तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग

खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी संदीप बबन कांबळे यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार सेंद्रिय पद्धतीने भात, भाजीपाला लागवड आणि थेट ग्राहकांना विक्री करत उत्पन्नवाढीचा चढता आलेख ठेवला आहे.
Sandip Kamble in rice field
Sandip Kamble in rice field

खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी संदीप बबन कांबळे हे सुधारित भात शेतीबरोबर रब्बी हंगामात भाजीपाला पिकांचे चांगले उत्पादन घेत आहेत. बाजारपेठेच्या मागणीनुसार सेंद्रिय पद्धतीने भात, भाजीपाला लागवड आणि थेट ग्राहकांना विक्री करत कांबळे यांनी उत्पन्नवाढीचा चढता आलेख ठेवला आहे.  

कोकणात काही शेतकरी पीकलागवड पद्धतीमध्ये बदल करून शाश्वत उत्पन्न वाढीचा चांगला प्रयत्न करत आहेत. या प्रयोगशील शेतकऱ्यांच्यापैकी एक आहेत, खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील शेतकरी संदीप बबन कांबळे. खानू गावात कांबळे यांची सुमारे आठ एकर जमीन आहे. दरवर्षी खरिपात दोन एकरावर भात आणि रब्बी हंगामात भाजीपाला पिकांची लागवड करतात. उर्वरित क्षेत्रात साग, काजू आणि चंदन लागवड आहे.   पीकपद्धतीमध्ये बदल  कांबळे यांनी भात उत्पादनवाढीसाठी लागवड तंत्रात बदल केला. याबाबत कांबळे म्हणाले की, मी भाताचे घरचेच बियाणे वापरतो. दरवर्षी एक एकर लाल भात, २० गुंठे काळा भात आणि २० गुंठे परंपरागत गावठी भात जातींची लागवड असते. गादीवाफ्यावर रोपवाटिका करतो. बी पेरणीपूर्वी गादीवाफ्यात कंपोस्ट खत, भात तुसाची राख मिसळतो. त्यामुळे रोपांची जोमदार वाढ होते. रोपे कणखर होतात. रोपांची पुनर्लागवड १५ सें.मी. बाय २५ सें.मी. अंतरावर करतो. चिखलणीच्या वेळी भात पेंढा आणि ग्लिरीसिडीयाचा पाला आणि कंपोस्ट खत मिसळतो. रासायनिक खताचा वापर करत नाही. पीकवाढीच्या टप्प्यात दशपर्णी अर्क आणि गोमूत्र अर्काची फवारणी करतो. लाल भाताचे एकरी सरासरी १५ क्विंटल, २० गुंठ्यांत काळ्या भाताचे ६ क्विंटल आणि गावठी जातीचे २० गुंठ्यांत ७ क्विंटल उत्पादन मिळते. मी ग्राहकांना लाल तांदूळ ८० रुपये, काळा आणि गावठी तांदूळ १०० रुपये किलो या दराने थेट विक्री करतो. भात शेतीमध्ये खर्च वजा जाता ५० हजारांचा नफा मिळतो.

