Agriculture Agricultural News Marathi success story of rural women development by BAIF, Nashik | Agrowon

सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘नवजीवन’

मुकुंद पिंगळे
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि कुटुंबीयांना पुन्हा सक्षमपणे उभे करण्यासाठी वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘बाएफ’ संस्थेच्यावतीने २०१६ साली ‘नवजीवन प्रकल्प’ राबविण्यास सुरवात झाली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि कुटुंबीयांना पुन्हा सक्षमपणे उभे करण्यासाठी वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘बाएफ’ संस्थेच्यावतीने २०१६ साली ‘नवजीवन प्रकल्प’ राबविण्यास सुरवात झाली. समाजशील घटकांच्या माध्यमातून निधी उभारून ‘बाएफ’ने कुटुंबाची गरज ओळखून फळबाग लागवड, सिंचन आणि प्रासंगिक मदत दिल्याने महिलांच्या आयुष्यात ‘नवजीवन’ घडले आहे.

सातत्याने नापिकी, कर्जाचा बोजा आणि नैसर्गिक आपत्तीचे प्रश्न गंभीर आहे.या परिस्थितीला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. मात्र यामुळे त्यांचे कुटुंब उघडे पडले. अशा कुटुंबांना प्रशासन आणि काही दानशूर व्यक्ती  मदत करतात. मात्र ती त्यांना उभारी देण्यासाठी पुरेशी नसते. २०१६ साली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना मदत वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या मदतीचे वाटप वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. किराणा साहित्य, साडी चोळी असे मदतीचे स्वरूप होते. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर विनायकदादांना एक गोष्ट अस्वस्थ करून गेली की, समाजाकडे करुणा आहे, गरजू घटकांना मदत करण्याची इच्छा आहे, मात्र तिचे स्वरूप व्यवहार्य नाही. ज्या गोष्टीमुळे तिचा कुटुंब प्रमुख गेला, तर या मदतीने हे कुटुंब पुन्हा उभे राहणार का?  अशा कुटुंबांची गरज ओळखून जर शेतीसंबंधी मदत केली, तर हे कुटुंब आर्थिकदृष्टया नव्याने उभे राहू शकते. यासाठी विनायकदादा हे ‘बाएफ’ संस्थेचे विश्वस्त या नात्याने पुढे आले. शाश्वत व दीर्घकालीन विकासाची योजना आखून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी ‘नवजीवन प्रकल्प’ हाती घेतला. अशा कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवून आत्मसन्मान मिळवून देण्याचा हा प्रकल्प पथदर्शी ठरला 
आहे.
शेतकरी आत्महत्या झालेली प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतात.त्यांची यादी विनायकदादांनी मिळविली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समितीने शेतकरी आत्महत्या म्हणून मान्यता दिलेल्या नावांची यादी केली. अशा शेतकऱ्यांच्या थेट घरी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या कारणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्यांच्या पत्नीची भेट घेऊन पार्श्वभूमी समजून घेतली. जून २०१६ पासून या प्रकल्पाच्या कामाला सुरवात झाली. सुरवातीला ३८ आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेटी देण्यात आल्या. स्वतः विनायकदादा पाटील, बाएफ संस्थेचे राज्य मुख्य कार्यक्रम समन्वयक सुधीर वागळे आणि कार्यक्रम अधिकारी(कृषी) राहुल जाधव यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबत दौरे केले. यातून प्राधान्य क्रमाने कुटुंबाची निवड करून सुरवातीला १५ लाभार्थी कुटुंब निश्चित  करण्यात आली. २०१७ मध्ये २५ कुटुंबांना भेटी देऊन त्यापैकी गरजू १५ कुटुंबाची पुन्हा निवड करण्यात  आली.  
 निवड झालेल्या लाभार्थी कुटुंबाची गरज आणि मागणीनुसार फळबाग लागवड, सिंचन स्रोत उभारणी किंवा परिस्थितीजन्य मदत करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी प्रकरणनिहाय प्रत्येकी एक लाख रुपयांचा लक्ष्यांक ठेऊन मदतीचे धोरण ठरले. फळलागवडीमध्ये लिंबू, शेवगा, पेरू, डाळिंब, सीताफळ असा कोणताही एक पर्याय देण्यात आला. ज्या कुटुंबाकडे  सिंचन सुविधा नाही, त्यांना विहीर किंवा कूपनलिका देण्याचे निश्चित झाले.तर काही महिलांना द्राक्ष बागेसाठी मंडप उभा करून देण्यात आला. यामध्ये तालुकानिहाय कुटुंबांची निवड  (मालेगाव-१५ , येवला-२, निफाड-२, सटाणा-८, देवळा-१ चांदवड-२) करण्यात आली.

