कुक्कुटपालन, परसबागेने दिली आर्थिक साथ

कुक्कुटपालन व्यवसायाला डिसेंबरमध्ये सुरवात केली होती. टाळेबंदीत गिरीराजा कोंबड्यांची ग्राहकांनी थेट विक्री केल्याने उत्पन्नात वाढ झाली. या व्यवसायात चांगला नफा मिळत असल्याने वाढ करणार आहे. त्याचबरोबरीने परसबागेत विविध भाजीपाला पिकांची लागवड वाढविणार आहे. त्यातून वर्षभर शाश्वत आर्थिक मिळकत होणार आहे. — अंजली चाळके, ९७६६८६५०२५
poultry bird
poultry bird

चिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली शशिकांत चाळके यांना दोन वर्षांपासून परसबागेत हंगामनिहाय विविध भाजीपाला लागवडीतून चांगला आर्थिक नफा मिळत आहे.यंदा त्यांनी पूरक उद्योग म्हणून गिरीराजा,वनराजा या सुधारित जातीच्या कोंबड्यांचे संगोपन सुरू केले.  सध्याच्या काळात थेट ग्राहकांना भाजीपाला आणि कोंबड्यांची विक्री करत अंजली चाळके यांनी शाश्वत आर्थिक नफ्याचा मार्ग शोधला आहे. उदरनिर्वाहासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. गिरीराजा, कावेरी या सुधारित गावठी कोंबड्यांचे संगोपन आणि विक्री सुरू झाली. तेवढ्यात कोरोनाची टाळेबंदी सुरु झाली. पंचक्रोशीत मासे, ब्रॉयलर कोंबड्यांची वाहतूक बंद झाल्याने ग्रामस्थ गावठी कोंबड्यांच्या खरेदीकडे वळले. सगळ्याच कोंबड्यांची जागेवर विक्री झाली आणि कमी कालावधीत हाती चांगले पैसे आले. त्यामुळे ठरवलं की, गावठी कोंबडीपालन व्यवसायामध्येच गुंतवणूक करायची... हे अनुभव आहेत चिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली शशिकांत चाळके यांचे. सध्याच्या काळात सुधारित देशी जातीच्या कोंबडीपालनातून चांगला नफा मिळवीत यामध्येच त्यांनी गुंतवणूक वाढविली आहे. कोंबडीपालनाला सुरवात   चिपळूण तालुक्यातील चिंचघरी येथे शासनाच्या उमेद योजनेंतर्गत गणेश महिला समूहाची स्थापना करण्यात आली. परसबागेत भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, शेळीपालन, प्रक्रिया उद्योगामध्ये या गटातील सदस्या कार्यरत आहेत. या महिला समुहामध्ये अंजली शशिकांत चाळके  या देखील सदस्या आहेत. समूहातील सर्व सदस्यांनी एकच व्यवसाय न करता वेगवेगळ्या पूरक उद्योगांची निवड केली आहे. अंजलीताईंनी सुधारित गावरान कोंबडीपालनासह परसबाग संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे दोन वर्षांपासून परसबाग आहे. त्यामध्ये वर्षभर हंगामानुसार विविध भाजीपाल्याची लागवड करतात. याचबरोबरीने त्यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात कुक्कुटपालनाला सुरवात केली. कोंबड्यांसाठी स्वतंत्र लहानशी शेड बांधली. त्यामध्ये शंभर गिरीराजा आणि शंभर कावेरी, वनराजा या सुधारित देशी कोंबड्यांच्या पिल्लांचे संगोपन सुरू केले. ही पिल्ले त्यांनी कळबस्ते गावातील कुक्कुटपालन केंद्रातून आणली होती.  गिरीराजा कोंबड्यांना मागणी  मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा, वाहतूक बंद झाली.  त्याचा फटका ब्रॉयलर कोंबडी विक्रेत्यांना बसला. ग्रामीण भागात जीवनावश्यक गोष्टींचाही काही काळ तुटवडा  जाणवत होता. कोकणात मांसाहाराला जेवणात प्राधान्य दिले जाते. परंतु टाळेबंदीमुळे बाजारपेठेत मासे, ब्रॉयलर कोंबड्या मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांच्याकडून  गावठी कोंबड्यांची खरेदी वाढली. याचा फायदा अंजली चाळके यांना झाला. कोंबडीपालनाबाबत अंजलीताई म्हणाल्या की, ग्रामीण भागात गिरीराजा, वनराजा कोंबडीला वर्षभर चांगली मागणी आहे. उमेदचे अभियान व्यवस्थापक अमोल काटकर आणि प्रभाग समन्वयक विलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली  मी लहान स्तरावर डिसेंबर महिन्यात पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. कोंबड्यांच्या संगोपनासाठी खोली तयार ठेवली. शंभर गिरीराजा आणि शंभर कावेरी, वनराजा या सुधारित देशी कोंबड्यांच्या पिल्लांचे संगोपन सुरू केले. खोलीमध्ये खाद्य आणि पाण्याची व्यवस्था केली. तापमान व्यवस्थित राहण्यासाठी विजेचे बल्ब लावले. मला पिल्लांच्या खरेदीसाठी दोन हजार रुपये आणि खाद्य व्यवस्थापनासाठी पाच हजार रुपयांचा खर्च आला. उमेदकडून मी पिल्लांना खाद्य, औषधे देणे आणि लसीकरणाचे प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे कोंबड्यांचे तीन महिन्यापर्यंत चांगले संगोपन मी केले. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांश कोंबड्यांचे वजन सव्वा किलोपर्यंत झाले होते.  

