शेततळ्यातील मत्स्यपालन झाले उत्पन्नाचे शाश्वत माध्यम

करडा (जि. वाशीम) येथील कृषी विज्ञान केंद्राने शेततळ्यातील म्हणजे गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाला पाठबळ देत शेतीला भक्कम पूरक व्यवसायाचा पर्याय शेतकऱ्यांना उभा करून दिला.
fish sale
fish sale

करडा (जि. वाशीम) येथील कृषी विज्ञान केंद्राने शेततळ्यातील म्हणजे गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाला पाठबळ देत शेतीला भक्कम पूरक व्यवसायाचा पर्याय शेतकऱ्यांना उभा करून दिला. प्रशिक्षण, प्रात्यक्षिके यावर भर दिला. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मत्स्यपालनात उतरले असून त्याचे रूपांतर चळवळीत झाले आहे. त्यातून रोजगाराचे सक्षम साधन उपलब्ध झाले आहे.

वाशीम जिल्ह्याची ओळख मुख्यतः शेतीत व त्यातही सोयाबीन पिकात ओळख आहे. अनेकदा नैसर्गिक संकटामुळे हातातोंडाशी आलेले पीक हिरावले जाते. अशावेळी शेतीला पूरक व्यवसाय मोठा आर्थिक आधार ठरू शकतात. त्यातही वाशीम जिल्ह्यात कुठलीही मोठी बारमाही नदी नाही किंवा अन्य सक्षम जलस्रोत नाही. अशावेळी वाशीम कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पुढाकार घेत शेतकऱ्यांना शेततळ्यातील मत्स्यपालनाचा नवा भक्कम पर्याय दिला आहे.  मत्स्यसंवर्धनाचा विस्तार  वाशीम जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी सहा हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यात गावतलाव, पाझर तलाव, लघुसिंचन तलावांचा समावेश आहे. यासोबतच शेततळ्याद्वारे मत्स्यपालनाचा विस्तार होण्यास मदत मिळाली आहे. जिल्ह्यातील मत्स्यउत्पादन वाढावे यासाठी केव्हीकेचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे व त्यांच्या ‘टीम’ ने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण व प्रात्यक्षिके घेतली. सुमारे १५ वर्षांपासून सुरू असलेले हे कार्य आता चळवळीचा भाग झाली आहे. पाहता पाहता सुमारे ७५ शेततळी उभारली आहेत. वाशीमसह अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा मत्स्योद्योग स्वीकारला आहे. कमी जागेत व कमी वेळेत अधिक उत्पादन घेणे शक्य होत आहे. 

असे वापरले तंत्रज्ञान  

  • वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयार केली मत्स्योत्पादनात कौशल्ये
  • उत्पादन वाढीसाठी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष
  • तलावांमध्ये साप, बेडूक व अन्य जलचर प्राणी येऊ नये म्हणून कुंपणाला जाळी 
  • माशांना पक्षांपासून मोठा धोका असतो. त्यासाठी संपूर्ण तलावाला अँटी बर्ड नेट’ चा वापर
  •  पाण्याचा आम्ल- विम्ल निर्देशांक स्थिर ठेवण्याकरिता चुन्याचा वापर 
  • प्लॅस्टिक टाक्यांमधून अन्ननिर्मिती. तयार खाद्याचाही वापर.
  •   माशांना लागणाऱ्या प्राणवायू निर्मितीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान
  •   जाळी टाकून माशांची वाढ तपासून खाद्याची मात्रा निश्‍चित.
  •  पहिल्यांदा मोठ्या आकाराचे मासे बाहेर काढण्यासाठी मोठी घरे असलेल्या जाळीचा वापर. त्यामुळे लहान माशांना वाढीसाठी वाव मिळून मत्स्योत्पादनात वाढ. 
  •  प्लॅस्टिक अस्तरीकरण असलेल्या शेततळ्यात मासे वाढत नाहीत अशी गैरसमजूत शेतकऱ्यांत निर्माण झाली होती. परंतु तंत्रज्ञान योग्य पद्धतीने वापरले तर ते शक्य आहे हे केव्हीकेने प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दाखवले.
  • गोड्या पाण्यात वरच्या थरात राहणारा कटला व तळाशी राहणारा सायप्रिनस या दोन जातींची प्रामुख्याने निवड केली.  
  • शेतकरी शिकले विक्रीचे तंत्र 

    यंदा लॉकडाऊनमध्ये मत्स्य व्यवसायावरही संकट ओढवले. परंतु शेतकऱ्यांनीही ही संधी मानली. मासे काढण्याचे तंत्रज्ञान शिकून घेतले. ग्राहकांना थेट शेततळ्याच्या काठावरून २०० रुपये प्रति किलो दराने विक्री केली. एरवी अर्थकारण सांगायचे तर साधारण ३४ बाय ३४ बाय ५ मीटर क्षेत्रफळ असलेल्या शेततळ्यात सुमारे १५०० नग बोटुकली सोडण्यात येते. यात सर्व घटक, पूरक खाद्य, जाळी व अन्य मिळून सुमारे साडे ८७ हजार रुपये खर्च येतो. यात उत्पादन सुमारे १२०० किलो मिळते. दर १२० रुपये प्रति किलो मिळाला तर एक लाख ४४ हजार रुपये उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता ५६ हजार ६०० रुपयांपर्यंत नफा हाती राहतो.

    माझी २४ एकर शेती आहे. शेतीला संरक्षित पाण्यासाठी ३४ बाय ३४ मीटर आकाराचे शेततळे खोदले.  त्यात गेल्या तीन वर्षांपासून मत्स्य संवर्धन करीत आहे. वर्षाला सरासरी ७० ते ८० हजारांपर्यत उत्पन्न मिळते. तळ्यातील पाण्यावर हळद, आले, आंबा अशी विविध पिके घेतो. माशांची विक्री सुरुवातीला व्यापाऱ्याला करायचो. यंदा लॉकडाऊनच्या काळात २०० रुपये प्रति किलो दराने ८० हजारांचे मासे थेट विकले.  ४० हजारांचे उत्पन्न मिळेल एवढे मासे अद्याप बाकी आहेत.   — संजय पायघन, ९८५०१७८९५० कवठा, ता. रिसोड जि. वाशीम  

    कृषी विज्ञान केंद्राचे ३० बाय २० मीटर आकाराचे शेततळे मक्त्याने घेतले आहे. यात तीन वर्षांपासून मत्स्यपालन करतो. खर्च वजा जाता वर्षाला ४० हजार रुपये मिळतात. यात रुपचंद, फंगेशिअस, कटला, जयंती, रोहू अशा माशांचे पालन होते. काही मासे तीन ते साडेतीन महिन्यात काढून होतात. उर्वरित माशांचे अधिक चांगल्या पद्धतीने पोषण होण्यासाठी यंदापासून प्रथिनयुक्त अन्न देण्यास सुरुवात केली आहे. — राम देशमुख, ८९७५६३८५६४ करडा

    उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी अशा पूरक व्यवसायांकडे वळावे. केंद्राने २०२२ पर्यंत देशाला मत्स्योत्पादनात जगात क्रमांक एकवर आणण्याची आखणी केली आहे. गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाला मोठी संधी आहे. आंध्र प्रदेशाने मत्स्यपालनात क्रांती करून दाखवली. आपल्याकडे देखील तशीच पोषक परिस्थिती आहे. या दृष्टीने आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी अनेक वर्षांपासून उपक्रम सुरू केले आहेत. — डॉ. आर. एल. काळे, ७३५०२०५७४६ प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, करडा  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com