात पूर्वी असलेल्या काठावरील आणि पाण्यातील वनस्पतींची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. दुर्लक्षित तलावांमध्ये या वनस्पती परत रुजण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जांभळी गावातील नवतलावात प्रयोग करून पाहण्याचे ठरले. कारण संस्था आणि लोकसमूह यांच्यापैकी कुणीच हे काम पूर्वी केले नव्हते. लोकांच्या अनुभवाच्या आधारे तलावात स्थानिक वनस्पती लागवड करून तलाव जिवंत करण्याचा प्रयोग झाला. हा प्रयोग यशस्वी होऊन तेथे वनस्पती, माशांच्या स्थानिक प्रजातींची संख्या आणि उत्पादन वाढले, सोबतच पाणपक्षीही तलावात परत आले. या बदलाला साधारण तीन वर्षे लागली. त्यानंतर हा अनुभव घेतलेले गावातील जाणकार पतिराम तुमसरे यांच्या सोबतीने या प्रयोगाची माहिती भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मासेमारी संस्थांपर्यंत पोहोचवली. तलावांना जिवंत केल्याशिवाय माशांचे उत्पादन वाढू शकणार नाही, निरंतर पद्धतीने मासेमारीचा व्यवसाय करायचा असेल, तर माशांच्या स्थानिक जातींचे संवर्धन करावे लागेल, असा विचार करणाऱ्या १२ मासेमारी सहकारी संस्थांबरोबर काम सुरू झाले.

संस्थेचे उपक्रम

  • तलावांच्या उभारणीसोबतच धीवर समाजाची उभारणीही आवश्यक होती. या समाजामधून नेतृत्व उभे करण्याकडे संस्थेने लक्ष दिले. या समाजातील महिला फार मेहनती आहेत; पण घरापासून ते गावातील सर्व संस्थांमध्ये पुरुषांचे वर्चस्व असल्यामुळे तरुण महिलांमधून समाजाचे नेतृत्व उभे करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
  • तलावांचे पाणलोट जंगलात असल्यामुळे, त्यांचे व्यवस्थापन करण्याकरिता व लोकांचीही जंगलावर उपजीविका असल्यामुळे वन हक्क कायद्याच्या आधारे संस्था लोकांच्या हक्कासाठी काम करते.
  • संस्थेच्या कामांमधून आज समाज व सोबतच तलावांचा विकास करणाऱ्या, नेतृत्व करणाऱ्या महिला व युवकांचा एक गट काम करतो आहे.
  • शालेय मुलांना तलाव आणि त्यांच्याशी जुळलेले जीवन याबाबत माहिती मिळावी म्हणून त्यासंबंधित प्रकल्प करायलाही संस्था मदत करते. 
  • मागील पाच वर्षांत ११ तलावांमध्ये २८१.८० हेक्टर क्षेत्रावर पाणवनस्पतींची लागवड करून त्या तलावांचे स्थानिक माशांपासून होणारे उत्पादन ४ ते १२ पटींनी वाढले आहे. 
  • परिसरातील लोकांनी २०८.९४ हेक्टर क्षेत्र असलेले १२ तलाव हे जल जैवविविधतेच्या संवर्धनासाठी राखीव ठेवले आहेत. यासोबतच सरकारद्वारे या भागात आणलेल्या रोहू, कटला, मृगळ या माशांची नैसर्गिक अन्नसाखळी पुन्हा प्रस्थापित झाल्यामुळे, वाढ दुप्पट झाली आहे. 
  • बाहेरून आणलेल्या माशांचे बीजही महिलांच्या माध्यमातून गावात तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कामाचा फायदा धीवर समाजाच्या बरोबरीने गावातील इतरही लोक, जे तलावांचा उपयोग करतात त्यांना झाला. पुन्हा एकदा तलाव ही जगण्याला आधार देणारी व्यवस्था होते आहे. 
  • लोकसहभागातून तलाव आणि परिसरातील १६१ वनस्पतींच्या प्रजाती, ७८ पक्ष्यांच्या प्रजाती आणि ५९ स्थानिक माशांच्या प्रजातींचे संरक्षण होत आहे.
  • - मनीष राजनकर, ८३२९३६२१५७ (भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ, अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com