मिश्र पीकपद्धतीवर भर

  • भात कापणी झाल्यावर ऑक्टोबर महिन्यात कांबळे सेंद्रिय पद्धतीने रब्बी पिकांचे नियोजन करतात. या पिकांसाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. 
  • भात पिकानंतर २० गुंठे क्षेत्राची नांगरणी करून ६ फूट बाय ६ फूट अंतरावर आळी तयार करून कंपोस्ट खत मिसळले जाते.
  • प्रत्येक आळ्यामध्ये गोलाकार पद्धतीने कुळिथाचे ५ दाणे, दोन्ही बाजूला सहा इंचावर पावट्याच्या दोन बिया आणि कोकण वालीच्या तीन बियाणांची टोकण.
  • आळी सोडून मोकळ्या जागेत गावरान वांगे आणि मिरचीची प्रत्येकी १०० रोपांची लागवड. 
  •  कुळीथ, पावटा, वाल ही तिन्ही पिके आळ्यामध्ये जवळ असल्याने सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी जोमाने वाढतात. कुळीथ हे पीक जमिनीवर पसरते. त्यामुळे आपोआप आच्छादन तयार होते. पावटा पीक कुळथापेक्षा थोडे उंच वाढते. आळ्यामध्ये वाळलेल्या फांद्या रोवून (शिरी) त्यावर वालाचे वेल चढवले जातात.
  • आळ्यातील पिकाला ठिबक सिंचनाने दिवसातून एकदा चार लिटर पाणी दिले जाते. 
  •     कुळीथ जमिनीवर, पावटा थोडा वर आणि फांद्यांच्या आधारे वालाचे वेल चढवले गेल्याने कमी जागेत तिन्ही पिकांची चांगली वाढ होते. शेतातील मोकळ्या जागेत वांगे आणि मिरचीच्या रोपांची जोमदार वाढ होते. त्यामुळे संपूर्ण क्षेत्र पिकांनी झाकले जाते. त्यामुळे बाष्पीभवन कमी होते, जमिनीत ओलावा टिकून राहतो. 
  • सेंद्रिय खतांचा वापर केल्याने पिकांची जोमदार वाढ होते. तसेच ठरावीक दिवसांनी दशपर्णी अर्क आणि गोमूत्र अर्काची फवारणी केल्यामुळे पिके चांगली वाढतात. आळ्यात कुळथाच्या पाल्याचे आच्छादन.
  • उत्पादनाचे गणित  पीक उत्पादनाबाबत कांबळे म्हणाले की, ऑक्टोबर महिन्यात कुळीथ, पावटा आणि वाल लागवड होते. लागवडीनंतर ६० व्या दिवशी कुळिथाचे ५० किलो उत्पादन मिळते. साधारणपणे ९० व्या दिवशी पावट्याच्या शेंगा तयार होतात. त्याचे ६० किलो उत्पादन मिळाले.  साधारणपणे ४५ व्या दिवसापासून वालास शेंगा येण्यास सुरुवात होते. वाल शेंगांची एक जुडी १० रुपयांना जाते. पहिले दोन महिने दररोज वालीच्या शंभर जुड्यांची विक्री होते. मार्चनंतर मात्र दर पाच दिवसांनी शंभर जुड्यांची विक्री होते. माझे घर पाली बाजारपेठेच्या मुख्य मार्गालगत असल्याने गाडी उभी करून दररोज ग्राहकांना थेट विक्री करतो. डिसेंबर ते एप्रिलअखेरपर्यंत भाजी विक्री असते. गावरान कुळीथ १०० रुपये किलो, पावटा १०० रुपये, वांगी आणि मिरची ३० रुपये प्रति किलो दराने थेट विक्री होते. सर्व बियाणे घरचे आहे. दैनंदिन शेती व्यवस्थापनात मला पत्नी श्वेताली, आई मीनाक्षी यांची मदत होते. शेतीमध्ये आम्ही घरचेच राबतो, त्यामुळे मजूर लागत नाही. त्यामुळे खर्च वजा जाता पाच महिन्यांत सरासरी एक लाखाचा नफा मिळतो.   

    वाढविली जमिनीची सुपीकता

     कांबळे यांनी जमीन सुपीकतेवर भर दिला आहे. याबाबत ते म्हणाले की, मी शेणखत, कंपोस्ट खत आणि वेस्ट डीकंपोजरचा वापर करतो. सेंद्रिय खतांमुळे जमीन भुसभुशीत झाली. उपयुक्त जिवाणू वाढले. जमिनीत ओलावा टिकून राहिला. याचा फायदा पिकांच्या चांगल्या वाढीसाठी होतो.

    तंत्रज्ञानाचा प्रसार

    संदीप कांबळे यांचे शेती प्रयोग पाहण्यासाठी महिला बचत गट, शेतकरी गट येतात. विविध पीक प्रयोग राबविण्यासाठी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी आरिफ शहा, आत्माचे प्रकल्प संचालक जी. बी. काळे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांचे मार्गदर्शन मिळते. कांबळे यांनी झारखंड, राजस्थान तसेच भूतान, नेपाळ येथे अभ्यास दौरा केला आहे. सेंद्रिय शेतीसाठी त्यांनी आत्माअंतर्गत खानू गावामध्ये ४५ शेतकऱ्यांचा इको फ्रेंडली शेतकरी गट तयार केला आहे. सेंद्रिय शेतीसाठी पीजीएस प्रमाणीकरण केले आहे. हे शेतकरी ‘खानू खजाना‘ या ब्रॅण्ड नेम ने उत्पादनांनी ग्राहकांना विक्री करतात. 

    - संदीप कांबळे, ९३५९५२६०८८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com