शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍वर शेतकरी उत्पादक कंपनी

किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी पंजाबराव पांडुरंग अवचार यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून संत ज्ञानेश्‍वर शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन, हरभरा बीजोत्पादन घेतले जाते.
seed Godown
seed Godown

किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी पंजाबराव पांडुरंग अवचार यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून संत ज्ञानेश्‍वर शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन, हरभरा बीजोत्पादन घेतले जाते. याचबरोबरीने कृषी यांत्रिकीकरण, सार्वजनिक- खासगी भागीदारीतून प्रकल्प आणि जलयुक्त शिवार असे उपक्रम राबविले जातात.

वाशीम जिल्हा हा शेतीतील नवनवीन प्रयोग, बीजोत्पादनात अग्रेसर समजला जातो. या जिल्ह्यात मागील काही वर्षात शेतकरी कंपन्यांनी बीजोत्पादनाच्या क्षेत्रात चांगले काम केले आहे. अशा कंपन्यांपैकी एक आहे, किनखेडा येथील संत ज्ञानेश्‍वर शेतकरी उत्पादक कंपनी. या कंपनीने ३५० सभासदांसह सुमारे ५०० हून अधिक शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात पुढाकार घेतला आहे.     कंपनीच्या पुढाकाराने राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते. किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी पंजाबराव पांडुरंग अवचार यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून शेती विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि वाशीम कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली १२ फेब्रुवारी, २०१६ मध्ये १८ गावातील शेतकऱ्यांनी एकत्र घेऊन संत ज्ञानेश्‍वर शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. यासाठी सुरुवातीला दहा लाख रुपयांचे भागभांडवल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभे केले. गावामध्ये कृषी यांत्रिकीकरण, सोयाबीन बीजोत्पादन, सार्वजनिक- खासगी भागीदारीतून प्रकल्प अंमलबजावणी आणि जलयुक्त शिवार यासारखे अभियान राबवून शेतकऱ्यांना विकासाची दिशा दिली. याचबरोबरीने किनखेडा गावामध्ये ७० एकरावर तुती लागवड करून रेशीम शेतीला सुरवात केली आहे.

सोयाबीन शेतीमध्ये यांत्रिकीकरण  अमरावती विभागात सोयाबीन लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. सोयाबीन पिकाच्या वाढत्या क्षेत्रामुळे शेती कामात मजुरांची समस्या सर्वत्र भेडसावत आहे. कंपनीने ही समस्या लक्षात घेऊन सर्वप्रथम सोयाबीन पिकात यांत्रिकरण करण्याचे ठरविले. सोयाबीन पीक आणि यांत्रिकरणाची माहिती घेण्यासाठी आत्माच्या माध्यमातून सदस्यांचा अभ्यास दौरा आयोजित केला. यातून शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतली. आता कंपनीच्या माध्यमातून रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन लागवड तसेच हार्वेस्टरने काढणी केली जाते.

खरीप, रब्बीत बीजोत्पादन कार्यक्रम

  • कंपनीच्या पुढाकाराने कार्यक्षेत्रात खरिपात सोयाबीन तसेच रब्बी हंगामात हरभऱ्याचा बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जातो. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक दर मिळतो. शिवाय कंपनीमुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार बियाणेसुद्धा उपलब्ध होते.  कृषी विभागाच्या ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत मागील तीन वर्षांपासून कंपनी बीजोत्पादन कार्यक्रम राबवीत आहे. यामध्ये १० वर्षांच्या आतील विविध जातीच्या सोयाबीन व हरभरा पिकाचे बीजोत्पादन घेतले जाते. 
  •  २०१६-१७ मध्ये एकूण १५० एकरांवर बीजोत्पादन कार्यक्रम राबवून १,३५० क्विंटल बियाणे उत्पादित झाले. सन २०१७-१८ मध्ये २५० एकर आणि २०१९-२० मध्ये कंपनीने ३०० एकरांवर बीजोत्पादन कार्यक्रम घेतला होता. 
  •  मध्यंतरी सरकारने शेतकरी उत्पादक कंपन्यांना बियाणे वितरण अनुदान बंद केल्याचा फटका बसला. त्यामुळे इच्छा असतानाही पुढील बीजोत्पादन कार्यक्रम कमी करावा लागला. अडचणी असल्या तरी त्यावर मात करून सोयाबीन व हरभरा  पिकाच्या विविध जातीच्या बिजोत्पादन कार्यक्रम सुरळीतपणे चालू ठेवला आहे. यात प्रामुख्याने सोयाबीनच्या एमएयूएस -१६२, एमएयूएस -६१२, एमएयूएस -१५८, जेएस-३३५, जेएस-९३०५, डिएसबी-२१ आणि  हरभरा पिकाच्या जाकी-९२१८, दिग्विजय, आरव्हीजी-२०२ या जातींचा समावेश आहे. 
  • उत्पादित होणाऱ्या सोयाबीन, हरभरा बियाणावर प्रक्रिया केली जाते. आजवर कंपनीने सुमारे पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले आहे.  
  • केंद्र शासनाच्या मदतीने केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप अभियान या योजनेअंतर्गत बियाणे प्रक्रिया केंद्र व साठवणूक केंद्रासाठी शेतकरी उत्पादक कंपनीला पाठबळ मिळाले. सन २०१९ मध्ये शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली.
  • कंपनीचे विविध उपक्रम

    कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत शेतकरी कंपनी सातत्याने विविध उपक्रम राबविते. यात हमीभावाने खरेदी, गट शेती उपक्रम राबविला जाते. शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत निविष्ठांचे वितरण व इतर उपक्रम हाती घेतले जातात. गट शेती उपक्रमाअंतर्गत कंपनीने ॲग्री मॉलचे बांधकाम चालू केले आहे. या मॉलच्या माध्यमातून शेतमाल आणि बचत गटांची प्रक्रिया उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. कंपनीला ‘आयफा महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ॲवॉर्ड-२०१८‘ चा उत्कृष्ट कंपनी आणि कार्यकारी अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

    शेतकरी कंपनीला शासनाचे पाठबळ

  •  कंपनीने  बियाणे आणि धान्य साठविण्यासाठी ५०० टन क्षमतेचे गोदाम बांधले आहे. यासाठी कृषी विभागाने ६० लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले. याअनुदानातून शेतकरी कंपनीने गोदाम उभारणीवर ४० लाखांचा खर्च केला.
  •       कंपनीने  बीज प्रक्रिया संयंत्र खरेदी केले असून त्याची प्रति तास चार टन क्षमता आहे. यासाठी २७ लाख ५० हजार रुपये खर्च झाले आहेत. 
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ केंद्र व राज्य कृषी विभागाने केलेल्या सहकार्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीचे स्वप्न साकार झाले. शेतकरी हितासाठी नवनवीन उपक्रम सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कंपनी काम करत आहे. — पंजाबराव अवचार, अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी, किनखेडा दर्जेदार बियाणे पुरवठा कंपनी कृषी विभागाच्या सहकार्याने विविध योजना राबवून शेतकऱ्यांना मदत करीत आहे. केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उपअभियान योजनेअंतर्गत बियाणे प्रक्रिया व साठवणूक केंद्रासाठी ६० लाख रुपयांचे पाठबळ मिळाले. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.  — रविंद्र बोडखे (व्यवस्थापक), ९७६७२००४२७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com