भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार करंजखोपचे भाग्य

भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून आकाराला आलेल्या करारांमधून अनेक प्रकल्प देशात तयार होत आहेत. त्यांपैकी जल आणि ऊर्जेचा योग्य वापर या विषयी एक प्रकल्प करंजखोप (जि.सातारा) गावात राबविला जात आहे. यामुळे गाव आणि किमान २०० शेतकरी कुटुंबांचे भाग्य उजळणार आहे .
Drip Irrigation  system
Drip Irrigation system

भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून आकाराला आलेल्या करारांमधून अनेक प्रकल्प देशात तयार होत आहेत. त्यांपैकी जल आणि ऊर्जेचा योग्य वापर या विषयी एक प्रकल्प करंजखोप (जि.सातारा) गावात राबविला जात आहे. यामुळे गाव आणि किमान २०० शेतकरी कुटुंबांचे भाग्य उजळणार आहे . 

भारताचे पंतप्रधान जगभरातील राष्ट्रप्रमुखांशी भेटत असतात. या भेटीमध्ये विविध सामंजस्य करार होतात. अशा करारांमधून काही वेळा अगदी गावपातळीपर्यंत नावीन्यपूर्ण प्रकल्प सुरू होतात. या संबंधी उदाहरण द्यायचे झाले तर सातारा जिल्ह्यातील करंजखोप गावाचे देता येईल. काही वर्षांपूर्वी भारत आणि इस्राईलच्या पंतप्रधान भेटीतून आकाराला आलेल्या करारांमधून अनेक प्रकल्प देशात सुरू झाले. त्यांपैकी जल व ऊर्जा विषयक एक प्रकल्प करंजखोप गावात राबविला जात आहे. यामुळे गाव आणि किमान २०० शेतकरी कुटुंबांचे भाग्य उजळणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी आणि वीजेचा काटेकोर वापर करून शेतकरी कुटुंबांना समृद्धीकडे नेण्याचे ध्येय आहे.  असा आहे प्रकल्प  भारत आणि इस्राईलच्या पंतप्रधानांमध्ये झालेल्या करारातून ‘औद्योगिक संशोधन विकास,तंत्रज्ञान नाविन्यपूर्णता निधी’ या नावाने एक व्यासपीठ तयार करण्यात आले. यासाठी ४० दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारण्यात आला. भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि इस्राईलमधील राष्ट्रीय तंत्रज्ञान नाविन्यपुर्णतः प्राधिकरणाने या निधीतून प्रकल्प करण्याचे ठरविले. भारताने या प्रकल्पांवर काम करण्याची संधी ‘गीता’ (ग्लोबल इनोव्हेशन टेक्नॉलॉजी अलायन्स) नावाच्या यंत्रणेला दिली आहे. ‘गीता’च्या माध्यमातून देशातील कृषी, ऊर्जा, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान आणि पाणी या पाच बाबींवर बारकाईने काम सुरू झाले आहे. या सर्व घडामोडींचा करंजखोप प्रकल्प हा केंद्रबिंदू आहे. पुण्यापासून ९० किलोमीटरवरील करंजखोप गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजार असून १२०० खातेदार शेतकरी आहेत. गावाचे शिवार १,३५० हेक्टरचे असून २५० विहिरी आहेत.  प्रकल्पाचे उद्दिष्ट  प्रकल्पाच्या समन्वयक स्नेहा शिंदे म्हणाल्या की, या निमित्ताने करंजखोप गावात चार नामांकित संस्था काम करणार आहेत. बाएफ संस्थेकडे  प्रकल्पातील शेतकऱ्यांशी संवाद साधणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, पीक उत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आहे. आयआयटीकडून जमिनीखालील पाणी स्रोताच्या अभ्यासानुसार नकाशे तयार होत आहेत. त्यानुसार पाण्याची एकूण उपलब्धता  आणि त्यामध्ये कशी वाढ करायची हे लक्षात येईल. आयआयटी ही संस्था शेतकऱ्यांना मोबाईलवर माहिती देणारी यंत्रणा उभारणार आहे. पाणी व ऊर्जा वापर योग्य होण्यासाठी आयओटी प्लॅटफॉर्म उभारण्यात येत आहे. यासाठी अचूक मोजमाप करणारी यंत्रणा बॅकसॉफ्ट कंपनी देणार आहे.  