Agriculture Agricultural News Marathi success story of Mukta Zade, Murumba,Dist, Parbhani | Page 2 ||| Agrowon

पूरक उद्योगातून मिळाली आर्थिक साथ

माणिक रासवे
रविवार, 28 जून 2020

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील झाडे कुटुंबीयांकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. पावसावर आधारित शेतीचे जेमतेम उत्पन्न लक्षात घेऊन मुक्ता किशनराव झाडे यांनी शिवणकाम आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून मसाला निर्मितीला सुरवात केली. यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी चांगला हातभार लागला आहे.

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील झाडे कुटुंबीयांकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. पावसावर आधारित शेतीचे जेमतेम उत्पन्न लक्षात घेऊन मुक्ता किशनराव झाडे यांनी शिवणकाम आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून मसाला निर्मितीला सुरवात केली. यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी चांगला हातभार लागला आहे.

मुरुंबा (जि. परभणी) येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील मुक्ता किशनराव झाडे यांनी महिला स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून मिळालेल्या भांडवलातून विविध गृहोद्योग सुरू केले. त्यांच्या उद्मशिलतेमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला.
परभणीपासून बारा किलोमीटरवर दुधना नदीकाठी असलेल्या मुरुंबा गावशिवारात मुक्ता किशनराव झाडे यांच्या कुटुंबीयांची दोन एकर शेती आहे. त्यांचे सासू सासरे, पती-पत्नी आणि मुलगी, मुलगा असे सहा सदस्यांचे कुटुंब आहे. अल्पभूधारक त्यात कोरडवाहू क्षेत्रातून जेमतेम उत्पन्न मिळते. किशनराव झाडे तसेच यांच्या वडिलांचा गावात शिवणकामाचा व्यवसाय आहे. परंतु हा व्यवसाय गावापुरता मर्यादित असल्यामुळे वाढत्या कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी कसरत करावी लागत असे. मुक्ता झाडे यांचे माहेर हिंगोली जिल्ह्यातील सेलू असून त्यांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंत झालेले आहे. कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्यासाठी स्वतः एखादा घरगुती उद्योग सुरू करावा, असे त्यांना वाटत होते. परंतु त्यासाठी भांडवल नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

महिला बचत गटाची स्थापना  
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे सन २००५ मध्ये गावातील महिलांचे स्वंयसहाय्यता गट स्थापन करण्यात येत होते. मुक्ता झाडे यांनी समविचारी महिलांना एकत्र करून एकूण १३ सदस्य असलेला जगदंबा महिला बचत गट स्थापन केला. या गटाच्या मुक्ता झाडे सचिव आहेत. असोला (जि. परभणी) येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत बचत गटाच्या नावाने खाते उघडण्यात आले. दर महिन्याला प्रति सदस्य १५० रुपये रक्कम बचत गटाच्या खात्यामध्ये जमा केली जाऊ लागली. चार वर्षांनंतर बॅंकेने बचत गटाच्या सदस्यांना उद्योग व्यवसायासाठी प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज दिले.
दरम्यानच्या काळात घरच्या शेतातील कामे करून कुटुंबीयांच्या शिवणकाम व्यवसायास मदत करण्याचा निर्णय मुक्ता झाडे यांनी घेतला. सन २००९ च्या डिसेंबर महिन्यात महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आयोजित शिवणकाम व्यवसायाचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले. २०१० मधील जानेवारी महिन्यात नवीन शिवण यंत्र खरेदी केले. घरामध्येच शिवणकामास सुरुवात केली. त्यामुळे कुटुंबाच्या शिवणकाम व्यवसायाला बळकटी मिळाली. उत्पन्नातदेखील भर पडू लागली.

पक्क्या घराचे बांधकाम
मुरुंबा गावात पूर्वी झाडे यांचे मातीचे घर होते. मुक्ता झाडे यांनी विविध गृहउद्योगांच्या माध्यामातून कुटुंबाच्या उत्पन्नवाढीसाठी हातभार लावला. त्यामुळे गेल्या वर्षी त्यांनी साधेच, परंतु सिमेंट विटांच्या भिंती असलेल्या पक्क्या घराचे बांधकाम केले. मुलांच्या शिक्षणावरही खर्च होत आहे.

कुटुंब आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन  
महिला आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन जिल्हा समन्वयक संजय गायकवाड, मन्सूर पटेल, विद्यमान समन्वयक निता अंभुरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, पीक संरक्षक विशेषज्ञ अमित तुपे, गृहविज्ञान विशेषज्ञ डॉ. अरुणा खरवडे यांचे झाडे यांना नेहमी मार्गदर्शन मिळते. पती किशनराव, सासू सखुबाई, सासरे मुंजाजीराव यांची विविध कामात मदत असते, त्यामुळे हे शक्य झाल्याचे मुक्ता झाडे यांनी सांगितले.

