अध्यापनासोबतच शेतीचेही काटेकोर नियोजन

Prasad Gavande-Patil
Prasad Gavande-Patil

प्रसाद प्रल्हाद गावंडे-पाटील हे जळगाव येथील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ही नोकरी सांभाळून आडगाव (ता. यावल, जि. जळगाव) येथील स्वतःच्या वीस एकर शेतीमध्ये प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांच्या सल्ल्याने केळी, कांदा, कापूस आदी पिकांचे उत्तम व्यवस्थापन केले आहे. शेतीला त्यांनी शेळीपालनाचीही जोड दिली आहे.  

आडगाव (ता. यावल, जि. जळगाव) हे गाव सातपुडा पर्वतामधील मनुदेवी तीर्थक्षेत्राजवळ आहे. गावशिवारात काळी कसदार, पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे. मागील तीन वर्षे या भागात पर्जन्यमान कमी झाल्याने विहिरी, कूपनलिकांमध्ये सिंचनासाठी पुरेसे पाणी नव्हते. यंदा चांगला पाऊस झाल्याने भूजल साठा बऱ्यापैकी वाढला आहे. आडगावातील प्रसाद प्रल्हाद गावंडे-पाटील यांनी अभियांत्रिकीमध्ये डिझाईन विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. याचबरोबरीने सध्या ते पीएचडी करत आहेत. सध्या नोकरीनिमित्त प्रसाद गावंडे-पाटील हे कुटुंबीयांसह जळगाव शहरात वास्तव्यास आहेत. दर शनिवार, रविवार ते शेतीवर जातात. शेतीच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी तीन सालगडी तसेच मशागतीसाठी एक ट्रॅक्‍टर आहे.  प्रसाद यांची आडगाव येथे वडिलोपार्जित वीस एकर शेती आहे. याचबरोबरीने ग्रामपंचायतीची दहा एकर शेती एक वर्षाच्या कराराने करतात. त्यापोटी ९५ हजार रुपये त्यांनी ग्रामपंचायतीला दिले आहेत. प्रसाद यांचे वडील प्रल्हाद हे अधूनमधून शेताकडे येऊन मार्गदर्शन करतात. शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होण्यासाठी त्यांच्याकडे तीन बैल, दोन म्हशी, दोन गाई आणि तीन वासरे आहेत. पिकांचे नियोजन  शेतात दरवर्षी सात एकर केळी, दहा एकर कापूस, चार एकर कांदा पीक असते. कांदा लागवड खरीप व रब्बी हंगामात असते. प्रमुख पिकांच्या सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब केलेला आहे. कांद्यासाठी यंदा रेन पाइप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यंदा तीन एकरावर लिंबू लागवड केली आहे. कापूस

प्रसाद गावंडे-पाटील हे कापसाची लागवड अमृतराव देशमुख यांनी सुचविलेल्या पॅटर्ननुसार करतात. पाच बाय एक फूट आणि सात बाय एक फूट अंतरात ही लागवड असते. यामुळे पिकाची चांगली वाढ होते. पाणी कमी लागते. प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया व्यवस्थित होऊन उत्पादकता टिकून राहिली आहे. सध्या त्यांना एकरी २० क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळत आहे. गुलाबी बोंड अळीचे संकट असल्याने फरदड टाळतात. कापूस, खरिपातील कांदा आदी क्षेत्र रिकामे झाल्यानंतर त्यात मका, गहू, भुईमूग आदी रब्बी पिकांची लागवड केली जाते. यामुळे जनावरांना पुरेसा चारा मिळतो आणि नफ्यातदेखील वाढ झाली आहे. 

केळी

 केळी लागवडीसाठी ऊतिसंवर्धित रोपांचा वापर केला जातो. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत पाच बाय पाच फूट अंतरावर लागवड केली जाते. केळी पिकाचे पाणी, खते यासंबंधी वेळापत्रक निश्‍चित केले असून, १२ महिन्यात पिकातील ९० टक्के काढणी पूर्ण होते. केळी पिकाला जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. कांदा : बाजारपेठेचा अंदाज घेत कांदा लागवड ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये केली जाते. कांद्याची स्वतः रोपवाटिका तयार करतात. त्यामुळे दर्जेदार रोपांची निर्मिती होऊन पीक उत्पादनवाढीला चालना मिळाली आहे. कांदा पिकाला माती परीक्षणानुसार खतमात्रा दिली जाते. यामुळे पिकाची जोमदार वाढ होऊन अपेक्षित उत्पादन मिळते. 

उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न

 कांदा पिकाचा एकरी खर्च सरासरी २२ हजार रुपये आहे. या पिकाला सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. खरिपातील कांद्याचे एकरी उत्पादन १५० क्विंटल तर रब्बीमध्ये २५० क्विंटल आहे. कांद्याला मागील हंगामात प्रति क्विंटल सरासरी ४०० रुपये आणि यंदा साडेसहा हजार रुपये दर खरिपातील कांद्यास मिळाला. केळी पीक व्यवस्थापनासाठी एकरी सरासरी ५० हजार रुपये खर्च होतो. एकरी ३०० ते ३५० क्विंटल केळी उत्पादन मिळते. सरासरी २६ किलोची रास मिळते. केळीला मागील तीन वर्षे प्रति क्विंटल ९०० ते १००० रुपये दर मिळाला आहे.

जागेवरच विक्री   प्रसाद गावंडे-पाटील हे वेळ, वाहतूक खर्च व इतर अनेक बाबींचा विचार करून केळी, कांदा व कापसाची जागेवरच विक्री करतात. केळी व कांद्याची विक्री धानोरा (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) येथील खरेदीदारांना करतात; तर कापसाची विक्री जिल्हा किंवा परराज्यातील खरेदीदारांच्या एजंटांना जागेवरच केली जाते.

हिरवळीचे खत, पिकांच्या अवशेषांचा उपयोग

  • प्रसाद यांचा रासायनिक खतांचा कमी वापर करण्यावर भर आहे. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी पिकांचे अवशेष न जाळता त्याचे कंपोस्ट खत केले जाते. त्यांनी माती परीक्षणही करून घेतले असून, त्यानुसार एकात्मिक खत व्यवस्थापन करतात. 
  • केळी, कापूस या पिकांना फक्त एकदाच बेसल डोस देतात. नंतर खतांच्या वेळापत्रकानुसार ठिबक सिंचनातून खते दिली जातात. कांदा पिकासाठीदेखील खतांचा मर्यादित वापर करण्यावर भर देतात. 
  • हिरवळीच्या खतासाठी केळी, कांदा पिके घेण्यापूर्वी धैंचा घेतात. हा धैंचा रोटाव्हेटरच्या साह्याने जमिनीत गाडतात. केळीची काढणी पूर्ण झाल्यानंतर केळीचे खांब आदी अवशेष जमिनीत गाडतात. यामुळे जमीन भुसभुशीत झाली आहे. सेंद्रिय कर्ब वाढला आहे. यामुळे प्रत्येक पिकासाठी रासायनिक व विद्राव्य खतांचा एकरी किमान तीन ते चार हजार रुपये खर्च कमी झाला आहे. 
  • पिकांच्या लागवडीपूर्वी शेतात शेणखत मिसळले जाते. यामुळे जमीन भुसभुशीत राहाते. 
  •  वेळोवेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन तसेच केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पीक नियोजन केले जाते. त्याचा चांगला फायदा झाला आहे. 
  • शेळीपालनाला सुरवात

    अडीच वर्षांपूर्वी प्रसाद यांनी शेळीपालनाला सुरवात केली. पहिल्या टप्प्यात त्यांनी दहा शेळ्या घेतल्या. सध्या त्यांच्याकडे ३५ शेळ्या आहेत. वेळ व मजुरांअभावी संगोपन शक्‍य नसल्याने या शेळ्या गावातील एका व्यक्तीला ४० रुपये प्रति शेळी, प्रतिआठवडा यानुसार संगोपनासाठी दिल्या आहेत. शेळ्या दररोज सकाळी आणि संध्याकाळी चराईसाठी नेल्या जातात. शेळीपालनातून दरवर्षी किमान ५० ते ६० हजार रुपये नफा मिळतो. शेळीपालन प्रकल्प वाढविण्यासाठी येत्या काळात मोठी शेड उभारण्याचे त्यांचे नियोजन आहे.  

    - प्रसाद गावंडे-पाटील, ९४२०३४६६११

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com