कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड' अभियान

कुडावळे (ता.दापोली,जि.रत्नागिरी) गावातयंदाच्या वर्षी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांनी `शत प्रतिशत भात लागवड' या उपक्रमाला सुरुवात करत शेतीला नवी दिशा दिली.
rice cultivation
rice cultivation

गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर सर्वांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, हे कुडावळे (ता.दापोली,जि.रत्नागिरी) गावातील शेतकऱ्यांनी ओळखले. यंदाच्या वर्षी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या मदतीने  शेतकऱ्यांनी `शत प्रतिशत भात लागवड' या उपक्रमाला सुरुवात करत शेतीला नवी दिशा दिली आहे. दापोली तालुक्यातील कुडावळे हे निसर्गरम्य गाव. भातशेती आणि भाजीपाला ही गावाची पीक पद्धती. परंतु मजूर टंचाई, आर्थिक स्थिती तसेच कुटुंबातील युवक मंडळी रोजगारासाठी शहरात गेल्यामुळे शेती पडीक राहिलेली. यंदा मात्र गावकऱ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने बहुतांश शेती भात लागवडीखाली आणायचा निर्णय घेतला.‘शत प्रतिशत भात लागवड' उपक्रमातून गावामध्ये सुधारित तंत्रज्ञानाचे बीज रुजू लागले आहे.   याबाबत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.संतोष वरवडेकर म्हणाले की, गेल्या वर्षी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कुडावळे गावामध्ये दापोली कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्यरत होते. त्यांनी गावातील शेती क्षेत्र, पीक पद्धती,भात व भाजीपाला पिकांच्या जाती आणि पूरक उद्योगांची नोंद घेतली. यामध्ये असे दिसून आले की, गाव शिवारात भात लागवड क्षेत्र सुमारे ५२ हेक्टर असले तरी यातील ३० टक्के क्षेत्र पडीक आहे. कृषी विद्यार्थांनी सहा महिने कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी गावामध्ये विविध उपक्रम राबविले. त्याअंतर्गत मागील वर्षी जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थांनी गावामध्ये ‘भाकरी महोत्सवा'चे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांसमवेत चर्चा करताना विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.एस.डी.सावंत, डॉ.संजय भावे (संचालक, विस्तार शिक्षण) आणि डॉ.उत्तम महाडकर (सहयोगी अधिष्ठाता) यांनी खरीप हंगामामध्ये पडीक शेती पूर्ण क्षमतेने भात लागवडीखाली आणण्यासाठी मार्गदर्शन केले. खरीप हंगामाच्या सुरूवातीला ग्रामस्थांनी विद्यापिठाच्या सहकार्याने भात लागवड अभियानाची आखणी केली. या उपक्रमाला सरपंच श्रीमती सरिता भुवड, उपसरपंच विकास भुवड, प्रयोगशील शेतकरी प्रमोद कदम, विनायक महाजन आणि गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

सुधारित भात जातींचा प्रसार भात लागवडीच्या सुधारित तंत्रासोबत उत्पादन वाढीसाठी बियाणे हा महत्त्वाचा घटक. हे लक्षात घेऊन कृषी विद्यापिठाच्या वर्धापन दिनी (१८ मे)  कुडावळे गावातील ९३ शेतकऱ्यांना भाताच्या रत्नागिरी-५, रत्नागिरी -६, रत्नागिरी- ७ (लाल भात), रत्नागिरी- ८ आणि रत्नागिरी-२४  या जातींचे १,६८० किलो बियाणांचे मोफत वाटप केले. 

शेतीत उतरले चाकरमानी  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरात रोजगारासाठी गेलेले चाकरमानी गावामध्ये परत आले, त्यांना रोजगार नव्हता. परंतू या उपक्रमामुळे चाकरमानी कुटुंबांनी  स्वतःची पडीक शेती विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमात १४७ चाकरमानी सामील झाले. या उपक्रमाचे सकारात्मक यश म्हणजे पडीक शेती लागवडीखाली आल्याने रोजगारासाठी बाहेर गेलेल्या काही तरुणांनी गावामध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तर काही जण दरवर्षी भात शेतीसाठी गावी येणार आहेत. गेल्यावर्षी ३७ हेक्टर क्षेत्रावर असलेली भात लागवड यंदा ४२ हेक्टरवर पोहोचले. याचबरोबरीने भाजीपाला,कडधान्य लागवडीला चालना मिळाली आहे.

प्रात्यक्षिकांचे आयोजन

मिनी ट्रॅक्टर प्रात्यक्षिक    शेतीमध्ये नांगरट, चिखलणी करताना मजूर,वेळेची बचत साधण्यासाठी शेखर कदम यांच्या शेतीमध्ये शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर वापराचे प्रात्यक्षिक देण्यात आले. कृषी विद्यापिठाच्या यंत्रे व शक्ती विभागातील तज्ज्ञ डॉ.प्रशांत शहारे, डॉ.विजय आवारे तसेच समीर झगडे, कुलदीप सातपुते यांनी यांत्रिकीकरणाबाबत माहिती दिली.

