Agriculture Agricultural News Marathi success story of Gangabai Wagh, Pramodini Metkar | Agrowon

गृहोद्योगातून मिळाला उन्नतीचा मार्ग

गोपाल हागे
रविवार, 4 जुलै 2021

ज्या कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेऊन शेतीपूरक उद्योग किंवा अन्य क्षेत्रातही सातत्याने काम केले, त्यांनी बदल घडवून दाखवला आहे. आज अनेक महिला पूरक उद्योगातून कुटुंबांना आर्थिक स्थिरता मिळवून देत आहेत.

ज्या कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेऊन शेतीपूरक उद्योग किंवा अन्य क्षेत्रातही सातत्याने काम केले, त्यांनी बदल घडवून दाखवला आहे. आज अनेक महिला पूरक उद्योगातून कुटुंबांना आर्थिक स्थिरता मिळवून देत आहेत. उत्पादनाची गुणवत्ता राखत त्यांनी बाजारपेठेत वेगळी ओळख तयार केली आहे.

रिसोड (जि. वाशीम) तालुक्यातील लिंगा कोतवाल गावामधील गंगाबाई संजाबराव वाघ यांचे चार सदस्यांचे कुटुंब. त्यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती. सुरवातीच्या काळात वाघ कुटुंबीय स्वतःची शेती सांभाळून इतरांच्या शेतातदेखील मोलमजुरी करण्यास जात होते. याच दरम्यान त्यांना बचत गट उपक्रमाची माहिती मिळाली. 
सन २००९ मध्ये गंगाबाई वाघ यांनी दहा महिलांना एकत्र करून जय गजानन स्वयंसाह्यता महिला बचत गट स्थापन केला. गटाच्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची वाशीम येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी ओळख झाली. या केंद्रामध्ये त्यांनी डाळप्रक्रिया, बटाटा वेफर्स निर्मितीबाबत प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला घरगुती स्तरावर एक हजार रुपये गुंतवणूक करून बटाटा वेफर्स निर्मितीला सुरुवात केली. प्रक्रिया उद्योगातील त्यांची चिकाटी बघून वाशीम कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी गंगाबाई वाघ यांना दहा हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. २०१३ मध्ये देशमुख यांनी दिलेले दहा हजार आणि शेत मजुरीच्या बचतीतून साठवलेले पैसे असे मिळून ४५ हजार रुपयांची गुंतवणूक करून पीकेव्ही मिनी डाळ मिल खरेदी केली. 

डाळनिर्मिती उद्योगाला गती 
गंगाबाई वाघ यांच्या डाळनिर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने पहिल्यांदा त्यांच्याकडून मजुरीवर दहा क्विंटल तूरडाळ तयार करून घेतली. यासाठी प्रति क्विंटल पाचशे रुपये मोबदला दिला. त्यांना डाळनिर्मिती मजुरीतून पाच हजारांचे उत्पन्न मिळाले. या मजुरीतून त्यांनी एक क्विंटल तूर विकत घेऊन स्वतः डाळ तयार करून विक्री केली. गुणवत्तापूर्ण डाळनिर्मितीमुळे हळूहळू परिसरातील ग्राहकांकडून मागणी वाढू लागली. उन्हाळी हंगामात डाळनिर्मिती केली जाते. गाव परिसरातील शेतकरी तसेच ग्राहक हे वाघ यांच्याकडून मजुरीवर डाळ बनवून घेतात. यासाठी प्रति क्विंटल सहाशे रुपये मजुरी मिळते. दर हंगामात ७० ते ८० क्विंटल डाळनिर्मिती केली जाते. यातून ४० हजारांपेक्षा अधिक उलाढाल होते. या सोबतच स्वतः दहा ते बारा क्विंटल डाळ तयार करून गंगाबाई या वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनामधून विक्री करतात. तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी कार्यालयात संपर्क साधून डाळ विक्री केली जाते. यातूनही दहा ते बारा हजारांचा निव्वळ नफा होतो. डाळनिर्मिती उद्योगातून मिळालेल्या उत्पन्नातून वाघ यांनी २०१७ मध्ये त्यांनी स्वतःच्या शेतात ८०० स्क्वेअर फुटाचे शेड व ओटयाचे बांधकाम केले आहे. गंगाबाई डाळनिर्मितीसोबत ग्राहकांच्या मागणीनुसार मूगवडी, बाजरी खारोडी निर्मितीकरून विक्री करतात. यातून त्यांना आठ हजारांचा निव्वळ नफा मिळतो. गंगाबाई वाघ यांनी मुंबई येथील महालक्ष्मी सरस, अकोल्यातील ॲग्रोटेक प्रदर्शनात सहभागी होत उत्पादनांची विक्री केली. यातून नवीन ग्राहक जोडले. डाळनिर्मिती उद्योगामध्ये गंगाबाई यांना सून माधुरी आणि मुलगा भागवत यांची चांगली मदत मिळते. 