शेतमाल प्रक्रिया उद्योगाला सुरुवात 

परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित अन्नप्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण मुक्ता झाडे यांनी घेतले. त्यानंतर गावात उपलब्ध होणाऱ्या लसूण, आले, जिरे चटणी, विविध प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती सुरू केली. सुरुवातीच्या काळात मसाल्याचे योग्य पॅकिंग करून विविध ठिकाणच्या प्रदर्शनांमध्ये विक्री सुरू केली. यातून दर महिना तीन हजारांचा नफा मिळू लागला.  या दरम्यान मुलांच्या शिक्षणासाठी झाडे कुटुंबाला परभणी येथे वास्तव्यास यावे लागले. परभणी शहरातील वसमत रस्त्याच्या परिसरात मुक्ता झाडे यांनी मसाले विक्री सुरू केली. तसेच त्यांचे पती किशनराव यांनी पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. दरम्यानच्या काळात भारतीय स्टेट बॅंकेच्या ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत झाडे कुटुंबीयांनी प्रशिक्षण घेतले. विविध कार्यालयात लागणाऱ्या कागदी फाइल्स तयार करून पुरवठा सुरू केला. कागदी पिशव्या तयार करून शहरातील मेडिकल्स स्टोअर्सना पुरवठा केला. मात्र लॉकडाउन सुरू झाल्यानंतर त्यांना परत गावी जावे लागले. गावी जाऊन त्यांनी पुन्हा एकदा शिवणकामाच्या माध्यमातून मास्क निर्मिती सुरू केली.

मास्कनिर्मितीतून उत्पन्न 
लॉकडाउनमुळे गावी आल्यानंतर निराश न होता मुक्ता झाडे यांनी पुन्हा एकदा शिवणकाम व्यवसाय सुरू केला. गाव परिसरात कोरोना आजार नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर मास्कची मागणी लक्षात घेतली. त्यानुसार त्यांनी कापडाचे मास्क तयार करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. माफक भांडवलात त्यांनी तीनस्तरीय मास्क तयार केले. प्रति मास्क २० रुपये दराने कृषी विज्ञान केंद्राने एक हजार मास्क आणि ग्रामपंचायतीने शंभर मास्कची खरेदी त्यांच्याकडून केली. लॉकडाउनमध्ये मास्क विक्रीतून त्यांना बऱ्यापैकी आर्थिक मिळकत झाली. 

दर्जेदार कापूस उपक्रमात सहभाग
परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे मुरुंबा तसेच परिसरातील साबा, दुर्डी, देवठाणा या गावात उत्तम दर्जेदार कापूस निर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, जीवामृत आदी घरगुती निविष्ठांचा वापर केला जातो. उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार कापूस उत्पादनासाठी उपाययोजना केल्या जातात. पीक व्यवस्थापनासाठी प्रवीण देशमुख यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते.    गेल्या काही वर्षांपासून झाडे यांच्या शेतामधील कपाशीचे या प्रकल्पातील पद्धतीने व्यवस्थापन केले जात आहे. मागील चार वर्षांच्या तुलनेत कपाशीवरील उत्पादन खर्च कमी झाला आहे. कृषी विज्ञान केंद्राने मुक्ता झाडे यांच्यातील नेतृत्व गुणांमुळे यंदा या प्रकल्पाअंतर्गत क्षेत्रीय सहायक म्हणून निवड केली आहे. त्यांच्यामार्फत मुरुंबा तसेच परिसरातील गावातील महिलांना दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, जीवामृत आदी निविष्ठा निर्मिती, त्यांचा वापर तसेच काडी कचराविरहित कापूस वेचणीपर्यंतचे प्रशिक्षण दिले जात आहे.

अॅग्रोवनतर्फे गौरव

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अॅग्रोवनतर्फे औरंगाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये मुक्ता झाडे यांचा उपक्रमशील महिला शेतकरी हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

- मुक्ता झाडे ः९५११७४८३३०

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...
युवा शेतकऱ्याची वीस एकर व्यावसायिक करार...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडमठ (ता.वैभववाडी) येथील...
एकनाथ खडसेंच्या शेतीत सीडलेस जांभूळ,...राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला चेहरा म्हणजे एकनाथ...
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
संयमवृत्तीनेच होते नफावृध्दी व...जनावरे मग ती दुभती असोत की नको असलेली, योग्य...
दूग्ध, रेशीम व्यवसायातून अर्थकारण केले...परभणी शहरानजीक शेती असलेल्या ढगे कुटुंबाने शेतीला...
शेतकरी नियोजन- कापूसमाझ्या शेतातील कपाशीचे पीक सध्या जवळपास ३५ ते ४२...
पीक नियोजनातून बसवले कुटुंबाचे आर्थिक...बाभूळसर (ता. शिरूर) येथील रामचंद्र नागवडे व...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...
हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या...हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे......
यांत्रिकी पद्धतीने मूरघास निर्मिती...सध्या दुग्धव्यवसायात मूरघास ही अत्यंत महत्त्वाची...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
द्राक्ष, पेरूतून प्रगतीकडे कृषी...कृषी पदविका घेतल्यानंतर त्याचा योग्य वापर करीत...
कोकणात प्रयत्नावादातून दिली...कोकणात दुग्धव्यवसाय म्हणावा तसा विकसित झालेला...
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...