शेती, ग्रामविकास अन् स्वच्छतेचा जागर

Help for farmers
Help for farmers

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जागर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. याचबरोबरीने जल, मृद संधारणासाठी श्रमदानाची मोहीम संस्थेतर्फे राबविली जाते. संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता, जलसंधारण, शेतकऱ्यांना मदत, पर्यावरण संरक्षण अशा विविधांगी कामांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढला आहे.  

अकोला जिल्ह्यातील जागर फाउंडेशनच्या माध्यमातून गरजवंत, वंचित, शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवे काहीतरी घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या फाउंडेशनमध्ये ना कोणी अध्यक्ष आहे, ना कुणी सदस्य. सर्वच संयोजक आहेत. गेल्या एकोणीस वर्षांत जिल्ह्यातील तीनशेपेक्षा अधिक जण या फाउंडेशनच्या चळवळीत जोडले गेले आहेत. अजून ही संख्या वाढत आहे. गेल्या चार वर्षांत अनेक समाजोपयोगी कामे करून तरुणीपिढीसाठी सामाजिकतेच्या अंगाने एक सकारात्मक चळवळ उभी करण्याचे काम होत आहे. ग्राम विकासासाठी एकत्र  समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, पण नोकरी, व्यवसायाच्या व्यापामुळे स्वतंत्रपणे काही करू शकत नाही, अशी खंत अनेकांना वाटत असते. अशा संवेदनशील लोकांना या जागर फाउंडेशनने एक व्यासपीठ तयार करून दिले आहे. त्यामुळेच आज अनेक अधिकारी-कर्मचारी नोकरी सांभाळून, व्यावसायिक व्यवसाय करीत, विद्यार्थी शिक्षण घेत आपापल्या क्षेत्रातील ज्ञान व कौशल्याचा एकत्रित वापर करीत हा जागर पुढे नेत आहेत. स्वच्छता, जलसंधारण, शेतकऱ्यांना मदत, पर्यावरण संरक्षण अशा विविधांगी कामात ही तरुणाई मदतीला पुढे येत असते. पर्यावरण संवर्धनाचे काम  पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे काम संस्थेचे पदाधिकारी करत असतात. केवळ रोप लागवड करून हे लोक थांबत नाहीत, तर जितकी झाडे लावू, तितकी जगवू या तत्त्वाने दरवर्षी वृक्षारोपण करून संगोपनाचे काम सुरू आहे. यावर्षी जून महिन्यात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ५० हजारांपेक्षा अधिक सीडबॉल तयार करून त्यांचे जंगलात रोपण केले. अशा पद्धतीने वृक्ष वाढविण्याचे काम व्यापक स्तरावर केले जात आहे. सोबतच आपल्या अवतीभवतीचे पर्यावरण चांगले राहावे यासाठी काम केले जात आहे.   दरवर्षी अकोला परिसरातून शेगावला पायी दिंडी जाते. या मार्गावर वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी विविध संस्था अन्नछत्र उभारतात. दिंडी गेल्यानंतर  मार्गावर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, शिल्लक राहिलेले अन्न फेकलेले असते. हे सर्व गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागरचे कार्यकर्ते काम करतात. यासाठी ‘माझी वारी-स्वच्छ वारी’ हा उपक्रम दरवर्षी  राबविला जातो.  रद्दी संकलनातून गरजवंताना मदत फाउंडेशनच्या माध्यमातून गरजवंतांच्या मदतीसाठी समाजातून निधी गोळा केला जातो. हे काम मोठे काम असल्याने आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असते. यासाठी नागरिकांकडून रद्दी संकलन केले जाते. गेल्या काही वर्षांत रद्दी गोळा करून त्याच्या विक्रीतून उभ्या राहलेल्या पैशाद्वारे गरजवंताना मदत केली जाते. यातून वंचितांची दिवाळी सारखा उपक्रमही राबविण्यात आला. इतरही गरजू लोकांना मदत करण्यात आली.

