Agriculture Agricultural News Marathi success story of Kumshet village,Dist.Nagar | Agrowon

डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या वाटेवर

शांताराम काळे
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून ओळख असलेले कुमशेत (जि. नगर) आता वेगाने प्रगतीकडे झेपावले आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शासन आदींनी एकत्रपणे जलसंधारणाची विविध कामे केली. त्यातून गाव पाणीदार झाले.

एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून ओळख असलेले कुमशेत (जि. नगर) आता वेगाने प्रगतीकडे झेपावले आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शासन आदींनी एकत्रपणे जलसंधारणाची विविध कामे केली. त्यातून गाव पाणीदार झाले. शिवारात विविध हंगामात पिके डोलू लागली. गावातील महिला हस्तकलेतून विविध वस्तू तयार करून अर्थार्जन करू लागल्या आहेत. युवकांनाही ग्राम पर्यटन व्यवसायातून हातभार लागला आहे. 

नगर जिल्ह्यात अकोले या तालुका ठिकाणापासून सुमारे ५५ किलोमीटरवर कुमशेत हे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव.  रामायणात वाल्मीकी ऋषींचा आश्रम असल्याचा उल्लेख आज्या पर्वतासंबंधी आहे. हा पर्वत तसेच वाकडा, सुपली, करंडा आदी डोंगरांच्या मध्यावर गावठा, पाटीलवाडी, बोरीची वाडी, ठाकरवाडी, मुडाची वाडी व नाडेकरवाडी अशा सहा वाड्यांचे मिळून कुमशेत गाव तयार झाले आहे. गावाच्या एका बाजूस धारेराव कोकणकडा आहे.

दुष्काळापासून मुक्ती 
गावचे भौगोलिक क्षेत्र सुमारे ३०२७. ५४ हेक्टर आहे. त्यात वनक्षेत्राचा मोठा वाटा आहे. पावसाळ्यात तीन हजार मिमी. पाऊस पडतो. खडकाळ जमीन असल्याने उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न जाणवतो. सतत टँकर तर रोजगारासाठी दाही दिशा अशा स्थितीत दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव आता परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करू लागले आहे. पाणीदार व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी लोकसहभाग व त्यातही महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. बचत गटाच्या माध्यमातूनही गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न होतो आहे. 

जलसंधारणातून अडवले पाणी 
गावात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी जानेवारीपासूनच टँकरची मागणी करावी लागत होती.हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी गावकरी एकत्र झाले. त्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांची मदत घेतली.त्यातून गावशिवारात कृषी विभागामार्फत सिमेंट काँक्रिटचे सात दगडी बंधारे, लघू पाटबंधारे विभागाकडून पाच तर लोकसहभागातून वनराई बंधारे झाले. त्याद्वारे डोंगरदऱ्यांतून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी अडविले. जलयुक्त अभियान कार्यक्रमातून पाणी अडविण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेतला. तत्कालीन आमदार वैभव पिचड यांनी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळवला. बंधाऱ्यात मेअखेरपर्यंत पाणी टिकते. त्याचा फायदा म्हणजे गावाला पिण्यासाठी पाणी मिळालेच, शिवाय उन्हाळी पिकेही शेतकरी घेऊ लागले. 

शिवारात डोलू लागली पिके 
पाटीलवाडी, ठाकरवाडी, चोंढी उत्तर ओढा आदी काँक्रिट बंधाऱ्याच्या काठावरील भात खाचरात गहू, हरभरा, भुईमूग, देशी वाल, वांगी, मेथी, पालक अशी पिके डोलू लागली आहेत. कमी पाण्यावरील गव्हाच्या वाणाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. नैसर्गिक  पाण्याचा ओलावा, त्याला बंधाऱ्यातील २५ ते ३० दशलक्ष घनफूट पाण्याची जोड व ठिबक सिंचन यांचा वापर झाला. त्या आधारे कांदा, बटाटा या प्रचलित पिकांसह आंबा, आवळा, पेरू, बोरे, मेथी अशी विविधता शिवारात दिसू लागली. हे सर्व सुरू असताना गावाला जलयुक्त शिवाराचा तिसरा क्रमांक मिळाला. ग्रामस्थांच्या एकजुटीला हे श्रेय जाते. त्यामध्ये विद्यमान सरपंच सयाजी अस्वले, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांचाही समावेश राहिला. गावात वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच अस्वले यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन कायदा समजून घेतला. तो ग्रामस्थांना समजून दिला. लोकपंचायत कार्यशाळेच्या माध्यमातून जाणीवजागृती केली.

पर्यटकांसाठी आकर्षण
जलयुक्त शिवार अभियानातून कृषी विभाग व वन विभागाने कामे केली. त्यातून पाण्याची समस्या दूर झाली आहे. शिवार हिरवेगार झाल्याने पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे. नजीकच्या काळात गाव पर्यटनासाठी नावारूपास येण्याची आशा वृद्धिंगत झाली आहे. हे गाव बांबू प्रशिक्षण केंद्र म्हणूनही नावारूपाला येत आहे. त्यातूनही गावाला मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. 

