Agriculture Agricultural News Marathi success story of Davade Village,Dist.Ratnagiri | Page 2 ||| Agrowon

नैसर्गिक वारसा जपत देवडे गाव समृद्धीकडे

राजेश कळंबटे
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्‍वर तालुक्यातील देवडे गाव स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्नशील आहे. जलसंधारणाच्या बरोबरीने खरीप हंगामात वैविध्यपूर्ण शेतीचे प्रयोग करतानाच दुबार व तिबार पिके घेण्याकडे गावाची वाटचाल आहे.

ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्‍वर तालुक्यातील देवडे गाव स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्नशील आहे. जलसंधारणाच्या बरोबरीने खरीप हंगामात वैविध्यपूर्ण शेतीचे प्रयोग करतानाच दुबार व तिबार पिके घेण्याकडे गावाची वाटचाल आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेल्या या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्याची जपणूक करण्यासाठी कृषी पर्यटनावर भर देताना पक्षी संवर्धनावरही देवडेवासीयांनी भर दिला आहे.

सह्याद्री रांगेतील विशाळगडाच्या पायथ्याशी रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर देवडे (ता. संगमेश्‍वर) हे गाव वसले आहे. गावातील लोकांचा उदरनिर्वाह मजुरी आणि गडांवर विविध वस्तूंची विक्री करून मिळणाऱ्या उत्पन्नावर चालत असे. पाच वर्षापूर्वी गटशेतीची संकल्पना गावात राबविण्याचा निर्धार केला गेला. त्यासाठी प्रकाश ऊर्फ बंधू बेर्डे यांनी प्रयत्न सुरू केले. ग्रामस्थांना जससंधारणासाठी एकत्र आणून सेंद्रिय गटशेतीसाठी आवश्यक ती पावले उचलली जाऊ लागली. सन २०१७ मध्ये मुंबईत नोकरी करणारे आणि एम.एस्सी. कृषी झालेले अनिल जयराम कांबळे गावी आले. त्यानंतर देवडेवासीयांच्या स्वयंपूर्ण होण्याच्या संकल्पनेला चालना मिळाली.

श्रमदानातून जलसंधारण 
गावाने जलसंधारणावर सर्वप्रथम भर दिला. सन २०१७ मध्ये श्रमदानातून विजय बंधारे बांधण्यात आले. पहिल्याच वर्षी सात बंधारे बांधले गेले. दगडी बांधांवर प्लॅस्टिक कागद लावून पाणी अडवण्यात आले. सन २०१८ मध्ये १२ तर २०१९ मध्ये १५ बंधारे बांधले. सन २०२० मध्ये त्यात वाढ करण्यात येत आहे. बंधारे बांधण्यासाठी गावाला उत्कर्ष कुणबी मंडळाचे मोठे सहकार्य लाभले.

पीक लागवडीला चालना 
गावातील पीक पद्धती बदलण्यासाठी दुबार पिकांखालील क्षेत्र वाढविण्यात येत आहे. गावात उभारलेल्या बंधाऱ्यातील पाण्यावर रब्बी हंगामात भाजीपाला लागवड झाली आहे. पहिल्या वर्षी कुळीथ पिकाची १० एकरांवर, तर हरभऱ्याची दोन एकरांवर, तसेच अर्ध्या एकरावर पावटा लागवड करण्यात आली. घरगुती वापरासाठी काही धान्य ठेऊन उर्वरित उत्पादनाची विक्री करण्यात आले. कुळथाची विक्री ८० रुपये प्रति किलो दराने झाली. यातून गावातील ७० शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाले. बंधारे वाढवून लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे.

केटीवेअर बंधाऱ्यांचे नियोजन
गावात केटीवेअर बंधारे बांधले असल्याने आणखी दीडशे एकर जमीन आता लागवडीखाली येणार आहे. त्यासाठी पाच केटीवेअर बंधारे येथील नदीवर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रति बंधाऱ्यास साडेतीन लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. खासगी संस्थांकडून तो संकलित करण्यात येणार आहे.