शेतकऱ्यांना मदत जागर फाउंडेशन शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने काम करीत आहे. संस्थेतर्फे दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी १०० क्विंटल चारा पाठविण्यात आला होता. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला, त्यात प्रचंड हानी झाली. शेतकऱ्यांकडील गाई, म्हशी, बैल महापुरात वाहून गेले. या पूरग्रस्त शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी गरज लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी अकोला येथून १०० पेक्षा अधिक बैल विनामूल्य पुरविण्यात आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत स्थानिक गोसंस्थेच्या मदतीने हे बैल शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भामरागड (जि. गडचिरोली) येथे पाठविले. तेथे काही पदाधिकाऱ्यांनी जाऊन हे बैल गरजू शेतकऱ्यांना वितरण केले.

शेतकऱ्यांचे प्रबोधन  जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्याचे काम जागर फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाते. यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शेतकऱ्यांना शेती व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर पर्याय म्हणून शेतीला जोडधंद्यांची साथ देणे गरज बनलेली आहे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून जागर फाउंडेशनने काही दिवसांपूर्वी अकोला तालुक्यातील आगर येथे ‘शेतीपूरक व्यवसाय-काळाची गरज' या विषयावर शेतकरी प्रशिक्षण घेतले. दिवसेंदिवस बदलत्या वातावरणामुळे शेती उत्पादनात स्थैर्य दिसून येत नाही. याचा फटका केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना मोठ्या प्रमाणात बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत चालल्याची बरीच उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. या कार्यक्रमात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. एच. मिश्रा यांनी उपस्थित राहून सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी आगर येथे सरपंच गोकुळाबाई वावरे, डॉ. नंदकिशोर चिपडे, किशोर कुकडे, राहुल उमक यांच्यासह जागरचे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गात डॉ. मिश्रा यांनी दुग्धोत्पादन, विविध दुग्ध पदार्थ, शेळीपालन, कुक्कुटपालन या विषयावर मार्गदर्शन केले.       अकोला शहराची रोजची दुधाची गरज चाळीस हजार लिटर एवढी असून स्थानिकांकडून उत्पादन होणारे दूध हे खूप कमी आहे. त्यामुळे ही गरज पूर्ण करण्यासाठी  शेतकरी व युवकांनी या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची गरज व्यक्त केली. फाउंडेशनच्यावतीने शेतकऱ्यांना गरजेवेळी सहकार्य, मार्गदर्शन करण्यासाठी या फाउंडेशनचे पदाधिकारी पुढे येतात.

पाणी बचतीसाठी पुढाकार सध्या अकोला जिल्ह्यात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत पावसाचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे हे लक्षात घेत फाउंडेशनने जनजागृतीचे कृतिशील काम सुरू केले. संस्थेतर्फे रेनवॉटर हार्वेस्टींगचे काम केले जाते. तसेच अकोला जिल्ह्यात कऱ्ही रुपागड (ता. अकोट) या गावामध्ये जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदान करण्यात आले. याठिकाणी सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रावर जल, मृद संधारणाची कामे करण्यात आली. यामुळे जवळपास ३० हजार कोटी लिटर पाणी बचत होऊ शकली. ग्रामस्थ आणि फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी श्रमदान करीत आज हे गाव जलसंपन्न बनविण्यात मोठा हातभार लावला आहे. पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत तालुका स्तरावर या गावाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे.

असे आहेत संस्थेचे उपक्रम

  • ग्राम विकासात नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, महिलांचा समावेश.
  • श्रमदानाच्या माध्यमातून मृद व जलसंधारण.
  • गाव परिसरात वृक्षारोपण आणि संवर्धन.
  • गरजू शेतकऱ्यांना बैलांचे वाटप.
  • व्हाटसअॅपच्या माध्यमातून ग्रामउपयोगी घडामोडींची देवाणघेवाण.
  • अनेक वर्षांपासून ‘माझी वारी-स्वच्छ वारी’ उपक्रम.
  • रद्दी संकलनातून वंचितांची दिवाळी.
  • -डॉ. नंदकिशोर चिपडे, ९५११७८९५५२  - अनंत देशमुख, ८२०८९९४०१७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com