Agriculture Agricultural News Marathi success story of Sanjay Salve, Telhara,Dist.Akola | Agrowon

प्रयोगशील शेतीतून पीक बदल

गोपाळ हागे
रविवार, 28 जून 2020

नोकरीच्या निमित्ताने संजय साळवे यांना गाव सोडावे लागले. परंतु शेतीच्या आवडीतून त्यांनी नोकरी असलेल्या तेल्हारा तालुक्यात (जि. अकोला) पाच एकर जिरायती शेती घेतली. टप्प्याटप्प्याने ही शेती बागायती केली. केळी, हळदीच्या शेतीला पशूपालनाची जोड देत आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा साळवे यांनी प्रयत्न केला आहे.

नोकरीच्या निमित्ताने संजय साळवे यांना गाव सोडावे लागले. परंतु शेतीच्या आवडीतून त्यांनी नोकरी असलेल्या तेल्हारा तालुक्यात (जि. अकोला) पाच एकर जिरायती शेती घेतली. टप्प्याटप्प्याने ही शेती बागायती केली. केळी, हळदीच्या शेतीला पशूपालनाची जोड देत आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा साळवे यांनी प्रयत्न केला आहे.

महसूल विभागाचा गाव पातळीवरील प्रतिनिधी म्हणून तलाठी ओळखला जातो. या पदावर गेल्या २० वर्षांपासून नोकरी करीत असलेले संजय सोपानराव साळवे यांनी शेतीत प्रयोगशिलता जोपासली आहे. शेतीत पारंपरिक पिकांऐवजी फलोत्पादन, नगदी पिके घेण्याकडे त्यांचा कल आहे. सोबतच पूरक म्हणून दुग्धव्यवसाय जोपासल्याने यशस्वी शेतीचे एक मॉडेल उभे राहिले आहे. संजय साळवे हे मूळचे वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीरचे. येथे त्यांची वडिलोपार्जीत शेती होती. नोकरीच्या निमित्ताने त्यांना गाव सोडावे लागले. सध्या साळवे हे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे स्थायिक झाले. शेतीची आवड असल्याने त्यांनी गावाकडील शेती विकून तेल्हारा-ममदाबाद शिवारात पाच वर्षांपूर्वी पाच एकर जिरायती शेती विकत घेतली. शेती व्यवस्थापनासाठी दोन कायमस्वरूपी मजूर ठेवले आहेत. त्यांच्या रहाण्याची सोयदेखील शेतामध्ये केली आहे. दर शनिवार, रविवार साळवे मजुरांच्याबरोबरीने पुढील आठवड्यातील शेतीचे नियोजन करतात.

शेताची केली बांधबंदिस्ती 
ममदाबाद शिवारातील पाच एकर शेतीच्या मध्यभागी पाट होता. त्यामुळे जास्तीचा पाऊस झाला की, माती वाहून जात होती. हा पाट सरळ करण्यासाठी साळवे यांनी पहिल्यांदा शेतीची शास्त्रीय पद्धतीने बांधबंदिस्ती केली. हलक्या जमिनीत ४०० ट्रॉली गाळाची माती मिसळली. जमिनीचे सपाटीकरण केले. त्यामुळे पाच एकरात पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली. शाश्वत पाणी व्यवस्थापनासाठी त्यांनी कूपनलिका घेतली. यास चांगले पाणी लागले. पहिल्या टप्प्यात साळवे हे सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांची लागवड करत होते. परंतु आता पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे केळी आणि हळद लागवडीस सुरुवात केली. शेती नियोजनात संजय यांना त्यांचे बंधू संदीप यांची मदत होते. ते नोकरीच्या निमित्ताने बुलडाणा जिल्‍ह्यात कृषी विभागामध्ये कार्यरत आहेत.

जमीन सुपीकतेवर भर

गाय, म्हशी, बैल जोडीच्या संगोपनामुळे 
शेतीला पुरेश्या प्रमाणात शेणखताची उपलब्धता होते. शेणखताच्या साठवणुकीसाठी मोठा खड्डा खोदलेला आहे. या खड्ड्यात शेण आणि शेतातील काडीकचरा वर्षभर भरला जातो. वर्षभरानंतर यातील खत जमिनीत मिसळले जाते. यामुळे पोत वाढला आहे. त्याचा केळी आणि हळद उत्पादनवाढीला फायदा होत आहे. 

पीक बदलाला सुरुवात 
कूपनलिकेमुळे शाश्वत पाण्याची सोय झाल्याने संजय साळवे यांनी दोन वर्षांपूर्वी पीक बदलाला सुरुवात केली. याबाबत ते म्हणाले की, आमचा भागातील जमीन केळी, हळद पिकासाठी चांगली समजली जाते. त्यामुळे परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन केळी आणि हळद लागवडीबाबत सविस्तर माहिती घेतली. दोन वर्षांपूर्वी मी केळी लागवडीस सुरुवात केली. या पिकाला ठिबक सिंचन केले आहे. त्यामुळे वाढीच्या टप्प्यानुसार विद्राव्य खतांचा वापर केला जातो. एकात्मिक खत व्यवस्थापनावर मी भर दिला आहे. त्यामुळे शिफारशीनुसारच रासायनिक खतांचा वापर करतो. गेल्यावर्षी मला २८ ते ३० किलोचे घड मिळाले. केळीची व्यापाऱ्यालाच विक्री केली जाते. खर्च वजा जाता चांगला नफा या पिकातून मिळतो. यंदाही घडांची चांगली वाढ झालेली आहे. 
   मागील दोन वर्षांपासून मी दोन एकरावर हळदीच्या सेलम जातीची लागवड करत आहे. गेल्यावर्षी मला दीडशे क्विंटल उत्पादन मिळाले. पहिलेच पीक असल्याने उत्पादनात थोडी घट आली. याची हळकुंडे तयार करून ठेवली आहेत. दर कमी असल्याने पावडर तयार करून थेट ग्राहकांना विक्रीचे नियोजन केले आहे. यंदा लागवड आणि व्यवस्थापनात बदल करून पीक उत्पादन वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. 