भातशेतीत वैविध्यपूर्ण प्रयोग
गावात पूर्वी पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली जात होती. सध्या लाल आणि काळ्या भाताचे व्यावसायिक महत्त्व वाढले आहे. हे लक्षात घेऊन आंध्रप्रदेशातून बियाणे आणून गावातील सुमारे ६० शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली आहे. यंदा हा पहिलाच प्रयोग केला आहे. या प्रयोगातून बियाणे बँक तयार करण्यात येणार आहे.

यांत्रिकीकरणावर भर
गावातील शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाबाबत सक्षम करण्यासाठी संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. गेल्या वर्षी योजनेतून अनुदानावर ६५ पॉवर टिलर्स उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे मजूरबळ व खर्चात बचत करणे शक्य होत असून, वेळेवर शेती कामे होत आहेत.

मिळाले उत्पन्नाचे साधन
गावाजवळील नदीचे पाणी सौरपंपाच्या साह्याने शेताच्या बांधापर्यंत आणले गेले. त्याद्वारे सुमारे चौदा एकर जमीन ओलिताखाली आली. यामध्ये तीन एकरांवर भेंडी, दहा एकरांवर चवळी, तर एक एकरवर मुगाची लागवड झाली. यामधून उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांना मिळाले.

पर्यटनाला चालना
शेतीसह गाव विकासासाठी ग्रामस्थ एकवटले होते. विशाळगडापासून दोन किलोमीटर अंतरावर पायथ्याशी देवडे गाव आहे. दरवर्षी १५ ते २० च्या संख्येने ट्रेकिंग करणारे गावात येतात. त्यांना किल्ल्यापर्यंत मार्ग दाखवण्यासाठी ग्रामस्थांचा गट तयार करण्यात आला. पर्यटकांना मार्गदर्शन, निवासाची सुविधा यासह रोजगार संधी मिळाली आहे. निवासासह जेवणासाठी प्रत्येक व्यक्तीमागे २०० ते २५० रुपये शुल्क आकारले जाते. गाइड म्हणून तीन व्यक्ती ट्रेकिंग करणाऱ्या गटांसोबत असतात. त्यामधून प्रति व्यक्ती ५०० रुपये मिळतात. विशाळगडकडे जाणारा मार्ग दरवर्षी ग्रामस्थ श्रमदानातून स्वच्छ करतात. पावनखिंडही येथून ४ किलोमीटर आणि आंबा घाट तीन किलोमीटरवर आहे. जंगल पर्यटनासाठी येणाऱ्यांना हे मार्ग सुरक्षित राहावेत यासाठी गेली तीन वर्षे देवडेवासियांनी एकत्रित येऊन ते स्वच्छ केले आहेत.

धनेशसह गिधाड संवर्धन
निसर्गाने भरभरून दिलेल्या देवडे गावात विविध वनौषधी आणि पशुपक्षी आहेत. पक्षिसंवर्धनासाठी गेली पंधरा वर्षे देवडे गावाने शिकारबंदी, कुऱ्हाडबंदी केली आहे. त्यातील धनेश (हॉर्नबिल) हा दुर्मीळ पक्षी असून, या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणात आढळतो. या पक्षाला घरटे करण्यासाठी पूरक अशी मोठी झाडे या ठिकाणी आहेत. धनेश पक्ष्याची घरटी असलेल्या झाडांचे संरक्षण केले जाते. ते तोडले जाणार नाही किंवा अन्य प्राणी त्याची अंडी पळवणार नाहीत याची काळजी घेतली जाते. वनराईत आढळणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी एक एकर जमीन संरक्षित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

सूर्यफुलाची लागवड 
पावसाळ्यात भात लागवड केल्यानंतर पुढे नोव्हेंबर ते जानेवारी या रब्बीच्या हंगामात कडधान्यांची लागवड केली जाते. त्यानंतर पुढील तीन महिन्यांसाठी गेल्या वर्षीपासून नवे पीक घेण्याचा निर्णय परिसरातील धुमकवाडी, वाडीआदिष्टी, बौद्धवाडी यांनी घेतला. त्यासाठी अनिल कांबळे यांनी पुढाकार घेऊन बैठकाही घेतल्या. सुमारे सात एकरांवर ३० कुटुंबांनी सूर्यफुलाची लागवड केली. लाकडी घाण्यावर त्यापासून तेल काढण्यात आले. सुमारे दीडशे लिटर तेल प्रत्येक कुटुंबाला मिळाले. या उपक्रमातून खाद्यतेलाबाबत गाव परिसरातील तिन्ही वाड्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत.