      स्थानिक पातळीवर निधी उभारणी 
प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रत्येकी एक लाख असा तीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. यासाठी विनायकदादांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना उभारी देण्यासाठी लाभार्थी निवड केलेल्या स्थानिक तालुक्यात मदतीचे आवाहन केले. त्यास तत्काळ प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी पिंपळगाव कांदा व्यापारी असोसिएशन, लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक(लासलगाव),अशोक बनकर पतसंस्था(पिंपळगाव बसवंत), व्यंकटराव हिरे नागरी सहकारी पतसंस्था(येवला), या संस्थांसह सरोजताई पाटील, भास्करराव बनकर, सुनील भुतडा,शिवनंदा इलेक्ट्रॉनिक्स,भगवती गॅस वितरक, दर्शन शेवाळे यांनी मदतीचा हात पुढे केला. यातून २५ लाखांपर्यंत मदत जमा झाली. ‘बाएफ’संस्थेने स्वनिधीतून पाच लाख रुपये देऊ केले. यामुळे भांडवल उपलब्ध होताच, प्राधान्याने निवड झालेल्या कुटुंबाला मदत देण्यास सुरवात झाली.

     प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात 
 क्षेत्र भेटीचा अहवाल आणि भौगोलिक परिस्थितीनुसार कुटुंबाची मागणी विचारात घेण्यात आली.त्यामध्ये फळबागेची मागणी अधिक होती. फळबाग लागवड पूर्व माती परीक्षण, फळ जाताची निवड करताना शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतून रोगविरहीत रोपे, कलमांची मागणी नोंदविली. लागवडीसाठी खड्डे खोदणे, खत मात्रा, सूक्ष्म सिंचन प्रणालीची जोडणी अशी कामे करण्यात आली. यासाठी संस्थेतील कृषी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. उपलब्ध पाण्याच्या योग्य वापराचे नियोजन करून आत्महत्याग्रस्त कुटुंबास एक एकर शाश्वत फळबाग करून देण्यात आली. तर काही ठिकाणी मागणीनुसार विहीर आणि कूपनलिका करून दिली.

महिला झाल्या तंत्रज्ञानाभिमुख
फळबाग लागवड झाल्यानंतर  महिलांना पीक पद्धतीबाबत मार्गदर्शन, सिंचनाचे अचूक व्यवस्थापन, उत्पादन व उत्पन्न वाढ, काढणी पद्धती, काढणी पश्चात तंत्रज्ञान, हाताळणी आणि प्रतवारी, विपणन कौशल्य असे मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे महिला प्रयोगशील आणि आर्थिकदृष्टया सक्षम झाल्या. 

प्रत्यक्ष मदतीचे स्वरूप

  • प्रकल्पांतर्गत शेवगा, डाळिंब, पेरू, लिंबू लागवड.
  • सिंचन स्रोत उपलब्ध नसलेल्या कुटुंबांसाठी विहीर व कूपनलिका खोदणी.  
  • पीक लागवड ते काढणीपर्यंत सर्व पीक खर्चासह व्यवस्थापन.
  • सिंचन स्रोत उपलब्ध नसलेल्या ठिकाणी फळबागांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा खर्च वितरित.

