beekeeping by Rohini Patil
beekeeping by Rohini Patil

शेतीला दिली मधमाशीपालनाची जोड

एखादा पूरक व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर मार्ग निघतोच. असाच काहीसा प्रयत्न नाडे-नवारस्ता (ता. पाटण, जि. सातारा) येथील रोहिणी प्रकाश पाटील यांनी केला. बाजारपेठेची मागणी, तांत्रिक अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर रोहिणी पाटील यांनी महिला गटाच्या माध्यमातून मधमाशीपालनास सुरुवात केली. अलीकडे बाजारपेठेत त्यांच्या ‘फाॅरेस्ट हनी’ या ब्रॅंन्डने वेगळी ओळख तयार केली आहे. 

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा डोंगराळ असल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या तालुक्यात सर्वाधिक भात लागवड होती. परंतु अलीकडे पाण्याची उपलब्धता झाल्याने ऊस, भाजीपाला पिके, फळबागांच्या क्षेत्रात चांगली वाढ झाली. या तालुक्यातील नाडे-नवारस्ता गावातील रोहिणी प्रकाश पाटील या प्रयोगशील महिला शेतकरी. पती नोकरी करत असल्याने त्यांनी शेतीची जबाबदारी स्वतःकडे घेतली. त्यांच्या कुटुंबाची दोन एकर शेती आहे. परंतु शेतजमीन कमी असल्यामुळे उत्पन्नवाढीसाठी त्यांनी शेतीपूरक व्यवसायाचा शोध सुरू केला. या दरम्यान बचत गट उभारणीसाठी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्याशी झालेल्या चर्चेतून मधमाशीपालनाला पाटण तालुक्यात चांगला वाव असून बाजारपेठेतही संधी असल्याचे लक्षात आले. त्यादृष्टीने रोहिणीताईंनी मधमाशीपालनाचा अभ्यास सुरू केला. या अभ्यासातून ऐश्वर्यादेवी पाटणकर आणि रोहिणीताई यांच्यासह १४ महिलांनी मधमाशीपालनाचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून मधमाशीपालनातील बारकावे, धोके, प्रक्रिया, संधी याची सविस्तर माहिती मिळाली. २०१४ मध्ये प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी मधुगंध महिला शेतकरी बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला भांडवल म्हणून प्रत्येकीने पाच हजार रुपये जमा केले. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून ३५ रिकाम्या मधपेट्याची खरेदी केली. त्यानंतर प्रत्येक सदस्याने दीड हजार जमा करून दहा पेट्या मधमाशांच्या वसाहतीने भरून घेतल्या. मात्र काही पेट्यातील माशांमध्ये राणीमाशी नसल्यामुळे मधमाशांची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे पुन्हा तज्ज्ञांशी चर्चाकरून रोहिणीताईंनी मधमाशांच्या वसाहती वाढविण्याचा निर्णय घेतला.   मधमाशीपालनाला सुरुवात  महिला गटाच्या माध्यमातून मधमाशीपालन हा पूरक व्यवसाय सुरू झाला. हळूहळू त्यातील बारकावे लक्षात आले. प्रत्येक वेळी मधमाशांच्या पेट्या भरून आणाव्या लागत होत्या. त्यामुळे रोहिणीताईंनी पुढाकार घेऊन मधमाशा पेट्या स्वतः तयार करण्याचे ठरविले. यासाठी खादी ग्रामोद्योगमधील तज्ज्ञ श्री. बल्लाळ यांचे मार्गदर्शन मिळाले. सुरुवातीच्या काळात नव्याने पेटी भरताना मधमाशांनी चावे घेतल्यामुळे चेहरा, त्वचेवर सूज यायची. तरी हिंमत न हरता रोहिणीताईंनी मधमाशीपालनाचे काम सुरू ठेवले. राणीमाशी ओळखण्यापासून ते स्वतः मधमाशांची वसाहत तयार करण्यास सुरुवात केली. मधमाश्यांची वसाहत यशस्वी झाल्यावर रोहिणीताईंनी स्वतःच्या ५० पेट्या गावाजवळील जंगलाच्या परिसरात ठेवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात वर्षभरात दोनशे किलो मध मिळाला. त्यानंतर टप्प्याटप्याने ६०० किलो मधाची त्यांनी योग्य पद्धतीने साठवणूक केली. एका पेटीतून एका वर्षात सरासरी सात किलो मध मिळतो. पहिल्या टप्यात रोहिणीताईंनी स्थानिक हॅाटेल तसेच परिसरात होणाऱ्या प्रदर्शनातून मध विक्रीला सुरुवात केली.  उद्योगाला मिळाली गती  मधमाशीपालनासाठी रोहिणीताईंना दैनिक अॅग्रोवनमधील माहितीचा चांगला उपयोग झाला. याचबरोबरीने माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, वडील तसेच मधुगंध शेतकरी महिला गटातील सुर्वणा पाटणकर, जयश्री बनसोडे, शोभा कदम, रेखाताई पाटील, शीलादेवी पाटणकर, उज्ज्वलादेवी पाटणकर, सविता पाटील, नीलिमा शेडगे, भारती सुतार, शशीकला हदवे, संध्या शिंदे, शोभा कदम तसेच खादी ग्रामोद्योग, कोयना अॅग्रो इंडस्ट्रीजमधील तज्ज्ञांची चांगली मदत मिळाली. रोहिणीताई परिसरातील शेतकऱ्यांकडे मधमाशीपालनाबाबत मार्गदर्शनासाठी जातात. रोहिणीताईंच्या मधमाशीपालन उद्योगाला इंग्लंड, ऑस्ट्रलियातील पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. मधाचे उत्पादन वाढविण्यासाठी रोहिणीताईंनी मेलीफेरा मधमाशीच्या ७० पेट्या मागविल्या आहेत. या पेट्या राजस्थान, गुजरात येथील मधपाळांकडे ठेवून मधाचे संकलन होणार आहे. मधमाशीपालनातील कार्याबद्दल त्यांचा `पॉवर वूमन' या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

