Agriculture Agricultural News Marathi success story of Hingangaon village,Dist.Ahmednagar | Page 2 ||| Agrowon

लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दार

सूर्यकांत नेटके
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

पाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या हिंगणगाव (ता.जि. नगर) शिवार दोन वर्षांपासून लोकसहभाग, सरकारी निधीतून पाणीदार झाले आहे. पाणीपातळी वाढल्याने पीकपद्धतीत बदल झाला. जिरायती शिवार बागायती होत आहे. विविध उपक्रमांमुळे हिंगणगावाने वेगळी ओळख तयार केली आहे.

पाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या हिंगणगाव (ता.जि. नगर) शिवार दोन वर्षांपासून लोकसहभाग, सरकारी निधीतून पाणीदार झाले आहे. पाणीपातळी वाढल्याने पीकपद्धतीत बदल झाला. जिरायती शिवार बागायती होत आहे. विविध उपक्रमांमुळे हिंगणगावाने वेगळी ओळख तयार केली आहे.

सिंचन आणि शाश्‍वत पाण्याची उपलब्धता नसल्याने नगर तालुक्यातील पश्‍चिम भागातील बहुतांश भागातील गावे पावसावर अवलंबून आहेत. या गावांना दरवर्षी उन्हाळ्यात सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र तीन वर्षांपासून लोकसहभाग आणि सरकारी निधीतून केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे दुष्काळी भागातील हिंगणगावने वेगळी ओळख तयार केली आहे. 
साडेतीन हजार लोकसंख्येच्या हिंगणगावचे सरपंच आबासाहेब सोनवणे पाटील हे लोकांतून निवडून आले आहे. गावाचे उपसरंपच दिलीप झावरे आणि बाळासाहेब पानसरे, आशाबाई ढगे, नीलम दुबे, मोहिनी सोनवणे, वैभव ताकपेरे, उद्धव सोनवणे, शोभा सोनवणे, पायल पाडळे हे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. सुजाता खर्से या ग्रामसेविका आहेत. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि गावकरी एकत्र बसून ग्रामविकासाच्या कामांबाबत नियोजन करतात.

जलसंधारणाच्या दिशेने
तीन वर्षांपूर्वी शेजारच्या हमीदपूरची जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली. हिंगणगाव, हमीदपूरला जोडणारे उंबर नाला आणि जामगाव नाला हे दोन ओढे गाव शिवारातून वाहतात. हमीदपूर शिवारात झालेल्या जलसंधारणाच्या कामांचा हिंगणगावला फायदा झाला. लोकांना याचे महत्त्व कळले. त्यामुळे हिंगणगावच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून शिवारात सिंचनाची कामे करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी गावशिवारातील ओढ्यावर जलसंधारणाची कामे झाली. जिल्हा परिषद आणि अन्य निधीतून दहा बंधाऱ्यांची साखळी तयार झाली आहे. त्याच साठलेला गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. दोन्ही नाल्यांतील मिळून सलग अकरा किलोमीटरवर ओढ्याचे खोलीकरण केले.
दोन वर्षांपूर्वी हिंगणगावची जलयुक्त शिवार अभियान निवड झाली. त्यानंतर गाव शिवारात खोलीकरण, बांधऱ्यांची दुरुस्ती, नवीन बंधाऱ्यांची कामे झाली. त्याचा परिणाम म्हणजे आज गावशिवार पाणीदार होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सरकारी टॅंकरची वाट पाहावी लागणाऱ्या हिंगणगावात आता भूगर्भातील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. गावात सध्या सुमारे अडीचशे विहिरी, तीनशेच्या वर असलेल्या कूपनलिकांना चांगल्या प्रकारे पाण्याची उपलब्धता आहे. गावाने सुमारे एक कोटींची सिंचनाची कामे केली. त्यातील पंचवीस लाखांचा लोकसहभाग आहे. नगरमधील डॉक्टरांच्या संघटनेने जलसंधारणासाठी मदत केली असल्याचे सरपंच आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले.

