Agriculture Agricultural news in Marathi success story of Jayluxmi SHG,Shelewadi,Dist.Kolhapur | Agrowon

शेती, दुग्धव्यवसायाने बनविले आर्थिकदृष्ट्या सक्षम

राजकुमार चौगुले
रविवार, 15 डिसेंबर 2019

अनेक आव्हानांना तोंड देत सदस्यांच्या मेहनतीने आम्ही बचत गटाचे काम सक्षमपणे पुढे नेले आहे. विविध उपक्रम राबविले. गटातील महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारली याचे मोठे समाधान आम्हाला आहे. यासाठी विविध विभागांनी केलेली मदत नक्कीच प्रेरणादायी आहे. 
 - सौ. गीता पाटील (अध्यक्षा)

कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी) येथील जयलक्ष्मी महिला बचत गटाने एकत्रित प्रयत्नांतून प्रगती करत गटांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. बचत गटाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय, खंडाने शेती, स्वतःच्या ट्रॅक्‍टरद्वारे ऊस वाहतूक, शेतीची मशागत करत स्वतःबरोबर महिलांनी गटालाही सक्षम केले. विविध सामाजिक उपक्रमांत हिरिरीने सहभागी होऊन एक चळवळ उभी केली आहे. 

कोल्हापूर - गारगोटी मार्गावर कोल्हापूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर शेळेवाडी हे दोन हजार लोकसंख्येचे गाव. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या गावात जास्त आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आणि स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी गावातील बारा महिलांनी एकत्र येत २००७ मध्ये बचत गटाची स्थापना केली. यानंतर गटाने आजतागायत विविध उपक्रम राबवत प्रगती साधली आहे.

गटातील सदस्य 
सौ. गीता पाटील (अध्यक्षा), आश्‍विनी पाटील (सचिव), लक्ष्मी पाटील, रंजना पाटील, सुवर्णा पाटील, मंगल पाटील, धोंडूबाई गाडीवड्ड, सोनाबाई गाडीवड्ड, जयश्री कांबळे
 
दुग्ध व्यवसायातून महिला झाल्या स्वावलंबी
जयलक्ष्मी महिला बचत गटाने गावातील इतर तीन बचत गटांना सोबत घेत २०१० मध्ये दूध संस्थेच्या धर्तीवर दूध संकलनाला सुरुवात केली. दररोजचे दूध संकलन साडेतीनशे लिटर इतके आहे. उपपदार्थ तयार करणारे खासगी व्यावसायिक व जास्त दर देणाऱ्या दूध संघाला दुधाची विक्री केली जाते. खासगी व्यावसायिकांकडून दूध दिल्यावर लगेच बाजारभावाप्रमाणे रक्कम अदा केली जाते. चांगल्या दर्जाचे दूध प्राप्त व्हावे यासाठी गटाने मिल्को टेस्टरची खरेदी केली आहे. या यंत्राने दुधाची प्रत तपासली जाते. कमी प्रतीचे दूध असेल तर ते नाकारले जाते. संस्थेचे इतर आर्थिक व्यवहार नसल्याने आलेल्या सर्व रकमेचा विनियोग गटातील महिलांबरोबर दुग्धोत्पादकांना केला जातो. प्रत्येक वर्षी दिवाळीला दुग्धोत्पादक सभासदांना तब्बल सहा रुपये प्रतिलिटर इतका लाभांश दिला जातो. मोठी रक्कम हाती पडत असल्याने सभासदांना दूध संस्थेचा मोठा आधार झाला आहे. दूध संस्थेच्या सभासदांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न यशस्वी झाला आहे. गटाची जी महिला संस्थेला सर्वाधिक दूधपुरवठा करेल ती महिला संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहते. बचत गटातून कर्ज घेऊन आतापर्यंत सुमारे एकशे ऐंशी जनावरांची खरेदी गावातील महिलांनी केली आहे. ज्या महिलांना आर्थिक परिस्थितीमुळे घरी चहाला दूध मिळणे मुश्कील बनले होते, त्या महिलांनी दुग्ध व्यवसायात प्रगती केली आहे.
 
