देशी गोपालनाचा शेतीला मिळाला आधार

कातरखडक (ता. मुळशी, जि.पुणे) येथील राणी संतोष मालपोटे यांनी पारंपरिक भात शेतीला देशी गोपालनाची जोड दिली आहे. एका गीर गायीपासून सुरू झालेले पशुपालन आता पाच गाईंपर्यंत पोहोचले आहे. याचबरोबरीने सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादनावर मालपोटे दांपत्याने भर दिला आहे.
Rani malpote
Rani malpote

कातरखडक (ता. मुळशी, जि.पुणे) येथील राणी संतोष मालपोटे यांनी पारंपरिक भात शेतीला देशी गोपालनाची जोड दिली आहे. एका गीर गायीपासून सुरू झालेले पशुपालन आता पाच गाईंपर्यंत पोहोचले आहे. याचबरोबरीने सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादनावर मालपोटे दांपत्याने भर दिला आहे.  मुळशी तालुक्यातील (जि.पुणे) दुर्गम भागातील कातरखडक येथील उपक्रमशील महिला शेतकरी म्हणून राणी संतोष मालपोटे यांची ओळख तयार झाली आहे. त्यांच्या कुटुंबाची पाच एकर पारंपरिक भात शेती आहे. पावसाच्या पाण्यावर भात शेती असल्याने काढणी झाल्यानंतर मालपोटे कुटुंबाला रोजगारासाठी इतरत्र जावे लागत असे. रोजगार मिळण्यासाठी राणी मालपोटे या सिद्ध समाधी योग गुरुकुल येथे पंचगव्य चिकित्सा आणि उत्पादनांच्या निर्मितीमध्ये मदत करू लागल्या. या ठिकाणी देशी गाईंचे संगोपन, शेण, दूध, गोमूत्राचा विविध प्रक्रिया उत्पादनांसाठी होणारा उपयोग त्यांच्या लक्षात आला. आपणही हे आपल्या घरी, शेतीमध्ये नियोजन करू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर राणीताईंनी दिवे (सासवड) येथील द्वारकाधीश गुरुकुल येथे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून आत्मविश्‍वास आल्यानंतर चेन्नई येथील पंचगव्य गुरुकुल येथे एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याच दरम्यान त्यांचे पती संतोष यांच्या मामाने त्यांना एक गावरान गाय भेट दिली. तसेच सासवड येथील गुरुकुल मधून त्यांना दोन गीर गाई मिळाल्या. चेन्नई येथील प्रशिक्षणानंतर २०१६ मध्ये राणीताईंनी विविध प्रक्रिया उत्पादनांना सुरुवात केली. यानंतर पती संतोष यांनी देखील २०१७ मध्ये प्रशिक्षण घेत पंचगव्य उत्पादन निर्मितीला मदत करण्यास सुरवात केली.  उत्पादनांची निर्मिती  विविध उत्पादनांसाठी दररोज पहाटे गोमूत्राचे संकलन केले जाते. विविध व्याधींवरील उपचारासाठी गोमूत्रामध्ये औषधी वनस्पती मिसळून कुकरमधून शास्त्रोक्त पद्धतीने वाफेद्वारे अर्क संकलित केला जातो. सात लिटर गोमूत्रापासून ३ लिटर अर्क तयार होतो. या विविध अर्कांची चाचणी आणि तपासणी पंचगव्य चिकित्सा संघटनेद्वारे केली जाते. नंतर याचे पॅकिंग करून विक्री केली जाते. पंचगव्य उत्पादनांसाठी भरपूर सूर्यप्रकाश  गरजेचा असतो. यासाठी जानेवारी ते जून या कालावधीमध्येच प्रक्रिया आणि उत्पादने तयार  केली जातात. नंतरचे सहा महिने गोमूत्र संकलन करून ठेवले जाते. सध्या राणी आणि संतोष मालपोटे हे गोमूत्र अर्क, घनवटी, नेत्रौषधी, कर्णऔषधी, बाष्पीकृत अर्क, वेदनाशामक तेल, फेसपॅक, दंतमंजन, अमृतधारा स्नानचुर्ण,  गोआसव अशी उत्पादने तयार करतात. चिकित्सेनुसार या उत्पादनांचा वापर केला जातो. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते. प्रक्रिया उद्योगातून दर महिन्याला त्यांना दहा हजाराचे उत्पन्न मिळते. विविध ठिकाणांच्या उत्पादकांनी एकत्रित येत  ब्रह्मांड ब्रॅंडने उत्पादनांची विक्री सुरू केली आहे. विविध प्रदर्शने, मेळावे आणि वैयक्तिक संपर्काद्वारे चिकित्सा करून उत्पादने दिली जातात, असे राणी मालपोटे सांगतात.  ‘लुपीन'ची मिळाली मदत  जातिवंत गीर गायीच्या निवडीसाठी राणी मालपोटे यांना लुपीन फाउंडेशनचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नवनाथ शिंदे यांची मदत झाली. याचबरोबरीने आरोग्य व्यवस्थापनासाठीदेखील संस्थेचे पशुतज्ज्ञ मार्गदर्शन करतात. त्यामुळे गाईंचे आरोग्य चांगले राहिले  आहे. तसेच दूध उत्पादनही टिकून आहे.

साजूक तूप आणि तेल विक्रीचे नियोजन   देशी गायींच्या दुधापासून केलेल्या तुपाला ग्राहकांच्याकडून चांगली मागणी आहे. सध्याचे उत्पादित होणारे तूप हे पंचगव्य उत्पादनांसाठी वापरले जाते. भविष्यात गायींची संख्या वाढविल्यानंतर थेट ग्राहकांना तूप विक्रीचे नियोजन आहे. पंचगव्य उत्पादनांसह लाकडी घाण्यावरील शुद्ध तेलाची मागणी देखील होऊ लागली आहे. यासाठी मालपोटे दांपत्याने लाकडी घाण्याची मागणी नोंदविली आहे. याद्वारे भुईमूग, तीळ, करडई, जवस तेल निर्मितीचे नियोजन केले असल्याची माहिती राणी मालपोटे यांनी दिली.  जमीन सुपिकतेवर भर  देशी गोवंश संगोपनाच्या बरोबरीने शेती विकासाबाबत राणी मालपोटे म्हणाल्या की, सध्या पाच एकर क्षेत्रावर आम्ही भात शेती करतो. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आम्ही शेण, गोमूत्राचा वापर करत आहोत. येत्या काळात सेंद्रिय पद्धतीने भात, भाजीपाला तसेच कडधान्याचे उत्पादन करण्याचे नियोजन केले आहे. 

मुक्त संचार गोठ्याचे नियोजन   मालपोटे यांच्याकडे पाच गाई, एक वळू आणि दोन वासरे आहेत. सध्या गोठ्याची जागा कमी पडत असल्याने त्यांनी नवीन गोठ्याचे बांधकाम केले आहे. नवीन गोठ्यालगत पाच गुंठ्यांवर मुक्त संचार गोठ्याचे नियोजन केले आहे. नवीन गोठ्यात १५ गायींचे संगोपन केले जाणार आहे. गाईंना परिसरातील डोंगरामध्ये चरायला सोडले जाते. त्यामुळे चाऱ्याचा फारसा खर्च नाही. फक्त कडबा आणि पशुखाद्यावर खर्च करावा लागतो. घरचेच लोक गाईंचे व्यवस्थापन करत असल्याने मजुरांची गरज पडत नाही.

 - राणी मालपोटे, ९७६२४३८४८९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com