प्रक्रिया उत्पादनांवर 'साहिवाल क्लब'चा भर

दूध विक्रीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन तूप, पनीर निर्मितीवर ‘साहिवाल क्लब' सदस्यांनी भर दिला आहे.तसेच जमीन सुपीकतेवर भर देत शेणखत, बायोगॅस स्लरी, गोमूत्र अर्क,गांडूळ खत निर्मितीतून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे.
sahiwal cow
sahiwal cow

दूध विक्रीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन तूप, पनीर निर्मितीवर ‘साहिवाल क्लब' सदस्यांनी भर दिला आहे.तसेच जमीन सुपीकतेवर भर देत शेणखत, बायोगॅस स्लरी, गोमूत्र अर्क,गांडूळ खत निर्मितीतून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे.

सध्याच्या कोरोनाच्या विषाणूच्या साथीमुळे बाजारपेठ, शेतकरी, पशुपालकांच्या दैनंदिन जीवन आणि आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला आहे. या संकटावर मात करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय. याला साहिवाल या देशी गोवंशाचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांच्या ‘साहिवाल क्लब' चा देखील अपवाद नाही. दूध विक्रीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन तूप, पनीर निर्मितीवर सदस्यांनी भर दिला आहे.तसेच जमीन सुपीकतेवर भर देत शेणखत, बायोगॅस स्लरी, गोमूत्र अर्क,गांडूळ खत निर्मितीतून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे. याबाबत माहिती देताना पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील साहाय्यक प्राध्यापक आणि साहिवाल क्लबचे मुख्य तांत्रिक मार्गदर्शक डॉ.सोमनाथ माने म्हणाले की, साहिवाल क्लबचे पुणे, सातारा, सोलापूर,सांगली या जिल्ह्यातील ७२ सदस्य आहेत. प्रत्येकाकडे सरासरी ५ ते ४० साहिवाल गाई आहेत. क्लबच्या माध्यमातून दररोज सरासरी आठशे लीटर दुग्धोत्पादन होते.  प्रत्येक सदस्याने परिसरातील बाजारपेठ आणि मागणी लक्षात घेऊन दूध विक्रीची व्यवस्था स्वतःच्या पातळीवर उभारली आहे. परंतु सध्याच्या काळात कोरोनाच्या प्रसारामुळे विविध शहरातील ग्राहकांपर्यंत दूध पोहोचविण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उत्पादित दुधाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सदस्यांनी तूप निर्मितीवर भर दिला.  देशी गाईच्या तुपाला ग्रामीण, शहरी ग्राहकांच्याकडून चांगली मागणी आहे. काही दिवसात बाजारपेठ सुरळीत झाल्यानंतर तूप विक्रीतून आर्थिक नुकसान भरून काढणे शक्य आहे. सध्या तूपनिर्मिती भविष्यातील आर्थिक गुंतवणूक म्हणावी लागेल. सध्या दर महिन्याला ३०० किलो तूप निर्मिती होते. राज्यभरात लोकांच्या संपर्कातून सध्या २००० ते २५०० रुपये किलो दराने तूप विक्री होते. काही सदस्य परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन ताक, पनीर विक्री करत आहेत. सर्व सदस्यांना घरगुतीस्तरावर दूध प्रक्रिया पदार्थ निर्मिती, कोणती यंत्रणा वापरावी याबाबत तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे येत्या काळात दूध विक्रीवर न थांबता तूप, खवा,पनीर, लस्सी, आइस्क्रीम या सारख्या प्रक्रिया उत्पादनावर भर देत ‘साहिवाल गोल्ड' हा ब्रॅण्ड बाजारपेठेत आणत आहोत. 

ॲप निर्मिती

 प्रत्येक सदस्याकडील जातिवंत दुधाळ गाई तसेच वासरांची नोंद ठेवली जाते. प्रत्येक गाय आणि वासराला टॅग दिलेला आहे. या नोंदी अद्ययावत करण्यासाठी साहिवाल क्लबतर्फे ॲप ची निर्मिती सुरू आहे. सध्या सदस्य संगणक, वहीमध्ये दैनंदिन दूध उत्पादन, आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण, कृत्रीम रेतन, दूध उत्पादन, प्रक्रिया उत्पादने आदी माहिती नोंदवीत आहेत. येत्या काळात ही माहिती स्वतंत्र ॲपमध्ये नोंदविली जाईल, यासाठी पशूतज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे.     

दुधाळ गाईंची पैदास  

  साहिवाल क्लबमधील सदस्यांकडे जातिवंत दुधाळ गाई आहेत. संभाव्य आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी लसीकरण, जंत निर्मूलन करण्यात आले आहे. देशी गाय काटक असल्याने बदलत्या हवामानाचा ताण सहन करू शकतात. साहिवाल गाय दररोज सरासरी ६ ते ८ लिटर दूध देते.  मात्र पुढील पिढी अधिक सक्षम आणि दुधाळ होण्यासाठी योग्य गुणवत्तेच्या रेतमात्रांचा वापर करण्यात येत आहे. काही सदस्य मूरघास, हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती करत आहेत, अशी माहिती डॉ.माने यांनी दिली.

जमीन सुपीकतेमध्ये गुंतवणूक

 साहिवाल क्लबमधील बहुतांश सदस्यांकडे मुक्त संचार गोठा आहे. त्यामुळे गोठ्यात पसरलेले सुके गवत, पाचटामध्ये शेण,गोमूत्र मिसळले जाऊन तीन महिन्यात चांगले खत तयार होते. बहुतांश सदस्य स्वतःच्या शेतीमध्ये हे खत वापरून सुपीकता, सेंद्रिय कर्ब वाढवण्याकडे वळले आहेत. सदस्यांनी पूरक उद्योग म्हणून गांडूळ खत निर्मिती सुरू केली आहे. सध्या दरमहा चार टन गांडूळ खत निर्मिती केली जाते. सरासरी सात रुपये किलो या दराने विक्री केली जाते. काही सदस्यांकडे बायोगॅस आहे. त्यामुळे स्वयंपाक आणि प्रक्रिया उद्योगासाठी गॅस मिळतो. बायोगॅस स्लरीमध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी जिवाणू संवर्धक मिसळून फळबागांना दिली जाते. या स्लरीला बागायतदारांच्याकडून मागणी आहे.  जीवामृत,दशपर्णी अर्क निर्मितीसाठी गोमुत्राची विक्री वाढली आहे. स्लरी, गोमूत्र, गांडूळखत, शेणाच्या गोवऱ्या  हे उत्पन्नाचा नवीन स्रोत तयार झाले आहे. 

- डॉ.सोमनाथ माने,९८८१७२१०२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com