शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'

farmers group visit
farmers group visit

औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेने गेल्या पंधरा वर्षांत मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांतील ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, जल-मृद संधारण, पूरक उद्योग, कृषी तंत्रज्ञान विस्तार, गटशेती तसेच शासनाच्या विविध योजनाविषयी माहिती संस्थेतर्फे दिली जाते. 

औरंगाबाद येथील जन जागृती प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्याची सुरुवात शेती आणि ग्राम विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन झाली. पहिल्या टप्प्यात ॲग्रो इंडिया गटशेती संघाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील १९ गावांमध्ये कापूस उत्पादनवाढ प्रकल्पाची सुरुवात माजी कृषी आयुक्‍त डॉ. उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत झाली. या उपक्रमामध्ये कापसाची अतिघन लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापन आणि ठिबकचा वापर करून एकरी ६ ते ७ क्‍विंटलपर्यंत असलेले उत्पादन २० ते २५ क्‍विंटलपर्यंत पोचविण्यात संस्थेला यश मिळाले. नाबार्डच्या मदतीने औरंगाबाद तालुक्‍यातील मुरूमखेडा, लामकाना आदी गावांत कापूस उत्पादनवाढीसाठी खास प्रकल्प राबवून कापूस उत्पादनात चांगली वाढ झाली. यामध्ये खासगी बियाणे तसेच ठिबक सिंचन कंपन्यांनी चांगले सहकार्य मिळत आहे. संस्थेतील तज्ज्ञांनी सोयाबीन, तूर, गहू कांदा बीजोत्पादन, डाळिंब लागवडीबाबतही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करीत उत्पादन वाढीचे तंत्र शिकविले. लोकसहभागातून जल-मृद संधारण संस्थेच्या माध्यमातून देळेगव्हान (ता. जाफ्राबाद, जि. जालना) येथे सकाळ रिलीफ फंडाच्या मदतीने ५.५ किलोमीटर नदीचे खोलीकरण करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील आडगाव (सरक) आणि अंजनडोह येथील पाझर तलावातील गाळ काढून ५० एकर मुरमाड जमिनीवर पसरून ती सुपीक करण्यात आली. जालना जिल्ह्यातील अकोला देव येथील जीवरखा धरणातून गाळ काढून तो ११५ एकर क्षेत्रावर शास्त्रीय पद्धतीने मिसळण्यात आला. दत्तक गावांसह विविध गावांमध्ये वॉटरशेडच्या माध्यमातून लोकसहभागातून मृद व जलसंधारणाची कामे संस्थेने हाती घेतली आहेत. आरोग्य, शिक्षण, महिला विकास  महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पळशी, बकापूर, माहोली, आडगाव, डोणवाडा, अंजनडोह, नायगव्हाण, लामकाणा, मुरूमखेडा आणि वडखा या दहा ग्रामपंचायतींमधील बारा गावांत सामाजिक परिवर्तनाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या गावांमध्ये प्रत्येक महिन्याला एक आरोग्य शिबिर घेतले जाते. प्रत्येक गावातील बालवाडीसाठी किचन गार्डन, एलईडी टीव्ही वाटप, मुलांसाठी खेळाचे साहित्य, शाळांवर सोलार पॅनल बसविणे, शाळा डिजिटल करणे, चांगल्या शिक्षकांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजन केले जाते. विविध गावांमध्ये जनावरांचे लसीकरण शिबिराचेही आयोजन करण्यात येते. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील ३१ गावांत महिलांचे बचत गट स्थापन करण्यात आले आहेत.  प्रशिक्षण, मार्गदर्शनाची सोय 

  • सुशिक्षित बेकारांसाठी तीन दिवसीय दुग्धव्यवसाय, शेळीपालन तसेच कुक्‍कुटपालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन. पाहणी दौरे, कौशल्य विकास प्रशिक्षण, व्यायामशाळा सक्षमीकरण. 
  • शासनाच्या वसुंधरा प्रकल्पांतर्गत नांदेड, जालना, नगर, औरंगाबाद, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत एल. आर. ए. पी. टी.ओ. अंतर्गत मोठ्या प्रमाणात लाईव्हलीहूड प्रशिक्षणाचे आयोजन. 
  • चौदा वर्षांपासून द्वादस कार्यक्रम जन जागृती प्रतिष्ठान आणि ॲग्रो इंडिया गट शेती संघाच्या माध्यमातून डॉ. भगवान कापसे यांनी १४ वर्षांपासून द्वादस कार्यक्रम राबविणे सुरू केले. आजवर १७९ द्वादस कार्यक्रम झाले आहेत. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या द्वादशीनिमित्त गटशेतीचे प्रमुख व शेतकरी एका शेतात जमतात. प्रत्येक गटप्रमुख आपला कार्यअहवाल सादर करतो. त्यानंतर अडचणींवर चर्चा होऊन शिवार फेरी होते. एकापेक्षा अधिकच्या गावात हा संपूर्ण द्वादशीचा प्रवास होतो. या वेळी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार येणारे तज्ज्ञ मार्गदर्शन करतात.

