पुन्हा जोडतोय शेतीशी

पुणे शहराजवळील पडीक शेत जमिनीवर ‘अर्बन फार्मिंग'ची संकल्पना चांगल्या प्रकारे रुजू लागली आहे. अशी संधी प्रत्येक शहराजवळ आहे, गरज आहे ती शोधक नजरेची...
vegetable cultivaton
vegetable cultivaton

पुणे शहराजवळील पडीक शेत जमिनीवर ‘अर्बन फार्मिंग'ची संकल्पना चांगल्या प्रकारे रुजू लागली आहे. अशी संधी प्रत्येक शहराजवळ आहे, गरज आहे ती शोधक नजरेची...

शहरातील नोकरी, व्यवसाय, जागेची अडचण आणि धावत्या जीवनशैलीमुळे लोकांना आवड असूनही शेती, बागेची आवड जोपासता येत नाही. हाच मुद्दा हेरून अभिजित, पल्लवी यांनी पुणे शहराजवळ ‘मृद्‍गंध’ हा ‘अर्बन फार्मिंग' उपक्रम प्रत्यक्षात आणला आणि लोकांचाही यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. अभिजित ताम्हणे हे इव्हेंट मॅनेजमेंटमधील आणि पल्लवी पेठकर लँडस्केप आर्किटेक्ट. दोघांची आवड शेती, बागकाम. पुणे शहराजवळ शेतजमीन मिळणं अवघड... मात्र इच्छा असेल तर मार्ग निघतोच, असंच काहीसं त्यांच्या बाबतीत झालं. पुणे शहराजवळील धायरी परिसरातून जाणाऱ्या महामार्गाला लागून निकित कोद्रे यांची पडीक शेतजमीन आहे. लागवडयोग्य काळीभोर जमीन, पाण्याचीही सोय, परंतु ही जमीन पडून. याचा योग्य वापर व्हावा ही त्यांची इच्छा. यातूनच पाच महिन्यांपूर्वी हे तिघेही एकत्र आले आणि सुरू झाला ‘मृद्‍गंध’ उपक्रम...  असा आहे ‘मृद्‍गंध’ उपक्रम  ‘मृद्‍गंध’बाबत अभिजित ताम्हणे आणि पल्लवी पेठकर म्हणाले, की आम्हाला दोघांनाही शेती आणि बागकामाची आवड. याबाबत आमची सातत्यानं समविचारी मित्रमंडळींची चर्चा व्हायची. यातूनच डिसेंबरपासून ‘मृद्‍गंध’ प्रकल्पाला सुरुवात केली. भाजीपाला, फुलशेतीची आवड असणाऱ्या कुटुंबांसाठी आम्ही या ठिकाणी ७४ गुंठ्यांमध्ये ७५० चौरस फुटांचे प्लॉट तयार केले. यामध्ये सऱ्या आणि गादीवाफे केले. यामधील एक प्लॉट किमान सहा महिन्यांसाठी आम्ही कुटुंबाला देतो. हंगामानुसार ठरलेली आगाऊ रक्कम ३,७५० रुपये प्रति महिना आम्ही त्यांच्याकडून घेतो. संबंधित कुटुंबातील सदस्यांनी शनिवार, रविवार किंवा त्यांच्या सवडीनुसार या ठिकाणी येऊन प्लॉटमधील सऱ्या, गादीवाफ्यांची मशागत करावी, शेणखत, गांडूळ खत मिसळावे, स्वतःच्या हाताने भाजीपाला बियाणे, रोपांची लागवड करावी, मातीची भर द्यावी, झारीने पाणी घालावे आणि दर आठवड्याला काढणीस तयार भाजीपाला घरी न्यावा आणि स्वतःच्या शेतीसारखा आनंद घ्यावा, अशी संकल्पना आहे.  आम्ही सध्या ७० प्लॉट तयार केले आहेत, त्यातील २५ प्लॉटवर भाजीपाला लागवड झाली आहे. अजून २५ प्लॉटवर लागवड सुरू आहे. येत्या महिनाभरात सर्व प्लॉट भाजीपाल्याने भरून जातील. आम्ही हंगामानुसार ३० प्रकारच्या भाजीपाल्याची निवड केली. सध्या कोबी, वांगी, टोमॅटो, कांदा, विविध पालेभाज्या, मुळा, गाजर, बीट, काकडी, दोडका, कारली, दुधी, मधू मका, मोहरी, मिरची, रंगीत कोबी, फ्लॉवर तसेच झुकिनी, ब्रोकोली, बेसील लागवड पाहायला मिळेल. सदस्य आठवड्यातून शनिवार, रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून येतात. संध्याकाळपर्यंत किमान २५ जण नोकरी, व्यवसायातील धावपळ, ताणतणाव विसरून शेतीमध्ये रमलेले असतात. थोडक्यात, या उपक्रमामुळे पुणे शहराजवळील पडीक जमीन लागवडीखाली आली आणि शेती, बागकामाची आवड असणाऱ्यांना विरंगुळ्याचे साधन तयार झाले.   असे असते नियोजन  दैनंदिन नियोजनाबाबत अभिजित ताम्हणे म्हणाले, की ज्यांनी आमच्या उपक्रमात प्लॉट घेतला आहे, त्यांना पीक लागवड ते काढणी, तसेच खते, रोपे, बियाणे, सेंद्रिय कीडनाशकांचा पुरवठा आणि वापराबाबत मार्गदर्शन करतो. त्यानुसार सर्व जण पिकांची काळजी घेतात. बहुतेक जण आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा येतात. बाकीच्या दिवशी आमचे मजूर पीक व्यवस्थापन पाहतात. या उपक्रमातून कुटुंबाने गुंतवलेल्या रकमेचा ६० टक्यांहून अधिक परतावा सेंद्रिय भाजीपाला उत्पादनातून मिळतोच. त्याहीपेक्षा मिळणारे मानसिक समाधान हे न मोजण्यासारखेच आहे. ‘मृद्‍गंध’मधील बहुतांश सदस्य हे डॉक्टर, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, व्यवस्थापन आणि व्यावसायिक क्षेत्रातील आहेत. कुटुंबातील मोठे, छोटे सदस्य शनिवार, रविवार किमान चार तास शेतीमध्ये रमतात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. या सदस्यांचा व्हॉट्‍सॲप ग्रुप आहे. त्यावर आम्ही त्यांच्या प्लॉटमधील पीकवाढीचे फोटो पाठवतो. येत्या शनिवार, रविवारी पिकांचे काय व्यवस्थापन करावे लागेल, याची माहिती देतो. संबंधित पिकाबाबत अनोखी माहिती, त्यांनी लावलेल्या भाजीपाल्याची नवी रेसिपी पाठवतो. त्यानुसार सदस्य पदार्थदेखील करून पाहतात, त्याचे फोटो ग्रुपवर शेअर करतात. थोडक्यात, लोकांना शहराजवळच ताणतणाव विसरण्याचा आणि शेतीचा आनंद देण्याचे ठिकाण तयार झाले आहे. येत्या काळात हायड्रोपोनिक्स इत्यादी पद्धतीचे शेती प्रयोग आम्ही करणार  आहोत.

