ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
फूल शेती
पॉलिहाउसमधील गुलाबशेतीत तयार केली ओळख
ऊसशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्लामपूर (जि. सांगली) येथील रघुनाथ व कस्तुरी या खांबे दांपत्याने ३५ गुंठे पॉलिहाउसमध्ये गुलाबशेती फुलवली आहे.
ऊसशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्लामपूर (जि. सांगली) येथील रघुनाथ व कस्तुरी या खांबे दांपत्याने ३५ गुंठे पॉलिहाउसमध्ये गुलाबशेती फुलवली आहे. बाजारपेठेतील फुलांची मागणी, त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी उभारलेले शीतगृह व एकूणच व्यवस्थापन या साऱ्यांमधून परिसरात आगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील शेतकरी ऊस आणि द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेण्यात माहिर आहे. उसाचे एकरी शंभर टनांपुढे उत्पादन घेत त्याने ओळख तयार केली आहे. येथील शेतकरी पीकपध्दतीत बदल करताना दिसतो आहे. तालुक्यातील उरुण इस्लामपूर येथील रघुनाथ ज्ञानू खांबे यांयांचे आजोबा कै. बापूसाहेब कृष्णा खांबे स्वातंत्र्य सेनानी होते. सन १९६६ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे सन्मान पत्र तसेच तत्कालीन प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी काळ्या आईचीही तितक्याच प्रेमाने सेवा केली. सन १९६७ मध्ये राष्ट्रीय ऊस स्पर्धेत शेतीनिष्ठ पुरस्कार त्यांनी प्राप्त केला.
आजोबांकडून शेतीचे धडे
आज कुटुंबात रघुनाथ, पत्नी कस्तुरी, वडील राजाराम, आई शांताबाई, बंधू पोपट, सौ. स्वाती असा परिवार आहे. रघुनाथ सांगतात की आजोबांनी कष्ट केल्याने कौटुंबिक परिस्थिती सुधारली. शेतीतील ज्ञान आमच्यापर्यंत त्यांच्याकडूनच आले. जिद्द आणि कष्टाची सांगड घालून शेती करू लागलो. पण उसाला पर्यायी पिकाची गरज होती. परिसरात जरबेरा फुलाची शेती वाढू लागली. या शेतीची उत्सुकता शिगेला पोहोचली. पुणे, सांगली यांसह अन्य ठिकाणची फुलशेती पाहण्यात आली. दरम्यान गुलाबशेतीनेही आकर्षण निर्माण केले. मग कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, तळेगाव दाभाडे इथं पॉलिहाउसमधील गुलाब पाहिला. मन प्रसन्न झाले. हीच शेती करण्याचा निर्धार केला.
गुलाबशेतीचा अनुभव
साल होतं २०१६. सुमारे ३५ गुंठ्यांत पॉलिहाउस उभारण्याचे ठरवलं. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार त्याची उभारणी केली. बंगळूरहून रोपं आणली. पाण्यात पडलं की पोहता येतं. तसंच शिकत शिकत प्रयोग करायचा, काही चुकलं तर नव्या उमेदीने प्रयत्न करायचं असं करत फुलशेती बहरू लागली. त्या चवेळी विक्री व्यवस्थाही महत्त्वाची होती. मग हैदराबाद, बंगळूर, मुंबई गाठली. त्या ठिकाणचे फुलांचे मार्केट पाहिलं. गुलाबाची फुले कोणत्या पद्धतीची येतात, त्यांचे दर, पॅकिंग अशा विविध अंगांनी माहिती करून घेतली. हळूहळू व्यापाऱ्यांशी संवाद वाढू लागला. एकाने फायदेशीर गोष्ट सांगितली ती म्हणजे गुलाबाच्या काडीची उंची जेवढी जास्त, तेवढा दर चांगला मिळतो. मग बाजारपेठेत त्या दृष्टीने फुले अभ्यासली.
