लोकसहभागातून ग्रामविकासाला दिशा

soil and water conservation work
soil and water conservation work

सप्टेंबर २०१५ मध्ये मी गावाच्या सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारला. ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही विकासाचा एक जाहीरनामा तयार केला होता. तो लोकांसमोर मांडला. आज या जाहीरनाम्यातील ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत, याचे समाधान वाटते. यासाठी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले. संपूर्ण गावाने एकत्र येत प्रत्येक उपक्रम राबविला. उपक्रम राबविण्यापूर्वी आम्ही ग्रामस्थांची हिवरेबाजार, राळेगणसिद्धी तसेच प्रयोगशील गावांमध्ये अभ्यास सहल नेली होती. यातून ग्रामस्थांना विकास कामांची दिशा मिळाली.  शासनाच्या विविध योजनेमधून गावशिवारात जल, मृदसंधारणाची विविधकामे केली आहेत. आम्ही शिवारात १४ बंधारे बांधले असल्याने चांगल्याप्रकारे पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले. या उपक्रमामुळे सत्यमेव जयते स्पर्धेत राज्यस्तरावर २५ लाखांचे दुसरे पारितोषिक गावाला मिळाले. गावशिवारात असलेले नाले, प्रत्येक शेताची बांधबंदिस्ती केली आहे. त्यामुळे पावसाचे वहाते पाणी जमिनीत चांगल्याप्रकारे मुरते. ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावशिवारात वृक्षारोपण करून चांगल्या प्रकारे संवर्धन देखील केले आहे.  विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी गावात चांगले शैक्षणिक वातावरण तयार झाले आहे. शाळा रंगरंगोटी, जिल्हा परिषद शाळा, विद्यालयात ई-लर्निंग सुविधा तयार झाली आहे. विद्यार्थ्यांना स्कूल बॅग दिलेल्या आहेत. दरवर्षी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील केला जातो. गावात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सर्वत्र एलईडी बल्ब लावले आहेत. गावात ९५ टक्के भूमिगत नाल्या आहेत. युवकांसाठी व्यायामशाळा बांधलेली आहे. दरवर्षी दिवाळीला स्वतःच्या खर्चातून कबड्डी स्पर्धा भरविल्या जातात. मागास वस्तीमध्ये भाऊबीजेचा सामूहिक उपक्रम राबवून साडीवाटप केले जाते.  ‘आयएसओ’ मानांकन   ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शकपणे केला जातो. गावकऱ्यांना आपल्या गावात कुठली कामे झाली, किती खर्च झाला, काय प्रस्तावित आहे, याची माहिती देणारी विकास पुस्तिका दरवर्षी दिली जाते. ग्रामपंचायतीला आयएसओचे मानांकन मिळाले आहे. गावात मुलीच्या जन्माचे स्वागत होते. बेटी बचाव उपक्रमामध्ये जिल्हा पातळीवर आमच्या ग्रामपंचायतीचे काम उत्कृष्ट ठरले. गाव संपूर्ण स्वच्छतेतही अग्रेसर आहे. गावाला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेचा १० लाखांचा पुरस्कार मिळालेला आहे. या योजनेच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत गावाचा समावेश झाला आहे. अजून निकालाची घोषणा व्हायची आहे. 

येत्या काळातील उपक्रम  विविध कंपन्यांच्या सीएसआरअंतर्गत गावाला विकास निधी मिळवणे, जागतिक बँक साह्यित महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प गावासाठी मंजूर करून घेत रोजगार संधी निर्माण करण्यावर भर दिलेला आहे. गावामध्ये १०० टक्के सौर ऊर्जाप्रकल्प राबविण्यासाठी ‘मेडा’कडे प्रस्ताव सादर केला आहे. गावामध्ये बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी मंत्रालयामध्ये आम्ही प्रस्ताव दिला आहे. गावात १०० टक्के घरकूल मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हा गावकऱ्यांना गाडगेबाबा ग्रामस्वच्‍छता स्पर्धेत राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळवायचा आहे. यासाठी संपूर्ण गाव एकभावनेने काम करत आहे. 

- सौ. विमल अर्जुन कदम, ९०११७५५७०९   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com