जागेवरच कोंबड्यांची विक्री  विक्रीच्या नियोजनाबाबत अंजली ताई म्हणाल्या की, कोरोनाच्या टाळेबंदीमुळे परिसरातील गावांमध्ये मासळीचा तुटवडा होता. त्यामुळे ग्रामस्थांच्याकडून गिरीराजा कोंबडीला मागणी वाढू लागली. त्यामुळे माझा कोंबडी विक्रीचा प्रश्न सुटला. ग्रामस्थ घरी येऊन कोंबड्या खरेदी करू लागले. पंधरा दिवसांच्या कालावधीत मी वजनानुसार २५० ते ३०० रुपये या दराने जागेवरच कोंबड्यांची विक्री केली. पिल्ले खरेदी आणि खाद्य व्यवस्थापनाचा खर्च वजा जाता मला तीन महिन्यात सतरा हजारांचा नफा झाला. सध्याच्या टाळेबंदीच्या काळात सुधारित देशी कोंबड्यांना मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती आहे. टाळेबंदीमुळे  घरच्या लोकांच्यापुढे रोजगाराचा प्रश्न होता. परंतू कोंबडीपालनाने या अडचणीच्या काळात चांगला आर्थिक आधार दिला आहे. गिरीरराजा कोंबड्यांना असलेली मागणी लक्षात घेऊन मी  २०० पिल्लांची मागणी नोंदविलेली आहे. त्यातील शंभर पिल्ले  माझ्या शेडमध्ये आली आहेत. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कोकणात कोंबड्यांना चांगली मागणी असते. त्यामुळे या काळात कोंबडीची विक्री सुरू होईल. टाळेबंदीमुळे थेट ग्राहकांना कोंबडी विक्रीची नवी व्यवस्था तयार झाली आहे. त्याचा कुक्कुटपालन व्यवसाय वाढीला चांगला फायदा होणार आहे.  

परसबागेतूनही आर्थिक आधार गेल्या दोन वर्षांपासून अंजलीताई घरच्या परसबागेत हंगामानुसार पालेभाजी, वांगी,गवार, मिरची, हिरवा माठ, दुधी भोपळा याची लागवड करतात. परिसरातील गावात आठवड्यातून चार दिवस त्या भाजीपाल्याची स्वतः विक्री करतात. दोन तासामध्येच सर्व भाजीपाला संपतो. भाजीपाला विक्रीतून दर आठवड्याला १२०० रुपये त्यांना मिळतात. त्यामुळे परसबागेने देखील त्यांना चांगली आर्थिक साथ दिली आहे. 

महिला गटांना ‘उमेद'ची साथ

चिपळूण तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून १३० ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ‘उमेद' अंतर्गत २४०० महिला समूह गट कार्यरत आहेत. याबाबत माहिती देताना ‘उमेद'चे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर म्हणाले की,या गटातील महिलांना आम्ही परसबागेत भाजीपाला लागवड, शेळीपालन, कुक्कुटपालन, आंबा,काजू,नाचणी, मिरची मसाला प्रक्रिया उद्योग तसेच शिवणकामाचे प्रशिक्षण देतो. तसेच व्यवसायासाठी काही प्रमाणात योजनेनुसार आर्थिक सहाय्य करतो. यातून विविध गावांमध्ये महिलांनी शेतीपूरक उद्योग सुरू केले. त्यांना चांगला आर्थिक नफा  मिळत आहे. टाळेबंदीच्या काळात काही महिलांनी थेट भाजीपाला, कोंबड्यांची विक्री करून नवी बाजारपेठ तयार केली. त्याचा पुढील काळात देखील फायदा होणार आहे.

- अमोल काटकर,९७६७३४६३५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com