शेती कळावी हाच उद्देश उपक्रमाबाबत पल्लवी पेठकर म्हणाल्या, की शहरी लोकांना शेतकऱ्यांचे कष्ट कळावेत, पीक लागवड ते काढणीपर्यंतच्या अडचणींवर मात करून शेतकरी दर्जेदार उत्पादन आपल्यापर्यंत पोहोचवितो, याची जाणीव आणि अन्नधान्याचे महत्त्व कळावे, हाच उद्देश आहे. दुसऱ्या बाजूला लोकांनाही शेतीचा आनंद मिळविण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. स्वतः लावलेले भाजीपाल्याचे रोप जेव्हा भरभरून उत्पादन देते, तेव्हा तो आनंद पैशात मोजता येत नाही, असे बरेच सदस्य आम्हाला सांगतात.  

कुटुंब राबतंय शेतीत...

  • उपक्रमामध्ये सहभागी झालेले कुटुंबातील सदस्य आपल्या आवडीच्या भाजीपाल्याची लागवड करतात. त्याप्रमाणे बियाणे, रोपे, सेंद्रिय खते, कीडनाशकांचा पुरवठा. 
  • भाजीपाल्याचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन. गरजेनुसार जिवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्काची फवारणी. या घटकांची मुळशी, भोर परिसरातील शेतकऱ्यांकडूनच खरेदी.
  • झेंडू, चवळी, मका, मोहरीसारख्या सापळा पिकांची लागवड. प्रक्षेत्रावर विविध प्रकारचे पक्षी येतात, त्याचाही आनंद  वेगळाच.   
  • सदस्य सुट्टीच्या दिवशी शेतीवर येत असले ,तरी दैनंदिन पीक    व्यवस्थापनासाठी तीन मजूर कार्यरत. त्यामुळे पीकवाढीच्या टप्प्यात चांगली देखभाल.  
  • -  अभिजित ताम्हणे,  ९८५०५६७५०५
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com