गावात वीज आणि पाण्याच्या अभ्यासासाठी एनर्जी मीटर, फ्लो मीटर बसविले जाणार आहेत. कृषिपंपांची क्षमता तपासणी   बाएफचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी रवी कोते म्हणाले की, जुन्या कृषिपंपांमुळे ऊर्जा वापराची क्षमता २५ टक्क्यांपर्यंत घटते. ही क्षमता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना ‘फाईव्ह स्टार एनर्जी इफिशियन्सी पंप’  देण्यात येत आहेत. सध्या सवलतीच्या दरातील विजेमुळे देशभर  पाण्याचा भरमसाठ उपसा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या पद्धती कशा आणि कुठे वापराव्यात हे समजावून सांगावे लागणार आहे. त्यासाठी ठिबक सिंचनासारख्या सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांना निश्चित मार्गदर्शन करणारी तसेच भूगर्भातील पाण्याचा शाश्वत वापर आणि व्यवस्थापन शिकवणारी यंत्रणा उपलब्ध नाही. करंजखोप प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी व ऊर्जा वापराचे शाश्वत आणि किफायतशीर मॉडेल शोधण्याचा प्रयत्न आहे. ते यशस्वी झाल्यास करंजखोप प्रकल्पाचे निष्कर्ष केंद्र स्तरापर्यंत नेण्याचे प्रयत्न होतील. वॉटर बजेटिंगमधील अडचणींचा शोध  करंजखोपमध्ये वॉटर बजेटिंग वेगळ्या अंगाने होणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींना वॉटर बजेटिंग ही संकल्पना माहिती आहे. हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांनी वॉटर बजेटिंगवर चांगले काम केले आहे. तथापि, अजुनही निश्चित पाणी वापर, अपव्यय आणि प्रभावी उपाय योजनांचे सूत्र मिळालेले नाही. वॉटर बजेटिंगमधील अडचणींचा शोध घेण्यासाठी करंजखोपमध्ये पाणी आणि ऊर्जा वापर नोंदविणारी उपकरणे बसविली जाणार आहेत. भूगर्भातील पाण्याचा वापर किती होतो, हे गावकऱ्यांना दाखवून देण्यासाठी डॅशबोर्ड वापरण्यात येणार आहे. यातून पाणी अपव्यय या मुद्द्यावर जनजागृती केली जाणार आहे. मोबाईल एप्लिकेशनद्वारे भूगर्भातील पाण्याचे स्रोत व पाणी नियोजनाची माहिती मिळणार आहे. जमिनीखालील आणि जलाशयांमधील पाण्याचा योग्य वापर करून गावातील कोरडवाहू जमिनीला बागायती पिकाकडे नेण्याचा प्रयत्न आहे. हे करताना खर्च वाढू नये यासाठी सौर ऊर्जा वापर वाढविण्याबाबत अभ्यास होत आहे.  दोन वर्षांचा प्रकल्प  करंजखोप प्रकल्प दोन वर्षांचा असून याच्या अंमलबजावणीसाठी पावणे सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एप्रिल, २०१९ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे २०० शेतकरी कुटुंबीयांच्या विहिरींवर नवे कृषी पंप मोफत बसविले जाणार आहेत. ऊर्जा वापराची क्षमता ही पाणी वापराशी निगडीत असते. ऊर्जेचा वापर वाढला की पाणी वापर वाढतो. मात्र, असा वापर वाढविताना अपव्यय टाळणे आणि समृद्धी साधणे अशी उद्दिष्टे ठेवलेली आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना मोफत नवे कृषिपंप दिले जाणार आहेत.   गाव नेमके किती पाणी आणि वीज वापरते याचा एक ‘डॅशबोर्ड’ तयार करून ग्रामपंचायतीमध्ये लावला जाणार आहे. नवे कृषिपंप बसविणे, शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोकाट पाणी वापराऐवजी ठिबक प्रणालीकडे नेणे, सौर ऊर्जेचा वापर वाढविणे, गावातील जलाशयांची दुरुस्ती, नवी पीक पद्धतीने लागवड नियोजनासाठी प्रवृत्त करणे अशी कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ४० शेतकऱ्यांकडे नवे ठिबक संच आले आहेत. गावातील जलाशयांची दुरुस्ती सुरू झाली आहे. सौर ऊर्जेवर पिण्याचे पाण्याची पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. बाएफमुळे शेतकऱ्यांना आधुनिक पीक पद्धती आणि  शेतमाल विक्री व्यवस्थेचे प्रशिक्षण मिळणार असल्याने गावातील तरुण शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. करंजखोपमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पाकडे  उपलब्धीकडे सरकारी यंत्रणांचेही लक्ष आहे. यातून या प्रकल्पाचा विविध गावात प्रसार होणार आहे.