नगदी पिकांच्या लागवडीत वाढ
हिंगणगावात सुमारे ७७० हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील साधारण चाळीस हेक्टर क्षेत्र पडीक असून, उर्वरित क्षेत्र लागवडीखाली आहे. या भागात शेतीला कायम पाण्याची टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाजरी, मूग, हरभरा, करडई, जवस या पिकांच्या लागवडीचे जास्त क्षेत्र आहे. मात्र गेल्या तीन वर्षांत सिंचनाची चांगली कामे झाली. ओढे खोलीकरण, बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे पाणी उपलब्ध झाले. यामुळे पीक पद्धतीमध्ये बदल होऊन लोक नगदी पिकांकडे वळले आहेत. तब्बल तीस वर्षांनंतर शिवारात गतवर्षी ऊस लागवड सुरू झाली. आतापर्यंत शिवारात दीडशे एकरावर ऊस लागवड झालेली असून, यंदा त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. याशिवाय फळपिके, कांदा, मका, गहू यांसारख्या पिकांची लागवड वाढत आहे.

शिवारातील पाणी पुन्हा बंधाऱ्यात
हिंगणगाव शिवारातील शेतीमधील पाणी वाहून जात होते. हे लक्षात घेऊन सरपंच आबासाहेब सोनवणे यांच्यासह तरुणांच्या संकल्पनेतून शिवारातील पाणी एका चरामध्ये एकत्र करण्यात आले. शेत शिवारातून बाहेर पडणारे पाणी साधारणपणे दोनशे मीटर अंतरावर वळवून ते नदीमध्ये वाहून जाऊ न देता बंद पाइपमधून बंधाऱ्यात सोडण्यात आले आहे. या उपक्रमामुळे गाव शिवारातील पाणी वाहून न जाता ते बंधाऱ्यात साठून राहते. दोन वर्षांपासून या बंधाऱ्यातील पाण्याचा फायदा शेतीला चांगल्या प्रकारे होत आहे. 

हिंगणगावकडून शिकण्यासारखे

 • ओढ्या-नाल्याच्या खोलीकरणातून निघालेला चांगल्या दर्जाचा गाळ लोकांनी स्वखर्चाने शेतात टाकला. याशिवाय मुरूम व माती टाकून आपापल्या शिवारातील शिव व पाणंद रस्ते तयार केले. लोकसहभागातून  सुमारे तेरा शिवरस्ते तयार झाले आहेत.
 •  ओढे खोलीकरणामुळे पाणी उपलब्ध झाले. शेतात चारा उपलब्ध होऊ लागला. त्यामुळे पशुपालन व्यवसायाला बळकटी मिळाली. हिंगणगावातून संकलित होणाऱ्या दुधात दुपटीने वाढ झाली. सध्या तीन हजार लिटर दूध येथे संकलित होते.
 • गावामध्ये आदिवासी कुटुंबे राहतात. त्यांच्याकडे राहिवासाचे कोणतेही पुरावे नसल्याने त्यांना शिधापत्रिका मिळत नव्हती. दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचातीच्या पुढाकारातून त्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा करून पंधरा कुटुंबांना शिधापत्रिका मिळवून दिल्या. गावातील इतर शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबालाही शिधापत्रिका काढून दिल्या. 
 • दुष्काळी हिंगणगावातील लोक नगरच्या औद्योगिक वसाहतीत कामाला जात होते. आता पाणी उपलब्धतेमुळे त्यांना स्वतःच्या शेतामध्ये रोजगार मिळू लागला आहे.
 • गावात रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे. येथे गाव तसेच परिसरातील विद्यार्थी येतात. शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेने एकत्र येत लाखो रुपये लोकसहभागातून जमा करत शाळा व परिसराचे सुशोभीकरणाचे काम केले आहे.
 • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जखणगाव-हिंगणगाव-निंबळक असे सात किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम केले आहे. त्यामुळे नगर औद्योगिक वसाहतीत जाण्याला गावकऱ्यांना जवळचा मार्ग झाला आहे.
 • सरकारी निधीतून पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा परिषद शाळा, दलित वस्ती सुधार योजनेतून अंतर्गत भूमिगत गटार योजना, संपूर्ण गावात सिमेंट रस्ते, रस्ता दुतर्फा तसेच स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण करून ती जगवण्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला आहे.
 • गेल्या वर्षी पूर परिस्थिती निर्माण झालेल्या सांगली, सातारा भागांतील पूरग्रस्तांना तसेच अलीकडच्या कोरोना संकट गावातील गरीब कुटुंबांना तरुणांनी एकत्र येऊन साधारणपणे ८ लाखांच्या धान्य व संसारपयोगी वस्तूची मदत केली.
 • गावांतील मोरया प्रतिष्ठानने लोकवर्गणीतून झाडांसाठी संरक्षण जाळ्या भेट दिल्या. 
 •  गावकरी एकत्र येऊन गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळलेल्यांचा गौरव केला जातो. महिला, मुली यांना आरोग्यविषयक तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी शिबिर घेतले जाते.
 • सर्व साडेतीनशे कुटुंबांनी वैयक्तिक शौचालये बांधून त्याचा वापर सुरू आहे. गाव चार वर्षांपूर्वी हागणदारीमुक्त झाले आहे. सर्व कुटुंबांना वॉटर मीटरमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसारच पाणीपट्टी आकारली जाते.
 • गावातील सर्व जागांची ड्रोन कॅमेऱ्याने मोजणी.
 • तंटामुक्त गावाचा पुरस्कार.

