गटामुळे मिळाली शेती, पूरक उद्योगाला चालना

टाकळीमिया (ता. राहुरी, जि. नगर) येथील महिलांनी एकत्र येत चौदा वर्षापूर्वी जगदंबा महिला बचत गटाची सुरवात केली. प्रत्येक सदस्याने दर महिना शंभर रुपये बचत केली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने बॅंकाकडून कर्ज मिळवून पूरक व्यवसाय सुरू केले. याचबरोबरीने सदस्यांनी एकत्र येत अडीच एकरावर सामूहिक पद्धतीने डाळिंब लागवड करत उत्पन्नाचा नवीन स्त्रोत तयार केला आहे.
SHG meeting
SHG meeting

टाकळीमिया (ता. राहुरी, जि. नगर) येथील महिलांनी एकत्र येत चौदा वर्षापूर्वी जगदंबा महिला बचत गटाची सुरवात केली. प्रत्येक सदस्याने दर महिना शंभर रुपये बचत केली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने बॅंकाकडून कर्ज मिळवून पूरक व्यवसाय सुरू केले. याचबरोबरीने सदस्यांनी एकत्र येत अडीच एकरावर सामूहिक पद्धतीने डाळिंब लागवड करत उत्पन्नाचा नवीन स्त्रोत तयार केला आहे. 

टाकळीमिया (ता.राहुरी, जि. नगर) हे बहुतांश शेतीवर आधारित असलेले गाव. २००७ मध्ये गावातील चौदा महिलांनी एकत्र येऊन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जगदंबा महिला बचत गटाची स्थापना केली. त्यानंतर दर महिन्याला सुमारे शंभर रुपये बचत सुरु केली. गेली आठ वर्षे शंभर रुपयांप्रमाणेच गटाची आर्थिक बचत सुरू होती. त्यानंतर आता दरमहा दीडशे रुपयांची बचत केली जाते. बचतीच्या पैशातून अंतर्गत व्यवहार सुरू झाले. सदस्यांच्या मागणीनुसार एकमेकींना कर्ज देण्यात येऊ लागले. यातून कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला. कर्जापोटी मिळत असलेली रक्कम महिला शेती विकासासाठी खर्च करू लागल्या. गटाची झालेली चांगली बचत आणि अंतर्गत आर्थिक व्यवहार पाहता आतापर्यंत चार वेळा बॅंकेने कर्ज उपलब्ध करुन दिले. या कर्जातून महिलांनी पूरक व्यवसाय सुरू केले. राहुरी तालुक्यात २८० महिला बचत गट असून त्यांना आतापर्यंत सुमारे साडेआठ कोटींच्या जवळपास कर्ज वितरण करण्यात आले आहे. गटांच्या माध्यमातून शेतीत सुधारणा करत महिला सक्षम होण्याला मदत झाली असल्याचे तालुका समन्वयक महेश आबुज यांनी सांगितले.  

शेती आणि पूरक उद्योगाला चालना  जगदंबा महिला बचत गटातील बहुतांश सदस्या शेतकरी कुटुंबातील आहेत. सदस्यांनी बचतीतून केलेल्या व्यवहारातील पारदर्शकता पाहून सुरवातीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक लाखांचे कर्ज दिले. त्याची वेळेत परतफेड केल्यावर दोन लाखांचे कर्ज दिले. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकारातून साडेचार लाख आणि सहा लाख असे दोन वेळा कर्ज मिळाले. त्या पैशातून चार महिलांनी दूध व्यवसाय, तीन महिलांनी शेळीपालन, एका महिलेने बांगडी व्यवसाय आणि इतरांनी शेतीसाठी पैशाचा वापर केला. त्यातून पीक उत्पादन वाढीला मदत झाली.

जगदंबा गटातील सदस्या  शोभा वेणुनाथ जाधव (अध्यक्ष), सविता राजेंद्र भोसले (सचिव), रोहिणी सुनील भोसले, अंजली कचरू निमसे, मंगल अशोक जाधव, संगीता सुनील बडाख, वैशाली प्रताप निमसे, सुमन हरिभाऊ भोसले, सुरेखा सतीश कवाने, सुवर्णा अनिल निमसे, सुमन किसन दाते, जयश्री राजेंद्र निमसे, सुरेखा राजेंद्र दिवटे, सरस्वती प्रकाश लबडे.

