कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून गटाची प्रगती

विंग (ता. खंडाळा,जि.सातारा) गावातील तेरा उपक्रमशील महिलांनी एकत्र येत रखुमाई महिला शेतकरी गटाची सुरुवात केली. या गटाने परिसरातील बाजारपेठेची गरज ओळखून कुक्कुटपालन आणि भात रोपवाटिका व्यवसायाला चांगल्या प्रकारे सुरुवात केली आहे.
poultry farming
poultry farming

विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा उपक्रमशील महिलांनी एकत्र येत रखुमाई महिला शेतकरी गटाची सुरुवात केली. या गटाने परिसरातील बाजारपेठेची गरज ओळखून कुक्कुटपालन आणि भात रोपवाटिका व्यवसायाला चांगल्या प्रकारे सुरुवात केली आहे.

विंग (ता.खंडाळा,जि.सातारा) हे जेमतेम अडीच ते तीन हजार   लोकसंख्येचे गाव. गावाशेजारीच औद्योगिक वसाहत असल्याने गावातील बहुतांशी लोक कुशल किंवा अकुशल कामगार म्हणून नोकरीस जातात. उर्वरित शेतकरी वर्ग पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करणारा आहे. याच गावातील महिला शेतकरी गटाने शेती आणि शेतीपूरक व्यवसायात बदल करण्यासाठी पाऊले टाकली. महिला गटाने अॅवार्ड संस्थेच्या सहकार्याने कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायाला चांगल्या प्रकारे सुरुवात केली आहे.    महिला गटाची सुरुवात   सातारा जिल्ह्यात अॅवार्ड संस्था २०१६ पासून गोदरेज अँण्ड बॉईस मँन्यु.कं. लि. सोबत सामाजिक दायित्व उपक्रमाअंतर्गत शिरवळ परिसरातील गावांमध्ये शेती विकास प्रकल्प राबवीत आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीची आवड निर्माण करणे, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा आहे. या अनुषंगाने संस्था विविध उपक्रम राबवीत असते. यातीलच एक उपक्रम म्हणजे शेतकरी गट स्थापन करणे. या प्रकल्पामध्ये अॅवार्ड संस्थेच्या सचिव अॅड. नीलिमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शेतकरी गट ही संकल्पना राबविण्यात आली.   संस्थेच्या प्रयत्नातून विंग गावामध्ये एक वर्षापूर्वी रखुमाई महिला शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली.  महिला गटामध्ये १३ सदस्या आहेत. गटातील महिलांनी एकत्रित येऊन शेती किंवा शेतीपूरक व्यवसाय सुरू करावा असे बैठकीत ठरविण्यात आले. त्यानुसार विविध व्यवसायांची माहिती घेण्यात आली. गटातील सदस्यांच्या चर्चेतून सुरुवातीस सामूहिक कुक्कुटपालन हा व्यवसाय करण्याचे निश्चित झाले. यासाठी गोदरेजचे सीएसआर विभाग प्रमुख अश्विनी देवदेशमुख, सीएसआर व्यवस्थापक प्रफुल्ल मोरे यांचे विशेष मार्गदर्शन  मिळाले.   कुक्कुटपालन यशस्वी  रखुमाई महिला शेतकरी गटातील महिला सुरुवातीला दहा कोंबड्यांचे संगोपनकरून घरगुती स्तरावर कुक्कुटपालन व्यवसाय करत होत्या. बाजारपेठ आणि गटाची मागणी लक्षात घेऊन अॅवार्ड संस्थेने गटातील प्रत्येक महिलेस सुधारित जातीची चाळीस कोंबडी पिल्ल्ले देण्याचे नियोजन केले. सुरुवातीला अॅवॅार्ड संस्थेने  सहभागी महिला सदस्यांची अभ्यास सहल आयोजित केली. यामध्ये यशस्वी कुक्कुटपालन केलेल्या  गटांना या महिलांनी भेट दिली. अभ्यास सहलीमुळे गटातील महिलांना व्यावसायिक कुक्कुटपालनातील बारकावे, अर्थकारण आणि प्रत्यक्ष लाभार्थीचे अनुभव ऐकल्याने कुक्कुटपालन व्यवसायाचे अर्थकारण समजण्यास मदत झाली. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथे  गटातील महिलांना तीन दिवसीय कुक्कुटपालन व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे महिलांना लसीकरण, प्रथमोपचार आणि खाद्य व्यवस्थापन इत्यादी गोष्टीचे माहिती मिळाली.       सात महिन्यापूर्वी रखुमाई महिला शेतकरी गटाच्या सात महिलांनी एकत्र येऊन सुधारित जातीच्या कोंबड्यांच्या संगोपनास सुरुवात केली. प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के निधी महिलांनी उभारला. उर्वरित ५० टक्के निधी गोदरेज कंपनीच्या माध्यमातून देण्यात आला. गटाने कुक्कुटपालन शेड उभारण्यासाठी गावामध्ये भाडेतत्त्वावर दोन गुंठे जागा घेतली. अवघ्या दोन महिन्यात कुक्कुटपालन शेड उभी राहिली. गटाने  सहा महिन्यापूर्वी सुधारित जातीची एका महिन्याची ७५० पिल्ले खरेदी केली. त्यांचे चांगले व्यवस्थापन केले. तीन महिन्यात कोंबड्यांची वाढही चांगली झाली. याच दरम्यान कोरोना लॉकडाउनचा फटका व्यवसायाला बसतो की काय ? अशी भीती वाटत होती. परंतु या संकटातही गटाने कोंबडी विक्रीची संधी शोधली. शेडमधूनच परिसरातील ग्राहकांना कोंबड्या विक्रीस सुरुवात केली. यामुळे गटाला तीन महिन्यात ३० हजारांचा निव्वळ नफा मिळाला. पहिल्याच प्रयत्नात यश आल्याने गटाने पुन्हा एकदा एक महिना वयाची ७५० कोंबडी पिल्ले खरेदी केली असून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन सुरू केले आहे. येत्या काळात गटाने अंडी उत्पादनावर भर दिला आहे. त्यानुसार कोंबड्यांचे व्यवस्थापन ठेवण्यात येत आहे. कुक्कुटपालन व्यवसायातून गटातील सदस्यांच्या कुटुंबास चांगला आर्थिक हातभार लागला आहे.

