नोकरीसोबतच जपली शेतीची आवड

वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सम्राट मेश्राम यांनी लहानपणापासूनची शेतीची आवड केवळ जोपासलीच नाही, तर त्यात आमूलाग्र बदल केले. सोनाळा (ता. जि. अकोला) येथील वडिलोपार्जित सहा एकर कोरडवाहू शेती सिंचनाची सोय करत बागायती केली. पीक पद्धतीमध्ये बदल, बांधावर सागाची लागवड यासोबत येत्या हंगामापासून रेशीम शेतीचे नियोजन त्यांनी केले आहे.
Samrat Meshram working in field
Samrat Meshram working in field

वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सम्राट मेश्राम यांनी लहानपणापासूनची शेतीची आवड केवळ जोपासलीच नाही, तर त्यात आमूलाग्र बदल केले. सोनाळा (ता. जि. अकोला) येथील वडिलोपार्जित सहा एकर कोरडवाहू शेती सिंचनाची सोय करत बागायती केली. पीक पद्धतीमध्ये बदल, बांधावर सागाची लागवड यासोबत येत्या हंगामापासून रेशीम शेतीचे नियोजन त्यांनी केले आहे.  

सोनाळा (जि.अकोला) येथील  मेश्राम कुटुंबीयांची पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती.  अर्जुन मेश्राम यांची मुले सम्राट आणि संघेश हे  शिक्षण घेत असताना शेतीत कमी अधिक कामे करून त्यांना मदत करत. या कामातूनच सम्राट यांना शेतीची गोडी लागली. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यातून त्यांना वनखात्यात नोकरी लागली. गेल्या बारा वर्षापासून वनखात्यामध्ये नोकरी करताना विविध जिल्ह्यामध्ये बदल्या होत गेल्या. सध्या सिपना वन्यजीव विभाग सीमाडोह येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. नोकरीचे ठिकाण हे गावापासून पावणेदोनशे किलोमीटर अंतरावर आहे. तर संघेश सध्या सैन्यदलामध्ये नोकरीला असून, त्यांचे पोस्टिंग आसाममध्ये आहे. त्यातल्या त्यात जवळ असल्यामुळे सम्राट यांनी घरची सहा एकर शेती विकसित करण्याचे ठरवले. कोरडवाहू शेतीतून पीक उत्पादन आणि उत्पन्नाची शाश्वती नसते. त्यामुळे प्रथम सिंचनाची सोय करण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी पंचायत समिती स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून अनुदानित विहीर खोदली. या विहिरीला अवघ्या ३० फुटांवर चांगले पाणी लागले. पिकांना पाणी देण्याचे कष्ट कमी करण्यासाठी त्यांनी स्प्रिंकलरचा वापर सुरु केला.

बदलली पीक पद्धती कोरडवाहू शेतीत केवळ सोयाबीन, तूर लागवड असायची. सिंचनाची सोय झाल्यापासून खरिपात सोयाबीन, मूग, ज्वारी आणि रब्बीमध्ये गहू, हरभरा लागवड सुरु केली. या वर्षी कांदा लागवड केली होती. कांदा साठवणुकीसाठी शेतात २५ टन क्षमतेची चाळ उभारली. त्यासाठी ७० हजार रुपये खर्च आला. गावातील प्रगतिशील शेतकरी, कृषी विषयक पुस्तके, ॲग्रोवनमधील लेखाचे वाचन यातून  त्यांनी पीक व्यवस्थापन सुरू केले. तसेच आत्मा अंतर्गत ११ शेतकऱ्यांचा एक उत्पादक गट बनविला आहे. त्या माध्यमातून तज्ज्ञांच्या भेटी, कृषी विषयक प्रदर्शनाला हजेरी, रोग व कीड नियंत्रणाबाबत मोबाईलवर संदेश, नवीन जाती, विक्री व्यवस्थापन असे अनेक फायदे होत असल्याचे सम्राट यांनी सांगितले. त्यातही आवश्यक त्या सुधारीत जाती मिळवून लागवडीचे प्रयत्न सुरू केले.  यावर्षी त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या डॉ. भरत गिते यांच्या मार्गदर्शनानुसार डब्ल्यूएसएम-१०९-४ या गहू जातीची लागवड केली. गहू अतिशय उत्तम असून मोठ्या प्रमाणात त्याला फुटवे व ओंब्या लागल्या आहेत. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या सोयाबीनच्या जातीचे त्यांनी एकरी १० क्विंटल उत्पादन मिळविले. सम्राट मेश्राम शेतीच्या नियोजनासाठी महिन्यातील दोन ते तीन सुट्ट्यांमध्ये गावी येतात. शेतीतील कामांचे नियोजन करतात. शेतीचे दैनंदिन व्यवस्थापन वडील अर्जुन मेश्राम हे सांभाळतात. त्‍यांना भावाचा मुलगा शेती कामात मदत करतो. सौर कृषीपंपाचा आधार विहिरीला पाणी लागले तरी भारनियमनामुळे कृषीपंपासाठी विजेचा पुरवठा हा एक मोठा प्रश्‍न होता. यावर मार्ग शोधताना त्यांनी सौरपंपासाठी अर्ज केला. अर्ज देऊनही बरेच महिने काम प्रलंबित होते. शेवटी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत प्रलंबित अर्जाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. परिणामस्वरूप यंत्रणा हलली. त्यानंतर १५ दिवसात पाच अश्वशक्तीचा सौरपंप बसविण्यात आल्याचे सम्राट मेश्राम सांगतात.  दिवसभर सिंचनाचे काम सुरु राहते. संपुर्ण सहा एकर शेती आता ओलिताखाली आली आहे.

