शेतीला दिली पूरक उद्योगाची जोड

अवर्षणग्रस्त ढालगाव (जि. सांगली) येथील आप्पासो बाबा लिमकर यांनी नऊ हेक्टर शेतीला पूरक उद्योगांची जोड दिली आहे. बाजारपेठेचा विचार करून लिमकर यांनी रेशीम शेती, शेळीपालन, खिल्लार गाईंच्या संगोपनातून अर्थकारण सक्षम केले आहे.
sericulture unit management
sericulture unit management

अवर्षणग्रस्त ढालगाव (जि. सांगली) येथील आप्पासो बाबा लिमकर यांनी नऊ हेक्टर शेतीला पूरक उद्योगांची जोड दिली आहे. बाजारपेठेचा विचार करून लिमकर यांनी रेशीम शेती, शेळीपालन, खिल्लार गाईंच्या संगोपनातून अर्थकारण सक्षम केले आहे. 

कवेठमहांकाळ तालुका हा कायम दुष्काळी. या तालुक्यातील ढालगावमध्ये आप्पासो बाबा लिमकर यांची वडिलोपार्जित शेती नऊ हेक्टर शेती आहे. पावसाची अनिश्चितता असल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकातून कसेबसे घर चालायचे. लहानपणीच त्यांच्यावर शेतीची जबाबदारी आली. शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे जाणून उदरनिर्वाह करण्यासाठी घरच्या शेती नियोजनात चांगल्या पद्धतीने लक्ष देण्यास सुरुवात केली. पाणी उपलब्धतेसाठी १९७२ मध्ये विहीर काढली, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने विहीर पूर्ण करता आली नाही. त्यामुळे शेतात काय पेरायचे आणि बियाणे कुठून आणायचे असा प्रश्न उभा होता. या वेळी गावातील शेतकऱ्यांकडून भुईमुगाचे बियाणे घेत त्यांनी लागवड पूर्ण केली. भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळाल्यामुळे हुरूप वाढला. सन २००३ मध्ये लिमकर यांनी कूपनलिका घेतली. याला चांगले पाणी लागले. त्यामुळे पीक पद्धती बदलण्यास त्यांनी सुरुवात केली. मात्र २००५ दुष्काळ पडल्याने कूपनलिकेचे पाणी कमी झाले. दुष्काळामुळे गावातील मजुरांना काम नव्हते. त्यामुळे लिमकर यांनी मजुरांच्या मदतीने विहीर पूर्ण केली. पुढील काळात चांगला पाऊस झाल्याने विहिरीत पाण्याची चांगली उपलब्धता झाली. सर्व लागवड क्षेत्रात पुरेशा पाण्याची शाश्वत सोय होण्यासाठी लिमकर यांनी कूपनलिका घेतल्या. याच दरम्यान शेतीसाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी गावशिवारात आल्याने शाश्वत पाण्याची सोय झाली. सध्या एक विहीर, चार कूपनलिकेतून पाण्याची उपलब्धता होत आहे.     लिमकर यांचे एकत्रित कुटुंब असल्याने शेतीचे नियोजन सोपे जाते. पाण्याच्या उपलब्धतेमुळे लिमकर ऊस, हळद, मका, ज्वारी, बेबीकॉर्न लागवडीकडे वळाले. दरवर्षी सहा एकर ऊस, एक एकर हळद, एक एकर बेबीकॉर्न, पाच एकर ज्वारी, एक एकर गव्हाची लागवड असते. पिकाचे दर्जेदार उत्पादन घेण्यावर त्यांचा भर असतो. याचबरोबरीने बाजारपेठेची गरज ओळखून लिमकर यांनी रेशीम शेती, शेळीपालन, गावरान कोंबडीपालन आणि खिल्लार गाईंच्या संगोपनाला सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी लिमकर यांनी १०० बाय १०० मीटरचे शेततळे केल्याने शाश्वत पाण्याची सोय झाली आहे. यामध्ये कटला माशांचे संगोपन केले आहे. येत्या काही महिन्यांत माशांच्या विक्री सुरू होत आहे.