केल्याने होत आहे रे

विनायक दादांनी हयातीत “केल्याने होत आहे रे” ही हाक देत शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना आधार देऊन स्वावलंबी बनविण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी या महिलांची लेकीप्रमाणे चौकशी करून अडचणी सोडविण्यावर भर दिला. या मदतीतूनच त्या जिद्दीने उभ्या राहून त्यांना नवजीवन मिळाले. आता या महिला शेतीमालाच्या विक्रीतून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागल्या आहे. मुलांचे शिक्षण, कुटुंब खर्च, आरोग्य आदि खर्चिक बाबी मिळालेल्या उत्पन्नातून पूर्ण होत आहेत.   जिरायती शेतीला पर्याय देत फलोत्पादन पद्धती संरक्षित पाण्यातून शक्य झाली. ज्या महिलांनी कधी व्यवहार केला नव्हता, त्या पीक काढणी करून विक्रीचे व्यवहार शिकून आर्थिक साक्षर झाल्या आहेत. योग्य बचत व आर्थिक नियोजनाचे ज्ञान त्यांना आले आहे.  शासन,दानशूर व्यक्ती यांनी अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतल्यास तणावाखाली असलेले शेतकरी आणि त्यांच्या पश्चात कुटुंबाला मदत केल्यास असे सामाजिक प्रश्न सोडविण्यास यश येईल, असा आशावाद विनायकदादा नेहमी व्यक्त करत असत.

बायफचा निरंतर  संपर्क आणि मार्गदर्शन 
मदत केली अन प्रकल्प संपला असे नाही. तर अजूनही लागवडीपश्चात मार्गदर्शनासाठी संस्थेचे कृषी तज्ज्ञ शेतावर भेट देतात. हंगामनिहाय विविध टप्प्यांवर अडचणी आल्यास तांत्रिक मार्गदर्शन केले जाते.  बायफ संस्थेच्या अधिकारी आश्लेषा देव यांनी महिला आणि त्यांच्या कुटुंबाच्या नेहमी संपर्कात राहून मानसिक आधार देण्याचे काम केले आहे.
 

उत्पन्नात झाली वाढ...
  एक एकर शेतात खाण्यापुरती बाजरी व्हायची. त्यामुळे पिण्यासाठी पाणी अन कामासाठी भटकावे लागे. आता शेतामध्ये कूपनलिका झाल्यामुळे लाखांपर्यंत पीक उत्पन्न गेले आहे.डोक्यावरील कर्ज गेले,दवाखाना, मुलांचे शिक्षण करता येत आहे. आता घरच्या शेतीमध्ये वर्षभर काम असते.

-श्रीमती संगीता ज्ञानदेव पवार, लाभार्थी (वळवाडी, ता.मालेगाव,जि.नाशिक)

डाळिंब लागवडीतून प्रगती...
पती गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले. सिंचनाची सोय होती. पैसा नसल्याने काहीच करता येत नव्हते. मात्र नवजीवन प्रकल्पातून एक एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड झाली. त्यामुळे आता मोठा आर्थिक आधार मिळून कुटुंबाची जबाबदारी पार पाडता येत आहे.
-श्रीमती मनिषा संदीप भगत, (लाभार्थी, मुखेड,ता.येवला,जि.नाशिक)
 

- राहुल जाधव,९४२३०६६००५,

(कार्यक्रम अधिकारी(कृषी),बाएफ, नाशिक) 
 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर महिला
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
आरोग्यदायी द्राक्ष द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित...
काकडीवर्गातील आरोग्यदायी झुकिनीझुकिनी ही कुकुरबीटासी कुळातील असून, खरबूज,...
आरोग्यदायी किवी फळकिवी  हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड...
आरोग्यदायी हळद मिश्रित दूधहळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते...
पूरक उद्योगातून महिला गट झाला सक्षमग्रामीण भागातील महिलांना योग्य प्रशिक्षण,...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
टार्गेट ठेवूनच करतेय शेतीपतीची बॅंकेत नोकरी असल्याने बदली ठरलेली. त्यामुळे...
सविताताईंनी जिद्दीने ठरविले की लढायचेपतीचे हृदविकाराने झालेले निधन, डोक्यावर सात...
कणेरीच्या ‘सिद्धगिरी’ने बनवले महिलांना...कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशाजळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे) या दुर्गम आदिवासी...
तेलनिर्मिती उद्योगात तयार केली ओळखसांगली शहरातील सौ. सुजाता विठ्ठल चव्हाण यांनी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...