शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोड

घोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर भगत यांनी पारंपरिक शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. केवळ दुग्धोत्पादनावर मर्यादित न राहता बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन स्वतःच्या डेअरीमध्ये खवा, बासुंदी, दही, तूपनिर्मितीतून अर्थकारणाला चालना दिली आहे.
dairy business by Priyanka Bhagat
dairy business by Priyanka Bhagat

घोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर भगत यांनी पारंपरिक शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. केवळ दुग्धोत्पादनावर मर्यादित न राहता बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन स्वतःच्या डेअरीमध्ये खवा, बासुंदी, दही, तूपनिर्मितीतून अर्थकारणाला चालना दिली आहे. जालिंदर आणि प्रियांका भगत हे घोटावडे गावातील भेगडेवाडी (ता. मुळशी, जि. पुणे) येथील प्रयोगशील शेतकरी दांपत्य. जालिंदर यांची चार एकर पारंपरिक शेती. खरिपामध्ये भात आणि रब्बी हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड ते करतात. शेतीला पशुपालनाची जोड असावी म्हणून त्यांनी चार वर्षांपूर्वी सात मुऱ्हा म्हशींसाठी गोठा उभारला. सध्या दररोज ८० लिटर दूध संकलन होते. एक म्हैस प्रति दिन १२ लिटर दूध देते. या दुधाची गावातच विक्री होते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी घरगुती स्तरावर दुग्ध प्रक्रियेला सुरुवात केली. या प्रक्रिया उत्पादनांची विक्री करण्यासाठी एक वर्षापूर्वी गावातच डेअरी सुरू केली. सध्या त्यांच्या डेअरीच्या माध्यमातून दररोज ८० लिटर दूध तसेच विविध प्रक्रिया उत्पादनांची ग्राहकांना विक्री होते.   गोठा व्यवस्थापन  सध्या गोठ्यातील सात म्हशींचे दैनंदिन व्यवस्थापन जालिंदर करत असले, तरी त्यांना प्रियांका यांची चांगली साथ आहे. पहाटे ५ वाजता गोठा स्वच्छ करणे, म्हशी धुणे, चारा घालणे आणि दूध काढणे हे सर्व काम पती-पत्नी करतात. दिवसभरातील नियोजनानुसार म्हशींना हिरवा चारा, कडबा कुट्टी, पशुखाद्य देण्याचे काम जालिंदर करतात. सायंकाळी पुन्हा ५ वाजता दूध काढले जाते. हे सर्व दूध संकलन करून एक आणि अर्धा लिटरच्या पिशवीत पॅकिंग करून डेअरीमध्ये विक्रीसाठी पाठविले जाते. म्हशींच्या व्यवस्थापनासाठी मजूर ठेवलेला नाही, पतिपत्नी दोघे पूर्णपणे गोठा आणि डेअरीचे नियोजन पाहतात. चारा लागवडीचे नियोजन  भगत यांनी चार एकर शेतीपैकी एक एकर क्षेत्र हिरव्या चाऱ्यासाठी ठेवले आहे. यामध्ये मका, लसूणघास, हत्ती गवताची लागवड केली आहे. कोरड्या चाऱ्यासाठी कडबा खरेदी करून ठेवला जातो. म्हशींना हिरवा, कोरड्या चाऱ्याच्या बरोबरीने पशुखाद्य, पेंड आदि पशुआहार दिला जातो. बारमाही पाण्याची व्यवस्था असल्याने उन्हाळ्यात देखील हिरवा चारा उपलब्ध असतो. त्यामुळे म्हशींच्या दुग्धोत्पादनात सातत्य आहे.   डेअरीमधील व्यवस्थापन   सकाळी पिशवी पॅकिंग केलेले दूध डेअरीवर आणल्यानंतर विक्री केली जाते. गावातील पशुपालकांच्याकडून खरेदी केलेल्या दुधापासून प्रियांका स्वतः खवा, बासुंदी, दही, तूपनिर्मिती करतात. सध्या दररोज सरासरी २ किलो खवा, दीड किलो बासुंदी, ५ लिटर लस्सी, १० किलो दही आणि मागणीनुसार तूपनिर्मिती केली  जाते.  पशुपालनाचे अर्थकारण  दररोजच्या आर्थिक उलाढालीचा विचार केला तर स्वतःच्या गोठ्यात उत्पादित होणारे ८० लिटर दूध ५० रुपये दराने विकले जाते. यातून चार हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. तसेच गावातील पशुपालकांकडून फॅटनुसार विकत घेतलेल्या ८० लिटर दूध प्रक्रिया उत्पादनाच्या विक्रीतून दिड हजारांचे उत्पन्न मिळते. म्हशींसाठी चारा, वैद्यकीय उपचार, पशुखाद्य आणि डेअरीमधील दैनंदिन व्यवस्थापनाचा खर्च वजा जाता दिवसाला सरासरी दिड हजारांची मिळकत होते, असे प्रियांका भगत सांगतात.  असे आहेत दर 

