मजुरांशिवाय कुटुंब झाले दुग्धव्यवसायात स्वयंपूर्ण

पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यालगत शहरीकरण वाढले आहे. जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत रिहे येथील बोरकर कुटुंबाने आपली साडेतीन एकर शेती टिकवून जोडीला सुमारे २२ जनावरांचा दुग्धव्यवसाय वाढवला आहे.
cattle feeding
cattle feeding

पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यालगत शहरीकरण वाढले आहे. जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत रिहे येथील बोरकर कुटुंबाने आपली साडेतीन एकर शेती टिकवून जोडीला सुमारे २२ जनावरांचा दुग्धव्यवसाय वाढवला आहे. एकाही मजुराची मदत न घेता सारे कुटुंब व्यवसायात राबते. ग्राहकांचे नेटवर्क तयार करून थेट दूध विक्री करून त्यांनी व्यवसायातील नफा वाढवला. व्यवसायात स्वयंपूर्णतः मिळवली.

पुणे शहराची वाढ झपाट्याने होत असताना शहराच्या लगतच्या तालुक्यात किंवा हिंजवडी, मुळशी भागात  शहरीकरण वाढीस लागले आहे. जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. अशातही आपली शेती टिकवून त्यातून आर्थिक सक्षमता निर्माण करणारी काही शेतकरी कुटुंबे पाहण्यास मिळतात. मुळशी तालुक्यातील रिहे येथील उत्तम व खंडू हे बोरकर बंधू हे त्यापैकीच एक आहेत. त्यांनी पारंपरिक साडेतीन एकर शेती जपली आहे.  शेतीतील धडपड  भात हे बोरकर कुटुंबाचे मुख्य पीक आहे. खरिपानंतर पाण्याच्या टंचाईमुळे त्यांना रोजगारासाठी परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये जावे लागत होते. शेती आणि संसाराला जोड म्हणून म्हैसपालन  करीत होते. गाभण म्हैस घेऊन वर्षभर सांभाळून विक्री करायचे. मात्र पैसे मिळण्यास काहीवेळा वर्ष देखील लागायचे. त्यातून आर्थिक स्थैर्य मिळत नसे. आपल्या धडपडीबाबत सांगताना बोरकर म्हणाले की ‘एमआयडीसी’ मध्ये लहानमोठी कामे करण्यासाठी जायचो. बरीच वर्षे काम केल्यावर दुग्धव्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होतो. पैशांची अडचण होती. माझी आणि भावाची पत्नी स्त्री शक्ती महिला बचत गटाच्या सदस्या होत्या. हा गट नाबार्ड आणि ल्युपीन फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होता. गटांमधून २०११ साली दोघींच्या नावावर प्रत्येकी ५० हजार रुपयांचे कर्ज मिळाले. त्यातून दोन म्हशी घेतल्या. आधीच्या दोन आणि नव्याने दोन अशा चार म्हशी झाल्या.  व्यवसायात स्थिरता शेतात एक गुंठ्यावर मोठा गोठा तयार केला. दरवर्षी दोन म्हशी आणि गायी वाढविण्याचा विचार करून गोठा बांधला. त्यासाठी विकास सोसायटीचे ४० हजार रुपये कर्ज घेतले. म्हशींना चारा- पाणी देणे सोपे जाण्याच्या दृष्टीने ‘फेस टू फेस’ गव्हाणीची सोय केली. सन २०१६ मध्ये पुन्हा बचत गटाचे कर्ज आणि स्वतःकडील रक्कम मिळून दोन गायी घेतल्या. म्हणता म्हणता गोठ्यातही पैदास होऊ लागली. अशा रितीने काही काळ लोटल्यानंतर आजमितीला लहान-मोठी मिळून जनावरांची संख्या सुमारे २० ते २२ पर्यंत पोचली आहे. यात मोठ्या सुमारे चार गायी, सात म्हशींचा समावेश आहे. 

