Agriculture Agricultural news Marathi success story of Ramesh Mali,Jat,Dist.Sangli | Agrowon

देशी गाईंच्या संगोपनातून वाढविला नफा

अभिजित डाके
शनिवार, 21 डिसेंबर 2019

व्यावसायिक पद्धतीनेच शेती नियोजन करायचे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जत (जि. सांगली) येथील रमेश रामचंद्र माळी यांनी डाळिंब शेतीपासून सुरवात केली. पुढे टप्प्याटप्प्याने द्राक्ष बाग वाढविली. फळबागेला माळी यांनी गीर गोपालनाची चांगली जोड दिली आहे.

व्यावसायिक पद्धतीनेच शेती नियोजन करायचे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जत (जि. सांगली) येथील रमेश रामचंद्र माळी यांनी डाळिंब शेतीपासून सुरवात केली. पुढे टप्प्याटप्प्याने द्राक्ष बाग वाढविली. फळबागेला माळी यांनी गीर गोपालनाची चांगली जोड दिली आहे.

जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी आले असले तरी आजही तालुक्याची ओळख दुष्काळीच म्हणून आहे. तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिके पावसावर घेतली जात असली तरी प्रयोगशील शेतकऱ्यांनी पाणी आणि बाजारपेठेची उपलब्धता लक्षात घेत डाळिंब आणि द्राक्षबाग मेहनतीने वाढवली आहे. यापैकीच एक आहे जत येथील माळी कुटुंब. रामचंद्र माळी हे रमेश माळी यांचे वडील. त्यांचे ८३ वर्षे वय. शेतीमधील वाटचालीबाबत रामचंद्र माळी म्हणाले की, आमची दोन एकर शेती. त्यात काहीच पिकत नव्हतं. माझं शिक्षण सातवीपर्यंत झाले. मी १९६२ साली सैन्यामध्ये भरती झालो. त्या वेळी मला महिन्याला ४५ रुपये पगार होता. परंतू ४५ रुपयांत घर चालत नव्हते. त्यामुळे मी १९६६ साली सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. गावी आल्यानंतर मला एसटी महामंडाळात चालक म्हणून नोकरी लागली. नोकरी करत जुनी अकरावी पूर्ण केली. १९८८ साली इतिहास विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून घर चालत होते. परंतू पाणी नसल्याने शेती पिकत नव्हती. परंतू मी हताश झालो नाही. मुलांना चांगले शिक्षण दिले. आजही मी शिवाजी विद्यापीठात ॲक्युप्रेशरचे शिक्षण घेत आहे. यातून लोकांची विनामूल्य सेवा करण्याचा उद्देश आहे. आमच्याकडे असलेल्या मजुरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना मी योग अभ्यास शिकवत असतो.

शेती नियोजनाला सुरुवात
रमेश रामचंद्र माळी यांनी अकरावी झाल्यानंतर खासगी संस्थेतून आॅटोमोबाईलचा डिप्लोमा केला. त्यानंतर पुणे शहरात शिक्षण घेत मोकळ्या वेळेत गॅरेजमध्ये काही वर्षे नोकरीदेखील केली. परंतू पुण्यात काही मन रमले नाही. त्यामुळे पुण्यातील नोकरी सोडून ते गावी शेती नियोजनासाठी आले. शेती नियोजनाबाबत रमेश माळी म्हणाले की, प्रयोगशील शेतकरी शिवलिंग संख यांच्याशी माझ्या वडिलांची ओळख होती. यातून डाळिंब शेतीला सुरवात झाली. संख यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही गणेश जातीची २०० झाडे शेतात लावली. पाणीटंचाईच्या काळात जवळच्या शेतकऱ्यांकडून पाणी विकत घेऊन बाग जगवली. १९९२ मध्ये शेतात कूपनलिका घेतली. पाणी उपलब्ध झाल्याने डाळिंब बाग चांगल्या प्रकारे फुलली. आत्मविश्वास वाढल्याने हळूहळू डाळिंबाची बाग वाढवली. वर्षाकाठी दोन ते अडीच लाख रुपये मिळू लागले. यातून बचत करत टप्प्याटप्प्याने माळ जमीन विकत घेत फळबाग लागवडीला सुरवात केली. मात्र २००३ मध्ये भयंकर दुष्काळात डाळिंब शेती संपुष्टात आली. हताश झालो, परंतू निराशेतून एक आशेचा किरण दिसला. पुढे परिस्थिती सुधारताच द्राक्ष शेतीला सुरवात झाली. द्राक्ष बागेचा मंडप तसेच गाईंचा गोठा उभारण्याचे काम मी स्वतः केले. द्राक्ष बागेसाठी ॲंगलऐवजी तारांचा वापर केला. त्यामुळे खर्चात बचत झाली. हळूहळू द्राक्ष शेती वाढत गेली. यातून आर्थिक स्थिरता आली. 

