जल, मृद्संधारणातून विकासाच्या दिशेने

clean water supply project in village
clean water supply project in village

उत्तर सोलापूर तालुक्यातील शेवटच्या टोकाकडील भागाईवाडी हे छोटंसं गाव. लोकसहभाग त्याचबरोबरीने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने भागाईवाडी गावामध्ये आम्ही विविध उपक्रम राबविले आहेत.

सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी पानी फाउंडेशनच्या माध्यमातून जल, मृद्संधारणासाठी चांगले प्रयत्न ग्रामस्थांनी केले. स्पर्धेच्या माध्यमातून  आम्ही ओढा खोलीकरण केले. जलयुक्त शिवारअंतर्गत लोकसहभागातून नवीन सिमेंट बंधारा, गायरानमधील पाझर तलाव, बंधारा दुरुस्ती केली. यातून गावशिवारात चांगल्या प्रकारे जल, मृद्संधारण झाले. जल, मृद्संधारणामुळे झालेला बदल पाहण्यासाठी अभिनेते आमीर खान, त्यांच्या पत्नी किरण राव, डॅा. सत्यजित भटकळ अशी सिनेसृष्टीतील दिग्गज मंडळी गावामध्ये आली होती. या मान्यवरांनी आमच्या गावात श्रमदानही केले. जल, मृद्संधारणाच्या बरोबरीने ग्रामविकासाच्या योजना राबवून शाश्वत विकासावर आम्ही भर दिला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कुरुक्षेत्र (हरियाना), गांधीनगर (गुजरात) येथे देखील मी अभ्यास दौरा केला. त्याचा फायदा ग्रामविकासासाठी होत आहे. 

शाश्वत विकासाच्या दिशेने 

  • गावामध्ये हायटेक ग्रामपंचायत आहे. स्वतःची वेबसाइट,  संगणकीय सेवा, सीसीटीव्ही सुविधा गावामध्ये आहे. गावातील सर्व शासकीय इमारती स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील असतात. 
  • आमदार आदर्श योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रथम निधी मिळणारे पहिले गाव म्हणून भागाईवाडीला बहुमान मिळाला. गावातल्या प्रत्येक कुटुंबात ओला कचरा, सुका कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र डस्टबीनची सोय आहे. 
  • ग्रामपंचायत खर्चातून हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये ग्रामस्थांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर आम्ही गावाच्या पंचवार्षिक आराखड्याचे सादरीकरण केले होते.
  • गावातील गरजू लोकांना शासकीय वैयक्तिक लाभाच्या योजना, घरकुल, शालेय विद्यार्थांना सायकल वाटप तसेच गरजू महिलांना शिलाई यंत्र, पिठाची चक्की दिली आहे. समाधान योजनेंतर्गत दाखले, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळाला आहे.
  • येत्या काळात सार्वजनिक सुविधांसह ग्रामस्थांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्याचे नियोजन केले आहे. 
  • स्मार्ट ग्राम-२०१७  स्पर्धेत उत्तर सोलापूर तालुक्यात प्रथम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात द्वितीय क्रमांकावर आमचे गाव होते. वॅाटरकप स्पर्धेत गावाने तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. 
  • आयएसओ मानांकनासह हायटेक काम   चार वर्षातील कामगिरी पाहाता अनेक बाबतीत भागाईवाडीला पहिल्या स्थानावर नेण्याचा प्रयत्न आहे. अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत आयएसओ असलेले जिल्ह्यातील पहिले उपक्रमशील गाव म्हणून आम्ही ओळख बनविली. ग्रामपंचायतीचे संपूर्ण कामकाजही संगणकावर करणारे गाव म्हणूनही आम्ही वेगळेपण जपत असल्याची माहिती सरपंच सौ. कविता शिवाजी घोडके-पाटील यांनी दिली.

      - सौ. कविता शिवाजी घोडके-पाटील, ९९२२३३८५५५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com