ट्रॅक्‍टरसह शेतीपूरक अवजारांची खरेदी 
गटाने राधानगरी पंचायत समितीच्या वतीने अनुदानातून ट्रॅक्‍टरची खरेदी केली आहे. ट्रॅक्‍टर आणि अन्य शेतीपूरक अवजारे भाडेतत्त्वावर दिली जातात. याशिवाय ऊसतोडणीसाठी कारखान्यांशी करार केला जातो. गटातील एका महिलेच्या पतीला ट्रॅक्टरवर चालक म्हणून नेमले जाते. सुरुवातीला गटातील महिलाच ऊसतोडणी करून तो ट्रॅक्‍टरमध्ये भरत. आता मजुरांमार्फत ऊसतोडणी केली जाते. तीन- चार महिन्यांच्या एका हंगामात सुमारे पाचशे ते सहाशे टन ऊस कारखान्याला तोडणी करून पाठविला जातो. संस्थेच्या पासबुकवर कारखान्यामार्फत रक्कम जमा होते. 

सामाजिक उपक्रमांत अग्रेसर 
बचत गटाने केवळ अर्थार्जनाचीच कामे न करता लेक वाचवा उपक्रम, ग्राम स्वच्छता अभियान आणि दारूबंदी कार्यक्रमातही सहभाग घेतला आहे. लेक वाचवा अभियानाअंतर्गत गटाने मुलींच्या नावे ठेव ठेवून लेक वाचवा उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत महिलांना शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. याशिवाय बचत गटाच्या काही सदस्या गावातील शाळेत शालेय पोषण आहाराचे काम करतात. 

  शासकीय विभागांचे सहकार्य
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत या बचत गटाला आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे. बचत गटांना आर्थिक स्तराबरोबर व्यावसायिक स्तरावर सक्षम करण्यासाठी बॅंकेकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यांच्या कामकाजाची माहिती घेण्यात येते. नाबार्डच्या माध्यमातून बचत गटांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण विभागानेही त्यांना विविध पद्धतीने सहकार्य केले आहे. या विभागांच्या आधारावर हा गट सक्षमपणे काम करीत आहे. 

खंडाने शेती करून निर्माण केला आदर्श 
बचत गटाच्या सदस्यांनी कष्ट हेच प्रमाण मानले. पड जमिनी कसण्यासाठी घेऊन संबधित जमीनमालकाला बचत गटातून रक्कम घेऊन ती खंडापोटी दिली जाते. गटातील ज्या महिलांची परिस्थिती अतिशय बेताची आहे, ज्यांना मजुरीवर गेल्याशिवाय पर्याय नाही. अशा महिला एकत्रित येऊन ही शेती करतात. यामध्ये हंगामानुसार ऊस, भाजीपाला, पालेभाज्या यांचे उत्पादन घेतले जाते. किमान दोन वर्षांसाठी ही जमीन कसण्यासाठी घेतली जाते. यातून मिळणारे उत्पन्न ज्या महिलांनी कष्ट केले आहे, त्या महिलांमध्ये वाटून दिले जाते. मजुरीपेक्षा अशा प्रकारे शेती करताना रक्कम जास्त मिळत असल्याने गटातील महिला एकत्र येऊन शेती करण्याला प्राधान्य देतात. ही पद्धत महिलांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी खूप महत्त्वाची ठरली आहे. अगदी दहा गुंठ्यांत जिथे उसाचे सहा टन उत्पादन यायचे, तिथे चौदा ते सतरा टनांपर्यंत उत्पादन महिलांनी काढून दाखविले आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन मातीपरीक्षणानुसार खत, पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. कांदा, कोबी, फ्लॉवर, मूग, भुईमुगाचे उत्पादनही हंगामानुसार घेतले जाते. 

वर्षाला चार लाख रुपयांची उलाढाल
सुरवातीला बारा महिलांनी एकत्रित येऊन या गटाची स्थापना केली. कालांतराने ही सदस्य संख्या दहा सदस्यांवर आली. महिन्याला तीस रुपये वर्गणी जमा करून गटाची स्थापना झाली. यानंतर ही वर्गणी शंभर रुपये करण्यात आली. २००९ मध्ये जिल्हा बॅंकेकडून ८० हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात आले. २०११ मध्ये ही रक्कम वाढवून २ लाख ४० हजार रुपये, तर २०१३ मध्ये इतकीच रक्कम देण्यात आली. सध्या विविध व्यवसायांतून वर्षाला सुमारे चार लाख रुपयांची 
उलाढाल गटातर्फे होत आहे. संस्थेचे स्वभांडवल ७२ हजार रुपये इतके आहे. 

 - सौ. गीता पाटील (अध्यक्षा), ८८०६६५५१८७


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...