देशी गाईंच्या संगोपनाला सुरवात 
गोपालनाबाबत रामचंद्र माळी म्हणाले की, १९७३ मध्ये मला शेताजवळील माळरानावर सोडून दिलेले अशक्त खिलार जातीचे वासरू दिसले, ते मी सांभाळण्यासाठी घरी आणले. यातूनच पुढे देशी गाईंची आवड निर्माण झाली. हळूहळू दावणीला १५ खिलार गाई झाल्या. २०१० पर्यंत त्यांच्या सांभाळ केला. त्यानंतर माझा मुलगा रमेश याने दोन गीर गाई विकत घेतल्या. त्यापासून पुढे चांगली पैदास गोठ्यात तयार झाली. २०१६ मध्ये सहा गीर गाई आणि सहा वासरे विकत घेतली. दावणीला जातीवंत जनावरांची पैदास झाली पाहिजे, यासाठी गीर वळूदेखील खरेदी केला. गोपालनातून फळबागेसाठी शेणखत आणि दूध, तूप विक्री हे दोन हेतू डोळ्यासमोर ठेवले. अलीकडे गोठ्याची जबाबदारी रमेश यांचा मुलगा ऋषिकेशकडे दिली आहे.

दूध, तूप विक्रीचे नियोजन 
दूध, तूप विक्रीबाबत रमेश माळी म्हणाले की, ग्रामीण भागात गीर गाईचे दूध आणि तूप विक्री करण्याचे मोठे आव्हान होते. सुरवातीला कोणीही दूध आणि तूप खरेदी करत नव्हते. त्यामुळे आम्ही जत शहरातील काही लोकांपर्यंत पोचलो. पहिल्यांदा त्यांना गीर गाईचे दूध मोफत दिले. या दुधाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दूध आणि तुपाला मागणी वाढू लागली आहे.

दर शनिवारी होते चर्चा 
परिसरातील १५ शेतकरी दर शनिवारी रमेश माळी यांच्या बागेत एकत्र येतात. यातून सुरू होते पीक पद्धती, खतांचा वापर, बाजारपेठ आणि विविध गोष्टींची चर्चा. या चर्चेत प्रत्येक शेतकरी आपले अनुभव सांगतात. त्यातून नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास होतो. याच अभ्यासातून शेतीत नव्याने प्रयोगास सुरवात होते.

माळी यांचे गोधन 
  २४ गीर गाई, १ साहिवाल, १ खिलार, १ देवणी तसेच २० लहान वासरे.   सकाळी गोठा स्वच्छ केला जातो. सात ते आठ या वेळेत गाईंचे दूध काढले जाते   नऊच्या दरम्यान गाईंना शेताजवळील पडीक माळरानात चरण्यास सोडले जाते. यामुळे गाईंचे आरोग्य चांगले राहाते. वैरणीचा खर्च केवळ १५ टक्के होतो.   गोठ्याजवळ शेण, गोमूत्र जमा करण्यासाठी दोन टाक्या बांधलेल्या आहेत. त्यातून फळबागेला स्लरी दिली जाते.