  •  दूध   - ५० रुपये लिटर
  •  खवा   - २८० रुपये किलो
  •  बासुंदी -   २८० रुपये किलो 
  •  लस्सी -   १०० रुपये लिटर 
  •  तूप    -६०० रुपये किलो
  • लुपीनचे मार्गदर्शन म्हशींचे व्यवस्थापन करताना नियमित पशुवैद्यकीय सल्ला आणि उपचारांसाठी लुपीन फाउंडेशनमधील पशुवैद्यकीय अधिकारी सावबा शिंदे यांचे मार्गदर्शन आणि सल्ला मिळतो. म्हशींचे वेळापत्रकानुसार नियमित लसीकरण, काटेकोर व्यवस्थापन, योग्य दरात औषधोपचार आणि प्रक्रिया उद्योगाची जोड दिल्याने अपेक्षित नफा दूध व्यवसायातून मिळत असल्याचे भगत यांनी सांगितले. 

    माहेरच्या अनुभवाचा सासरी फायदा  प्रियांका यांचे माहेर माण (ता. मुळशी) त्यांचे वडील हिरामण शिवराम हिंगडे यांचा देखील म्हशींचा गोठा आणि डेअरी असल्यामुळे लहानपणापासून म्हशी सांभाळण्याचा अनुभव आणि डेअरीमध्ये दूध विक्रीचा अनुभव होता. हाच अनुभव सासरी आल्यावर प्रियांका यांना उपयोगी ठरला. त्यामुळेच प्रियांका आता स्वतः डेअरीचे दैनंदिन व्यवस्थापन बघतात.

    ५० म्हशींच्या गोठ्याचे नियोजन   गाव परिसरातील वाढती लोकसंख्या आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी लक्षात घेता येत्या काळात गोठ्यामध्ये ५० म्हशींचे संगोपन करण्याचे जालिंदर आणि प्रियांका यांनी नियोजन केले आहे.  टप्प्याटप्प्याने म्हशींची संख्या वाढवून यांत्रिकीकरणाद्वारे दूध प्रक्रिया उद्योगाला गती देण्याचा भगत दांपत्यांचा प्रयत्न आहे. 

    माहेरी वडिलांकडे म्हशी आणि डेअरीचा व्यवसाय असल्याने लहानपणापासूनच म्हशी सांभाळण्याचा आणि दूध विक्रीचा अनुभव होता. हाच अनुभव आता सासरी आल्यावर कामाला आला आहे. पती जालिंदर यांच्या मार्गदर्शनातून डेअरी आणि दूध प्रक्रिया व्यवसाय सुरू केला. प्रक्रिया उद्योगाला सासू- सासरे यांची खंबीर साथ असून, भविष्यात पूरक व्यवसाय वाढविण्याचे नियोजन केले आहे. -प्रियांका भगत

    पत्नी प्रियांका हिच्या आग्रहामुळे डेअरी व्यवसायाला सुरुवात केली. मी शेती आणि गोठा सांभाळतो. प्रक्रियेसाठी अतिरिक्त लागणारे दूध गावातील पशुपालकांकडून खरेदी करून आमच्या डेअरीमध्ये आणतो. त्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवून विक्री केली जाते. दूध प्रक्रिया उद्योगामुळे शेतीला चांगला पर्याय मिळाला आहे.  - जालिंदर भगत

     - प्रियांका भगत,  ७९७२३४७७२२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com