शीतगृहाची उभारणी
फुलांची गुणवत्ता असल्याने मार्केट मिळू लागले. लग्नसराई, व्हॅलेंटाइन डेला गुलाबाला मोठी मागणी असते. त्या वेळी दरही अधिक मिळतो. पण दर घसरतात किंवा फुले जास्त काळ टिकवायची असतात अशावेळी काय करायचे असा प्रश्न पडला. मुंबई फूल मार्केटमधील अनेक व्यापाऱ्यांकडे शीतगृहे पाहिली. तीच संकल्पना शेतात वापरली तर फायदा होऊ शकतो असे वाटले. त्यानुसार २०१८ मध्ये शीतगृहाची उभारणी केली. त्यामुळे मार्केटमधील दरांची स्थिती पाहून फुलांची साठवणूक करणे सोपे झाले.
पहाटेपासून सुरू दिवस
सकाळी सहा मजुरांसह रघुनाथ आणि पत्नी सौ. कस्तुरी यांचा सहा वाजल्यापासून दिवस सुरू होतो. काढणी, प्रतवारी, पॅकिंग अशी कामे लीलया पार पाडली जातात. सकाळी अकरा वाजेपर्यंत कामे आटोपल्यानंतर व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार आष्टा येथील संघाच्या वाहनातून फुले पाठविली जातात.
व्यवसायात नफा-तोटा असतोच!
गुलाब शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले. नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेत मिळणारे कमी- अधिक दर अशा गोष्टींचा सामना करावा लागतोच. परंतु खचून न जाता फुलांचे उत्पादन कसे स्थिर ठेवता येईल, बाजारपेठ कशी जोडता येईल याचा अभ्यास करायचा असतो. आपले कष्ट कमी पडून द्यायचे नाहीत ही विचारसरणी जपली. त्यामुळेच शेतीत यश व स्थिरता मिळवण्याचे रघुनाथ सांगतात.
गुलाबाची शेती दृष्टिक्षेपात
- दीड फुटाचा एक असे ८२ बेड्स
- प्रति बेडवर ३१२ ते ३१५ रोपे
- ३५ गुंठ्यांत २८ हजार रोपे
असे आहे शीतगृह
- १० बाय १० फूट आकाराचे.
- क्षमता- ३० ते ४० हजार फुलांची
- सहा लोखंडी रॅक्सची व्यवस्था
व्यवस्थापनातील मुद्दे
- लाल, पांढरा व पिवळा गुलाब
- दररोज १५ ते २० हजार लिटर पाणी दिले जाते
- काढणीवेळी काडीचा आकार पाहिला जातो. दोन डोळ्यांवर काढणी.
- पानांची संख्या कमी असल्यास काडीचा आकार पाहून ती डोळ्यावर वाकवली जाते. यामुळे पानांची संख्या अधिक राहण्यास मदत होते. रोपे निरोगी राहतात.
- दररोज तिन्ही प्रकारच्या १५०० ते २००० गुलाबांची काढणी
- महिन्याला ४० ते ४५ हजार फुले
- काडीची लांबी ३०, ४० सेंटिमीटर पासून ७० ते ८० सेंटिमीटरपर्यंत.
- प्रति बंचमध्ये २० फुले
- विक्री- मुंबई, कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड
- दर- लाल व पिवळा गुलाब- २ ते १२ रुपयांपर्यंत, पांढरा गुलाब- ३ ते ७ रुपयांपर्यंत
- अधिक मागणी- लग्न सराई, व्हॅलेंटाइन डे.
- उत्पन्न- पाच लाख रुपयांपर्यंत
- भांडवल- ४० ते ४५ लाख रुपये. २० गुंठ्यासाठी अनुदान, उर्वरित प्रतिक्षेत
- लॉकडाऊन काळात मोठा फटका बसला.
- उर्वरित क्षेत्रात- ऊस, एकरी उत्पादन- ८० ते ९० टन
रघुनाथ खांबे,९३७७०५७७७७, ९३०९७४७०६७
फोटो गॅलरी
- 1 of 3
- ››