तेलघाणा उद्योगाला सुरुवात
बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वाघ यांनी २०१९ मध्ये २२,५०० रुपये गुंतवणुक करीत छोटी तेलघाणी विकत घेतली. परिसरातील ग्राहकांच्या मागणीनुसार खोबरे, शेंगदाणा, तीळ, जवस, मोहरी तेलाची निर्मिती केली जाते. डाळ मिल आणि तेलघाणा उद्योगातून आर्थिक प्रगती साधत वाघ कुटुंबाने कोरडवाहू शेती बागायती केली. सध्या गंगाबाई शेती, शेती पूरक उद्योगासोबतच ग्रामीण जिवनोन्नती ‘उमेद’ अभियानामध्ये पशुसखी म्हणून काम करीत आहेत.मागील वर्षीपासून कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांच्या गृहोद्योगालाही आर्थिक फटका बसला आहे. परंतु हा काळ संपल्यानंतर पुन्हा जोमाने कार्यरत होणार असल्याचे त्या सांगतात. डाळनिर्मिती उद्योगातील प्रगती लक्षात घेऊन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने गंगाबाई वाघ यांना ‘स्त्रीशक्ती’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

- माधुरी वाघ  ७५२२९८००१३

 

केळीपासून चिप्स, पीठनिर्मिती

तेल्हारा (जि. अकोला) तालुक्यातील सौंदळा गावातील प्रमोदिनी ज्ञानेश्‍वर मेतकर यांनी केळी प्रक्रिया उद्योगातून कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात भर घातली. गेल्या काही वर्षांपासून त्या महिला बचत गटात सक्रिय आहेत. सध्या प्रमोदिनी मेतकर तेल्हारा येथील लोकसंचालित साधन केंद्राच्या महिला गटाच्या अध्यक्षा आहेत. 
परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी ५ मार्च, २०१९ रोजी माँ जिजाऊ महिला गृहउद्योगाच्या माध्यमातून केळी चिप्स, पीठ तसेच पापड निर्मितीला सुरुवात केली. या उद्योगामध्ये सुरुवातीला चार महिला त्यांच्या सोबतीला होत्या. सध्या १५ महिला या उद्योगात कार्यरत आहेत. सुरुवातीला १५०० रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी केळी प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. आता दर महिन्याला सुमारे दहा क्विंटलपर्यंत केळी चिप्स उत्पादन केले जाते. विक्रेत्यांना होलसेल दरात २०० रुपये किलो दराने चिप्सचा पुरवठा केला जातो. याचबरोबरीने स्वतःदेखील काही प्रमाणात त्या चिप्सची विक्री करतात.  
केळी चिप्सच्या बरोबरीने त्यांनी उडीद, मूग पापड, तांदूळ पापड, बटाट्याचे पापड, कुरडयानिर्मिती आणि विक्रीला सुरुवात केली आहे. सध्या प्रमोदिनी मेतकर यांच्यासह प्रीती शित्रे, दुर्गा मेतकर, अनुराधा शित्रे, वर्षा शेळके, मुक्ता पुंडकर, सुवर्णा होरे यांच्यासोबत १५ महिला कार्यरत आहेत.

गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर 
प्रमोदिनी मेतकर यांना केळी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक अडचण होती. त्यावर मार्ग शोधत त्यांनी महिला गटामार्फत बँकेतून एक लाख रुपयांचे कर्ज काढले. हे कर्ज दरमहा १० हजार रुपयांप्रमाणे परतफेड केले. केळी प्रक्रिया तसेच पापडनिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. तयार उत्पादनाची विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. ‘स्वर्णफला‘ या ब्रॅंडनेमने मेतकर उत्पादनांची विक्री करतात. दरमहा पन्नास हजारांपर्यंत त्यांच्या प्रक्रिया उद्योगाची उलाढाल वाढली आहे. गुणवत्ता जपल्यामुळे त्यांच्या उत्पादनांना अकोट, हिवरखेड, तेल्हारा व स्थानिक पातळीवर मागणी वाढू लागली आहे.

-प्रमोदिनी मेतकर  ८९९९६१७८९३

 

 


इतर महिला
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
भरड धान्ये : पोषक तत्त्वांचे आगरभारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे...
रक्तक्षय होण्याची कारणे अन् उपाययोजना...मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात...
आहाराची पोषकता वाढविण्यासाठी प्रयत्न...सप्टेंबर महिना हा देशपातळीवर ‘राष्ट्रीय पोषण...
सुदृढ बालकांसाठी स्तनदा मातांना पोषक...ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडमोर्डे (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) हे डोंगराळ...
गृहोद्योगातून मिळाला उन्नतीचा मार्गज्या कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेऊन शेतीपूरक...
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
दूषित अन्नापासून सावध राहा...म्यूकरमायकोसिस दुर्मीळ बुरशीजन्य संसर्ग आहे. याला...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
आरोग्यदायी द्राक्ष द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित...
काकडीवर्गातील आरोग्यदायी झुकिनीझुकिनी ही कुकुरबीटासी कुळातील असून, खरबूज,...