पूरक उद्योगाला मिळाली चालना

  • बचत गटातील सदस्यांनी आतापर्यंत प्रत्येकी सत्तर हजार रुपयाचे कर्ज घेतले आहे. उपलब्ध कर्जातून अंजली 
  • निमसे यांनी पाच शेळ्या विकत घेतल्या. त्यांचे चांगले संगोपन केले. आता त्यांच्याकडे पन्नास शेळ्या आहेत. शेळीपालनातून त्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.
  • सविता भोसले यांनी बांगडी व्यवसाय आणि गाईंची खरेदी केली. जयश्री निमसे, सुरेखा दिवटे यांनी शिवणकाम, सरस्वती लबडे यांनी दूध संकलन केंद्र सुरू केले.  मंगल जाधव यांनी स्वतः घर बांधले. गटातील इतर सदस्यांनी पूरक व्यवसाय, शेतीला प्राधान्य दिले आहे. 
  • बचत गटाच्या कामाबद्दल महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे बावन्न हजार पाचशे रुपयांच्या हिरकणी पुरस्काराने गौरवण्यात आले. गटाला सहयोगिनी मनीषा वाडकर मार्गदर्शन करतात. 
  • सामाजिक कामात सहभाग 

  • बचतगटांसह गावातील महिलांसाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबीन तपासणी.
  • ग्रामसभेत सहभाग, अनेक बाबींवर प्रश्न उपस्थित करत सोडवणूक करण्याचा प्रयत्न.
  • शाळा, अंगणवाडीला भेटी, पोषण आहारासह अन्य बाबींवर लक्ष.
  • मुला-मुलींच्या कुपोषणावर चर्चा. पोषण आहार देण्याबाबत जागृती.
  • प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती. ग्रामस्थांना कापडी पिशव्याचे वाटप.
  • एकत्रित डाळिंब लागवड जगदंबा महिला बचत गटातील महिलांनी एकत्रित शेती करण्याचा विचार सुरू केला. गटातील सदस्या वैशाली प्रकाश निमसे यांनी महिलांच्या विचाराला साथ दिली. निमसे यांच्या मालकीच्या एक एकर क्षेत्रावर गटाने चार वर्षांपूर्वी डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. या बागेतून यंदा तिसरे पीक हाती येत आहे. पहिल्या वर्षी फारसा नफा झाला नाही. दुसऱ्या वर्षी  डाळिंब विक्रीतून पाच लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यातील साडेतीन लाखांचे उत्पन्न महिलांनी थेट ग्राहकांना विक्री केली. जमिनीच्या बदल्यात निमसे यांना गटाने चाळीस हजार रुपये दिले. उर्वरित खर्च वजा करून महिलांनी डाळिंब विक्रीतील नफा वाटून घेतला. यंदाही पाच लाखांच्या आसपास डाळिंबाचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. गेल्यावर्षी पुन्हा गटातील महिलांनी आणखी दीड एकर क्षेत्रावर एकत्रितपणे डाळिंब लागवड केली. जगदंबा महिला गटाने एकत्रित शेती करून या परिसरात वेगळा ठसा उमटवला आहे. या गटाचे काम कौतुकास्पद आहे, असे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे यांनी सांगितले.  

    पूरक उद्योगांना सुरुवात  आम्ही चौदा महिला एकत्र येऊन महिला बचत गट स्थापन केला. दरमहा बचत करत कुटुंबाला हातभार लावला. महिला आर्थिक विकास महामंडळामुळे आम्हाला कर्ज मिळाले. यातून महिलांनी वेगवेगळे पूरक व्यवसाय सुरू केले आहेत.

    - शोभा जाधव, ९५२७३८७४५० (अध्यक्षा, जगदंबा महिला बचत गट) 

    - सविता भोसले, ८८८८२२४०४७ (सचिव, जगदंबा महिला बचत गट)

    बचत गटातून शेती प्रगती राहुरी तालुक्यात महिला बचतगट चळवळीला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाकळीमिया येथील जगदंबा महिला बचतगटातील महिलांनी पूरक व्यवसाय, एकत्रित डाळिंब लागवड करून वेगळा ठसा उमटवला आहे. - महेश आबुज,  ः८३२९३१३६५७ (तालुका समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com