मजुरांशिवाय गोठा व्यवस्थापन बोरकर कुटुंबाने एकही मजूर तैनात केलेला नाही. आई-वडील, दोघे बंधू व प्रत्येकाची पत्नी असे कुटुंबाचे सर्व सदस्य व्यवसायात राबतात. त्यामुळे मजुरांवरील खर्च पूर्णपणे वाचवला आहे. व्यवस्थापनाबाबत सांगायचे तर दूध काढण्याची वेळ सकाळी आणि सायंकाळी एकच म्हणजे सहा वाजताची ठेवली आहे. पहाटे चारा देण्यात येतो. सकाळी व संध्याकाळी पशुखाद्य, पेंड, गोळीखाद्य, मका, घासाची कुट्टी देण्यात येते.  ओल्या चाऱ्यासाठी १० गुंठे क्षेत्र  वर्षभर ओला चारा उपलब्ध व्हावा यासाठी २० गुंठ्यावर चक्राकार पद्धतीने मका व अन्य गवतवर्गीय पिकांची लागवड केली आहे.  त्यामुळे वर्षभर व दररोज ताजा चारा उपलब्ध होतो. भात आणि गव्हाचा भुसा साठवणूक केलेला असतो. तो वर्षभर पुरवला जातो. 

वैद्यकीय तपासणी, लसीकरण, औषधोपचार

नियमित वैद्यकीय तपासणी, लसीकरण आणि औषधोपचार केले जातात. यासाठी संस्थेचे पशुवैद्यकीय अधिकारी नवनाथ शिंदे महिन्याला आणि गरजेनुसार गोठ्याला भेट देतात. संस्थेतर्फे कमी दरात औषधोपचार सेवा मिळते. याद्वारेही आर्थिक बचत होते. दूध देण्यामध्ये गायी- म्हशींचे सातत्य राखले जाते.  अर्थकारण जपले  दररोजच्या दूधविक्रीतून सरासरी ४५ रुपये प्रति लिटर दराने तीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. अर्थात चारा, पशुखाद्य, वैद्यकीय उपचार, वीजबिल, प्रवास असा खर्चही असतो. तरीही मजूर व चाऱ्यांवरील खर्चात चांगली बचत केली आहे. महिन्याला त्यातून ४० टक्क्यांपर्यंत नफा हाती येतो.

ग्राहकांचे नेटवर्क, रतीब व्यवस्था

दूध डेअरीला देण्यापेक्षा स्वतः थेट विक्री केल्यास नफ्याचे प्रमाण वाढेल हा विचार करून ग्राहकांचे नेटवर्क वाढवण्यास सुरुवात केली. सध्या सुमारे ७० पर्यंत ग्राहक आहेत. हिंजवडी परिसरातील निवासी सोसायट्यांमध्ये दुधाचे रतीब देण्यात येते. दूध आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित म्हणजे ‘हायजेनिक’ असावे यासाठी ते पॉलिथिन पॅकिंगमधून देण्यात येते. दुधाचे रतीब हे कष्टाचे काम आहे. वर्षभर त्यात सातत्य पाळावे लागते. दूध कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. दररोज सुमारे ७० ते ८० लिटर दूध थेट पुरवण्यात येते. गायीच्या दुधाला लिटरला ४० रुपये, म्हशीच्या दुधाला ५० ते ५५ रुपये दर मिळत आहे. 

मुक्त गोठा पद्धत आणि यांत्रिकीकरण  बोरकर बंधूंपैकी उत्तम हे एका कंपनीत नोकरीही करतात. काळाची गरज ओळखून तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात त्यांचा पुढाकार असतो. साहजिकच येत्या काळात ‘नाबार्ड’ च्या आर्थिक सहकार्याने मुक्त गोठा पद्धत, यंत्राद्वारे दूध काढणी, पॅकिंग यंत्र आदींची सुविधा करण्यात येणार असल्याचे खंडू यांनी सांगितले.

- खंडू बोरकर, ८८०६६६७८०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com