 

लोकसहभाग आणि सरकारी निधीतून सिंचनाची कामे, गाव पातळीवर नागरिक, तरुण, महिलांच्या पुढाकारातून विविध उपक्रम राबवत हिंगणगाव आदर्श गावाकडे वाटचाल करत आहे. लोकसहभागातून आमचे गाव पाणीदार झाले असून, दुष्काळी गाव अशी ओळख पुसली जात आहे.
— आबासाहेब सोनवणे, ९४२०३४७०६९
(सरपंच, हिंगणगाव)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
कारले म्हणावे तर टाकरखेडचेच’बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड गाव कारले पिकासाठी...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
शेती, पूरक उद्योगावर दिला भरकुडाळ तालुक्यातील पूर्व भागात आमचे निरुखे हे...
महिला सक्षमीकरणातून होतो ग्राम विकाससामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी...
पाणीपुरवठा, जलपुनर्भरणाच्या कामांना आता...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या...
उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावात पेरला...नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या...
लोक सहभाग हाच विकासाचा पायाकुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा...
ग्राम स्वच्छता, प्रयोगशील शेतीला चालनालोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे ...
पाणलोटाच्या मदतीनं केली दुष्काळावर मातजालना जिल्ह्यातील कायम दुष्काळी नंदापूर गावच्या...
गावामध्ये असावी संयुक्त कुरण व्यवस्थापन...शेती परिवार कल्याण संस्था गावशिवारातील माळरानावर...
गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्नतीन वर्षांपासून मनारखेड गावाचे सरपंचपद सांभाळत...
शिक्षण, कृषी, ग्रामविकासामध्ये ‘समता...नाशिक जिल्ह्यातील येवल्यासारख्या दुष्काळी...
दुष्काळी मजले एकीतून झाले बागायतीकायम दुष्काळी असलेले मजले (ता. हातकणंगले. जि....
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
विकासकामाच्या जोरावर ब्रम्हपुरीला `...  ब्रम्हपुरी ग्रामपंचायतीला आयएसओ...
प्रत्येक कुटुंब अन ्गाव आत्मनिर्भर...ध्यास, प्रयत्न, चिकाटीचा संगम झाल्याने हस्ता...