नियोजनातून शेती प्रगती 

तलाठी पदाची नोकरी ही सतत जनसंपर्क असणारी आहे. त्यातही अनेकांकडे विविध गावांचा पदभार असतो. संजय साळवे यांच्याकडे दानापूरसारख्या मोठ्या गावाचा पदभार आहे. तसेच तहसील कार्यालयातील कामांमुळे शेतीमध्ये दररोज जाणे होत नाही. यासाठी दर आठवड्याला रविवारी ते मजुरांशी चर्चा करून पुढील नियोजन करतात. शेतात कोणते पीक लावायचे, खत व्यवस्थापन, जनावरांचे व्यवस्थापन, शेतमाल तसेच दूध विक्रीचे नियोजन केले जाते. गरजेनुसार प्रयोगशील शेतकऱ्यांची ते भेट घेतात. नोकरीत संजय साळवे यांचा नावलौकीक आहे. सध्या कार्यरत असलेल्या गावातून त्यांची काही काळापूर्वी दुसरीकडे बदली झाली होती. त्या वेळी गावकऱ्यांनी साळवे यांनाच गावात पुन्हा नेमणूक द्या यासाठी पाठपुरावा केला आणि गावात आणले. जनसंपर्क आणि प्रयोगशीलता जपत त्यांनी शेती विकासाचे नियोजन केले आहे. 

समाज माध्यमांचा वापर

शेतीचा प्रत्यक्ष अनुभव नसला तरी समाज माध्यमांचा वापर करून साळवे यांनी शेतीमध्ये प्रयोगशीलता जपली आहे. काही महिन्यापूर्वी त्यांनी यू ट्यूबवर शेळी पालन, कुक्कुटपालनाची यशोगाथा बघितली. त्यानुसार त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर शेळीपालन, कुक्कुटपालनास सुरुवात केली. यासोबतच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून पीकपद्धतीत टप्प्याटप्प्याने सुधारणा केली जात आहे. नोकरी सांभाळत शेती करीत असल्याने काही वेळा पुरेसे लक्ष देता येत नाही. याचा कधी कधी पीक उत्पादनावर परिणाम होत असतो. यामुळे शेती आणि पूरक व्यवसाय यांची योग्य सांगड घालून आर्थिक नियोजनावर त्यांनी भर दिला आहे.

चारा पिकांची लागवड 
दुभत्या म्हशींना वर्षभर सकस हिरवा चारा वर्षभर मिळावा, यासाठी अर्धा एकर शेतात साळवे यांनी हंगामानुसार आलटूनपालटून चारा पिकांची लागवडीचे वेळापत्रक बनविले आहे. यामुळे जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळतो. सकस चाऱ्यामुळे जनावरांची दूध देण्याची क्षमता कायम राहिली आहे. सकस चाऱ्यासोबतच दुभत्या जनावरांना पशुखाद्य योग्य प्रमाणात सकाळ-संध्याकाळी दिले जाते. हिरवा, कोरड्या चाऱ्याची कुटी करून दिल्याने चाऱ्याचीदेखील बचत होते.

पशुपालनाची शेतीला जोड 
तेल्हारा शहरापासून काही अंतरावर संजय साळवे यांची शेती आहे. शहरी भागातील दुधाची मागणी लक्षात घेऊन साळवे यांनी पशुपालनाची जोड दिली. सध्या त्यांच्या गोठ्यामध्ये ५ म्हशी आणि एक गीर गाय आहे. सध्या दररोज २५ लिटर दूध संकलन होते. तेल्हारा शहरात एका व्यक्तीच्या माध्यमातून दुधाचे रतीब घातले जाते. गाय, म्हशीच्या व्यवस्थापनासाठी साळवे यांनी दोघांना पूर्णवेळ रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यापैकी एकजण शेतातील घरात राहून जनावरांचे व्यवस्थापन पहातो. इतरवेळी वेळच्या वेळी मजुरांच्या माध्यमातून कामे करून घेतली जातात. मजुरांना राहण्यासाठी शेतातच निवास व्यवस्था केली. जनावरांच्या खाद्य साठवणुकीसाठी शेतात छोटे गोदाम बांधले आहे. दूध विक्रीतून शेतातील वर्षभराच्या मजुरीचा खर्च मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसेच शेतीलाही पुरेशे शेणखत उपलब्ध होत असल्याने सुपिकता वाढीस मदत होत आहे. साळवे यांनी सध्या प्रायोगिक तत्त्वावर देशी कोंबड्या, शेळीपालनास सुरुवात केली आहे. सध्या त्यांच्याकडे १० कोंबड्या आणि तीन शेळ्या आहेत. शेळी, कोंबड्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. येत्या काळात म्हशींची संख्या मर्यादित ठेऊन शेळ्यांची संख्या वाढविण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.

- संजय साळवे, ९६५७४९४०४६

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...