फळबागेला दिली शेळीपालनाची जोड

Usmanabadi and Kokan kanyal goats
Usmanabadi and Kokan kanyal goats

अजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश अनंत कासले यांनी फळबागेला शेळीपालनाची जोड दिली. दृष्टिदोष असून देखील जगदीश कासले यांनी अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर शेळीपालन व्यवसायात चांगला जम बसविला. याचबरोबरीने सेंद्रिय पद्धतीने आंबा, काजू बागेचे व्यवस्थापन करून उत्पन्नात वाढ मिळविली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-मालवण रस्त्यावरील अजगणी हे छोटेसे गाव. या गावशिवारात प्रामुख्याने भात, आंबा, काजू, कोकम, बांबू यांसारख्या विविध पिकांची प्रामुख्याने लागवड आहे. याचबरोबरीने पाण्याच्या उपलब्धतेनुसार भुईमूग, कुळीथ, पालेभाज्यांची लागवड येथील शेतकरी करतात. अशा या अजगणी गावातील जगदीश अनंत कासले हे आंबा, काजू आणि भात शेतीचे व्यवस्थापन पाहतात. जगदीश यांना लहानपणापासून ६० टक्के दृष्टिदोष आहे. परंतु, आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या प्रोत्साहनाने त्यांनी प्रयत्नपूर्वक पदवी तसेच आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या शेती प्रगतीमध्ये दृष्टिदोष कधीच अडथळा ठरला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जगदीश यांनी कुटुंबासोबत शेती विकासामध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. उपलब्ध क्षेत्र आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कासले कुटुंबीयांनी काजू, आंबा, बांबू लागवडीवर भर दिला आहे. केवळ शेती उत्पन्नावर अवलंबून न राहता जगदीश कासले यांनी पाच वर्षांपूर्वी शेळीपालनाची जोड दिली.  शेळीपालन व्यवसाय करण्याचे निश्चित झाल्यावर जगदीश कासले यांनी किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दोन दिवस तसेच सांगली येथे अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी महामंडळामध्ये दोन दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी जिल्ह्यातील किमान पाच वेगवेगळ्या प्रकल्पांना भेट देऊन शेळी व्यवस्थापनातील समस्या आणि अनुभव जाणून घेतले. त्यानतंरच २०१५ मध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.   शेळ्यांचे व्यवस्थापन 

  • जगदीश कासले यांनी २०१५ मध्ये  शेळीपालनांकरिता दीड लाख खर्च करून ३० बाय ५० फूट  आकाराची शेड उभारली. विविध प्रकल्पांना भेट दिल्यामुळे विचारपूर्वक त्यांनी शेडची उभारणी केली. 
  • शेडमध्ये हवा खेळती राहील, योग्य पद्धतीने स्वच्छता करता येईल अशा पद्धतीने शेडमध्ये शेळ्यांसाठी चार फूट उंचीचे मचाण बांधले.
  • गोठ्यामध्ये शेळ्या, बोकड, करडे आणि आजारी शेळ्यांसाठी स्वतंत्र कप्पे केले आहेत. त्यामुळे व्यवस्थापन सोपे जाते. 
  • सुरुवातीला कासले यांनी सांगली येथून ४२ उस्मानाबादी शेळ्या आणि एक बोकड आणला. सांगली येथून आणलेल्या शेळ्यांना कोकणातील हवामानात समरस होण्यास वेळ लागला. पहिल्यांदा शेळ्यांच्या तोंडातून फेस येणे, श्वसनाचा त्रास दिसून आला, परंतु, किर्लोस कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. के. व्ही. देसाई, डॉ. विलास सांवत आणि पंचायत समितीतील डॉ. वेर्लेकर यांच्या मार्गदर्शनामुळे शेळी व्यवस्थापनात बदल केले. त्यांचा चांगला परिणाम दिसून आला.  
  • एक वर्षानंतर कृषी विज्ञान केंद्रातून जगदीश यांनी कोकण कन्याळ जातीची एक शेळी आणि एक बोकड आणला. सध्या त्यांच्या प्रकल्पात ७० उस्मानाबादी आणि २५ कोकण कन्याळ शेळ्या आहेत.
  • आंबा, काजू बागेला लेंडीखताचा वापर 