    गटशेतीतून विकास  विविध गावांत गटशेती नोंदणी करून विकासाला चालना देण्याचे काम संस्था करत आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत ३३ शेतकरी गट आणि ७ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना संस्थेने केली. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात आला आहे. शेतकरी मेळावे, शिवार फेरी, जनजागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन सातत्याने केले जाते. शेती विकासासाठी डॉ. एस. एस. बैनाडे, डॉ. एस. एस. माने, डॉ. एस. बी. पवार, ग्रामीण बॅंक सीजीएम जी. जी. वाकडे, सिंचन विभागाचे आर. बी. घोटे यांच्यासह कृषी व विविध विभागाचे अधिकारी यांचे सातत्याने मार्गदर्शन गटशेतीमधील शेतकऱ्यांना मिळते.

    शेतकरी सहलीतून तंत्रज्ञान प्रसार  फळबागा आणि पूरक उद्योगातील संधीची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी सहलीचे आयोजन केले जाते. अतिघन फळबाग लागवडीचा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर येथे शेतकऱ्यांच्या सहली झाल्या. त्यामुळे अतिघन लागवडीला मराठवाड्यात चालना मिळाली. याशिवाय गोकूळ दूध संघ, राळेगण सिद्धी, सातारा मेगा फूड पार्क, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आदी ठिकाणी शेतकऱ्यांच्या सहलीचे आयोजन संस्थेमार्फत केले जाते.

    आंतरराष्ट्रीय 'वॉटसेव्ह' पुरस्काराने सन्मान ठिबकचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे ५० ते ६० टक्‍के पाणी बचत झाली. उत्पादनात दोन ते अडीच पट वाढ, मालाची प्रत सुधारा हे जन जागृती प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनातून शक्‍य झाले. २०१२ मध्ये १९ गावांमध्ये ८.९४ दलघमी पाणी बचत करून उच्चांक स्थापित करण्याचे काम केल्याने २०१५ मध्ये जन जागृती प्रतिष्ठान संस्थेला फ्रान्समध्ये आंतरराष्ट्रीय ''वॉटसेव्ह'' पुरस्काराने गौरविण्यात आले. 

    संस्थेचे योगदान 

  • नाबार्डच्या सहकार्याने २१० शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादन वाढीसाठी खास प्रकल्प.बांधावर मार्गदर्शन.
  • गावविकास आराखड्यावर व्हीएसटीएफअंतर्गत बारा गावांत काम.व्हीएसटीएफअंतर्गत स्पर्धेत बकापूर (जि. औरंगाबाद) ग्रामपंचायतीची निवड.
  • ग्रामस्वच्छतेवर विशेष भर, विविध शाळांमध्ये बसविले सोलर पॅनल.
  • डिजिटल शाळा, अंगणवाड्यांना किचन गार्डन.
  • महिला सक्षमीकरणासाठी मेळावे, प्रशिक्षणाची सोय.
  • डोणवाडा, वडखा येथे शुद्ध जल प्रकल्पाची उभारणी.
  • २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गटशेतीला भेट.
  • शेतकरी अनुभव

    गटाच्या माध्यमातून सात शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवड केली. गतवर्षी पहिल्यांदाच थेट ग्राहकांना द्राक्ष विक्रीचा प्रयोग केला. याला चांगला प्रतिसाद मिळाला. संस्थेचे चांगले मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे.  - उद्धव पळसकर, पळशी, जि. औरंगाबाद

    एका शेळीपासून पूरक उद्योगाला सुरुवात केली. संस्थेच्या मार्गदर्शनातून कर्ज उभारणी करत  शेळीपालनाचा विस्तार केला. त्यामुळे उत्पन्नात चांगली भर पडली आहे.   - निवृत्ती पठाडे, आडगाव सरक, जि. औरंगाबाद

    संरक्षित शेती, पाण्याचे महत्त्व, जल, मृदसंधारण, कीडरोगांची ओळख आणि उपाययोजना, उत्पादन खर्चात बचत करून उत्पन्न वाढीचे तंत्र आम्हाला मिळाले. शेतीबरोबरीने ग्रामविकासालादेखील चालना मिळाली.    - लक्ष्मण सवडे, अकोला देव, जि. जालना.

    संपर्क - डॉ. भगवानराव कापसे,  ९४२२२९३४१९, ९४२२२०२८३४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com