फळबागेला मिळाली दुग्धव्यवसायाची साथ

वेतोरे (ता.वेंगुर्ला,जि.सिंधुदुर्ग) येथील मधुसूदन केशव गावडे यांनी आंबा,काजू बागेला पशूपालनाची जोड दिली आहे. जातिवंत दुधाळ गाई, म्हशींच्या संगोपनातून दुग्ध व्यवसाय किफायतशीर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
cow shed
cow shed

वेतोरे (ता.वेंगुर्ला,जि.सिंधुदुर्ग) येथील मधुसूदन केशव गावडे यांनी आंबा,काजू बागेला पशूपालनाची जोड दिली आहे. जातिवंत दुधाळ गाई, म्हशींच्या संगोपनातून दुग्ध व्यवसाय किफायतशीर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-वेंगुर्ला राज्यमार्गावरील वेतोरे हे मधुसूदन केशव गावडे यांचे गाव. कुटुंबाची शेती नसल्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोकणातील  तरूणांप्रमाणेच नोकरीसाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरी केली. परंतु सुरवातीपासून स्वतःचा उद्योगधंदा,शेती असावी अशा विचारांचा पगडा असलेल्या गावडे यांनी  नोकरी सोडून मुंबईमध्ये फर्निचरचा व्यवसाय सुरू केला.काही वर्षात यामध्ये चांगला जम देखील बसविला. देशभरातील विविध शहरांमध्ये त्यांच्या फर्निचरला मागणी होती.परंतु त्यांचे सर्व लक्ष गावाकडे असे. गावी जावे, शेती आणि पूरक उद्योग करावा असे त्यांना वाटे, परंतु  कुटुंबाची एक गुंठादेखील शेती नसल्याने काय करायचे ? असा प्रश्न त्यांना सारखा सतावत होता. पण प्रयत्नपूर्वक त्यांनी गावी दोन एकर शेती खरेदी केली आणि  सन १९८८ मध्ये मुंबई सोडून गावडे गावी आले.     वेतोरे गाव शिवारात गावडे यांनी एक-दोन एकर अशी टप्याटप्याने शेती खरेदीला सुरूवात केली. आता त्यांची ३० एकर फळबागायती झाली आहे. सुरवातीच्या काळात त्यांनी दोन एकर भात शेती सुरू केली. तसेच वरकस दोन एकर जमिनीत हापूस आंबा लागवड केली. यासाठी गाव परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. शेती आणि आंबा बागायतीमध्ये जम बसल्यानंतर हळूहळू आंबा,काजू लागवडीचे क्षेत्र वाढवण्यास सुरवात केली. या दरम्यान शेती पूरक उद्योग म्हणून गाईपालनाला सुरवात केली.  दुग्ध व्यवसायाला सुरवात 

  • शेती करीत असतानाच गावडे यांनी २००३ मध्ये एक जर्सी गाय खरेदी केली. घराजवळच गोठा बांधला.  पशूपालनातील बारकावे लक्षात आल्यानंतर त्यांनी दोन होल्स्टिन फ्रिजियन गाई खरेदी केल्या. पशूतज्ज्ञांच्या सल्याने गाईंचे योग्य व्यवस्थापन ठेवल्याने दूध उत्पादनातही सातत्य मिळाले. त्यामुळे गावडे यांनी टप्याटप्याने गाईंची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला.
  •  सध्या गोठ्यामध्ये ३ मुऱ्हा,४ गावठी म्हशी, ३५ होल्स्टिन फ्रिजियन गाई आणि १५ कालवडींचे संगोपन.
  •  गाई,म्हशींसाठी दोन एकरावर नेपिअर गवताची लागवड. पशूतज्ज्ञांच्या सल्याने हिरवा,कोरडा चाऱ्याची कुट्टी, पेंड, पशुखाद्य, खनिज मिश्रणाचा योग्य वापर. त्यामुळे, गाई,म्हशींचे चांगले आरोग्य. दुग्धोत्पादनात सातत्य.
  •  घरालगतच्या गोठ्यामध्ये दुधाळ गाई,म्हशींचे संगोपन. फळबागेतील चार वेगवेगळ्या गोठ्यामध्ये गाभण आणि भाकड गाई,म्हशी, कालवडींचे स्वतंत्रपणे संगोपन. 
  •  सध्या १५ गाई , ३ म्हशी दुधात. सरासरी एक गाय दररोज २२ लिटर आणि म्हैस १८ लिटर दूध देते. जातिवंत दुधाळ गाईंच्या संगोपनावर भर.
  •  दररोज सकाळ,संध्याकाळ मिळून १०० लिटर दुग्धोत्पादन.  दूध संघाच्या डेअरीला विक्री. गाईच्या दुधाला प्रति लिटर २८ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ४५ ते ५२ रुपये दर. महिन्याला खर्च वजा जाता वीस हजाराचे उत्पन्न.
  •  उपलब्ध शेणखताचा फळबाग, भात शेतीला वापर.
  • फळबागेत मुक्त संचार गोठा  गावडे यांच्या एकूण तीस एकर आंबा, काजू फळबाग लागवड क्षेत्रापैकी २० एकर क्षेत्र थोडे समतल आहे. या क्षेत्रामध्ये भाकड, गाभण गाई,म्हशींना चरण्यासाठी सोडले जाते. बागेला कुंपण असल्याने सुरक्षित राहतात. बागेमध्येच गाई,म्हशी फिरत असल्याने त्यांचे शेण,मूत्र जमिनीत मिसळले जाते. त्यामुळे जमीन सुपीक होण्यास मदत होत आहे.  जनावरे चरत असल्याने  गवत काढण्यासाठी फारसा खर्च येत नाही. गाय व्यायल्यानंतर पाडा जन्मला तर त्याची पाच महिने चांगली देखभाल गावडे करतात.त्यानंतर गरजू शेतकऱ्याला शेतीकामासाठी मोफत देतात.