सुधारित भात रोपवाटिका आणि यांत्रिक लागवड      विंग परिसरामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी गावातील शेतकरी गटाला ॲवार्ड संस्थेने भात लागवड यंत्र दिले. परंतु यंत्राने भात लागवड करण्यासाठी मल्चिंग पेपरवर साचेबद्ध पद्धतीने रोपवाटिका तयार करावी लागते. हे रोपवाटिका तंत्र अवगत करणे सोपे होते. त्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांची गरज होती. सुधारित पद्धतीने भात रोपवाटिका निर्मितीची तयारी विंग येथील रखुमाई महिला शेतकरी गटाने स्विकारली. ॲवार्ड संस्थेचे प्रकल्प संचालक किरण कदम आणि प्रकल्प समन्वयक संतोष धुमाळ यांनी गटाला तांत्रिक मार्गदर्शन केले.     महिला गटाने कुक्कुटपालन व्यवसायापुरते मर्यादित न राहता अन्य शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. मासिक बैठकीत संस्थेच्या सदस्यांनी भात रोपवाटिका निर्मिती व्यवसायाबद्दल महिला गटाशी चर्चा केली. गटातील महिलांनी यास तात्काळ होकार दर्शविला.

  • सुधारित पद्धतीने भात रोपवाटिका निर्मिती प्रशिक्षणासाठी गटातील महिलांची अभ्यास सहल ॲवार्ड संस्थेच्यावतीने भोर तालुक्यातील माळेगाव (नसरापूर) येथे आयोजित करण्यात आली. माळेगावमधील प्रयोगशील शेतकरी लहू शेलार यांच्या रोपवाटिकेला महिला गटाने भेट दिली.  त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून सुधारित रोपवाटिका आणि यांत्रिक भात लागवडीचे फायदे लक्षात आले.  
  •  गटातील सदस्यांनी स्वत:च्या शेतीमध्ये यांत्रिक पद्धतीने भात लागवड करायचे ठरविले. त्यासाठी सुधारित पद्धतीने भात रोपवाटिका निर्मितीची तयारी केली. यंदाच्या खरिपात गटाने सुधारित पद्धतीने भात रोपवाटिका यशस्वी करून यांत्रिक पद्धतीने भात रोपांची लागवड देखील केली आहे. 
  • यावर्षी गटाने आगाऊ नोंदणी आणि ५० टक्के रक्कम घेऊन व्यावसायिक पद्धतीने भात रोपवाटिका सुरू केली. रोपवाटिकेमध्ये  भात जातींची रोपे तयार केली. रोपांच्या निकोप वाढीसाठी चाळलेली माती, गांडूळ खत, कोकोपीट आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्याने १७ दिवसांमध्ये लागवड योग्य निरोगी रोपे तयार झाली. 
  • गटाने यशस्वीरीत्या रोपवाटिकेचे व्यवस्थापन करून गावातील शेतकरी गटाच्या मदतीने २५ एकर क्षेत्रावर यांत्रिक पद्धतीने भात लागवड यशस्वी केली. याचबरोबरीने परिसरातील पाच गावांमध्येही सुमारे दहा एकर क्षेत्रावर यांत्रिक पद्धतीने भात लागवड केल्याने मनुष्यबळ आणि खर्चात बचत झाली. भात लागवडीसाठी एकरी १२ ते १३ हजार रुपये येणारा खर्च हा आठ हजार रुपयांपर्यंत आला.   
  • पूरकउद्योगाची जोड

    कुक्कुटपालन उद्योगामुळे गटातील महिलांना कायमस्वरूपी शेतीपूरक उद्योग मिळाला आहे. सुधारित भात लागवड रोपवाटिकेमुळे  गटातील महिलांना व्यवसाय मिळाला. गावामध्येही २५ एकरावर भात लागवड यांत्रिक पद्धतीने झाली. शेतकऱ्यांचे भात लागवडीचे कष्ट कमी झाले.

    भविष्यातील उपक्रम  येत्या काळात गटातर्फे फळे, फुलझाडांची रोपवाटिका सुरू करण्याचा मानस आहे. यासाठी खंडाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा विभाग, खंडाळा, तसेच शिरवळ येथील गोदरेज कंपनीचे अधिकाऱ्यांचे सतत मार्गदर्शन मिळत असल्याचे स्वप्नाली महांगरे यांनी सांगितले. सध्या कुक्कुटपालन आणि भात रोपवाटिका व्यवसायात स्वप्नाली महांगरे, मंगल महांगरे,सुषमा तळेकर, ज्योती, भरगुडे, आशा महांगरे, वंदना कंक, बेबी महांगरे, मीरा घोडे, नीलिमा मोकाशी, स्वाती चिकने या गटातील सदस्या काम पहात आहेत. 

    - स्वप्नाली महांगरे, ७३९७९४३०५१,  (कार्याध्यक्ष, रखुमाई महिला शेतकरी गट)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com