केळी पीलबागेचे व्यवस्थापन, खर्च कमी करण्यावर भर

सध्या जुलैमध्ये लागवडीच्या बागेतील काढणी ७० टक्‍क्‍यांवर झाली आहे. या बागेत मी खोडव्याचे (पीलबाग) व्यवस्थापन करणार आहे.
Banana crop
Banana crop

 माझी काळी कसदार दहा एकर शेती आहे. दोन कूपनलिका असून, एका सालगडीच्या मदतीने शेतीचे व्यवस्थापन मी करतो. कृषी पदवीधर असल्याने पिकाचे योग्य व्यवस्थापन करत चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. मी दोन टप्प्यात केळीची लागवड केली आहे. पहिली लागवड चार एकरात २ जुलै २०१९ रोजी आणि दुसरी लागवड सहा एकरात जानेवारीत केली होती. मी उतिसंवर्धित रोपांची लागवड केली आहे.  सध्या जुलैमध्ये लागवडीच्या बागेतील काढणी ७० टक्‍क्‍यांवर झाली आहे. या बागेत मी खोडव्याचे (पीलबाग) व्यवस्थापन करणार आहे. कोरोना टाळेबंदीमुळे केळीचे दर उतरलेले आहेत. मला सरासरी ५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे.येत्या काळात केळी पिकावरील खर्च कमी करण्याबाबत कटाक्ष असणार आहे. त्यातूनच खोडवा व्यवस्थापनासंबंधीचे नियोजन केले आहे. 

असे आहे नियोजन 

  •  चार एकरातील लागवड सहा बाय पाच फूट अंतरात केली आहे. सुमारे सहा हजार झाडे या बागेत आहेत. बाग जोमदार असल्याने काढणी ९० टक्‍क्‍यांपर्यंत होईल. यामुळे पीलबागेतही झाडांची संख्या ९५ टक्‍क्‍यांवर राखता येणार आहे. गादीवाफ्यावर लागवड असून ठिबक सिंचन केलेले आहे.
  •   काढणीनंतर  गादीवाफे व्यवस्थित करून पिकाचे अवशेष बागेतच टाकणार आहे. पावसाळ्यात या अवशेषांवर एकरी ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकणार आहेत. तसेच २०० लिटर पाण्यात पालापाचोळा कुजविणारे जिवाणू संवर्धक ३ लिटर मिसळून केळीच्या अवशेषांवर शिंपडून देणार आहे. यामुळे हे योग्य वेळेत कुजून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होणार आहे.
  •   मातीची  तपासणी लागवडीच्या पूर्वी केली होती. यामुळे कुठले अन्नघटक आवश्‍यक आहेत, याची नेमकी माहिती आहे. यानुसार खोडवा पिकाला खते देणार आहे. खर्च कमी करण्यासाठी फक्त दोन बेसल डोस देणार आहेत. यानंतर आवश्‍यकतेनुसार खते व पाण्याचे नियोजन केले जाईल. 
  •   सध्या  बागेत काढणी पूर्ण होत आली असली तरी फुटव्यांची चांगली वाढ व्हावी यासाठी रोज किमान सहा तास सिंचन केले जात आहे. ड्रीपरची पाणी देण्याची क्षमता प्रति तास प्रति ड्रीप चार लीटर एवढी आहे. पुढे पावसाळ्यात सिंचनाची फारशी गरज भासणार नाही. फक्त पावसात खंड पडल्यास उष्णता व आर्द्रता लक्षात घेऊन सिंचन केले जाईल. हिवाळ्यात रात्रीच्या वेळेस रोज तीन ते चार तास सिंचनाचे नियोजन आहे. पुढील १० ते ११ महिन्यात पीलबाग केळीची काढणीदेखील पूर्ण होईल.
  • पूर्वमशागत, लागवडीसंबंधीचा खर्च वाचणार

  • पीलबाग केळीमुळे पुनर्लागवड, पूर्वमशागत व मजुरीचा खर्च वाचणार आहे. त्यात नांगरणी, रोटाव्हेटर, बेड निर्मितीचा एकरी किमान २८०० रुपये खर्च वाचेल.
  •  नव्याने केळी लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपाची गरज भासली असती, परंतु पीलबागेसाठी रोपांचा खर्च नाही. त्यामुळे एकरी किमान १८ हजार रुपये खर्च वाचणार आहे. तसेच लागवड व इतर कामांसाठीचा मजुरी खर्चही लागणार नाही. 
  •  ठिबक सिंचन यंत्रणा बागेत कार्यरत आहे, तीच पुढेही वापरात असणार आहे. त्यामुळे ठिबक सिंचन आणि दुरुस्तीचा फारसा खर्च लागणार नाही. 
  • - नितीन चौधरी, ९४२३९०६१३०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com