खिल्लार गाईंचे संगोपन   लिमकर यांना खिल्लार गाई आणि बैलांच्या संगोपनाची आवड आहे. सध्या त्यांच्याकडे १५ जातिवंत खिल्लार गाई आहेत. दरवर्षी ४ ते ५ खोंडांची विक्री केली जाते. गुणवत्तेनुसार एक खोंड सरासरी पन्नास हजार ते एक लाखापर्यंत विकला जातो. जातिवंत खिल्लारसाठी त्यांच्याकडे चांगली मागणी असते. गाईंच्या संगोपनामुळे शेतीला पुरेशा प्रमाणात शेणखताची उपलब्धता होते. लिमकर यांनी गांडूळ खतनिर्मितीदेखील सुरू केली आहे. दर तीन महिन्याला एक टन गांडूळ खत उपलब्ध होते. हे शेतीसाठीच वापरले जाते. 

जातिवंत बोकडांची विक्री  लिमकर यांनी शेतीला शेळीपालनाची जोड दिली आहे. सध्या त्यांच्याकडे २५ उस्मानाबादी शेळ्या आहेत. उपलब्ध चाऱ्यावरच शेळ्यांचे संगोपन केले जाते. दरवर्षी स्थानिक व्यापाऱ्यांना लहान करडू आणि बोकडांची मागणीनुसार विक्री केली जाते. सरासरी सहा हजाराला एका लहान बोकडाची विक्री होते. शेळीपालनातून वर्षाला दीड लाखांचा नफा मिळतो. जातिवंत उस्मानाबादी शेळीला परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून चांगली मागणी आहे.

रेशीम शेतीचे नियोजन सन २०१२ मध्ये ढालगावमध्ये रेशीम विभागाचे अधिकाऱ्यांनी चर्चासत्रामध्ये परिसरातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीबाबत माहिती दिली होती. या चर्चासत्राला लिमकर उपस्थित होते. या मार्गदर्शनातून त्यांना रेशीम शेतीबाबत चांगली माहिती मिळाली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार लिमकर यांनी रेशीम शेतीला सुरुवात केली. याबाबत लिमकर म्हणाले, की आत्मा विभागाकडून आयोजित रेशीम शेती कार्यशाळेत मी सहभागी झालो होतो. याठिकाणी मला तुती लागवडीबाबत प्रशिक्षण आणि रेशीम कीटक संगोपनाची तांत्रिक माहितीदेखील मिळाली. मार्गदर्शनानुसार दोन एकर क्षेत्रावर चार फूट बाय २ फूट अंतराने तुती लागवड केली आहे. आता या लागवडीला ठिबक सिंचन केले आहे.  रेशीम कीटक संगोपनासाठी शेड उभारली. यासाठी रेशीम विभागाकडून दोन लाखांचे अनुदान मिळाले होते. मी रेशीम शेतीमध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा करत गेलो. त्यामुळे रेशीम शेतीतून अपेक्षित नफा मिळू लागला आहे. शेडची योग्य स्वच्छता ठेवली जाते. तसेच दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात तुतीची छाटणी केली जाते. शेणखताचा जास्तीत जास्त वापर केल्याने तुतीची चांगली वाढ होते. गेल्या सात वर्षांपासून मला दरवर्षी रेशीम कोषांच्या पाच ते सहा बॅच होतात. एका बॅचमधून १६० ते १८० किलो कोषांचे उत्पादन मिळते. कोषांची गावात येणाऱ्या  व्यापाऱ्याला केली जाते. काही वेळा मुधोळ, रामनगर येथे कोष विक्रीला पाठविले जातात. प्रतवारीकरूनच कोष विक्री केल्याने मला चांगला दर मिळतो. खर्च वजा जाता मला सत्तर हजारांचा नफा मिळाला आहे.

पुरस्काराने सन्मान 

  • सांगली बाजार समितीच्या वतीने जनावरे प्रदर्शनात २००१-०२, २००२-०३, २००८, २०११-१२ सन्मान.
  • सन २००९ मध्ये सेंद्रिय शेतमाल प्रदर्शनात कृषी विभागाकडून तालुका स्तरावर सन्मान.
  • सन २०१३ मध्ये रेशीम संचालनालय, वस्त्रोद्योग विभागातर्फे आदर्श रेशीम शेती उद्योजक पुरस्काराने सन्मान.
  • - आप्पासो लिमकर, ९८८१९०३५६३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com