शेतकरी झाले समाधानी 
शिवारातील बहुतांश पीक उत्पादन सेंद्रियच म्हणावे लागेल. विविध हंगामात पिके घेणे शक्य झाल्याने रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. यावर्षी पाऊस अधिक झाल्याने बंधारे देखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चारसूत्री भात लागवडीद्वारे परिसरात मार्गदर्शकाची भूमिकाच गावाने बजावली आहे. कृषी विभागाने महिलांना बांबू उद्योगासाठी मदत केली आहे. बांबूपासून हारे, टोपल्या, करंडे, तट्टे, खुराडे, कणगी आदी घटक बनवून गावातील आदिवासी आपल्या संसाराला हातभार लावत आहेत. 

गावात झालेली उल्लेखनीय कामे

 • बांबूची सुधारित लागवड. २१ शेतकऱ्यांकडे ४००० रोपांची लागवड.
 • चार सूत्री पद्धतीने भात लागवड व पारंपरिक पद्धतीने बियाणे संवर्धन. 
 • पिण्याच्या पाण्यासाठी गावात तीन ठिकाणी कूपनलिका.
 • पर्यटन वाढीसाठी गावातील युवकांनी गाइड प्रशिक्षण.
 • महिला बचतगटांमार्फत पर्यटकांसाठी घरगुती जेवणाचे नियोजन.
 • महिलांना प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण. 
 • स्वच्छता अभियान उपक्रमातून गाव शंभर टक्के हागणदारी मुक्त. 
 • सर्व कुटुंबांना इंधन गॅस वाटप.
 •  युवकांसाठी वाचनालय. स्पर्धा परिक्षांची पुस्तके वाचण्याची सुविधा.
 •  दर महिन्याला आरोग्य शिबिराचे आयोजन.
 •  जिव्हाळा संस्था स्थापन करून सामाजिक कामे.
 • कोरोना समितीची स्थापना करून त्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला प्रतिकारक्षम घटक व मास्क वाटप.
 • ५५ कुटुंबांना रेशनवरील धान्य मिळण्यास सुरुवात.
 • अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा डिजिटल.
 • श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेची अंमलबजावणी. त्याअंतर्गत विविध योजनांचा ग्रामस्थांना लाभ 
 • वाहन चालवण्याचा अभ्यासक्रम घेऊन प्रशिक्षणातून परवानेही. 
 • गावात पर्यटन वाढविण्यासाठी युवकांना प्रशिक्षण. हिमाचल प्रदेश व अन्य पर्यटन केंद्रांची युवकांना प्रत्यक्ष ओळख.
 • शाळांना कुंपण.
 • उंबरवाडीत पिण्याच्या पाण्याची टाकी. 
 • सार्वजनिक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक्स.
 • धरराव देवाचे मंदिर बांधकाम.
 • गावाच्या मालकीची जमीन असल्याचे प्रमाणपत्र. 
 • ग्रामस्थांना गावातच जातीचे दाखले उपलब्ध.
 • अंगणवाडीला आदर्श पुरस्कार. 

सर्वांच्या मदतीतून गाव बदलतेय 
ग्रामविकासाबाबत सरपंच सयाजी अस्वले म्हणाले की, उन्हाळ्यातील पिण्याचा टँकर बंद झाला आहे. शेतीलाही पाणी उपलब्ध होऊन रब्बी, उन्हाळी क्षेत्र वाढले आहे. गावात महिलांचा तनिष्का गट स्थापन केला आहे. त्या आधारे वीस महिलांना एकत्र करून उद्योग उभारण्याचे  काम सुरू आहे. बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी सकाळ रिलिफ फंडातून दोन लाख रुपयांचा निधी मिळाला. खडकाळ माळरानावरील शेतांमध्ये शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला. त्यातून पाच हेक्टर क्षेत्रात पिके डोलू लागली आहेत. या जमिनींची पाणीक्षमताही वाढीस लागली आहे. या बंधाऱ्यांना भेट देण्यासाठी पर्यटक येतात. वस्ती करतात. ग्रामस्थ त्यांना चुलीवरची भाकरी तसेच जेवण देतात. हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात येते. त्यातून पर्यटनाचे केंद्र म्हणून गावाची ओळख झाली आहे. सरकारने पर्यटन विकासातून निधी दिल्यास तसेच रस्ते काँक्रिटचे तयार झाले तर पर्यटकांचा ओघ अधिक वाढेल. गावात सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, गाळ काढणे, गॅबियन वनराई बंधारे आदी कामे झाल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गहू, भाजीपाला, उन्हाळ्यात भुईमूग, बाजरी त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आंबा, आवळा आदींचीही लागवड झाली आहे. एक महिन्याचे प्रशिक्षण घेऊन बांबूपासून वस्तू तयार करून महिला त्यांची विक्री पर्यटकांना व बाजारात करतात. त्यातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे.

- सयाजी अस्वले (सरपंच), ९४२१३५०६५६ 
 - प्रवीण गोसावी (तालुका कृषी अधिकारी), ९८५०२४५६५६

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
बारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...
जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...
डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या...एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...