नामांकित संस्थांचा सहभाग  ग्रामविकास, मानवी जीवनमान उंचावण्यासाठी पाणी व वीज वापराची क्षमता कशी वाढवता येईल, असा मुद्दा ‘गीता’समोर चर्चेला आला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एनर्जी इफिशियन्सी सव्हिसेस लिमिटेड  (ईईएसएल) या सरकारी अंगीकृत संस्थेने काम करण्याचे ठरविले. या चर्चेतून करंजखोप प्रकल्प तयार झाला. या प्रकल्पामध्ये बाएफ, आयआयटी- भुवनेश्वर, पुण्यामधील डेटामेट्रिक्स आणि इस्राईलमधील बॅकसॉफ्ट या संस्था कार्यरत आहेत.  

होणारे बदल 

  • सर्व जुनाट कृषिपंप मोफत बदलून देणार. 
  • भूगर्भातील पाण्याचा वापर करणारे सर्व शेतकरी ठिबक संच वापरणार. 
  • जलाशये व जलस्रोतांची दुरुस्ती. 
  • भूगर्भातील जलस्रोतांच्या नकाशांची निर्मिती. 
  • पाणी व ऊर्जा वापर अभ्यासण्यासाठी स्मार्ट मीटर, सेन्सर्स,डॅशबोर्डचा वापर.
  • पाणी व ऊर्जा वापराचे बजेटिंग. 
  • भूगर्भातील पाण्याचा वापर करून पीक उत्पादकांचा गट. शेतकरी उत्पादक कंपनीची निर्मिती.
  • सौर ऊर्जेवर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी यंत्रणा.
  • पथदर्शक प्रकल्पाचे व्यावसायिक मॉडेल तयार करण्यासाठी अभ्यास. 
  • करंजखोप प्रकल्पाचे ध्येय 

  • ऊर्जा वापरात १५ टक्के आणि पाणी वापरात २५ टक्के बचत.  
  • मोबाईल आधारित पाणी वापर व सल्ला यंत्रणेची उभारणी.  
  • ऑनलाइन जल व्यवस्थापन प्रणालीची उभारणी.
  • पाणी व ऊर्जा वापर समतोल तयार करणारी प्रणाली. 
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून समृद्धीकडे नेणे. 
  • - स्नेहा शिंदे (प्रकल्प समन्वयक,बाएफ),  ७७०९०५४१७७   - रवी कोते (वरिष्ठ प्रकल्प अधिकारी,बाएफ), ९४०५३७०४७१   - सचिन धुमाळ (अध्यक्ष, पाणलोट समिती), ९७६५७०७८८८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com