अधिकरावांनी विकली २२ गावात कलिंगडे 

एकीकडे लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेले मार्केट आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपिटीची डोक्यावर टांगती तलवार... अशा स्थितीत विक्रीयोग्य तब्बल ५५ टन कलिंगडांकडे हताशपणे पहाण्याएवजी अधिकराव माने यांनी २२ गावांमध्ये स्वतः फिरून विक्री केली. जेथे नुकसानच होणार होते तेथे खर्च वजा जाता पंधरा दिवसात सव्वा लाखांची मिळकत त्यांनी केली.
sale of watermelon
sale of watermelon

 एकीकडे लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेले मार्केट आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपिटीची डोक्यावर टांगती तलवार... अशा स्थितीत विक्रीयोग्य तब्बल ५५ टन कलिंगडांकडे हताशपणे पहाण्याएवजी अधिकराव माने यांनी २२ गावांमध्ये स्वतः फिरून विक्री केली. जेथे नुकसानच होणार होते तेथे खर्च वजा जाता पंधरा दिवसात सव्वा लाखांची मिळकत त्यांनी केली.   मानेगाव (ता.पाटण, जि.सातारा) येथील आधिकराव माने यांची प्रयोगशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ओळख. साडे आठ एकरापैकी दरवर्षी दीड एकर कलिंगड लागवड ठरलेली. यंदाही त्यांनी फेब्रुवारी महिन्यात कलिंगड लागवड केली. योग्य व्यवस्थापनामुळे दर्जेदार फळेही तयार झाली. यासाठी सुमारे एक लाख १७ हजाराचा खर्च त्यांनी केला होता. मात्र फळांच्या विक्री सुरू होण्याच्या टप्यात कोरोनामुळे लॉकडाऊनचे संकट उभे ठाकले. जेथे नऊ रुपये किलोचा दर ठरलेला, तेथे व्यापारी चार रुपये किलोने कलिंगड मागू लागले. त्यातच वळीव आणि गारपिटीचे वातावरण. पुढील धोका लक्षात घेऊन अधिकराव माने यांनी शेतामध्येच चार प्रकारे प्रतवारी करून कलिंगडाचे ढीग केले. त्यावर वेल, नारळाच्या झावळ्यांचे आच्छादन केले. हवा खेळती राहील याचीही काळजी घेतली. दोनच दिवसात गारपीट झाली, परंतु योग्य प्रकारे कलिंगडाचे ढीग झाकले असल्याने माने यांचे फारसे नुकसान झाले नाही. फळेदेखील चांगली राहिली. त्यामुळे त्यांनी विक्रीचे नियोजन सुरू केले. 

थेट विक्रीवर दिला भर  व्यापाऱ्यांनी दर पाडून मागितल्याने माने यांनी स्वतःच परिसरातील २२ गावात ओळखीच्या लोकांना मोबाईलवर संपर्क करून दैनंदिन फळांच्या विक्रीचे नियोजन केले. तसेच तालुक्यात फिरती विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना शेतात खरेदीसाठी बोलावले.  आधिकराव आणि त्यांचे बंधू सुभाष यांनी मजुरांना बरोबर घेत कराड, पाटण तालुक्यात दररोज सहा गावात कलिंगड विक्रीस सुरवात केली. एका ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये दीड टन आणि पीक अप गाडीत दीड टन कलिंगड भरून दोघे बंधू दररोज प्रत्येकी तीन गावात कलिंगडाची थेट विक्री करू लागले. विक्री देखील फळांच्या प्रतवारीनुसार केली. त्यामुळे प्रतवारीनुसार कलिंगडाला २० ते ८० रुपये असा दर त्यांना मिळाला. जवळपास पंधरा दिवसात दोघा भावांनी ५५ टन कलिंगडांची विक्री केली. शेतावर देखील काही फिरते विक्रेते दररोज २०० ते ३०० किलो कलिंगडाची खरेदी करायचे,यातून काही रक्कम मिळत गेली.  कलिंगड विक्रीच्या अनुभवाबाबत अधिकराव माने म्हणाले की, यंदा कलिंगडाचे दर्जेदार उत्पादन हाती आले होते. व्यापाऱ्यांनी देखील चांगल्या दराने कलिंगड खरेदीची तयारी दाखविल्यामुळे किमान चार, साडेचार लाखांचे उत्पन्न मिळणार असे वाटत होते. एक लाख १७ हजाराचा खर्च देखील झालेला. पण कोरोना, गारपिटीचे संकट आणि व्यापाऱ्यांनी चार रुपये किलोने सांगितलेला दर मला परवडणारा नव्हता. मी स्वतः भावासोबत फळ विक्रीचा निर्णय घेतला. जेथे ५० हजारांच्या उत्पन्नाची खात्री नव्हती, तेथे थेट विक्री करत प्रति किलोस सरासरी १० ते १२ रुपये दर मिळवत खर्च वजा जाता सव्वा लाखांचे उत्पन्न मिळविले. अपेक्षेपेक्षा नफा कमी मिळाला, पण जिद्दीने स्वतः विक्री केल्याने नुकसानीत गेलो नाही,याचे समाधान आहे.  संपर्क ः आधिकराव माने, ९८२३८८८८७९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com