फॉरेस्ट हनी’ ब्रॅंन्डने विक्री  बाजारपेठेत मधाला चांगला दर मिळण्यासाठी ब्रॅंडिंग, पॅकिंग महत्त्वाचे होते. रोहिणीताईंनी मध उद्योगाची एफएसएसएआय मध्ये नोंदणी करून घेतली. साठवणूक कालावधी वाढविण्यासाठी रोहिणीताई कोयना अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये मधावर प्रक्रिया करून घेतात. बाजारपेठेत गुणवत्तापूर्ण मधाची वेगळी ओळख तयार होण्यासाठी ‘फॅारेस्ट हनी’ हा ब्रॅंन्ड तयार केला. यासाठी ऐश्वर्यादेवी पाटणकर यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. बहुतांश मध हा जंगल परिसरातून गोळा होत असल्याने चव आणि गुणवत्ताही चांगली आहे. त्यामुळे आपोआप ग्राहकांच्याकडूनही मधाला मागणी वाढू लागली. रोहिणीताई गुगल साथीचे काम करत असल्याने त्याचाही फायदा मधाचा प्रचार आणि विक्रीसाठी होतो. रोहिणीताई भीमथडी, मानिनी जत्रेमध्येदेखील मधाची विक्री करतात. २०१८ मध्ये ७० पेट्यांच्यामधून त्यांना सहाशे किलो आणि २०१९ मध्ये ६० पेट्यांच्यामधून पाचशे चाळीस किलो मध मिळाला. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन बाजारपेठेमध्ये ५०० ग्रॅम मध बाटली चारशे रुपये आणि २०० ग्रॅम मध बाटली दोनशे रुपये या दराने विकली जाते. वर्षभरातील मधविक्रीतून त्यांना दीड लाखाचा नफा होतो.     मधमाशीपालन करताना वसाहत तयार करणे अवघड जाते. अशा शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी रोहिणीताई मधमाशांची वसाहत असलेल्या पेट्या तयार करून देतात. ही पेटी देताना संबंधित शेतकऱ्यांना राणीमाशी तर इतर मधमाशांचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. प्रत्येक पेटीसाठी साधारणपणे पाच हजार रुपये घेतले जातात. 

व्यवसायाचे नियोजन

  • सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात मधमाश्‍यांची वसाहत.
  • जानेवारीत जंगलात पेट्या ठेवल्या जातात.
  • पेट्या सावलीत ठेवल्या जातात. स्वच्छतेवर भर.
  • मधमाशी पेटीस मुंग्या लागू नये यासाठी योग्य काळजी.
  • जंगल परिसरात पेट्या ठेवल्यामुळे सेंद्रिय मधाचे उत्पादन. 
  • फेब्रुवारी, एप्रिल महिन्यात पेटीतील मधाचे संकलन.
  • परिसरातील दहा ते बारा गावातून मधमाश्‍यांच्या वसाहतींची निर्मिती.
  • मधमाशा गोळा करण्यापासून ते वसाहतीच्या विक्रीपर्यंतचे नियोजन. 
  • - रोहिणी पाटील, ७५८८६८५७३७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com