भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
महिला
कणेरीच्या ‘सिद्धगिरी’ने बनवले महिलांना आत्मनिर्भर
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राने ३०० महिलांना आत्मनिर्भर बनविले आहे. सहा तालुक्यांत येणाऱ्या पंचवीस गावांतील या महिलांना सुमारे दीडशे वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ तयार करण्यास शिकवले.
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राने ३०० महिलांना आत्मनिर्भर बनविले आहे. सहा तालुक्यांत येणाऱ्या पंचवीस गावांतील या महिलांना सुमारे दीडशे वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ तयार करण्यास शिकवले. बाजारपेठ उपलब्ध करून दिली. एका वर्षाच्या कालावधीत नियोजनबद्ध कार्यक्रम आखत केंद्राने महिलांना स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच विक्रीचे रोजगाराचे साधनही उपलब्ध करून दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राने महिलांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर यांच्या प्रयत्नातून केंद्र सुरू झाले. केंद्राच्या अंतर्गत करवीर, कागल, भुदरगड, चंदगड, आजरा, गडहिंग्लज हे तालुके येतात. या तालुक्यातील पंचवीस गावे केंद्राने निवडली. त्यातील महिला बचत गटांचे मेळावे घेण्यात आले. केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी या महिलांना विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. यातील दीडशे पदार्थ महिलांकडून तयार करुन घेण्यात केंद्राचे पदाधिकारी यशस्वी ठरले.
गटांच्या मदतीने तसेच वैयक्तीकरीत्याही पदार्थांचे उत्पादन व विक्री साधली जात आहे. स्वत:च्या पायावरच उभे राहण्याबरोबर अन्य कुटुंबानाही आपल्यात सहभागी करून घ्या. आपली प्रगती साधताना अन्य कुटुंबासोबत नाते वृद्धिंगत करा. आर्थिक आघाडी सांभाळ्याबरोबर कुटुंबातील सदस्यांनाही आयुष्यात मानाचे स्थान द्या असे संदेश देत केंद्राने या महिलांना उत्तेजन दिले आहे.
युवा महिलेचे प्रयत्न
अन्न व पोषण विषयातून एमएस्सी झालेल्या युवा महिला तज्ज्ञ प्रतिभा ठोंबरे यांनी अधिक मेहनत घेतली. महिलांकडून अधिकाधिक पदार्थ तयार करुन घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. केवळ प्रशिक्षण देण्यापुरते न थांबता संबंधित महिलांच्या घरातील सदस्यांना भेटणे, त्यांना संकल्पनेचे महत्त्व पटवून देणे, त्यांचा पाठिंबा मिळवणे आदी कामे त्यांनी उत्साहाने पार पाडली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
केंद्राकडून खरेदी
विपणन व विक्रीचा प्रश्न कृषी विज्ञान केंद्राने सोडविला. पदार्थांची गुणवत्ता तपासून त्याचे पॅकिंग केंद्राच्या इमारतीतच कणेरी ब्रॅण्डखाली केले जाते. कणेरी मठ पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पदार्थांची विक्री होते. आपल्या पदार्थांना असलेली मागणी लक्षात आल्यानंतर त्या उत्साहातून अनेक नावीन्यपूर्ण पदार्थही महिला तयार करून पाठवतात. अनेकदा नाचणीसारखे धान्य महिलांना देऊन त्यापासून पदार्थ तयार करून घेतले जातात. वर्षभरात सुमारे सात लाख रुपयांचे पदार्थ केंद्राने महिलांकडून खरेदी केले आहेत.
वैविध्यपूर्ण पदार्थ
लोणची, पापड, चटण्या, विविध प्रकारचे मसाले, पुरण, सुकविलेल्या भाज्या, लाडू आदी पदार्थ महिलांनी तयार केले.
शिवाय ‘रेडी टू इट’ प्रकारात गुलाबजाम, थालीपीठ, चकली, शंकरपाळी, भाज्या, पराठे, पुरण, मटकी अशी विविधताही महिलांनी जपली.
लॉकडाउनमध्ये फायदा
लॉकडाउनच्या काळात बाहेरील बाजारपेठा बंद होत्या. यामुळे महिलांनी तयार केलेल्या घरगुती पदार्थांना सातत्याने मागणी राहिली. अन्य उद्योग ठप्प असताना प्रत्येक महिलेला महिन्याला सुमारे दहा हजार रुपयांचे मिळालेले उत्पन्न उल्लेखनीय ठरले.
कृषी विज्ञान केंद्राने नियोजनबद्ध पद्धतीने महिलांना पदार्थनिर्मितीत प्रशिक्षित केले. त्यासाठी आम्ही गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन जागृती केली. महिलांची धडपड पाहून आमचे प्रयत्न यशस्वी ठरल्याचा आनंद आहे.
- डॉ. रवींद्र सिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ व
प्रमुख, श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी
केंद्रातील तज्ज्ञांनी आत्मविश्वास दिला. ऐन लॉकडाउनमध्येही पदार्थ तयार करण्यामध्ये आम्हाला उसंत नव्हती. चांगली अर्थप्राप्ती झाली. त्यातून नवा आत्मविश्वास मिळाला.
- सुनीता माळी,
गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर
कुटुंबातील सर्व सदस्यांना उपक्रमात सहभागी करण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न केले. यामुळेच महिलांना कुटुंबाची ताकद व प्रेरणा मिळाली. घरातील अन्य सदस्य तुमच्यासाठी आधारस्तंभ आहेत, हा संदेश आम्ही प्राधान्याने दिला. त्यातून कुटुंबाचे वातावरण निखळ झाले. हे समाधान प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
प्रतिभा ठोंबरे, ९७६३६६६८१४
शास्त्रज्ञ, गृहविज्ञान विभाग,
श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी
- 1 of 14
- ››