जमीन सुपीकतेवर भर मेश्राम यांची वडिलोपार्जित असलेली सहा एकर जमीन ही हलक्या ते मध्यम स्वरूपात मोडते. दगड, मुरमाचेही प्रमाण बरेच आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी या वर्षी परिसरातील प्रकल्पातील गाळ टाकण्याचे नियोजन केले आहे. रब्बी पिकांची काढणी होताच मुरमाड जमिनीत गाळ मिसळण्याचे नियोजन केले आहे. त्याचा पीक वाढीसाठी फायदा होईल.

पीक व्यवस्थापन बदलाचा प्रयत्न

  • सम्राट यांचे पारंपरिक पिकांच्या तुलनेमध्ये सुधारीत किंवा नवीन पिकांना प्राधान्य असते. सहा एकर क्षेत्रापैकी काही क्षेत्रामध्ये आगामी महिन्यात तुती लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षणसुद्धा घेतले आहे. रेशीम शेती करणाऱ्या अन्य शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आहे.
  •  सहा एकर शेताच्या बांधावर सर्वत्र सागाची लागवड केली आहे. स्वतः वनपरिक्षेत्र अधिकारी असल्याने त्यांना झाडांच्या संवर्धनाची आवड आहे. भविष्यात त्यातून चांगली रक्कम मिळण्याचीही अपेक्षा आहे. 
  •  येत्या काळात शेतात वेगवेगळी फळझाडे लावण्याचे त्यांचे नियोजन आहे.
  • प्रगतीकडे वाटचाल

  • सुरुवातीला पावसावर आधारीत शेती करीत असल्याने खरिपात सोयाबीन एकरी पाच ते सहा क्‍विंटल उत्पादन मिळायचे. आता नवीन जाती व व्यवस्थापनात सुधारणा केल्याने सोयाबीन उत्पादन  दहा क्विंटलपर्यंत पोहोचले. 
  • तुरीचे पीक एकरात दोन ते अडीच क्विंटल व्हायचे. आता चार ते पाच क्विंटलचा उतारा.
  • मूग उत्पादन एकरी दोन क्विंटलवरून साडेतीन क्विंटलपर्यंत नेण्यात यश. 
  • रब्बीत गहू व हरभरा पिकाचीही उत्पादकता वाढवता आली. यंदा नवीन जातीच्या वापरामुळे गव्हाचे  एकरी उत्पादन १६ क्विंटल. 
  •  हरभऱ्याचे एकरी उत्पादन चार ते सहा क्विंटलवरून ८ क्विंटलपर्यंत. हंगामात गरजेच्यावेळी सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने ही उत्पादन वाढ. 
  • पारंपारिक पिकांसोबत भाजीपाला, कांदा लागवडीचे नियोजन.
  • -  सम्राट मेश्राम, ९४२१९५६५१४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com