चारसूत्री पद्धतीने लागवड एकनाथ मोरे यांच्या शेतीमध्ये विद्यापिठातर्फे चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शेतकऱ्यांना कृषि विद्या विभागातील तज्ज्ञ डॉ.व्ही.जी.मोरे, डॉ.संतोष वरवडेकर, कृषी विभागाचे विजय जाधव, सुनील भावे, राकेश मर्चंडे, सचिन पवार हे सुधारित लागवड तंत्रज्ञान, व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करत आहेत.

उपक्रमाचे प्राथमिक यश

  •  यंदाच्यावर्षी भात लागवडीखाली ४२ हेक्टर क्षेत्र.
  •  संपूर्ण गावात विद्यापिठाने विकसित केलेल्या भात जातींची लागवड.
  • चारसूत्री, एसआरटी, पेरभात पद्धतीने भात लागवडीकडे कल.
  • सुधारित जाती आणि गादीवाफा पद्धतीने रोपवाटिका केल्याने १०० टक्के रूजवा.
  • एकात्मिक खत व्यवस्थापनावर भर.
  •  भात बीजोत्पादनाला सुरुवात. सामूहिक शेती उपक्रमांना चालना. 
  • लॉकडाउनमुळे गावी आलेल्या युवकांना रोजगार निश्चिती.
  • गावामध्ये ‘किसान आर्मी'  गावात भात शेतीच्याबरोबरीने तीस शेतकरी भाजीपाला लागवड करतात. या शेतकऱ्यांना विद्यापीठातर्फे प्रशिक्षित करण्यात येत आहे.  यांत्रिकीकरण, पूरक उद्योगाबाबत प्रशिक्षणाचे नियोजन झाले आहे.  सामूहिक शेतीला चालना देण्यासाठी गावामध्ये ‘किसान आर्मी‘ उभारण्यात आली आहे. विविध शेतीकामांच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांचे गट तयार झाले आहेत.

    ‘ मॉडेल गाव' तयार करणार...  कुडावळे गावामध्ये कृषी विद्यापिठातर्फे यांत्रिकीकरण, भाताच्या नवीन जातींचा प्रसार, चारसूत्री, पेरभात तसेच एसआरटी पद्धतीने लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापनावर भर दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विद्यापिठातील विविध विभागातील तज्ज्ञ गावामध्ये मार्गदर्शनासाठी जातात. भात शेतीच्या बरोबरीने रब्बी, उन्हाळी हंगामी पिके तसेच भाजीपाला लागवडीखाली गावातील संपूर्ण क्षेत्र आणण्याचे नियोजन आहे. यांत्रिकीकरण, अवजारांच्या वापर आणि पूरक उद्योगांतून पंचक्रोशीत वर्षभर रोजगार निर्मिती होणार असल्याने शहरातून परत आलेल्या युवकांना शाश्वत रोजगार मिळेल. सामूहिक प्रयत्नातून शेती आणि आर्थिक विकासावर भर आहे. विद्यापिठाच्या माध्यमातून कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये असे ‘मॉडेल गाव' विकसित करण्याचे नियोजन केले आहे.  - डॉ.एस.डी.सावंत, (कुलगुरू,डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

    सुधारीत जाती, तंत्रज्ञानातून भात उत्पादनवाढीचे ध्येय आहे. गावामध्ये आम्ही लाल रंगाच्या भात जातीच्या (रत्नागिरी-७) लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. सुधारित पीक पद्धतीच्या बरोबरीने यांत्रिकीकरण, आळिंबी संवर्धन, कुक्कुटपालन, मिनी राईस मिलबाबत प्रशिक्षण देत आहोत. निश्चितपणे शाश्वत ग्रामविकासाचे मॉडेल यातून उभे राहील. — डॉ.संजय भावे (संचालक, विस्तार शिक्षण)

    कृषी विद्यापीठ, कृषी विभागाच्या सहकार्याने यंदा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्र भात लागवडीखाली आणले. अवजारांचा वापर, सुधारित भात जातींची लागवड, व्यवस्थापनावर भर दिला. दर्जेदार भात बियाणे उत्पादनाचे नियोजन आहे. गावात भात बियाणे बॅंक तयार होत आहे.भाताच्या बरोबरीने कडधान्ये, भाजीपाला लागवड क्षेत्र वाढविण्याचे आम्ही ठरविले आहे. गावातील पडीक क्षेत्र लागवडीखाली आल्याने रोजगाराची संधी वाढणार आहे. — विनायक महाजन, प्रयोगशील शेतकरी.

    - डॉ.संतोष वरवडेकर,९४०४१६१४३५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com