दीड वर्षात पपईसह पाच पिकांचा 'तनपुरे पॅटर्न'

wheat inter crop in papaya
wheat inter crop in papaya

पपईच्या दीर्घ कालावधीच्या पिकात कांदा, पपई काढणीच्या वेळेस ज्वारी, गहू व हरभरा अशी दीड वर्षात सुमारे पाच पिके घेण्याची पद्धती राळेरास (जि. सोलापूर) येथील लक्ष्मण तनपुरे यांनी तयार केली आहे. एक एकरातील या पीक पद्धतीतून नफा मिळवताना घरच्यांसाठीही धान्य उत्पादनाचा हेतू त्यांनी साध्य केला आहे.  

सोलापूर-बार्शी मार्गावर वैरागनजीक राळेरास (ता. बार्शी) गाव आहे. येथून एक किलोमीटरवर रस्त्याच्या कडेला लक्ष्मण तनपुरे यांची तीन एकर शेती आहे. कमी क्षेत्र असल्याने त्यातून अधिकाधिक उत्पन्न घेण्याची त्यांची नेहमीच धडपड असते. बोअरच्या माध्यमातून पाण्याची बऱ्यापैकी व्यवस्था आहे. शिवाय जमीनही चांगली आहे. पूर्वी केवळ ज्वारी, गव्हाशिवाय अन्य कोणत्याही पिकाचे उत्पन्न ते घेत नसत. मात्र प्रयोगशीलता जपताना त्यांनी पीकपद्धतीची दिशा बदलली. आंतरपिकांचा विचार केला. सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे लालासाहेब तांबडे, अमोल शास्त्री व विकास भिसे या तज्ज्ञांनी त्यांना मार्गदर्शन केले.  पपईची गुणवत्ता, उत्पादन, दर  पपईची लागवड तनपुरे आठ बाय सहा फूट अंतरावर करतात. या अंतरामुळे एकरी झाडांची संख्या सुमारे ९०० पर्यंत बसते. ते म्हणतात की फळाच्या वाढीसाठी एक चौरस मीटर तरी जागा लागते. त्यामुळे ते वजनाला सरासरी एक किलोपर्यंत भरते. प्रति झाड सुमारे ४० ते ५० पर्यंत फळे ठेवण्यात येतात. मोजून ठेवलेल्या फळसंख्येमुळे त्यांची वाढ चांगली होतेच. पण गुणवत्ताही चांगली मिळते.  यापूर्वी एकरी २२ टन, २७ टन, १८ टन व १० टन असे उत्पादन मिळाले आहे. व्यापारी जागेवरच खरेदी करतात. किलोला ९ रुपये, १४ रुपये व काही प्रसंगी कमाल २५ ते ३० रुपयांपर्यंतही दर मिळाल्याचे तनपुरे सांगतात.    

सुधारित पीकपद्धती 

  • ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कांदा घ्यायचा. त्यानंतर महिनाभराने पपईची (तैवान ७८६) लागवड होते.  
  • कांदा नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमारास निघून जातो.
  • त्यानंतर मशागत करून चार ट्रॅाली शेणखत टाकले जाते. त्यानंतर छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने पपईची बोद बांधणी होते. 
  • पपई पुढील ऑगस्टनंतर सुरू होते. डिसेंबरपर्यंत संपते. या हंगामात मग पपईची सावली कमी होते. त्या वेळी काढणीच्या एक महिनाभर आधी ज्वारी, गहू आणि हरभरा अशी पिके घेण्यात येतात. ही पिके घरच्यांसाठी उपयोगी आहेत.  अशा रितीने दीड वर्षाच्या कालावधीत साधारण पाच पिके घेण्यात येतात.   
  • त्यानंतर क्षेत्रबदल करून पपईची नवी लागवड करण्यात येते. 
  • क्षेत्र कमी असल्याने दरवर्षी एक एकरातच या पीकपद्धतीचा वापर होतो. 
  • दरवर्षी आलटून-पालटून क्षेत्र निवडत असल्याने एकाच क्षेत्रावर जादा भार पडत नाही. मात्र फेरपालट झाल्याने उत्पादनावर चांगला फरक पडतो. पिकातील सातत्य महत्त्वाचे राहते.  
  • सेंद्रिय पद्धतीवर भर 

  • शेतीतील खर्च कमी करण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर अत्यंत अल्प. 
  • दोन म्हशी व एक गाय आहे. प्रति दिन दोन्ही वेळेस ८ ते १० लिटर दूध उपलब्ध होते.  त्याचबरोबर शेतासाठी शेणखताचाही वापर होतो. 
  • जीवामृतही घरच्या घरी बनविले जाते. 
  • रासायनिक कीडनाशकांचा वापर जवळपास नसतोच. 
  • कांद्यामुळे पपई बोनस 

  • कांद्याचे एकरी उत्पादन १० ते १२ टन तर काही वेळा ते १७ टनांपर्यंतही मिळाले आहे. यंदा उत्पादन कमी मिळाले असले तरी ए ग्रेडला दर किलोला ४२ रुपयांपर्यंत तर बी ग्रेडला ३० रुपयांपर्यंत दर मिळाला. कांद्यासाठी सोलापूर हे स्थानिक मार्केट आहे. कांद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून पपईचा उत्पादन खर्च बहुतांश कमी होतो. त्यामुळे पपईचे उत्पन्न बोनस ठरल्यासारखेच असल्याचे तनपुरे सांगतात. 
  • चिकाची विक्री  पपईचे दर अनेक वेळा पडतात. अशा वेळी पपईच्या फळातील चिकाची विक्री हादेखील पर्याय त्यांना मिळतो. त्यासाठी व्यापारी थेट बांधावर येतात. या चिकाला दीडशे रुपये प्रति किलो दर मिळतो. पपईच्या चिकाचा वापर सौंदर्यप्रसाधन उद्योगात होत असल्याचे ते सांगतात. दरवर्षी १०० किलोपर्यंत चीक उपलब्ध होतो. यंदा तो ५५ किलोपर्यंत मिळाला आहे.

    शेतीतील उत्पन्नातून मुलांना उच्चशिक्षण  सतत प्रयत्नशील राहिल्यानेच तनपुरे यांना शेतीत आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. पत्नी उषा यांची त्यांना मोलाची साथ मिळाली आहे. मुलगी सायली बीएएमएसचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मोठा मुलगा साहिल इंजिनिअरिंग, तर आणि छोटा मुलगा अनिकेत सीएसचे शिक्षण घेत आहे. शेतीतील उत्पन्नातूनच हे साध्य झाल्याचे तनपुरे अभिमानाने सांगतात. त्यांच्याकडे टॅंकरही असून उत्पन्नाचा स्रोत म्हणून त्याचाही व्यवसाय ते करतात. 

    - लक्ष्मण तनपुरे, ९४२३३३२८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com