  • कासले कुटुंबाची २५० हापूस कलमे, चार हजार काजू कलमे आहेत. या कलमांचे त्यांनी सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन ठेवले आहे. या सर्व कलमांना लेंडीखताचा वापर केला जातो. त्यामुळे रासायनिक खतांचा खर्च वाचला आहे. सेंद्रिय व्यवस्थापन पद्धतीमुळे ग्राहकांच्याकडून आंबा, काजूला त्यांना चांगला दर मिळाल्यामुळे उत्पन्नामध्ये चांगली वाढ झाली आहे. भाजीपाला पिकासाठीदेखील लेंडीखताचा वापर केला जातो. फळबागेला लेंडी खताचा पुरेसा वापर करून शिल्लक राहिलेल्या खताची विक्री केली जाते. यातून त्यांना दरवर्षी वीस हजार रुपये मिळतात. कासले यांनी फळबागेच्याकडेने बांबू लागवड केली आहे. या लागवडीतून त्यांना दरवर्षी नव्वद हजारांचे उत्पन्न होते.
  • अर्धबंदिस्त शेळीपालन फायदेशीर 

  • शेळ्यांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्यांना व्यायाम मिळावा यादृष्टीने कासले  यांनी अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन केले. शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी दैनंदिन वेळापत्रक तयार केले आहे.
  • सकाळी साडेअकरा वाजता शेळ्यांना शेड परिसरातील शेतीमध्ये चरायला सोडले जाते. दुपारी अडीच वाजता पुन्हा शेळ्यांना शेडमध्ये आणले जाते. शेळ्यांना मोकळे चरायला सोडल्यामुळे आहारात चाऱ्या बरोबरीने औषधी वनस्पती येतात, त्यामुळे आरोग्य चांगले राहिले आहे. 
  •  शेडमधील मचाणावर शेळ्या आल्यानंतर काही प्रमाणात हिरवा आणि सुक्का चारा तसेच खाद्य मिश्रण, गव्हाचा कोंडा शिफारशीनुसार दिला जातो.
  • शेळ्यांना पिण्यासाठी पुरेसे चांगले पाणी उपलब्ध करून दिले आहे.  
  •  पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लसीकरण आणि जंतनिर्मूलन केले जाते. त्यामुळे शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. 
  • जागेवर शेळी, बोकडांची विक्री 

  • चांगले वजन आणि निरोगी जातिवंत शेळ्या आणि बोकडांच्यामुळे जगदीश कासले यांना बाजारपेठ शोधावी लागली नाही. जिल्हा परजिल्ह्यातील शेतकरी त्यांच्याकडे येऊन शेळ्या आणि बोकडांची खरेदी करतात. 
  • पूर्ण बंदिस्तपालनातील शेळ्यांपेक्षा फिरत्या शेळ्यांना चांगला दर मिळतो. नग आणि किलो अशा दोन्ही पद्धतीने विक्री केली जाते. साधारणपणे बोकडाला प्रतिकिलो ३५० रुपये आणि शेळीला प्रतिकिलो ३०० रुपये दर मिळतो. लहान करडांना वाढीनुसार दर आकारला जातो. शेळ्यांच्या व्यवस्थापनातील खर्च वजा जाता दरवर्षी दोन लाखांची उलाढाल होते.
  •  आत्तापर्यंत कासले यांनी पंचवीसहून अधिक शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसायांकरिता सहकार्य केले आहे. नवोदित व्यावसायिकांना व्यवस्थापनाबाबत मोफत मार्गदर्शन करतात. दररोज त्यांच्याकडे किमान दोन युवा शेतकरी शेळीपालनाची माहिती घेण्यासाठी येतात.
  • कोंबडीपालनाची जोड  परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कासले यांनी कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने परसबागेत गिरिराजा, वनराजा या सुधारित कोबड्यांच्या जातींचे संगोपन केले आहे. दिवसभर कोंबड्या परस बागेत मोकळ्या सोडलेल्या असतात. त्यामुळे लसीकरणाशिवाय या कोंबड्यांच्या व्यवस्थापनाचा फारसा खर्च नाही. प्रति किलोस अडीचशे रुपये असा दर त्यांना जागेवर मिळतो. सध्या त्यांच्याकडे ५० कोंबड्या आहेत.  

    कुटुंबाची मोलाची साथ जगदीश कासले यांना फळबाग तसेच शेळीपालनामध्ये कुटुंबाची चांगली साथ मिळाली आहे. त्यांचे वडील अनंत कासले निवृत्त शिक्षक आहेत. त्यांची फळबाग व्यवस्थापनात चांगली मदत होते. जगदीश यांच्या पत्नी शलाका या शेळ्यांचे दैनंदिन व्यवस्थापन, शेडची स्वच्छता, शेळ्यांना हिरवा चारा नियोजन अशा कामांची जबाबदारी सांभाळतात. 

    - जगदीश कासले, ९४२३०७९०६२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com