    दर्जेदार हापूस,काजू उत्पादन  गावडे यांची पंचवीस एकरावर हापूस आंबा लागवड आहे. टप्याटप्याने लागवड केलेल्या या बागेतून त्यांना चांगले उत्पादन मिळते. फळबागेला जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला जातो. त्यामुळे जमीन सुपीक झाली आहे. प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सल्याने त्यांनी बागेचे चांगले व्यवस्थापन ठेवले आहे. त्यामुळे हापूस आंब्याची चांगली गुणवत्ता आहे. दरवर्षी  दोन हजार पेटी आंबा उत्पादन होते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, बेळगाव बाजारपेठेत गावडे आंबा विक्रीसाठी पाठवतात. या फळबागेतूनही  खर्च वजा जाता पाच लाखांचे उत्पन्न मिळते.  गावडे यांनी कराराने घेतलेल्या ६.५ एकरावर चार वर्षापूर्वी काजूच्या वेंगुर्ला-४ आणि वेंगुर्ला-७ या जातींची लागवड केली आहे. यंदाच्या वर्षीपासून चांगले उत्पादन सुरू झाले आहे. काजू बी विक्री परिसरातील काजू प्रक्रिया उद्योगांना केली जाते.

    बांधावर जांभूळ, आवळा लागवड 

    बाजारपेठेत जांभळाची मागणी लक्षात घेऊन गावडे यांनी आंबा बागेच्या बांधावर जांभळाच्या बहाडोली जातीची २०० कलमे आणि  आवळ्याची ५० कलमे लावली आहेत.त्याची देखील जोमदार वाढ होत आहे.

    साडेचार एकरावर भातशेती

     गावडे यांची स्वतःची अर्धा एकर भातशेती जमीन आहे. त्याचबरोबरीने त्यांनी करारावर घेतलेल्या साडेचार एकरावर संकरित भात लागवडीवर भर दिला आहे. दरवर्षी भात विक्रीतून एक लाखांचे उत्पन्न मिळते.  

    काथ्या उद्योगाची उभारणी  गावडे यांनी ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने वेंगुर्ला येथे सहकारी तत्वावर काथ्या उद्योगाची उभारणी केली.या कारखान्यात ४० महिलांना रोजगार मिळाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना काथ्या उद्योगाचे युनिट सुरू करून देण्यात आले आहेत. या उद्योगामुळे प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष सुमारे १ हजाराहून अधिक महिलांना कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे.

    ॲग्रोवन ठरतोय दिशादर्शक गावडे हे पहिल्या दिवसापासून ॲग्रोवनचे वाचक आहेत. फळबाग, पशूपालनासंबंधी तांत्रिक लेख,यशोगाथांचे संकलन त्यांच्याकडे आहे. हे संकलन ते परिसरातील शेतकऱ्यांना वाचायला देतात. गावडे हे गावातील शेतकरी गटाचे सदस्य आहेत. गटामार्फत शेती विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. पुरस्काराने सन्मान 

  • राज्य शासनातर्फे २०१२ साली कृषिभूषण पुरस्काराने सन्मान.
  • विविध संस्थांतर्फे फळबाग, पशूपालनातील कार्याबद्दल गौरव.
  • गावडे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष, एम.के.क्वायर क्लस्टरचे अध्यक्ष, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आणि जिल्हा सहकार मंडळाचे संचालक अशा पदावर कार्यरत आहेत. 
  • - मधुसूदन गावडे,९४२२३८१८७४ / ०२३६६-२६६२२०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com