दुग्धोत्पादनाला चालना
ग्रामविकासाच्या दृष्टीने विविधांगी उपक्रम राबवत असताना दुग्धोत्पादनातूनही ग्रामस्थ स्वयंपूर्ण झाले आहेत. पूर्वी १०० ते १२५ लिटर दुधाचे दररोज संकलन व्हायचे. आता गावातच दूध डेअरी आहे. गेल्या वर्षी ग्रामस्थांनी नव्याने १५ जर्सी व होल्स्टिन फ्रिजीयन गायी खरेदी केल्या. त्यामुळे यंदापासून दररोज ७०० लिटरपर्यंत दूध डेअरीला पुरवणे शक्य झाले आहे. दुधाला लिटरला २६ रुपये दर मिळत असून उत्पन्नात भर पडली आहे.

भविष्यातील प्रकल्प

  • वनखात्याच्या साह्याने किरबेट, देवडे गावांतील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याद्वारे दोन गावांतील १०० ते १२५ महिलांना काम मिळेल. तसेच २४ गावांतील महिला बचत गटांनाही त्यात सामावून घेण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी निधी उभारण्यात येत आहे. जांभूळ, करवंद, बांबू, यासह वनौषधींवर प्रक्रिया केली जाईल.
  •  प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशन संस्थेच्या मदतीने नदीतील स्रोत पुनरुज्जीवीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
  •  दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे गावात अ‍ॅग्री क्लिनिक उभारण्यात येणार आहे. 
  •  गावातील पाच लाभार्थींनी शेळीपालन सुरू केले आहे. अकरा शेळ्यांचा एक गट आहे. भविष्यात त्यात वाढ करून शंभर शेळ्यांचे पालन करण्यात येणार आहे. 
  •  गावातील क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी गावाजवळील नदीवर धरण उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाला, तर गावातील २५० ते ३०० एकर जमीन ओलिताखाली येऊ शकते. माती परीक्षणाचेही काम सुरू आहे. 
  •  ग्रामविकासासाठी ग्रामस्थांबरोबरच ग्रामसेवक अभिजित शेळके, प्रकाश बेर्डे, विजय चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

निसर्गाने समृद्ध असलेले देवडे गाव आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने पीक पद्धतीत बदल केला आहे. बारमाही पिके घेण्याचा प्रयत्न आहे. गेल्या तीन वर्षांत जलसंधारण, शेतीतून समृद्धी, पर्यटनाला चालना यांसह विविधांगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत.
— अनिल कांबळे, ९४०३१०१५५९


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
शिक्षण, कृषी, ग्रामविकासामध्ये ‘समता...नाशिक जिल्ह्यातील येवल्यासारख्या दुष्काळी...
दुष्काळी मजले एकीतून झाले बागायतीकायम दुष्काळी असलेले मजले (ता. हातकणंगले. जि....
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
विकासकामाच्या जोरावर ब्रम्हपुरीला `...  ब्रम्हपुरी ग्रामपंचायतीला आयएसओ...
प्रत्येक कुटुंब अन ्गाव आत्मनिर्भर...ध्यास, प्रयत्न, चिकाटीचा संगम झाल्याने हस्ता...
लोकसहभागातून तयार होईल ग्रामविकासाचा...शाश्‍वत ग्रामविकास करताना विकासाच्या विविध...
सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...
गावशिवाराचा शाश्‍वत विकास करणारी ‘एफईएस’आनंद (गुजरात) येथे नोंदणीकृत असलेल्या फाउंडेशन...
दुर्गम सावंगी गावात घडले एकीतून कृषी...गावातील युवकांना दिशा देण्यासोबतच त्यांच्यातील...
नैसर्गिक वारसा जपत देवडे गाव समृद्धीकडेऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले रत्नागिरी...
ग्राम पर्यटन, पर्यावरण संवर्धनातील...गेली पंधरा वर्षे रत्नागिरी येथील निसर्गयात्री ही...
पायाभूत सुविधांसह शेतीतून प्रगतिपथावर...रस्ते, बंधारे उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन,...
पिंपळगाव वाघाच्या शिवारात लोकसहभागातून...कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...
चुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...
स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....