दूध, तूप विक्री 
  दरदिवशी तीस लिटर दुधाची विक्री. प्रति लिटर ७० रुपये दर.   रतीबाचे दूध विक्रीनंतर शिल्लक राहिलेल्या दुधापासून तूप निर्मिती.   दर महिना सरासरी पाच किलो तूप निर्मिती. अडीच हजार रुपये किलो दराने तूप विक्री.   दरवर्षी पहिल्या वेताच्या चार गाईंची विक्री. एक गाय सरासरी पन्नास हजाराला विकली जाते.    दर महिना खर्च वजा जाता चाळीस टक्के नफा शिल्लक राहतो, कारण चारा खरेदी आणि मजुरांचा फारसा खर्च होत नाही.

माळी यांची शेती

  • एकूण क्षेत्र ः ३७ एकर
  • द्राक्ष बाग १८ एकर ः माणिक चमन, तास ए गणेश, सुपर आणि एस. एस. जाती.  
  • द्राक्षाचे एकरी उत्पादन ः सरासरी १५ ते १८ टन
  • सरासरी दर ः ५० ते ७५ रुपये प्रति किलो.
  • बाजारपेठ ः विविध राज्यांतील व्यापाऱ्यांना जागेवर द्राक्ष विक्री.
  • द्राक्ष बागेत जास्तीत जास्त शेणखताचा वापर. गोमूत्र आणि शेण स्लरी फळबागेला दिली जाते. यामुळे वेल, द्राक्ष घडाची चांगली वाढ होते. जमिनीची सुपीकता वाढत आहे.
  • शाश्वत सिंचनासाठी पावणेदोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे. यातून सायफन पद्धतीने बागेला पाणी दिले जाते.
  • द्राक्ष बागेसाठी हंगामी ३० मजूर. तासिकेवर पगार. महिलांना २५ रुपये आणि पुरुषांना ४० रुपये प्रति तास पगार. मजुरांना दिवाळी बोनस आणि शेतावर राहण्याची सोय. तासिकेवर काम दिल्याने मजुरांकडून व्यवस्थित काम होते.

- रमेश माळी, ९८५००५४४१६


फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...
थंडीमध्ये जपा जनावरांचे आरोग्य वातावरणातील अनपेक्षित बदल जनावरांच्या आरोग्यास...
मत्स्यशेतीमध्ये बायोफ्लाक तंत्रज्ञानाचे...टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून...सध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
कोंबड्यांच्या योग्य व्यवस्थापनाकडे द्या... कुक्कुटपालन प्रक्षेत्राची जागा उंचावर असावी....
मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञानजैवपूंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत...
जनावरांच्या आहारात करा योग्य वेळी बदलजनावरांच्या आहारात अचानक बदल केल्यामुळे पोटफुगी,...
शेळ्या-मेंढ्यांतील पीपीआर आजाराकडे...पीपीआर हा शेळ्या-मेंढ्यांतील अतिसंसर्गजन्य आजार...
जातीवंत मेंढ्याची निवड महत्त्वाचीमेंढीपासून मिळणाऱ्या मांस, दूध, लोकर आणि लेंडीखत...
लसीकरणाबाबत जागरूक राहा...आजारी जनावरे रोगवाहक म्हणूनही काम करू शकतात,...
जनावरांतील लसीकरणाचे महत्त्वजनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय...
बैलातील आतडे बंद होण्याची समस्याउन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसात जनावरांना...
पीक अवशेषातून अन्नद्रव्यांची उपलब्धता पीक अवशेषांमध्ये नत्राचे १.२५ ते ०.४० टक्के,...
लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधात्मक...‘लाळ्या-खुरकुत’ हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर...